नवीन लेखन...

मनोहर राजाराम कुळकर्णी

मनोहर राजाराम कुळकर्णी म्हणजे माझा कुणी भाऊ नाही किंवा कुणी मित्रही नाही , तर ते होते माझे सख्खे काका. आता ते चांगले, म्हणजे डोक्यावर परिणाम होण्यापूर्वीचे मला बरेचसे अंधुक आठवतात. कारण त्यावेळी मी तसा लहानच होतो. परंतु डोक्यावर परिणाम झालेले काका मात्र अगदी स्पष्ट आठवतात. म्हणजे…. थांबा, सुरवातीपासून थोडसं विस्तरानेच सांगतो सगळं ,
माझ्या वडिलांना दोन भावंडं, सगळ्यात मोठे माझे वडील, त्यानंतर मधले हे काका आणि धाकटी माझी आत्या. माझे वडील एका विदेशी बँकेत नोकरी करत होते, आत्या एका शाळेत शिक्षिका होती आणि काका इंडियन रेल्वेमध्ये अकाउंटिंग खात्यात वरच्या हुद्द्यावर काम करत होते. त्यावेळी रेल्वेच्या या खात्यासाठी होणाऱ्या सार्वत्रिक परीक्षेत मुंबईतून ते पाहिले आले होते. काका आपल्या दोन्ही भावंडांपेक्षा चांगलेच उजळ वर्णाचे , तरतरीत नाक आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाचे. त्यांना व्यायामाची वगैरे आवड होती म्हणे. घरात त्यांचे वेटलिफ्टींगचा बार आणि वजनंही होती. त्यांच्याशिवाय आणि त्यांच्यानंतरही ही व्यायामाची आवड घरात कुणामध्येच आली नाही. माझ्या भावाला कधीमधी व्यायामाची हुक्की यायची आणि काही दिवसातच विरूनही जायची. पुढें मी ही दोन तीन दिवस नेमाने उचलून पहिली, आणि अचानक छातीकडे दुखायला लागल्यावर घाबरून ठेवून दिली. त्यानंतर मात्र ती तशीच पडून होती. काकांना बॉक्सिंगचाही फार शौक होता म्हणे. म्हणजे ते स्वतः खेळत नसत , पण बॉक्सिंगचे सामने आवर्जून पाहायला जायचे आणि सोबत माझ्या भावालाही घेऊन जायचे. माझा भाऊ आणि माझी थोरली बहीण दोघांवर काकांचा खूप जीव होता. त्यांना एक तापकीर ओढणं सोडलं तर कसलही, म्हणजे अगदी सुपारीच्या खांडाचही व्यसन नव्हतं. घरात आम्ही तिघं भावंडं, आई वडील, आत्या आणि काका असे आम्ही सात जण होतो. पुढे अचानक काकांची मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी बदली झाली. आता ती ऑफिसने केली की त्यांनी स्वतःहून करून घेतली कल्पना नाही. पण त्या बदलीने काकांचं आयुष्य मात्र वैराण झालं. माझे वडील हे मुळात धार्मिक वृत्तीचे , पापभिरू, कमी बोलणारे आणि शक्यतो कुणाला न दुखावणारे. भावाला ते सांगू शकले असते की कशाला एव्हढ्या लांब जातोयस . बदली रद्द करून घे. वेळेला ते ही काही बोलले नाहीत आणि पुढे होणारं काही टळत नाही.

काका तिथे गेल्यावर वर्षभरानंतरची गोष्ट असावी, एक दिवस म्हणे माझ्या वडिलांना बैतूल ऑफिस मधून फोन आला आणि त्यांनी विचारणा केली,
“मनोहर कुळकर्णी आपले कोण ?”
वडील न समजून म्हणाले ,
“भाऊ ! का, काय झालं ?”
त्यावर त्यांनी जे सांगितलं ते पचवणं वडिलांना कठीण होतं. त्यांनी सांगितलं,
“तुमच्या बंधूंनी नोकरीचा राजीनामा दिला आहे आणि त्यांची मानसिक स्थितीही फारशी चांगली नाही.”

हे ऐकून वडिलांना काहीच कळेनासं झालं. ते तातडीने रवाना झाले, आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की आपला भाऊ एका मोठ्या प्रशस्त घरात दाढी वाढलेल्या स्थितीत कमरेला टॉवेल गुंडाळून काहीतरी पुटपुटत येरझाऱ्या घालतो आहे आणि बाजुलाच स्टोव वर अंघोळीचं पाणी उकळत आहे. हे सगळं चित्र पाहून वडिलांना भडभडून आलं आणि कसलाही विचार न करता भावाला घेऊन ते मुंबईला परतले. त्या दिवसापासून ते काकांच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते आमच्याकडेच होते. इथे मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे. आम्हा तीनही भावंडांच्या जन्मपत्रिका केलेले आमचे एक खूप जुने परिचित गृहस्थ होते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा व्यासंग दांडगा होता. त्यांनी म्हणे काकांची पत्रिका पाहून सांगितलं होतं की , या व्यक्तीच्या आयुष्यात अशी काही घटना घडेल , ज्यामुळे ही व्यक्ती आयुष्यातून उठेल. अर्थात आपणही या गोष्टींना फार मनावर घेत नाही. तसच इथेही झालं. पुढे सगळेच ही गोष्ट विसरून गेले , पण विधिलिखित काही टाळता येत नाही.

काका घरी आल्यावर सुरवातीला संपूर्ण घराचा तोलच ढळल्यासारखा झाला. भीती , ताण, अस्वस्थता घरातल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसू लागली. काका मात्र आपल्याच धुंदीत असायचे. सुरवातीला ते दिवसभर कुणाला काहीतरी बजावल्यासारखे काहीतरी पुटपुटत, डोळे गरागरा फिरवत फेऱ्या मारत असायचे. पण पुढे मात्र ते मोठ्याने असंबद्ध बडबडू लागले. आमचं घर दोन खाणांचं , आणि बाहेरच्या गॅलरीवजा खोलीत त्यांचं वास्तव्य असायचं. रात्रीही त्यांना झोप नसायची. अनेक डॉक्टर झाले, मानसोपचारतज्ञ झाले. त्याच काळात माझ्या मधल्या भावाची मुंज व्हायची होती. मानसोपचारतज्ञांच्या औषधांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला. काकांच्या बोलण्यातून ढळलेलं मानसिक संतुलन जागेवर येतंय असं वाटायला लागलं. भावाच्या मुंजीत आलेल्या पाहुण्यांची काका विचारपूसही करत होते. वडिलांना तर खूपच आनंद झाला. त्यांना मनापासून वाटलं की आपला भाऊ पुन्हा माणसात आला. पण हे मृगजळच ठरलं. काही दिवसांनी पुन्हा त्यांची असंबद्ध बडबड तशीच सुरू झाली , आणि वडिलांचा आणि आमचाही आनंद पुन्हा एकदा मावळला. त्यानंतर आम्ही नवीन जागेत राहायला आलो. माझ्या थोरल्या बहिणीचं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं होतं मधला भाऊ आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षाला होता आणि मी इ.आठवीमध्ये शिकत होतो. याच काळात माझ्या आत्याचं लग्न झालं आणि ती सासरी गेली. आता घरात आम्ही सहा जण होतो. काकांच्या वेडेपणाचा त्रास संपूर्ण घरालाच होत होता. आम्हाला कुठेही बाहेरगावी जाता येत नव्हतं. वडील तर अक्षरशः कुणी जे सांगतील ते उपचार, खर्चाकडे न पाहता करत होते. उद्देश एकच , आपला भाऊ पुन्हा एकदा पहिल्यासारखा चांगला व्हावा. पण नियती मात्र त्यांना कणभरही यश मिळू देत नव्हती. हळुहळु काकांची शारीरिक स्थितीही ढासळू लागली होती. आतापर्यंत ते खाण्याचे पदार्थच खात होते , परंतु आता त्यांच्या वेडाने विक्षिप्त रूप घेतलं आणि ते काहीही स्वाहा करू लागले. हा त्रास मात्र तापदायक होऊ लागला. स्वयंपाकघरातलं आवरलं की त्या खोलीला कुलूप लावण्याची पाळी आली. कच्च सुद्धा त्यांना खायला वर्ज्य नव्हतं. पण या सगळ्यामध्ये त्यांची एक गोष्ट मात्र अत्यंत चांगली होती. त्यांच्या वेडेपणाने घरातल्या स्त्रियांकडे कधीही चुकीच्या नजरेने पाहिलं नाही. अन्यथा त्यांना घरात ठेवणं कठीण झालं असतं. अशा अवस्थेतही ते रोज बाहेर फिरून यायचे. रस्त्यातून जाताना बडबड मात्र सुरू असायची. एकदा असेच बाहेर गेले ते आलेच नाहीत. रात्रभर वडील , माझा भाऊ सगळीकडे शोधत होते. पण मिळालेच नाहीत. आठ दिवसांनी आपणच घरी आले. नंतर एकदा पुन्हा असेच गायब झाले ते अंधेरीला मिळाले. इतके दिवस कुठे होते, कुणी खायला दिलं, कुठे झोपत होते कुणास ठाऊक. ते तर काहीच सांगू शकत नव्हते. दोनदा घरातून गायब झाल्यामुळे मुख्य दरवाजाला कुलूप लावणं सुरू झालं. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाच्या गोळ्या, कॅप्सुल्स दातांनी कडकडा चावून खायचे. कधीतरी आई खूप वैतागायची आणि त्राग्याने , त्यांना वेड्यांच्या इस्पितळात ठेवा असं वडिलांना म्हणायची. अर्थात ते ही तात्पुरतच असायचं. अखेर काकांची अवस्था खूपच खराब झाली, गात्र थकली आणि एक दिवस या जगातून ते गेले. ज्योतिषाची भविष्यवाणी खरी झाली.
एका अत्यंत हुशार, महत्त्वाकांक्षी , कुणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या, सुसंस्कारी माणसाचं संपूर्ण आयुष्य वाऱ्यावर उधळून गेलं. हे का झालं ?, कुणामुळे झालं ?, कशामुळे झालं? या प्रश्नांची उत्तरं मात्र आम्हाला कधीही मिळू शकली नाहीत. त्यांच्या ऑफीस मधल्या काही लोकांकडून कुणीतरी त्यांना काही खायला घातलं आणि त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली असं कानावर आलं. पण अशा बातम्यांना ठाम असा पाया काहीच नव्हता. ते खरं असलं नसलं तरी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याइतपत कुणी वाईट वागू शकतं ? हा प्रश्न आमच्यासारख्या दुसऱ्याच्या सुखात आनंद शोधणाऱ्याना मात्र कायमचा पडत राहिला. या सगळ्यामध्ये काका विवाहित नव्हते ही एक गोष्ट चांगली झाली होती का ? विवाहित असते तर कदाचित इतक्या लांब त्यांनी बदली घेतलीही नसती आणि पुढचा सगळाच अनर्थ टळला असता , किंवा दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्या मुलीचं आयुष्यही मातीमोल झालं असतं. अखेर या जर तर च्या गोष्टी , नेहमीच नंतर सुचणाऱ्या.

मला सांगायचय ते हे की आपले जन्मदाते सुद्धा नकोसे झालेल्या आजच्या वेगवान आणि माणूसपण संपलेल्या जगात कदाचित माझ्या वडिलांनी वेड्या भावासाठी आयुष्यभर जे केलं ते मूर्खपणाचं वाटू शकतं. कशाला आपल्या सुखाच्या संसारात हा त्रास ओढवून घेतला ? तुमच्या वेड्या भावाला तुम्ही का आयुष्यभर तुमच्या कुटुंबाच्या बोकांडी बसवलं ? सरळ मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवायचं असही कुणी म्हणेल. पण इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की काकांची काळजी घेताना आई वडिलांनी आमच्या संगोपनात मात्र जराही कसूर केली नाही. आज विचार करताना मलाही वाटतं , कोण करतं वेड्या व्यक्तीसाठी इतकं ? काकांच्या अखेरच्या दिवसात डॉक्टरही वडिलांना म्हणाले,
“किती करणार अजून तुम्ही त्यांचं. त्यांना पायावर उभा करण्याच्या ‘ वेडापायी ‘ तुमची तब्येत खराब होईल.”

पण खरंच वडिलांच्या या ध्यासाला माझ्या आईने तशीच साथ दिली म्हणून ते सगळं निभावून नेऊ शकले. वेड्या भावासाठी भावाने आयुष्यभर केलं हे मोठं आहेच, पण आपल्या नवऱ्याचा प्रामाणिक हेतू जाणून , काहीही तक्रार न करता त्याला तितकीच खंबीर साथ देणारी माझी आई त्याहून मोठी.

काकांना जाऊन आज अनेक वर्ष लोटली. आई वडीलही गेले. रक्ताच्या नात्याना अशा अवस्थेतही न विसरणारी माणसं मात्र आज दुर्मीळ झालीयत .

प्रासादिक म्हणे,
प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..