नवीन लेखन...

निळ्या डोळ्यांचा जादूगार !

त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे उत्कट पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश, धीरगंभीर, वरवरचे, अस्सल असे सारे प्रणयाचे, रोमँटीझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत फक्त भव्योदात्त पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा माणूस आपला खेळ संपवून गेला. फार कमी लोकांच्या दृष्टीला असे उत्तुंग वरदान असते आणि फार कमी लोकांमध्ये पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते.

राजचे यशस्वी पोत निरखत असताना प्रकर्षाने आढळते- त्याचे व्यक्तिमत्व ! पुरुषी सौंदर्याचा अभिजात नमुना वाटतो तो ! बघताक्षणी शब्दशः त्याच्या प्रेमात पडण्यावाचून गत्यंतर नसते. नर्गीसचे नाकेले पुरुषी सौंदर्य राजच्या साच्यात त्यामुळेच एकरूप झाले असावे. (आणि त्याच्या कर्तृत्वाच्या बहराचा पाया झाला असावं. त्याला प्रेरणा देणारं चिरस्थायी कारंजं बनलं असावं. आणि प्रेमासारखा दुसरा संजीवक पाऊस असूच शकत नाही.

राज नशीबवान नव्हता- पित्याने घरटं नाकारून त्याच्या पंखांपुढे त्याचं स्वतःचं अथांग आकाश नेमून दिलं. या आव्हानाचा रस पिऊन राजने बघता बघता इथे कलेचा हिमालय उभा केला. या अर्थाने तो स्वयंभूच ! निर्माता,दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, संगीताचा कान असलेला हा माणूस प्रत्येक रूपात स्वतःचे ठसेच ठसे उमटवून गेला. चित्रमाध्यमावर इतकी भक्कम पकड फक्त या माध्यमावरील “आतल्या ” भावनेतूनच असू शकते. या माध्यमाला एक कलात्मक परिमाण बहाल करणं, एक व्यावसायिक उंची देणे यापरतं दुसरं ध्येय त्याच्या डोळ्यांनी स्वीकारलंच नाही.

त्याच्या यशाचा अभ्यासक आणखी एका मुद्याचा परामर्श घेतल्याविना पुढेच जाऊ शकत नाही – त्याची माणसे ! अब्बास, शैलेंद्र, हसरत जयपुरी , शंकर-जयकिशन, मुकेश आणि लता ही सारी आभाळाएवढी माणसं, किंबहुना प्रत्येकजण म्हणजे त्या त्या नावाचे आभाळच. या सगळ्यांचे एकत्र येणे यासारखा महिमा दुसरा नाही. प्रत्येकाने आपापले “बहर ” त्याला दिले, आणि राज त्यातून एकेक ताजमहाल बांधत गेला.

राजच्या चित्रपटात प्रत्येक कलावंत किती वेगळा आणि खराखुरा,ताजा वाटतो. स्वतःचे कलारंग अस्सलपणे उधळताना जाणवतो. ही राजची छाप त्यांच्यातून उणीच करता येत नाही. तोच कलाकार इतर चित्रपटांमधून फिका,निस्तेज वाटतो. प्रत्येकाचं आतलं सर्वस्व काढून घेऊन त्याने कलाकारांचे शिल्प सजीव केले. त्याच्या परिसस्पर्शाची झळाळी लेऊन कितीतरी कलादेह इथे चिरंतन होऊन गेलेत.

राजकपूर ही खरंतर एक संस्थाच ! निर्विवाद अधिराज्य करणारी, पूर्णतेचा ध्यास घेणारी. कोठलीही तडजोड न करणारी. तो स्वतःच एक पांढरा रुपेरी पडदा होता – बाह्यतः सारं काही मिरविणारा, पण आतमध्ये कुठेतरी खोलवर एक धुमसत्या कलागुणांचा ज्वालामुखी घेऊन हिंडणारा ! “जोकर ” च्या नेमक्या अपयशापाशीच खरंतर राज कपूर संपला. हे मरण जिव्हारी बाळगत त्याने ” बॉबी “, ” सत्यम शिवम ” सारखी आपल्या पराभवाची थडगी बांधली.

तो जाणार हे त्याच्या महिन्याभराच्या दवाखान्यातील वास्तव्याने अबोलपणे सांगितले. “लिविंग लिजेंड ” च्या शेवटाने आमचे डोळे खळाळून रडले. त्या अर्थाने रडविणारा हा पहिलाच विदूषक ! मनावर धरण बांधत आम्ही पुन्हा एकदा नियतीपुढे हरणारी करूणा भाकली. मात्र त्याच्या जाण्याने मनाचे हे सर्व बांधकाम कोसळले.

आता मागे उरल्या – ” तोहफा ” टाईप कळशा, निर्विकार पडदा आणि रिकाम्या खुर्च्या !
आणि हो, असे कितीतरी भारंभार विषण्ण लेख !!

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 40 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर नऊ पुस्तके ( ६ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..