नवीन लेखन...

रहस्यमय मार्गिका…

वैश्विक किरण हे मुख्यतः शक्तिशाली विद्युतभारित कण असतात. हे कण म्हणजे विविध मूलद्रव्यांची केंद्रकं आहेत. विविध अवकाशस्थ वस्तूंतून उत्सर्जित होणारे हे कण पृथ्वीच्या दिशेनंही येतात. पृथ्वीवर पोचताच त्यांची वातावरणातील वरच्या थरांशी क्रिया होऊन, त्यातून म्यूऑन या ऋणभारित कणांची निर्मिती होते. हे म्यूऑन कण जेव्हा एखाद्या वस्तूतून प्रवास करतात, तेव्हा त्यांतील काही कण त्या वस्तूत शोषले जातात, तर काही कण त्या वस्तूतून पार होऊन पलीकडे जातात. कण शोषले जाण्याचं प्रमाण हे अर्थातच त्या वस्तूच्या आतल्या रचनेवर अवलंबून असतं. पिरॅमिडच्या बाबतीत, म्यूऑन कणांचं मापन करणारी उपकरणं त्या पिरॅमिडच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली जातात. या उपकरणांनी एखाद्या ठिकाणी म्यूऑन अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात शोषले गेल्याचं दाखवलं, तर त्या जागेच्या वरच्या बाजूस एखादी अज्ञात पोकळी असण्याची शक्यता असते. पिरॅमिडमधील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या अशा उपकरणांनी गोळा केलेल्या माहितीच्या विश्लेषणावरून, पिरॅमिडच्या अंतर्भागाची त्रिमितीय रचना समजू शकते. स्कॅनपिरॅमिड्स प्रकल्पाद्वारे केल्या जात असलेल्या संशोधनात, इतर तंत्रांबरोबरच वापरलं जात असलेलं हे तंत्र, संशोधनासाठी अतिशय उपयुक्त ठरलं आहे.

गिझा इथलं ‘ग्रेट पिरॅमिड’ हे सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी, इजिप्तमधील चौथ्या राजवटीच्या काळात, खुफू राजाचं थडगं म्हणून बांधलं गेलं. हे पिरॅमिड सुमारे १४० मीटर उंच असून, २३० मीटर रुंद आहे. या पिरॅमिडमधल्या महत्त्वाच्या जागांपैकी दोन जागा म्हणजे राजाची खोली आणि राणीची खोली. या दोन्ही खोल्या ‘ग्रँड गॅलरी’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका मार्गिकेनं जोडल्या आहेत. स्कॅनपिरॅमिड्स प्रकल्पाद्वारे २०१५ साली, या ग्रेट पिरॅमिडवरील संशोधनाला सुरुवात झाली. या संशोधनासाठी राणीच्या खोलीत म्यूऑन कणांची संख्या मोजणारी उपकरणं ठेवण्यात आली. म्यूऑन कण हे मुळातच अल्पायुषी असल्यानं, पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचणाऱ्या म्यूऑनची संख्या अल्प असते. त्यातही पिरॅमिडमधील विविध अडथळ्यांतून प्रवास करून उपकरणांपर्यंत पोचणाऱ्या म्यूऑनची संख्या आणखी कमी झालेली असते. त्यामुळे विश्लेषणाच्या दृष्टीनं पुरेशा म्यूऑनची नोंद होण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी मोजणी करावी लागते. परिणामी, खुफूच्या पिरॅमिडमधली ही निरीक्षणं तब्बल दोन वर्षं चालू होती. सुमारे दोन वर्षांनी, मिळालेल्या सर्व माहितीचं विश्लेषण केलं गेलं. आश्चर्य म्हणजे ग्रँड गॅलरीच्या वरच्या भागात किमान ३० मीटर लांबीची एक पोकळी अस्तित्वात असल्याचं या संशोधकांना दिसून आलं. जमिनीच्या पातळीपासून सुमारे २१ मीटर उंचीवर असणारी ही पोकळी कसली आहे, ते मात्र समजू शकलं नाही. कुनिहिरो मोरिशिमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन २०१७ साली ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं.

स्कॅनपिरॅमिड्स प्रकल्पाद्वारे अलीकडेच संशोधली गेलेली, ग्रेट पिरॅमिडमधली आणखी एक अज्ञात जागा म्हणजे या पिरॅमिडच्या उत्तरेकडच्या भागातील शेवरॉन मार्गिका. पिरॅमिडच्या उत्तरेकडील पृष्ठभागावर, पिरॅमिडच्या मूळच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस, उलट्या इंग्रजी V अक्षरासारखी एक रचना आहे – लष्करी गणवेशावरील शेवरॉन चिन्हासारखी दिसणारी. या शेव्हरॉन रचनेला लागूनच, आतील भागात एखादी पोकळी असल्याची शक्यता, २०१६ साली केल्या गेलेल्या काही निरीक्षणांतून दिसून आली होती. या पोकळीची लांबी किमान पाच मीटर असल्याचा निष्कर्ष तेव्हा काढला गेला होता. मात्र पुरेशा निरीक्षणांच्या अभावी या पोकळीचं स्वरूप स्पष्ट झालं नव्हतं. त्यानंतर सन २०१६ ते २०१९ या काळात म्यूऑन कणांच्याच मदतीनं या पोकळीचा तपशीलवार अभ्यास केला गेला. हा अभ्यास करण्यासाठी या शेवरॉन रचनेच्या खाली असणाऱ्या, पिरॅमिडच्या प्रवेशद्वाराजवळच्या एका मार्गिकेवर, तसंच जमिनीखालच्या एका खोलीत जाणाऱ्या मार्गिकेवर म्यूऑन कणांचं मापन करणारी उपकरणं ठेवून म्यूऑन कणांच्या नोंदी केल्या गेल्या. या विविध नोंदींंचं विश्लेषण केलं गेल्यावर या शेवरॉनच्या आतल्या बाजूस, एखाद्या मार्गिकेसारखी पोकळी असल्याचं नक्की झालं. सुमारे दोन मीटर उंची आणि दोन मीटर रुंदी असणाऱ्या या मार्गिकेची लांबी सुमारे नऊ मीटर इतकी आहे. या मार्गिकेला थोडासा उतार आहे – दोन अंशांहूनही कमी असणारा. स्कॅनपिरॅमिड्स प्रकल्पाच्या अंतर्गत सेबास्टिअन प्रोक्युरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे हे निष्कर्ष अलीकडेच ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत.

शेवरॉनला लागून असणाऱ्या या मार्गिकेसारख्या पोकळीचा शोध पुढे चालूच राहिला. टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ म्यूनिच या संस्थेतील संशोधकांनी या मार्गिकेचा, रेडिओलहरी आणि स्वनातीत ध्वनिलहरी वापरून पुढचा अभ्यास केला. बाहेरून सोडलेल्या रेडिओलहरी आणि स्वनातीत ध्वनिलहरी, या रचनेच्या आत शिरून कशा परावर्तित होतात वा विखुरल्या जातात, हे अभ्यासलं गेलं. यासाठी पिरॅमिडच्या बाहेरून, या शेवरॉनच्या जवळ लाकडी परांची बांधल्या गेल्या. त्यानंतर या परांचींच्या मदतीनं, मार्गिकेच्या बाहेरूनच विविध उपकरणांद्वारे हा अभ्यास केला गेला. या पद्धतींनी केलेल्या मोजमापानुसारही या मार्गिकेची रुंदी आणि उंची सुमारे दोन मीटर भरली, तसंच तिची लांबी सुमारे नऊ मीटर भरली. एकूण तीन मोहिमांद्वारे काढल्या गेलेल्या या निष्कर्षांनी, म्यूऑन कणांवर आधारलेल्या पद्धतीद्वारे काढल्या गेलेल्या अगोदरच्या निष्कर्षांना बळकटी मिळाली.

या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी अलीकडेच, शेव्हरॉनच्या दगडांतल्या छोट्या फटीतून, सुमारे सहा मिलिमीटर आकाराचा लहानसा, शरीराची एंडोस्कोपी करण्यासाठी वापरतात तसा कॅमेरा आत पाठवून या मार्गिकेसारख्या पोकळीची थेट छायाचित्रं घेतली गेली. या छायाचित्रांवरून, ही पोकळी म्हणजे एक व्यवस्थित स्थितीतली मार्गिका असल्याचं स्पष्टच दिसत होतं. या मार्गिकेचं छतही बाहेरच्या शेवरॉनसारखंच बांधलं गेलं आहे. ही मार्गिका मोकळी असून, तिथे कोणत्याही मानवनिर्मित वस्तू दिसून येत नाहीत. त्यामुळे ही मार्गिका म्हणजे एखादी खोली असण्याची शक्यता वाटत नाही. एक शक्यता म्हणजे हा आतल्याच, आतापर्यंत अज्ञात असणाऱ्या एखाद्या खोलीकडे जाण्याचा मार्ग असू शकतो. दुसऱ्या शक्यतेनुसार या मार्गिकेचा संबंध पिरॅमिडच्या बांधकामाशी असू शकतो. या मार्गिकेखाली असणाऱ्या, मूळच्या प्रवेशद्वारजवळच्या भागावरचा भार कमी करण्यासाठी ही पोकळी ठेवली गेली असावी. मार्गिकेच्या स्वरूपातल्या या पोकळीचं रहस्य उलगडण्यासाठी अर्थातच आणखी संशोधनाची आवश्यकता आहे.

फक्त खुफूच्या पिरॅमिडमध्ये नव्हे तर, अन्य पिरॅमिडमध्येही अशा अनेक अज्ञात जागा असाव्यात. विविध आधुनिक तंत्रं वापरून या दडलेल्या जागा आता शोधल्या जाऊ लागल्या आहेत. स्कॅनपिरॅमिड्स प्रकल्पातील संशोधकांनी या घडीला गिझा इथल्या पिरॅमिडवर लक्ष केंद्रित केलं आहे. कालांतरानं इजिप्तमधील इतर पिरॅमिडवरही संशोधन केलं जाईल. या सर्व संशोधनाद्वारे पिरॅमिडमध्ये दडलेल्या अशा अनेक गुपितांचा शोध लागू शकतो. अशी अधिकाधिक गुपितं उघड झाली की त्यातून कदाचित विविध पिरॅमिडच्या अंतर्गत रचनांचं पूर्ण चित्र संशोधकांना उभं करता येईल. आणि या संपूर्ण चित्राच्या विश्लेषणावरून या पिरॅमिडमध्ये दडलेल्या या विविध ‘रहस्यमय’ रचनांमागचे उद्देशही स्पष्ट होतील!

(छायाचित्र सौजन्य : Nina/Wikimedia / Hajotthu /ScanPyramids/TUM)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..