नवीन लेखन...

मॉर्निंग वॉक

‘मॉर्निंग वॉक’ हा प्रकार भयंकर असतो हे तुमच्यावर जेव्हा तो ‘कंपल्सरी’ या प्रकारात येतो तेव्हाच कळते. तसे तरुणपणी आपण ‘बारीक’ असताना किंवा स्वतःची फिगर सांभाळण्यासाठी किंवा गंमत म्हणून जेव्हा आपण ‘मॉर्निंग वॉक’ साठी जात असतो तेव्हा आपण चार लोकांशी गप्पा मारताना काहीतरी विषय काढून आपण वॉकसाठी जात आहोत हे आवर्जून त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही दोघेही (श्री व सौ) बरेच वर्षे मॉर्निंग वॉकला जात होतो. पण मध्यंतरीच्या ५-६ वर्षात कंटाळून म्हणा किंवा झोपेशी जराशी जास्त मैत्री झाल्यामुळे तो बंद झाला होता. आता तो आमच्या वाट्याला कंपल्सरी कॅटेगरीतला आला. त्यामुळे नाईलाजास्तव हा परत चालू केला.

नुकताच आमच्या अहोंच्या ‘बायपास’ नंतर हा चालू झाला. आमच्या दोघांच्याही मनावर भयंकर भीतीचे दडपण होते. ऐन उन्हाळ्याचे दिवस सकाळी उठून देवाचे नाव घेऊन आम्ही आपले निघालो. पहिल्याच दिवशी सोसायटीच्या गल्लीतले कुत्रे ‘भसाभसा’ भुंकत अंगावर आले. ते ही बिचारे काय करणार? रात्रभर गल्लीचा पहारा देऊन थकले असावे किंवा कायम गाडीतून जाणारी माणसं त्याच्या रस्त्यावर अतिक्रमण करायला आली असे बहुतेक त्याला वाटले असावे. आजकाल अतिक्रमण जरा जास्तच झाले आहे. जो राहिल त्याची जागा. रस्ता तर याच्या मालकीचाच ना. असो.

दुसऱ्या दिवशी विचार केला. कुत्री, गाई, माकड याचा आपल्याकडे फारच त्रास म्हणून घरातील एक जुनी, पुराणी, कित्येक वर्ष न वापरलेली काठी स्वच्छ केली आणि ‘स्व संरक्षणा’ साठी घेऊन निघालो. माझ्या हातात ती फारच लांब आणि विचित्र दिसत असावी. रस्त्यात समोरुन येणारी माणसे माझी ती काठी, मी आणि यांना अगदी वेगळ्याच नजरेने बघत होती हे आमच्या लक्षात आले होते. पण काय करणार? कुत्र्यांसाठी काठी घेणे भाग होते.

तीन – चार दिवसांनी सोसायटीतला राजेश (रेग्युलर वॉकर) हातात एक सुंदर काठी घेऊन माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणाला “आँटी ही काठी घ्या, तुमच्या हातात छान दिसेल.” मी अगदी खूश होऊन धन्यवाद देणार तेवढ्यात म्हणाला, “ती काठी ना तुम्ही अंकलच्या मागे हंटर घेऊन चाललाय अशी दिसते.” आता मला लोकांच्या वेगळ्याच नजरेचा अर्थ समजला.

नियमित चालणारी माणसे एकमेकाला रस्त्यावर क्रॉस होत असतात. एकमेकांकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून हे कोण अशी नजरही टाकत असतात. यांना बघून मला मुंबईच्या लोकल ट्रेन मधल्या माणसांची आठवण आली. ती ही अशीच एकमेकाला बघता बघता ओळखायला लागतात हळूहळू एकमेकांशी त्यांची मैत्री होते. इथे फरक एवढाच की जागा पकडून ठेवायची नाही आणि गर्दी नाही. इथे मोकळ्या हवेत शांतपणे फिरा. कुठेतरी सुंदर पक्षांची जोडी दिसते, मोर असतात. माकडे आणि नीलगाईंना तर काही तोटाच नाही. सकाळच्या वेळेस मजेशीर अजब गजब फॅशन परेड ही बघायला मिळते.

हे बघा समोरुन येणारे हे गृहस्थ यांचे नाव मी ‘मी. डेन्डी’ ठेवले आहे. एका हातात बांबूचा छोटासा काठी नामक तुकडा दुसऱ्या हातात सुंदर छोटेसे, गोजिरवाणे गोरेपान पामेरियन कुत्रे, डोक्यावर फारूक अब्दुला सारखी फरची टोपी (सध्या उन्हाळा आहे) मस्त ट्रेकसूट, पायात चप्पल ( स्लीपर) आणि तोंडात दांतण ( कडुलिंबाच्या काड्या) आणि दर पाच मिनिटाने थुंकणे. नियमित भेटतात.

त्यांच्या पाठोपाठ येणारे हे ‘मी. नाईट सूट’ हे त्यांचे नामकरण मी केलेले आहे. रोज अंगात ‘नाईट सूट’ त्यावर जोरदार महागडे रिबॉकचे बुट आणि तोंडात दांतण नक्की. बरोबर साथीला पत्नी त्या ही नाईटगाऊन मध्येच आणि पायात घरातली चप्पल. दोघेपण चालतात मात्र तडातड . बघता बघता कुठल्या कुठे पोहोचतात.

या पार्श्वभूमीवर पाठीमागून येणारे ‘ ओर – फॉर्स’चे अधिकारी अगदी टीपटॉप त्यांच्या पदाला शोभेल असा वेश, पांढरी हाफपॅन्ट, पांढरा टी शर्ट (बहुतेक निरमा पावडरने जाहिरातीसाठी यांच्याच कडून नेला असावा) परेडसाठी लागणारे पांढरे बूट, आणि जोरजोरात एकाच तालावर चालतांना बघून आपल्याही तोंडून निघून जाते “एक दो, एक दो, सीधे चल!” आणि त्यांच्या पाठीहून चालणाऱ्या त्यांच्या बायका, देखते रहो, सुंदर जीन्स टीशर्ट, फारच छान छान पंजाबी ड्रेस, यांची तर नजाकतच कुछ और.

आणि या बाईसाहेब कोण आहेत माहित नाही. पण सकाळी सकाळी भराभर चालत असतात. चालते कुठली पळतच असते. बरेच दिवसांपासून बघत होते. तिच्यापाठी कुत्री किंवा गाई लागलेल्या तर दिसत नव्हत्या.

शेवटी तिला थांबवून विचारलेच, “बाई तुम्ही अशा पळता का? सकाळच्या वेळेस तुम्हाला कोणी त्रास देते का? कोणी पाठीपडून छळतय का?”

तशी हसायला लागली म्हणाली, “नाही हो, नवरात्री असते ना मग ‘स्टॅमिना’ ठेवायला लागतो.” मी बघतच राहिले. ती म्हणाली. नवरात्रीत जर मी सगळे दिवस पहिल्यापासून शेवटपर्यंत न थांबता गरबा केला तर मला ‘बेस्ट खिल्लैया’ चे बक्षिस मिळेल. गेली तीन वर्षापासून मीच हे बक्षीस घेते.

‘व्वा!’ मी तर तिच्याकडे बघतच राहिले. काय मेला उत्साह. मला रोज झोपेतून उठताना हा रस्ताच दिसतो आणि ही बघा म्हटले, “धन्य आहात हो आपण बाई !”

हळूहळू थंडी आली. थंडीची मजा कुछ और. प्रांताप्रमाणे स्वेटर्स, शाली, कानटोप्या, जॅकेटस यांच्याही फॅशन्स बघायला मिळतात. पंजाबातल्या लोकांच्या गरम कपड्याची स्टाइल, रंग वेगळेच असतात. सोबर रंग बघायला मिळतात. तेच हिमाचली असले की त्यांचे स्वेटर्स ‘ओव्हरकोट’ टाईप असतात आणि रंग तर विचारूच नका निसर्गातले सगळे रंग त्यांच्या कपड्यात ओसंडून वहात असतात. या पेक्षा मध्यंतरी मुंबईला मुलाकडे गेलो होते. तिथे आमची चालण्याची वेळ आणि सोसायटीतल्या काही बायकांची चालण्याची वेळ बरोबर येत होती. या सगळ्या बायका, त्यांची मुले, सुना नवरे, नातवंडे आपल्या आपल्या कामावर गेल्यावर चालायला निघत असाव्यात आणि मोठ मोठ्यांनी गप्पा, आज सुनेनं टिफीन साठी काय बनवले. कोळ्यांने कोलंबी स्वस्त दिली इथपासून ते सोसायटीत पाणी १० ते १२ जाणार आहे. उद्या लाईट नाहीत वगैरे. त्यांच्या गप्पा ऐकल्या नंतर सोसायटीचा नोटीस बोर्ड वाचण्याची गरजच भासणार नाही.

कॉलेजची मुले मुली किंवा तरुण पिढी आपल्या कानात ‘इअरफोन्स’, हातात मोबाईल घेऊनच चालत असतात. बहुतेक सकाळी निवांतपणे ऐकमेकांशी बोलण्याचा एवढाच वेळ मिळत असावा आणि कोणी ऐकेल याची भितीही नसावी.

मॉर्निंग वॉक चा अहमदाबादच्या काही लोकांचा अनुभव तर ऐकण्यासारखा आहे. ते सकाळी उठून वॉकला जातात ते घरी नाश्ता (ब्रेकफास्ट) करूनच येतात. त्यांच्या इथे वॉक करुन गार्डनच्या बाहेर आले की इडली डोसा, सँडवीच पासून थेट साबुदाण्याच्या खिचडी पर्यंत खाण्याचे प्रकार मिळतात. सगळे ज्यूस, चहा कॉफी ते गरम दूध सगळे मिळते. हे ऐकून मात्र मला त्यांचा हेवाच वाटला. आम्हांला घरी जाऊन चहा ही स्वतःच करायचा आणि परतीच्या रस्त्यावर पंधरा मिनिटात नाश्ता काय करायचा याचाही विचार करतच जायचे.

एकंदरीत काय अतिशय टेंशन मध्ये चालू केलेल्या या कंपल्सरी वॉकला थोडासा यूटर्न देऊन मी तो मजेशीर करण्याचा प्रयत्न करत होते आणि बऱ्याच अंशी मला त्यात यशही मिळाले. कारण अलिकडे बाहेर पडताना हे मला म्हणतात “वैजु सकाळी सकाळी शांतपणे चाल हो, नाहीतर काही लोकांना बघून हसू येत आणि त्यांच्यासमोर हसताही येत नाही. ”

या वरून मला असे जाणवले की काही गोष्टी (आपल्या आयुष्यातल्या देखील) आपल्या विचारांची दिशा बदलून त्या हलक्या फुलक्या करुन त्यातून आपण आनंद घेऊ शकतो. पण हे करताना आपण काहीतरी चांगलेच अनुभव घेण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात ठेवायला पाहिजे नाहीतर.

एक बाई मला तीन चार दिवसांपूर्वीच सांगत होत्या “तुम्ही सकाळी खूप लवकर चालायला जाता. लक्ष ठेवूनच चाला हं, सकाळी बघा नं. १०८ किती वेळा जाते. ते ट्रकवाले पण अर्ध्या झोपेतच चालवत असतात. जरा लक्ष ठेवूनच चालत जा.” झाले, आता त्याला काय म्हणावे…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..