नवीन लेखन...

मूर्तीपूजा : विविध धर्मातील फरकाचा एक मुद्दा !

‘आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपवरील लेखक श्रीनिवास बेलसरे यांचा हा लेख 

विविध धर्मात असलेल्या महत्वाच्या फरकांचा विचार करीत असताना मूर्तीपूजा हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा ठरतो. आपल्याला वाटते तसे मूर्तीपुजा ही केवळ भारतीय परंपरेतच असलेली प्रथा आहे असे मुळीच नाही. वेगवेगळ्या काळी जगातल्या सर्वच समाजात ती अस्तित्वात होती. मध्यपूर्वेतील काही धर्मांचा मूर्तीपूजेला असलेला विरोध हाच त्यांच्या स्थापनेच्या काळात त्या समाजात मूर्तीपूजा अस्तित्वात होती याचा ठोस पुरावा आहे. माणूस जी गोष्ट अस्तित्वात आहे तिलाच विरोध करीत असतो. जी गोष्ट त्याने कधी पाहिलीच नाही, जी त्याला माहीत नाही तिला तो विरोध करु शकत नसतो हा साधा तर्क आहे. मूर्तीपूजेचा विरोध हे एक महत्वाचे तत्व म्हणून काही धर्मात प्रस्थापित झाले याचे कारण केवळ काही शतकांपूर्वी मध्यपूर्वेतही मूर्तीपूजा अत्यंत विपुल स्वरूपात सुरु होती.

माणसाची मुलभूत गरज
जसजसे माणसाला आपल्या आजूबाजूची जीवसृष्टी, निसर्ग आणि अवकाशातील तारकामंडळांमागे एक निश्चीत अशी यंत्रणा कार्यरत आहे असे लक्षात येऊ लागले तसतशी त्याच्या मनात आपल्याला न दिसणा-या परंतु या विश्वाच्या सर्व व्यवहाराचे नियंत्रण आणि सूत्रबद्ध संचालन करणा-या शक्तीची जाणीव होऊ लागली. कुणीतरी महाबुद्धिमान चैतन्य (Cosmic intelligence) ह्या चराचर सृष्टीच्या निर्मितीमागे आहे, ती शक्तीच या विश्वातील सर्व घटनांचे आणि आपल्याही आयुष्याचे नियंत्रण करते आहे असा विश्वास माणसाच्या मनात मूळ धरू लागला. हेच ईशसंकल्पनेचे (The seed of all theology) बीज होते. मात्र न दिसणा-या या ईश्वराचे आपल्या जीवनतील सर्व घटनांवर नियंत्रण असेल तर ती अज्ञात शक्ती आपल्याला अनुकूल रहावी, तिला वश करून घ्यावे अशी इच्छा माणसाला होणेही स्वाभाविकच होते. या गरजेतून माणूस ह्या अज्ञात शक्तीला, म्हणजेच ईश्वराला आळवू लागला. कधी चंद्र, सूर्य यांच्या प्रतीमा वापरून माणूस त्या निर्गुण, निराकार, अदृश्य शक्तीची उपासना करू लागला तर कधी त्या शक्तीची कल्पना करण्यासाठी अशीच इतर प्रतीके शोधू लागला. यातूनच मग कधी डोंगर, एखादा विशिष्ट वृक्ष, त्याला नेहमी उपयोगी पडणारी नदी हे सर्व त्याच्यासाठी देव किंवा दैवी प्रतीके ठरू लागले. सूर्य, चंद्रापर्यंत पोचता येत नसल्याने मग चंद्रांची किंवा सूर्याची प्रतिमा बनविण्यात आली. प्रथम या प्रतिमा ईश्वराची प्रतीके बनल्या आणि नंतर त्यांच्या मूर्ती बनू लागल्या. जसे आपण आपल्यासारख्याच असलेल्या इतर माणसांशी चांगले संबध प्रस्थापित करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी काहीतरी भेटवस्तू देतो तसे या न दिसणा-या ईश्वराला काहीतरी दिल्याने तो प्रसन्न होईल अशा व्यवहारवादी विचारातून मूर्तीपूजेचा जन्म झाला.
आपली प्रार्थना संबोधित करण्यासाठी; ती ज्याला संबोधित करायची आहे तो ईश्वर; कोणत्या तरी स्वरूपात दिसणे, निदान मनात त्याची कल्पना तरी करता येणे ही माणसाची भावनिक गरज होती. ज्या शक्तीची आराधना करावयाची आहे तिचा आकार, रंग, रूप, गुण असे काहीतरी आपल्या आकलनासाठी उपलब्ध असणे ही त्याची अपरिहार्यता होती. जगभर वेगवेगळ्या वेळी निर्माण झालेल्या मूर्तीपूजेच्या प्रथेमागचे महत्वाचे कारण हे असे आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. मध्यपूर्वेतील सर्व महत्वाचे धर्म केवळ मूर्तीपूजा नाकारतात असे नाही तर विविध करणाकरता मूर्तीपूजेचा कडवा विरोध करतात आणि काही अतिरेकी परंपरा तर मूर्तीपूजेच्या प्रथेबरोबरच मूर्तीपूजा करणा-याचांही द्वेष करावयाचे शिक्षण देतात. पण या प्रथेबाबतची दुर्दैवी गंमत अशी आहे की मूर्तीपूजेचा द्वेष करणारे आणि मूर्तीपूजेलाच खरी उपासना समजणारे असे दोघेही मूर्तीपूजा हे केवळ एका प्रतिकाचे पूजन आहे हे विसरतात. ज्याचे पूजन करतो तो पांच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने समजण्याच्या पलीकडचा आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे मग अफगाणिस्थानमध्ये कोणत्याही अध्यात्मिक संस्काराचा लवलेश नसणारे, हिंस्त्र, पाशवी,तालिबानी अतिरेकी जागतिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या भगवान बुद्धाच्या बहामियन मूर्ती फोडण्यात धन्यता मानतात. इकडे मूर्तीपूजेचा अर्थ न समजलेले मूर्तिपूजक दगडाच्या मूर्तीपुढे निरपराध पशूंचा बळी देऊन ईश्वर प्रसन्न होईल अशी अंधश्रद्धा जोपासतात. किंवा अमुक एक ‘मुहूर्तालाच’ अमुक एका मूर्तीचे दर्शन घेतल्यास आपल्या बाकीच्या रोज सुरु असलेल्या सर्व पापांकडे पूर्ण दुर्लक्ष करून देव आपल्याला पावेल अशी श्रद्धा जोपासतात. मूर्तीपूजा ही वस्तुत: आपल्या आकलनासाठी निर्माण केलेली एक सोय आहे. ती मुळातच प्रातिनिधिक आणि प्रतीकात्मक आहे. जसा एखादा आर्किटेक्ट आपण बांधणार असलेल्या इमारतीची कल्पना येण्यासाठी संकल्पचित्र (Blue-print) तयार करतो तसे अदृश्य, अमूर्त ईश्वराची केवळ कल्पना करण्याकरता ‘दगडात काढलेले संकल्पचित्र’ म्हणजे मूर्ती आहे. त्यामुळे तिची पूजा ही नेहमीच प्रातिनिधिक राहणार आहे.
मुर्तीपुजेची प्रथा असलेल्या भाविकात ईश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी , काहीतरी अर्पण करणे ही साधी स्वाभाविक इच्छा असू शकते. मात्र ही फुले, गंध, चंदन इत्यादी (अदृश्य पण सर्वत्र असलेल्या) ईश्वराला अर्पण करण्यासाठी हवेत तर उधळून देता येत नाही म्हणून निर्माण केलेले मूर्ती हे ईश्वराचे केवळ प्रतिक आहे हे मूर्तीपूजक विसरलेले आहेत. तर दुसरीकडे आपण ज्या ईश्वराची उपासना अमूर्त स्वरुपात करतो त्याच ईश्वराची कल्पना मूर्तिपूजक त्यांच्या आकलनाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रतीकांच्यामार्फत करत आहेत हे समजावून घ्यायला मूर्तिभंजक त्यांना देण्यात आलेल्या मुलतत्ववादी शिक्षणामुळे तयार नाहीत.
खरे तर आपण सगळेच मूर्तीपूजा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात करतच असतो. अगदी साधे उदाहरण पाहिले तर असे सहज, साधार म्हणता येईल की ज्या ज्या देशाला त्याचा झेंडा आहे त्या प्रत्येक देशाला मूर्तीपूजा मान्य आहे. कारण झेंड्याशिवाय आपण त्या देशाची कल्पना करू शकत नाही. समजा आपण ती त्या देशाच्या नकाशाच्या स्वरूपात केली तरी तेही केवळ एक प्रतीकच असणार आहे. नकाशाला सलामी दिली जात नाही आणि झेंड्याला मात्र सलामी दिली जाते. ध्वजवंदन हे त्या देशाने ‘आपला राष्टध्वज’ या प्रतीकाच्या माध्यमातून केलेले आपल्या देशाचे प्रातिनिधिक पूजनच आहे. भारतीय परंपरेतील भाविक अनेकदा मूर्तीऐवजी कळसाला, प्रसंगी पूर्ण मंदिराला, ईश्वराचा दर्जा बहाल करतात आणि संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालतात अगदी तशीच प्रदक्षिणा पवित्र काब्यालाही हज यात्रेच्या वेळी अतिशय श्रद्धेने घातली जाते. ‘पाम सन्डे’ला ख्रिस्ती भाविक हातात पाम वृक्षाची पाने घेऊन चर्चला प्रदक्षिणा घालतात. काही ख्रिस्ती बांधव गळ्यात क्रूस परिधान करतात. मुस्लीम भाविक पवित्र संतांच्या दर्ग्यावर चादर चढवतात. मुळात ईश्वरच न मानणा-या भगवान बुद्धांच्या सोन्याच्या मूर्तीचे देवासारखे पूजन थायलंडसारख्या बौद्ध धर्म हा अधिकृत राष्ट्रीय धर्म असलेल्या देशात रोज होते. हे सर्व मुळात मुर्तीपूजेचीच विविध रूपे आहेत. मूर्तीपूजेशिवाय ईश्वराची कल्पना करणे जवळजवळ अशक्य आहेत. यात माणसाचा मूळ स्वभाव लक्षात घेतला तर वावगे असे काही नाही. आस्तिक असलेल्या कोणत्याही माणसाने डोळे मिटून प्रार्थना करावयाची म्हटल्यास कोणत्यातरी प्रतिकाची, आकृतीची, प्रतिकृतीची कल्पना करणे अटळ आहे.
मूर्तीपूजा ही पंचेद्रियांवर अवलबून असलेल्या माणसाच्या आकलनशक्तीची अगतिकता आहे. मूर्तिपूजक आणि मूर्तिभंजक या दोघांनीही जर हे सत्य समजावून घेतले तर दोघेही त्या विश्वनिर्मात्याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने करतानाही परस्परबंधुभाव सांभाळू शकतील. एवढेच नव्हे तर तो वृद्धिंगतही करू शकतील. अध्यात्माच्या क्षेत्रात भारतापेक्षा मागे असलेल्या इतर देशांना हे समजायला नक्कीच वेळ लागेल. मात्र ज्यांचा भूतकाळ आणि पूर्वज एकाच वंशाचे आहेत त्या भारतीय समाजातील अमूर्त ईश्वराची उपासना करणा-या आणि त्या जगन्नियंत्याची कल्पना मूर्तीच्या सहाय्याने करून त्याचेच पूजन करणा-या, अशा दोन्ही घटकांना हे शक्य आहे. तसे गेली शतकानुशतके ते करीतच आहेत. आजच्या संघर्षशील जगात परस्पर-सामंजस्याचा असा आगळा आदर्श जगापुढे केवळ उभय विचाराचे भारतीयच उभा करू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे.
— श्रीनिवास बेलसरे.
shreeneevas@gmail.com

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..