नवीन लेखन...

नवरंगी साड्या – संस्कृती की मार्केटिंग ?

नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं. पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले.

मन सहाजिकच भूतकाळात गेले. आई आजी कडे होत्या का एवढ्या साड्या आणि त्या ठेवायला मोठे वॉर्डरोब. घरात एक दोन कपाटं, त्यातले १-२ कप्पे मिळायचे. त्यात ५-६ नेहेमीचे कपडे,२-४ ठेवणीतले. त्यात नऊ रंगाचे कपडे मिळणं केवळ अशक्य.
नवरात्रीतला भोंडला, सोसायटी/गल्लीतला रोजच्या कपड्यातला गरबा, अष्टमीला देवीचे दर्शन ह्या कशालाच पैसे लागत नसतं पण आनंद, भक्तीभाव, उत्साह हमखास असे.

कदाचित वर्तमानपत्रवाल्यांना नवरात्रीच्या स्पेशल पुरवणीसाठी मोठ्या मोठ्या जाहिराती मिळत असतील. जाहिरातदारांना नवरात्रीच्या आगे मागे सेल लावून भरमसाठ नफेखोरी होत असेल. बरंच मोठं अर्थकारण असल्याशिवाय गोष्टी येवढ्या पसरत नाहीत. बरं ह्यात समाजाचे सगळे स्तरही सामावले जात नाहीत.

गमती गमतीत सुरू झालेल्या ह्या गोष्टी कधी गरज बनुन त्याच्या चालीरीती बनतील आणि पुढे धार्मिक रुढी /परंपरा होतील आणि सगळ्यात स्तरातील लोकांना वेठीस धरतील हा विचार टोकत रहातो. हा लघुलेख मी दोन वर्षांपूर्वी लिहिलेला. यावर खूप मतमतांतर त्यावेळी वाचायला मिळाली. राग लोभ सगळंच प्रकट झालेलं.

या दोन वर्षात बहुदा जग अजूनच बदललं म्हणजे मला ते जाणवलं ( कदाचित बऱ्याच उशिराने असावं). एकेका रंगांचे कपडे हे प्रकरण माझ्या समजुतीप्रमाणे फक्त नवरात्रीपुरतं मर्यादित होतं. पण आता आता समजतंय की कोणत्याही विशिष्ट समारंभांना, फोटो काढायच्या वेळेलाही एकाच रंगाचे, थाटाचे किंवा धाटणीचे वस्त्र किंवा पेहराव असावा ह्याचा आग्रह. म्हणजे पूर्वी चुकून जरी एकाच रंगाचे कपडे घातले तर बॅंडवाले म्हणून चिडवतील अशी भीती वाटण्याचा काळ जाऊन आता तेच “In” झालय.

अशा सुंदर एकसारख्या सजलेल्या (बहुतांशी ) जणींचा उत्साह, उरक आणि आनंद (अगदी फोटो पुरता किंवा त्या समारंभापुरता का असेना) मोहून टाकतो. कदाचित त्या क्षणापुरत तुमचेही मन प्रफुल्लित करतो. मग एक-दोन दिवस त्यावर चर्चा, फोटोंची देवाण घेवाण यात जातात. मुख्य (?)म्हणजे सोशल मीडियावर झळकतात. नकळत, फारशा उत्सुक नसलेल्याचंही त्यात खेचलं जाणं हे सगळं ओघाने आलच.

काही लोकं या साऱ्याला न भुलता त्यांच्या विचारांशी ठाम राहून, गुंतुनी गुंत्यात न पडता तटस्थ राहू शकतात. तर माझ्यासारखे काठावरचे, ज्यांच्या बुद्धीला तर हे एक सारखे रंग, पेहेराव, (जे बहुदा घरात नसल्यामुळे) ते जमविताना होणारी दमछाक, यातायात, त्यासाठी लागणारा अनाठायी वेळ, व्यय आणि शक्ती काहीच पटत नसणारे, पण त्यांचे मन मात्र वरच्या उत्साही लोकांचा उत्साह बघून, आनंद बघून नकळत बुद्धीशी फारकत घेऊ बघते.

आणि मग त्यांच्या उत्सवात सामील होऊन घरी आल्यावर परत बुद्धी वरचढ होऊन मनाला मत करते. एकरंगी, एकरूपी पेहराव हे आजकाल मूलतः ज्या सोशल मीडिया साठी घेतले जातात त्या FB, Insta आणि Whatsapp चा कर्ताकरविता, जो ह्या सगळ्या लोकांच्या एंगेजमेंट वर अब्जावधी पैसे कमावतो तो मात्र रोज एकाच रंगाचे कपडे घालतो कारण त्याच म्हणणं रोज कोणते कपडे घालायचे हे ठरविण्यात वेळआणि क्रयशक्ती वाया जाते. किती विरोधाभास आहे, नाही? अगदी नैसर्गिकपणे सुटसुटीतपणे साजरे केलेले सण, साध्या कपड्यातले फोटो कमी आनंद देणारे असतात का? आधुनिक काळाकडे सरकत असताना आचार, विचार, आणि आहार स्वातंत्र्याचे पंख लेवून भरारी घ्यायचे अशावेळी आपणच आपल्यासाठि नवनवीन चौकटी बांधून त्यातच रमणार आहोत का? दरवर्षी सण आले की त्यावर विरजण पाडणारं कोणी लिहितच असाही एक आरोप होतो. पण कदाचित ह्या लाटेवर स्वार करणारे असतात तेव्हा कधी कोणाला त्याची मागची एखादी बाजू व्यक्त करावीशी वाटूच शकते की.

– प्रेरणा कुलकर्णी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..