नवीन लेखन...

नितळ

आज सकाळपासूनच जयंतरावांच्या घरात गडबड चालू होती. त्याला कारणही तसंच होतं. त्यांच्या एकुलत्या एक कन्येला, शिल्पाला पहायला पाहुणे येणार होते. त्यांनी सकाळी अकराची वेळ दिली होती. जयंतराव व त्यांच्या पत्नी सुषमा यांनी आपल्या लाडक्या परीला, शिल्पाला आवरायला सांगितलं..

जयंतराव नुकतेच बॅंकेच्या नोकरीतून निवृत्त झाले होते. पस्तीस वर्षांच्या नोकरीतील कालावधीत त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. सुषमानेही त्यांच्या सुख-दुःखात गृहिणीचं कर्तव्य बजावत, भक्कम साथ दिली होती. शिल्पाच्या आगमनाने त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला होता..

शिल्पा लहानपणापासूनच हुशार होती. तिचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण चालू असताना तिने अभ्यासाबरोबरच इतरही कला अवगत केलेल्या होत्या. त्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तिने अनेक पारितोषिके व प्रमाणपत्रं मिळविली होती.

तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच तिला बॅंकेत नोकरी मिळाली. तिला कॅश काऊंटरचं काम असल्यामुळे, रोजच अनेक खातेदारांशी तिचा संपर्क येत असे. नोकरीला सहा महिने होत असताना, एक दिवस ‘तो’ तिच्या काऊंटरसमोर येऊन उभा राहिला. त्याने पे स्लीप व कॅश तिच्यापुढे ठेवली. ती पे स्लीपवरच्या रकमेचा आकडा व कॅश टॅली करु लागली. टिकमार्क करता करता तिच्या लक्षात आलं की, दोन हजारांची एक नोट जादा आली आहे. तिनं ती नोट परत देण्यासाठी स्लीपवरचं नाव वाचून ते पुकारलं, ‘शैलेश जोशी..’ तो लगेच काउंटरवर घाईने आला. शिल्पानं त्याला नोट परत केली व शिक्का मारुन स्लीपची काऊंटर फाईल दिली. तो ‘थॅंक्यू, मॅडम!’ म्हणेपर्यंत रांगेतील आजोबा, पुढे आले व शिल्पा पुन्हा कामात व्यस्त झाली.

त्या दिवशी बॅंक सुटल्यावर ती घरी जायला निघाली, तर बॅंकेच्या फाटकाशी शैलेश, त्याच्या अॅक्टिव्हासह उभा होता.‌ तिला अडवत तो म्हणाला, ‘सकाळी मला तुमचे आभार मानता आले नाहीत, आता मी बोलू शकतो का?’ शिल्पाला काही सुचेना. तो पुढे म्हणाला, ‘तुमची तयारी असेल तर, आपण चहा घेऊयात.’ मग ते दोघे शेजारी असणाऱ्या हाॅटेलमध्ये गेले. चहा घेता घेता, एकमेकांनी आपली ओळख करुन घेतली.

शैलेशचा स्वतःचा व्यवसाय होता. बॅंकेजवळच त्यानं छोटं ऑफिस थाटलं होतं. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. शैलेश कॅश भरण्यासाठी, कधी चेकबुकसाठी बॅंकेत येत होता व काही ना काही कारणानं, शिल्पाला भेटत होता.

जयंतराव शिल्पासाठी स्थळं पहात होते. काही वधुवर सूचक केंद्रात, त्यांनी तिचे नावही नोंदविलेले होते. सहा महिन्यांच्या शैलेशच्या गाठीभेटीनंतर, एक दिवस शैलेशनेच तिला विचारले, ‘मी तुझ्याबद्दल घरी सांगितले आहे, त्यांची मान्यता आहे. तू घरी माझ्याबद्दल बोलली आहेस का?’ शिल्पाने ‘आज सांगते’ असं त्याला सांगितलं..

रात्री जेवण झाल्यावर शिल्पाने आधी आईला, शैलेशबद्दल सविस्तर सांगितले. आईने जयंतरावांच्या कानावर ही गोष्ट घातली. दोघांनीही विचार करुन, शिल्पाला होकार दिला व शैलेशच्या आई-वडिलांना घरी येण्याचं निमंत्रण द्यायला सांगितलं.

दुसऱ्याच दिवशी बॅंक उघडल्या उघडल्या शैलेश काऊंटर समोर उभा!! शिल्पाकडून काय घडलं ते ऐकायला, तो आतुर झाला होता. शिल्पानं आई-वडिलांची मान्यता सांगितली व एखाद्या रविवारी घरी येण्याचं निमंत्रण दिलं. एवढ्यात तिला मॅनेजर साहेबांनी बोलावलं म्हणून ती उठून त्यांच्या केबिनमध्ये गेली. शैलेशने हवेत तरंगतच, आईला फोन लावला व शिल्पाला पहायला जाण्याचा दिवस, नक्की करायला सांगितले.

त्यानंतरच्या पुढच्याच रविवारी शैलैशने आम्ही सकाळी अकरा वाजता येऊ, असे शिल्पाला सांगितले. तो दिवस आज उजाडला होता..

अगदी वेळेवर शैलेश व त्याचे आई-वडील आले. जयंतरावांनी त्यांचं स्वागत केलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. थोड्याच वेळात शिल्पा कांदेपोहे, ट्रेमध्ये घेऊन आली. शैलेशच्या आईने तिला काही प्रश्न विचारले, त्याची तिनं हुशारीने उत्तरं दिली. नंतर चहा झाला. शैलैशच्या आई-वडिलांना, जयंतरावांनी फ्लॅट फिरवून दाखवला. शैलेशची आई, सारखी जयंतरावांकडे पाहते आहे हे सुषमाने ताडलं होतं. तासाभराने ती मंडळी निघून गेली.

सोमवारपासून शिल्पाचं रुटीन पुन्हा सुरु झालं. आता जयंतराव व सुषमा, शैलेशच्या घरुन येणाऱ्या होकाराची वाट पाहू लागले. शैलेशची बॅंकेतही एकही चक्कर झाली नाही. शिल्पाला वाटलं, तो कुठेतरी कामाच्या व्यापात असेल.

दोन दिवसांनंतर शैलेश बॅंक सुटल्यावर तिला भेटला. पहिल्या भेटीत ज्या हाॅटेलात बसले होते, त्याच टेबलवर ते दोघे बसले. शैलेश गप्प होता. शिल्पाने त्याला खोदून विचारल्यावर तो बोलू लागला, ‘शिल्पा, तू मला व माझ्या आई-वडिलांना एकदम पसंत आहेस. तुझ्यासारखी मुलगी मला लाखांतही शोधून सापडणार नाही.’ शैलेश पुन्हा गप्प झाला. ‘मग अडलंय कुठं?’ शिल्पानं काकुळतीला येऊन विचारलं. शैलेश म्हणाला, ‘अगं सगळं ओके आहे, फक्त एकच ‘प्राॅब्लेम’ आहे.. तो म्हणजे तुझ्या बाबांच्या मनगटावर असलेला पांढरा डाग!’ शिल्पाच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला आठवलं त्याची आई, त्या दिवशी सारखी बाबांच्या हाताकडे पहात होती.. शिल्पा पर्स घेऊन उठली व तडक बाहेर पडली. शैलेश तिच्यामागे ‘ऐकून घे..’ म्हणत विनवू लागला..

शिल्पाने घरी आल्यावर घडलेला प्रसंग आई-बाबांना सांगितला. दोघेही दिग्मूढ झाले. शिल्पाला शैलेशचा अतिशय संताप आला होता. त्याने विश्वासात घेऊन तिला विचारायचं तरी होतं.. हा आई-वडिलांसारखा पुराणमतवादी असेल, अशी तिला पुसटशी कल्पना देखील कधीही आली नव्हती..

त्या जयंतरावांच्या मनगटावरच्या डागाची घटना, तिच्यासमोरच पाच वर्षांपूर्वी घडलेली होती. तिच्या वाढदिवसाला जयंतरावांनी सुषमाला स्वयंपाकात मदत म्हणून पुऱ्या तळायला घेतल्या होत्या. त्यावेळी एक पुरी उकळत्या तेलाच्या कढईत सोडताना, तेल त्यांच्या मनगटावर उडाले.. क्षणार्धात त्या जागेवर मोठा फोड आला. सुषमानं बर्नाल लावलं. संध्याकाळी डाॅक्टरला दाखवलं.. त्या दिवसाच्या आनंदावर विरजण पडलं.

पंधरा दिवसांनी ती जखम बरी होऊ लागली. महिन्यांनंतर तेथील खपली निघाल्यावर पांढरा डाग दिसू लागला. जयंतरावांनी अनेक उपाय करुनही, तो डाग काही गेला नाही. कुणी विचारलं तर जयंतराव त्यामागची हकीकत सांगायचे. नंतर स्वतः जयंतरावांनी त्या डागाबद्दल विचार करणं, सोडून दिलं होतं..

तोच डाग, आता मुलीच्या लग्नात ‘अडथळा’ ठरला होता. शिल्पाला मॅनेजर साहेबांनी गेल्याच महिन्यात दुसऱ्या शाखेत जाणार का? असं विचारलं होतं. त्यावेळी तिनं शैलेशचा विचार करुन नकार दिला होता, आता मात्र तिने त्यांना भेटून होकार दिला. कारण तिला आता शैलेशशी संपर्क नको होता..

शैलेशने फोन केला तरी तिने तो घेतला नाही. व्हाॅटसअपवर त्याने मेसेज टाकले, तरी तिने ते पाहिले नाहीत. शेवटी त्याने तिला वाटेत गाठलेच. शिल्पाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले, ‘शैलेश, तू माझा विचार सोडून दे. तुझ्या आईच्या म्हणण्यानुसार तू वागत असशील तर मला ते पटणार नाही. तुझं स्वतःचं असं काहीच मत नाही का? तुम्हा पुरुषांना पत्नी कशी ‘नितळ कांती’ची गोरीपान हवी असते, मात्र तिच्या अंगावर असलेला एक डागही, नकार द्यायला पुरेसा असतो.. आणि उद्या तुला बाबांच्या त्या, मनगटावरच्या डागामागची खरी गोष्ट सांगितली तरी तुझा त्यावर विश्वास बसणार आहे का? एवढं रामायण घडल्यावरही तुझ्याशी लग्न केलंतरी मी, तू दिलेल्या ‘नकाराचं कारण’ नाही विसरु शकत.. आणि माझीही, त्या उपकाराच्या ओझ्याखाली आयुष्यभर घुसमट होत राहील..’ शिल्पानं गाडी स्टार्ट केली व ती निघून गेली…

शैलेश हताश होऊन, मान खाली घालून चालू लागला…

© सुरेश नावडकर.

मोबाईल :९७३००३४२८४

१४-८-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..