नवीन लेखन...

नारळीकर आणि मराठी विज्ञान परिषद

डॉ. नारळीकर १९७२ मध्ये भारतात आले आणि लगेचच त्यांचे मराठी विज्ञान परिषदेबरोबर जे गहिरे नाते जुळले ते आजपर्यंत अबाधित आहे एव्हढेच नाही तर आता चांगलेच मुरले आहे. याच ह्रद्य नात्याच्या प्रवासाचा स्मरणरंजनात्मक आढावा घेतलाय या लेखात श्री. अ. पां. देशपांडे यांनी.


जयंतराव नारळीकरांना १९६४ सालीच संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळाली होती, आणि नंतर ते १९६५ मध्ये भारतात व्याख्यानांच्या दौऱ्यावर आले होते. पण, तेव्हा मराठी विज्ञान परिषदेचा जन्मही झाला नव्हता. नारळीकर १९७२ साली इंग्लंड सोडून भारतात वास्तव्यास आले आणि टीआयएफआरमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७३ सालच्या डिसेंबरमध्ये जालना येथे भरलेल्या आठव्या मराठी विज्ञान संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. जयंतरावांनी आपले अध्यक्षीय भाषण हातानेच लिहून
दिले होते.

या जालना संमेलनात त्यांच्या हस्ते ‘विज्ञान रंजन कथा स्पर्धे’ची बक्षिसे दिली गेली होती. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात आपणही अशा स्पर्धेत भाग घ्यावा, असे चमकून गेले असावे. शिवाय, ज्या फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केंब्रिजमध्ये पीएच.डी. केली; ते एक प्रसिद्ध विज्ञान कथा-कादंबरी-टीव्ही मालिका लेखक आणि विज्ञान चित्रपटकार होते. त्यांचा प्रभावही जयंतरावांवर होताच. १९७४ साली तळेगाव येथे डॉ. पां.वा. सुखात्मे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या नवव्या मराठी विज्ञान संमेलनानिमित्त जी ‘विज्ञान रंजन कथा स्पर्धा’ घेण्यात आली, त्यात नारायण विनायक जगताप यांची ‘कृष्णविवर’ ही कथा – भास्कर, टीआयएफआर कोलाबा, मुंबई ५ – या पत्त्यावरून आली होती. त्या स्पर्धेचे परीक्षक प्रा. भालबा केळकर आणि आनंद माधव लेले होते; आणि त्यांनी या कथेला पहिले बक्षीस दिले होते. दरम्यान, दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात जयंतराव व त्यांचे वडील प्रा. वि.वा. नारळीकर एका कार्यक्रमाला आले असता, त्यावेळचे मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह व संस्थापक श्री. म.ना. गोगटे हे जयंतरावांना भेटले होते. आणि त्यांनी जयंतरावांना विचारले होते की, ‘काय हो, तुम्ही राहता तेथे कोणी जगताप नावाचे गृहस्थ राहतात का? त्यांनी आमच्या स्पर्धेत कथा पाठवली असून, ती बक्षीसपात्र ठरली आहे.’ चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न दाखवता जयंतराव म्हणाले होते की, ‘कल्पना नाही, तेथे बरेच लोक राहतात.’

आदल्याच वर्षी अध्यक्षीय भाषण पाठवले असल्याने जयंतरावांचे हस्ताक्षर परिषदेला परिचित होते. त्यामुळे त्यांची कथा परिषदेकडे स्पर्धेसाठी आली, ती मंगलाबाईंच्या हस्ताक्षरात. शिवाय, नावही ओळखून त्याच्या दबावाने बक्षीस मिळाले असे होऊ नये; आणि खरा कस लागावा म्हणून जयंत विष्णू नारळीकर यांतील ‘जविना’ या आद्याक्षरांची उलटापालट करून, नाविज उर्फ नारायण विनायक जगताप या नावाने, त्यांनी ती कथा पाठवली होती. तिला पहिले बक्षीस मिळाल्याचे जगताप यांना परिषदेने कळवल्यावर, मग जयंतरावांनी त्याला लिहिलेल्या उत्तरात हा खुलासा केला होता. पण, त्याचबरोबर परिषदेकडून हा निर्णय कळवताना, हे बक्षीस आपण संमेलनात उपस्थित राहून स्वीकारावे, पण यासाठीचा प्रवास खर्च आपल्यालाच करावा लागेल, असे कळवले जात असे. परिषदेची तेव्हा असा खर्च देण्याची आर्थिक स्थिती नव्हती. याचा उल्लेख नंतर एक-दोन वेळा गमतीने जयंतरावांनी केला होता. मात्र नंतर १९९० सालाच्या सुमारापासून मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे पूर्वाध्यक्ष प्रा. डॉ. चिं श्री. कर्वे यांच्या नावे मिळालेल्या देणगीतून, कथा व निबंध स्पर्धेतील बक्षीसपात्र लोकांना प्रवास भाडे देत असे.

१९७४ पासून १९९१ पर्यंत जयंतरावांना मराठी विज्ञान परिषदेच्या विविध विभागांकडून व्याख्यांनासाठी आमंत्रणे येत व ते त्या-त्या ठिकाणी जात असत. यात एकदा ते छत्रपती शिवाजी स्थानकापासून कल्याणपर्यंत लोकल ट्रेनने आले होते. १९७८ साली चिंचणी-तारापूर येथे भरलेल्या तेराव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनातील त्यांच्या व्याख्यानाला, आजूबाजूच्या पंचक्रोशीतून तीन हजार लोकांचा समूह बैलगाड्या करून आला होता; आणि संमेलन स्थळाबाहेर  बैलगाड्यांचा तळ पडला होता.

१९८२ ते १९८८ अशी सहा वर्षे परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. भा. मा. उदगावकर होते. १९८८च्या जून महिन्यात प्रा. उदगावकर यांच्या ‘झर्लीना’ या मुंबईतील लिटल गिब्ज रोडवरील घरी मी आणि दुसरे कार्यवाह श्री. शरद नाईक, त्यांनी आणखी तीन वर्षे अध्यक्ष राहावे, हे सांगायला गेलो होतो. त्यावेळी ते म्हणाले, ‘आता दुसरे कोणीतरी शोधा.’ त्यावर ‘तुम्ही नाव सुचवा’, असे आम्ही म्हणालो. त्यावर त्यांनी जयंतरावांचे नाव सुचवले. मग आम्ही त्यांना म्हणालो, ‘आम्ही आत्ताच त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारतो. पण, काही कारणाने ते नाही म्हणाले तर आपण आणखी तीन वर्षे राहावे.’ हे त्यांनी मान्य केले. मग तेथून उठून आम्ही टीआयएफआरच्या कॉलनीतील ‘भास्कर’ इमारतीत गेलो व जयंतरावांना विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, ‘नुकतेच मी विद्यापीठ अनुदान मंडळाने केलेल्या विनंतीनुसार, पुण्याला खगोल भौतिकीची नवीन संस्था उभारण्याचे काम स्वीकारले असल्याने सध्या तीन वर्षे उदगावकरसरांनाच विनंती करा. आणि मी १९९१ साली, तीन वर्षांसाठी अध्यक्ष होईन.’ हे ऐकल्यावर परत आम्ही तेथून उठून प्रा. उदगावकरांकडे गेलो व त्यांना जयंतरावांचा हा निरोप दिला. त्यावर त्यांनी काहीही आढेवेढे न घेता, १९८८ ते १९९१ असे तिसऱ्या वेळेला तीन वर्षे अध्यक्ष राहायचे मान्य केले.

मग १९९१ साली जूनमध्ये जयंतरावांना ‘आता अध्यक्ष व्हा’ म्हणून विनंती केल्यावर, ते त्यांनी तत्काळ मान्य केले आणि ते अध्यक्ष झाले. मात्र परिषदेच्या इतिहासात त्यावेळी असे प्रथमच घडले की, परिषद मुंबईत आणि अध्यक्ष पुण्यात. पण, त्यांच्याशी फोनवरून सल्लामसलत चालत असे. मात्र ते न चुकता दरवर्षी एप्रिलमधील वर्धापनदिनी, ऑगस्टमधील वार्षिक सभेला आणि डिसेंबरमधील वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहत. फक्त १९९४ साली, जेव्हा त्यांची अध्यक्षपदाची तीन वर्षे संपत आली, त्यावेळी ते परदेशाला गेले होते, पण जाताना त्यांनी लिहिलेले पत्र त्या सभेत वाचून दाखवले होते.

ते अध्यक्ष झाल्याबरोबरचे पहिले संमेलन १९९१च्या डिसेंबरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे झाले होते. त्याच्या अध्यक्षा कर्करोग-संशोधक कमल रणदिवे होत्या. गडहिंग्लज येथील नगरपालिकेला संमेलन समितीने संमेलनाच्या खर्चासाठी देणगी मागितली असताना, त्यांनी एक अट घातली की, ‘आम्हांला जयंतरावांचा सत्कार करायचा आहे, त्यासाठी तुम्ही त्यांना येथे आणा, मग आम्ही तुम्हांला २५ हजार रुपयांची देणगी देतो.’ जयंतराव तर कुठे असे सत्कार स्वीकारत नसत. मग गडहिंग्लजकरांनी ती अवघड कामगिरी माझ्या गळ्यात घातली. जयंतराव गडहिंग्लजला आल्या-आल्या मी जयंतरावांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यावर ते मला म्हणाले, ‘तुम्हांला माझा नियम माहीत आहे.’ त्यावर मी म्हणालो, ‘तरी नियमाला मुरड घालून या विभागाचे संमेलन नीट व्हावे म्हणून, तुम्ही त्यांची ही मागणी मान्य करावी.’ त्यावर ते म्हणाले, ‘त्यांना दहा मिनिटांत कार्यक्रम उरकायला सांगा.’ तसे त्यांना सांगितल्यावर त्यांनी पंधरा मिनिटांत कार्यक्रम संपवला.

१९९२ सालचे संमेलन सोलापूरला झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष होते, प्रा. श्री. अ. दाभोलकर. या संमेलनानिमित्त रस्त्यावरून निघालेल्या दिंडीतही जयंतराव सामील झाले होते.

१९९३ सालचे, जयंतरावांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील शेवटचे संमेलन इस्लामपूरला झाले होते. त्याचे अध्यक्ष होते वसंतराव गोवारीकर. जयंतराव आणि वसंतराव दोघेही पुण्यातच राहणारे. मग जयंतरावांना विनंती केली की, तुमच्या गाडीतून तुम्ही वसंतरावांनाही आणावे. ते त्यांनी मान्य करून, ते दोघेही पुण्याहून इस्लामपूरला आले होते.

१९९४ सालच्या जुलै महिन्यात मी जयंतरावांना विनंती केली की, त्यांनी परिषदेचे विश्वस्त व्हावे. ते त्यांनी मान्य केले, पण जागा कुठे होती? त्यामुळे एका विश्वस्तांना राजीनामा देण्याची विनंती केली; आणि जयंतराव विश्वस्त झाले, ते आज २०२१ सालीही, म्हणजे गेली २६ वर्षे विश्वस्त आहेत. जयंतराव परिषदेचे विश्वस्त असणे, हा परिषदेचा सन्मान आहे.

जयंतराव यांचे नेहमी सांगणे असते की, विश्वस्त सभा एक तासाच्यावर चालवू नये आणि ५५ मिनिटे झाल्यावर ते मला खूण करतात. मीही तासाभरात सभा संपवतो. एखाद्या वेळी इतर विश्वस्तांना आणखी काही बोलायचे असेल तर सभा चालू राहते, पण जयंतराव एका तासाने निघून जातात. अगदी कोरोनाकाळामध्ये घेतलेल्या आभासी सभेपर्यंत हीच गोष्ट घडत आली आहे.

१९९१ साली परिषदेचा रौप्य महोत्सव साजरा करायचे ठरवले. त्या निमित्ताने १९९० सालापासून त्यावर विचार सुरू झाला व या रौप्य महोत्सवी वर्षात काय-काय कार्यक्रम घ्यावेत म्हणून अनेकांची मते घेतली. त्यावेळी जयंतरावांनी सुचविले की, १९७० पासून सुरू असलेल्या ‘विज्ञान रंजन कथा स्पर्धे’तील प्रथम क्रमांकाच्या कथांचे एक पुस्तक परिषदेने प्रसिद्ध करावे. त्याप्रमाणे, सगळ्या कथा जमा केल्या आणि पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनाच्या मधुकाका कुलकर्णी यांना विचारले असता, त्यांनी हे पुस्तक ‘विज्ञानिनी’ या नावाने प्रकाशित करायला मान्यता दिली. या पुस्तकाला मराठीतील प्रसिद्ध साहित्य-समीक्षक प्रा. डॉ. व.दि. कुलकर्णी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. नंतर ही आवृत्ती संपल्यावर ठाण्याच्या परममित्र प्रकाशनाने २०१३ सालापर्यंतच्या बक्षीसपात्र कथा ‘विज्ञानिनी भाग १’ आणि ‘विज्ञानिनी भाग २’ अशा दोन भागात छापल्या आहेत.

जयंतरावांनी कोणत्याही सभेत व्याख्यान दिले की, बरीच मुले व्याख्यानानंतर त्यांच्या सह्या मागायला येतात. त्यावेळी जयंतराव कोणाला सह्या न देता, त्यांना एका पोस्टकार्डावर विज्ञानातला कोणताही एक प्रश्न विचारायला सांगतात. पत्ता विचारल्यावर ते सांगतात, ‘जयंत नारळीकर, पुणे ७.’ मग अशा प्रश्नांना ते पोस्टकार्डावर उत्तर पाठवत, आणि त्या उत्तराखाली विद्यार्थ्यांना त्यांची सही मिळते. जयंतराव सांगतात, सगळेच विषय त्यांच्या अभ्यासाचे नसल्याने काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना काही पुस्तके वाचावी लागली आणि त्यांच्या ज्ञानात आपोआपच भर पडली. १९९५ साली मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. शरद नाईक यांनी जयंतरावांना विनंती केली की, अशी सगळी पत्रे आणि त्याची उत्तरे तुम्ही आम्हांला पाठवल्यास, आम्ही त्याचे एक पुस्तक तयार करू. मग जयंतरावांनी ती उत्तरे परत लिहून, सगळी कार्डे परिषदेकडे सुपूर्द केली आणि त्याचे प्रथम मराठीत, ‘पोस्टकार्डातून विज्ञान’ या नावे व नंतर ‘Science through Postcards’ या नावे इंग्रजीतून, अशा पुस्तिका तयार झाल्या; आणि त्याला खूप चांगली मागणी मिळाली.

२००९ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने जयंतरावांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार द्यायचे ठरवले. तेव्हा प्रतिष्ठानचे सरचिटणीस श्री. शरद काळे यांनी परिषदेला अशी विनंती केली की, पुरस्कार समारंभाच्या दिवशी दुपारी तीन ते पाच तुम्ही मुंबईच्या शाळांतील ३०० मुलांना जमवून, त्यांच्यात व जयंतरावात विज्ञान प्रश्नोत्तरे घडवून आणाल का? त्यासाठी येणारा सर्व खर्च प्रतिष्ठान करेल. त्याप्रमाणे ३०० मुलांना जमवून, त्यांच्याकडून मागवलेल्या प्रश्नांपैकी निवडक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. त्यातील दहा उत्तम प्रश्नकर्त्यांना त्यांचेच ‘आकाशाशी जडले नाते’ हे पुस्तक त्यांच्या सहीनिशी दिले. नंतर त्यांच्या या कार्यक्रमातील प्रश्नोत्तरांचे पुस्तक तयार झाले, त्यालाही चांगली मागणी होती. आता ती आवृत्ती संपली.

नारळीकर परिषदेचे अध्यक्ष असताना, परिषदेतील वरचा मजला बांधला जात होता. त्याचा खर्च १२ लाख + फर्निचर इत्यादी होता. त्यातील ५ लाख रुपये एस. एच. केळकर कंपनीने दिले होते. उरलेल्या ७ लाख रुपयांसाठी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी दोन हप्त्यात ७ लाख रुपये मंजूर केले. बाहेर आल्यावर लिफ्टपाशी जाताना जयंतराव मला म्हणाले, परिषदेसाठी पैसे जमवताना जिथे कुठे माझा उपयोग होईल असे तुम्हांला वाटते, त्या-त्या वेळी मला बोलवत जा, मी येत जाईन.

हे ७ लाख वसूल झाल्यावर १९९३ची मुंबई दंगल झाली आणि सुधाकरराव नाईक यांच्या जागी शरद पवार मुख्यमंत्री झाले. नंतर झालेल्या विश्वस्त सभेत, फर्निचर व इतर खर्चासाठी १० लाख रुपयांची गरज होती व नवीन मुख्यमंत्र्यांना ते मागायचे ठरले. पण, सभा झाल्यावर जयंतराव परस्पर विमानतळावर जाऊन, एक महिना परदेशी जाणार होते. तेव्हा ते मला म्हणाले, ‘देशपांडे, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा. ते लिहीपर्यंत मला थांबायला वेळ नाही. तुम्ही अंदाज करून लेटर हेडवर कुठपर्यंत तुमचे पत्र येणार व मी  कुठे सही करायची, ती जागा दाखवा. कोऱ्या लेटरहेडवर सही करून जयंतराव निघून गेले. मग मी आणि शरद नाईक यांनी दोन-तीन खर्डे बनवून, उपलब्ध जागेत काय बसेल ते पाहून, ते पत्र पुरे करून मुख्यमंत्र्यांना पाठवले. त्याला उत्तर म्हणून एक महिन्याने मुख्यमंत्र्यांकडून १० लाख रुपयांचा चेक आला. बरोबर कव्हरिंग लेटर नव्हते. मग मी जयंतरावांना कळवले की, ‘तुम्ही जे चांगदेवी पत्र (कोरे पत्र) लिहिले, त्याला दहा लाखांचा प्रतिसाद मिळाला.’

मराठीत विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या लेखकांचे मेळावे प्रथम पुण्यात, महात्मा फुले वस्तू संग्रहालयातर्फे श्री. निरंजन घाटे यांनी सुरू केले.  नंतरचे तीन मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केले. एक मुंबईत झाला. मग नारळीकरांनी एक आयुकात केला व तिसरा औरंगाबाद विद्यापीठात केला.

आयुकाच्या घटनेतील आठवे कलम – विज्ञान प्रसार करणे – असे नारळीकरांनी घातले असून, त्या अन्वये प्रत्येक वर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनी पुण्यातील शाळा आयुकाला भेट देतात, आणि त्यांच्यासाठी दोन-तीन व्याख्याने आयोजित केली जातात. त्यातील एक व्याख्यान नारळीकर स्वत: देतात, इतर व्याख्याने आयुकातील अन्य शास्त्रज्ञ देतात. नंतर आयुकात अरविंद गुप्ता येऊन ‘पुलत्स्य’ हे केंद्र सुरू झाल्यावर, दर आठवड्यात दोन-तीन शाळा येऊ लागल्या.

एकदा नारळीकरांनी मराठी विज्ञान परिषदेच्या स्थायी समितीची एक बैठक आयुकात घेतली होती, तर अलीकडे तीन वर्षांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेतील १५ जण आयुका आणि मुक्तांगण संशोधिका बघायला गेले असताना, आयुकात नारळीकरांची भेट घेतली होती.

नारळीकर १९९१ साली परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी परिषदेची गंगाजळी शून्य होती. पत्रिकेला फारशा जाहिराती मिळत नसत आणि देणग्यांचे प्रमाणही अत्यल्प होते. त्यामुळे आजीव  सभासदांची वर्गणीही शिल्लक पडली नव्हती. त्याचवेळी श्री. मोहन पटवर्धन हे परिषदेचे कोषाध्यक्ष झाले होते. तत्पूर्वी ते फुलफोर्ड फार्मास्युटिकल  कंपनीचे फायनान्स डायरेक्टर होते. गंगाजळी वाढवण्यासाठी त्यांनी एक योजना काढली. लोकांनी परिषदेला एक हजार रुपये पाच वर्षांसाठी बिनव्याजी कर्जाऊ द्यायचे. त्यावेळी व्याजाचा दर १३ टक्के होता. ज्या जनता सहकारी  बँकेत हे पैसे ठेवणार होतो, त्यांच्याशी पटवर्धनांनी बोलणे करून व्याजाचा दर एक टक्क्याने वाढवून घेतला. या व्याजदराने  पाच वर्षांत रक्कम  दुप्पट होणार होती. मग मिळालेल्या एक हजार रुपयांतील पाचशे रुपये त्या  व्यक्तीच्या नावे बँकेत ठेवले,  आणि त्याचे पाच वर्षांत एक हजार झाले. आणि उरलेले पाचशे रुपये परिषदेच्या नावे ठेवले. या रकमा कर्जाऊ देणाऱ्या व्यक्तींना  बँकेने हमीपत्र दिले की, पाच वर्षांनी आम्ही तुमचे एक हजार रुपये परत करू. त्यामुळे ओळखीचे लोक व त्यांचे मित्र, नातेवाईक रकमा देऊ लागले. त्यासाठी नारळीकरांना घेऊन मी धर्मादाय आयुक्तांकडे गेलो व अशा रकमा कर्जाऊ घेण्यासाठी त्यांची परवानगी मिळवली. पाच वर्षांनी कर्जाऊ रकमा देणाऱ्यांना परिषदेने पत्रे पाठवली की – आपली रक्कम पाच वर्षे पुरी झाल्याने आम्ही परत करू इच्छितो. ती  रक्कम १) आपल्याला परिषदेला देणगी द्यायची आहे का? २) ती रक्कम आपल्याला आणखी पाच वर्षे परिषदेकडे कर्जाऊ ठेवायची आहे का? ३) ती रक्कम आम्ही आपल्याला परत करावी का? – ही पत्रे मिळाल्यावर ३३ टक्के लोकांनी रकमा परिषदेला देणगी म्हणून दिल्या. आणखी ३३ टक्के लोकांनी आपापली रक्कम परत पाच वर्षांसाठी परिषदेला कर्जाऊ दिली आणि उरलेल्या ३३ टक्के लोकांनी रकमा परत मागितल्या. पण, ज्या ३३ टक्के लोकांनी रकमा परत मागितल्या, त्यांच्यातर्फे समाजात एक संदेश गेला की, परिषदेला दिलेली कर्जाऊ रक्कम परत मिळते. त्यामुळे आणखी लोकांनी परिषदेला रकमा कर्जाऊ दिल्या. या प्रकल्पातून परिषदेला २५ लाख रुपये जमवता आले. यासाठी काढलेल्या पत्रकावर सर्व विश्वस्तांच्या सह्या होत्या. त्यात प्रमुख सही नारळीकरांची होती.

नारळीकरांच्या जाहीर मुलाखती मी काही जाहीर समारंभात, आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर घेतल्या आहेत. २००२ साली पुणे दूरदर्शनसाठी मी नारळीकरांवर ६० मिनिटांचा एक माहितीपट बनवला आहे.

नर्म विनोदी आणि सौम्य स्वभावाच्या नारळीकरांच्या अशा अगणित आठवणी आहेत. सगळ्या लिहायच्या झाल्या तर संपूर्ण अंकच लागेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की नारळीकरांचे मराठी विज्ञान परिषदेवर आणि मराठी विज्ञान परिषदेचे नारळीकरांवर प्रेम असल्याने ते एक समीकरण झाले आहे.

— अ.पां. देशपांडे
विज्ञान प्रसारक
apd1942@gmail.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकाच्या एप्रिल २०२१ अंकामधून 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..