नवीन लेखन...

मि. साधे भोळे

‘पांडोबाऽऽ?”

“जी साहेब आलोच.” पांडोबा जवळपास सत्तर पंचाहत्तर वर्षांचा. पण अजूनही खारकेसारखा खणखणीत असा रोजची पहाट’ या दैनिकाचा शिपाई. लगबगीने सूर्याजीराव रविसांड्यांच्या म्हणजे रो.प. च्या संपादकाच्या खोलीकडे धावला.

सूर्याजीराव टेबलावर पसरलेल्या बाणे महानगर पालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाच्या विशेषांकाची कागदपत्रे चिवडत बसले होते. त्यांच्यासमोर एक फुलपेज फोटो पडला होता. त्याच्याकडे रागाने पहात होते.

“साहेब मला बोलावलेत?”

“हो, अरे तो काका कुठे गेला? जा बोलाव त्याला.”

“साहेब, काकासाहेब अजून आले नाहीत.”

“काय? अजून आले नाहीत? अरे करतोय काय हा म्हातारा? विशेषांकाची तारीख जवळ आली. महापौरांच्या मुलाखतीचा अद्याप पत्ता नाही. आणि त्या ऐवजी फक्त एक फोटो?”

“काका म्हणजे काका सरधोपट. हे पण सत्तरी पार केलेले गृहस्थ. रो. प. चे मुख्य वार्ताहर. मुलाखतकार त्यांच्या मुलाखती घ्यायच्याच कौशल्यावर सूर्याजीरावांना आपला विशेषांक ‘सम्राट’ पदाचा डोलारा उभारला होता. सूर्याजीराव, काका सरधोपट आणि पांडोबा प्यून ही रो.प.ची त्रिमूर्ती. तिघेही जवळपास एकाच वयाचे. मालक नोकर संबंधापेक्षा एकमेकांस अरे तुरे करणारे अजब रसायन.

सूर्याजीरावांचा रागाचा पारा फारच चढला होता. तिकडे दुपारचा सूर्य मध्यान्ही येऊन तळपत होता आणि इकडे सूर्याजीरावांचा सूर्य पेटला होता.

“साहेब एक कटिंग मागवू का?”

“पांड्या इकडे हा काका माझा जीव खातोय आणि तुला कटिंग सुचतोय? जा आणि तो काका येताच त्याला ताबडतोब मला भेटायला पाठव.” येवढे बोलतात तोच काका आत शिरतात.

“साहेब येवढं तापायला काय झालं?”

“वर मलाच विचारताय? अहो महापौरांची मुलाखत कुठाय? आणि हा रेड्यासारखा माजलेल्या बैलाचा फुलपेज फोटो कुणाचा?”

“साहेब ते आपले महापौर श्रीयुत साधेभोळे.

“हा? आणि साधा भोळा? उद्या तुम्ही यमाच्या रेड्याला गरीब गाय म्हणाल।”

“साहेब हेच आपले महापौर श्री. साधेभोळे, त्यांचीच इच्छा आहे की त्यांच्या मुलाखती सोबत त्यांचा हा साधासुधा फुलपेज फोटो छापावा. महानगरपालिका फुलपेज जाहिरातीचाखर्च देणार आहे रो, प.ला.”

अरे वा! मग ठीक आहे. मग असा एकच का, चार रेड्यांचे फोटोही छापू आम्ही. ते राहू दे. मुलाखतीचे काय?”

‘साहेब महापालिकेतील सगळी मंडळी या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात इतकी मश्गूल झालीत की कोणाला चार शब्दही बोलायला फुरसत नाही. त्यातून हे साधेभोळे साहेब तर म्हणतात की ही सुवर्णसंधी पुन्हा कुठे मिळायला तेव्हा आज काय गिळायला मिळते ते बघावे.”

‘गिळायला? म्हणजे?

“साहेब त्यांचे म्हणणे, अहो इथे गिळायला मिळण्याची पंचाईत तिथे तुमची मुलाखत कशी होणार?”

“असं?”

“तरीपण साहेब आज फक्त पाच मिनिटं त्यांनी दिली आहेत मला. मी आता तिकडेच पळतो.”

“अहो मग पळा. वाट कसली पहाताय?”

“बस, यांचं आपलं एकच वाक्य, चला पळा, लागा कामाला. आम्ही इकडे मर मर मरायचं पण चार पैशाची पगार वाढ देईल म्हातारा तर शपथ!” जाता जाता काका पांडोबाच्या कानात कुजबुजले.

“काका, काय सांगताय त्या पांड्याच्या कानात?”

“काही नाही साहेब, म्हटलं एक कप चहापण विचारत नाही म्हातारा. कुठं घेऊन जाणार आहे डबोले कोण जाणे?”

“हां हां समजले. मुलाखत आटोपून या दोन कटिंग चहा मागवीन दोघांसाठी’

“दोन कटिंगच? फुल नाही?”

“काका आता येतोस का उठू इथून?”

“येतो येतो”, म्हणून काका पसार होतात. ते थेट बाणे महानगरपालिकेत पोहोचतात. रिक्षातून उतरताच त्यांच्या पुढेच एका मारूती मधून एक पांढरेशुभ्र कडक कपडे घातलेला माणूस उतरतो. लगबगीने आत शिरतो. काका त्याच्या मागूनच आत जातात. दोघेही उद्वाहनाने चौथ्या मजल्यावर महापौरांच्या कार्यालयाकडे जातात. महापौरांच्या स्वीय सचिवांकडून काका मुलाखतीचा पास घेऊन महापौरांच्या कक्षासमोर येतात. दारातच तो मघाचा पांढऱ्या शुभ्र कपड्यातला माणूस बसलेला दिसतो. फरक एवढाच की आता त्याच्या डोक्यावर पांढरे शुभ्र कडक टोपी असते!

“काय आजोबा? काय हवंय?” तो काकांना विचारतो. काका पास दाखवतात तसा तो त्यांना आत सोडतो. दार ढकलून काका आत शिरतात.

“या,या काका.” साधेभोळे त्यांचे स्वागत करतात.

“नमस्कार साहेब, आपण महापौर झाल्याबद्दल अभिनंदन, या पदावरून लोकसेवा करण्याची आपली काय कल्पना आहे? सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या काय काय योजना आहेत हे आमचे रो.प.चे वाचक जाणून घेण्यास फार उत्सुक आहेत.”

“काका मी या क्षेत्रात आलो ते लोकसेवेच्या हेतूने. पण आता लक्षात येते की लोकसेवा ही सुळावरची पोळी असते!”

“ती कशी?”

“काका, आपल्याला वाटते की लोक फार साधेभोळे असतात. त्यांच्या फार अपेक्षा नसतात. पण ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे’, म्हणतात ना तशी गत आहे. शहराचा प्रथम नागरिक म्हणून काम करावयाचे म्हणजे खायची गोष्ट नाही.”

“हां. ते ही खरेच आहे म्हणा!” काका.

“काय?”

“नाही म्हणजे महापौरपद ही नुसतीच खायची गोष्ट नाही हे खरं आहे.”

“काका अहो तुमच्या जिभेला काही हाड?”

“नाही नाही साहेब, आपण चुकीचा अर्थ घेताय, मला म्हणायचंय की ती फार कठिण गोष्ट आहे. आपण म्हणता तशी सुळावरची पोळी! पण साहेब एखादं उदाहरण दिलंत तर नीट समजेल.”

“एक अगदी साधे उदाहरण देतो. आम्ही साधे कार्यकर्ते. पायी हिंडणारे, कधी सायकलवरुन, कधी बसमधून, कधी रेल्वेतून आणि अगदीच फार तर रिक्षा किंवा टॅक्सी. पण हे महापौरपद मिळाले आणि आमच्या दारात एकदम वातानुकुलित वाहन!

“मग चांगलंच आहे की. त्यात येवढं वाईट वाटण्यासारखं काय?”

“काका हेच हेच तर आम्हांला पटत नाही. आम्ही आपले नावाने साधेभोळे आणि विचारांनीही साधेभोळे आम्हांला नाही पटत हा भपका! पण लोक म्हणतात, साहेब आपण प्रथम नागरिक, आपला मान मोठा. आपल्या रस्त्यांवर फार खड्डे खुड्डे असतात, उकाडाही फार असतो, शिवाय आपल्याला कामही फार, आपण कार्यालयात कमी आणि जनसंपर्कात जास्त तेव्हा आपल्याला वातानुकुलित वाहनच हवे, पूर्वीचे महापौरही तेच वापरत होते.”

“आपण ते नाकारून साधे वाहन वापरु शकता.”

“काका आमचे स्वीय सहाय्यक म्हणतात तसे करणे महापौरपदाच्या प्रतिष्ठेस शोभणारे नाही. शिवाय नवीन महापौर आले की, जुनी गाडी टाकून नवीन गाडी घ्यायची अशी आपली थोर परंपरा आहे.’

“तरी आम्ही म्हणालो, आम्ही असे साधेभोळे, आम्हांला पूर्वीच्या महापौरांची गाडी चालेल. अहो काका, आमची स्वतःची खाजगी गाडी आहे. गेली दहा वर्षे आम्ही ती वापरतो आणि आणखी पाच दहा वर्षे वापरू मग जुन्या महापौरांची इंपोर्टेड आलिशान वातानुकुलित गाडी का नाही चालणार?”

“मग? काय म्हणतात ते?

“ते म्हणतात साहेब आपले खरे आहे. पण आपल्याला अजून माहीत नाही. महापौरांना फार फिरावे लागते. गाडीची देखभाल करायला वेळ नसतो मग एक दोन वर्षातच गाडी कंडम होते. मग नवीन घेण्याशिवाय काही मार्गच नसतो”.

“खर आहे त्यांचं, मग आपण काय ठरवलंत?”

“मी म्हणालो, ठीक आहे. आता आपली परंपराच आहे म्हणता तर घ्या एखादी साधी सुधी काँटेसा!”

“मग ते काय म्हणाले?”

“ते म्हणाले, छे छे साहेब, काँटेसा? आणि आपल्यासाठी? नाही नाही अहो, ती आयुक्तांसाठी ठीक आहे. आपल्याला शोभणार नाही.”

मग मी म्हणालो,”काँटेसा नाही तर एखादी साधीसुधी सिएना चालेल मला!”

तर म्हणाले, “सिएना? छे छे साहेब अहो ती उपायुक्तांसाठी ठीक आहे. आपल्याला नाही शोभणार!”

“मग शेवटी ठरलं तरी काय? आपण कोणती घेणार?”

“काका शेवटी पी.ए. म्हणाले,”साहेब आपण एखादी अलिशान वातानुकुलित ‘हु’दाईच घ्या! मागचे महापौर तीच वापरत होते.” मग मी म्हणालो अहो, मग तीच चालेल मला. नवीन कशाला? तर म्हणाले, “साहेब, ती जुनी झाली. रिपेअर पण होत नाही. त्यापेक्षा नवीन कोरी ‘हु’दाई’च आणू!”

“काका त्या जुन्या गाड्या पण महापालिका वापरते. त्यांचे आम्ही कचऱ्यासारखे रीसायकलिंग करतो!”

“वा! ते कसे?

“माझी जुनी गाडी आयुक्तांना देतो, त्यांची जुनी उप आयुक्त वापरतात. उपायुक्तांची जुनी गाडी नगर अभियंत्याला देतो. अशाप्रकारे ही साखळी महापालिकेच्या अगदी शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवतो. वाया जाऊ देत नाही.”

“वा! फारच छान!” काकांच्या डोक्यात आता प्रकाश पडला की महापौरांचा प्यून गाडीतून आला त्याचे रहस्य काय?

“फारच आदर्शपरंपरा, पध्दत म्हणावयाची ही!”

“हो ना, काका, अहो हीच पध्दत इतर अनेक गोष्टीत मी लागू करणार आहे. जुने झाले द्या फेकून असे न करता पुनर्वापर करून काटकसर हे धोरण आम्ही अनुसरणार आहोत.”

“ते कसे?”

“या पध्दतीने मी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरे देणार आहे. प्रथम टप्प्यात सर्व उच्च पदस्थांना घरे, त्यानंतर त्यांचे खालच्या वर्गाला हस्तांतरण, पुन्हा उच्चपदस्थांना नवी घरे असे करत करत अगदी शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यत बांधा, वापरा, हस्तांतरण कराया तत्वाने ही पध्दत राबविली जाईल.”

“वा! फारच अद्भुत योजना आहे! पण या योजनेतच सारा पैसा ओतला तर हानगरपालिकेच्या प्राथमिक जबाबदाऱ्या, जसे पाणी पुरवठा, मल निःसारण, वीज पुरवठा, रस्ते, आरोग्य, कचऱ्याची विल्हेवाट, सफाई इत्यादी सुविधांना पैसा कुठून आणणार?”

‘काका, हे रडगाणे तर वर्षोन वर्षे चालूच आहे. कितीही करा. वाढती लोकसंख्या सगळं खाऊन टाकते. हा सगळा केंद्र सरकारचा मामला आहे. त्यांनी पैसे दिले तर आम्ही या गोष्टीही करू पण आमच्याही काही मर्यादा आहेतच ना?”

“ते खरे. पण सगळेच केंद्र सरकारवर ढकलायचे तर मग महानगरपालिका हवी कशाला?

“काका याबाबत आम्ही काही वास्तुतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांनी फार उपयुक्त योजना सुचविल्या आहेत.”

“यात वास्तुतज्ज्ञांचा काय संबंध? यासाठी नगर रचना कारांचा सल्ला घेणे उचित नाही का?”

“काका हे आमचे वास्तुतज्ज्ञ फक्त वास्तु बद्दल नव्हे तर वास्तु, जागा, शहर, गावे अशा कोणत्याही बाबतीत पुराण ग्रंथातील आधार देऊन मार्गदर्शन करतात.”

“असं? काय मार्ग दाखवलाय त्यांनी?”

“काका पूर्वीच्या नगरात वीज पुरवठा नव्हताच. सगळे काम दिवे, कंदील पणत्या,मशाली यावर व्हायचे. जुन्या काळी मल निःसारण व्यवस्था म्हणजे गावाबाहेर एखादे मोकळे मैदान तिथे प्रातःविधी उरकायचे, पाणी पुरवठा म्हणजे ज्याने त्याने आपापल्या घरात विहिरी, आड, हौद बांधायचे, किंवा नदी, तळी, तलावाचा वापर करायचा.

“पण याचा आता कसा उपयोग करणार?”

“का नाही करता येणार? प्रत्येक इमारतीत एकावर एक संडास बाथरुम त्यासाठी भरमसाठ पाणी, त्यासाठी भूमिगत गटारे, केवढा प्रचंड? त्यापेक्षा प्रत्येक वॉर्डा वॉर्डात एक सामायिक जागा प्रातःविधी साठी ठेवली तर जुनी परंपराही राहील आणि अनावश्यक पाणी पुरवठा लागणार नाही. प्रत्येकाने आपापल्या इमारतीत विहिरी, आड, हौद बांधावेत. महानगरपालिकेला हा फुकटचा व्याप कशाला? वीज पुरवठा म्हणाल तर सूर्यदेव आहेतच. त्या प्रकाशात जमेल तेवढे काम करावे नाही तर अंधार पडताच दिवे. पणत्या लावाव्या. सर्व नैसर्गिक तत्वावर चालेल. तर हा सगळा अनावश्यक व्याप कशाला? पाश्चात्यांचे अनुकरण करून आणि त्यांची विद्या स्वीकारून आपण भलतीकडेच भरकटत चाललो आहोत. बाणे महानगरपालिका या सर्व अनावश्यक गोष्टींचा त्याग करून हजारो वर्षापूर्वीची आपली थोर जीवन शैली पुन्हा निर्माण करणार आहे. एक पथदर्शक कार्यक्रम म्हणून आम्ही ही योजना राबविणार आहोत.”

“वा! वा! साधेभोळे साहेब, जुन्या परंपरा, जुनी संस्कृती, जुनी जीवनशैली पुन्हा प्रस्थापित करण्याचा आपला उद्देश फारच स्तुत्य आहे. आपल्या या पथदर्शक प्रस्तावाची योजना पाहून इतर महानगरपालिकांचेही ‘कल्याण’ होईल यात मला काही शंका वाटत नाही. आपल्या सारखा पारंपारिक, उच्च विचारसरणीचा महापौर या बाणे महानगरपालिकेस लाभला हे आमचे थोर नशीबच म्हणावयाचे. आपल्या पथदर्शक कार्यक्रमास शुभेच्छा! मुलाखती बद्दल धन्यवाद येतो.”

विशेषांक फारच गाजला. विशेष म्हणजे आखाती वाळवंटातील तालीबानी राज्यकर्त्यांना बाणे महानगरपालिकेची ही पथदर्शक योजना फारच आवडली. बाण्याचे लवकरच वाळवंट होऊन ते आपले भाईबंद शोभणार याचा त्यांना फार आनंद झाला. श्रीयुत साधेभोळे यांना खास आमंत्रण देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्याचे त्यांनी ठरवले. बसऱ्याचे तालिबानी महापौर, अल् हल् चल् खल् फरटून उस्मानी अल् तस्मानी, यांनी बाण्याच्या महापौरांना खास आमंत्रण पाठवल्याचे कळते. त्यांना घेऊन येण्यासाठी एक खास उंटही रवाना झाल्याचे समजते.

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..