नवीन लेखन...

मोदींच्या मिस्कील नजरेतून – एक अकबर-बिरबल

पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिनमध्ये बसत असे ती एका मोठ्या हॉलमध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूंना साडेतीन फूट उंच पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४–२५ जणांचा स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्याबरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते.

हॉलचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो. तिथे एक तीन फूट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.

त्या दिवशी दुपारचे साडेतीन वाजले असतील. नुकताच सर्वांचा चहा झाला होता. अचानक दरवाजा उघडून एक कर्मचारी आत आला आणि थरथरत्या पण सर्वांना ऐकू येईल अशा आवाजात म्हणाला, “पंतप्रधान इकडेच येत आहेत!”

मी चमकलोच. गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत आहे. या आधी पंतप्रधान तर सोडाच, कुणा वरिष्ठतम अधिकाऱ्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिनमध्ये डोकावल्याचे मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल. म्हणतात ना—देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावं लागतं, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो.

सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करायला सुरुवात केली. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचार्‍याच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी आत आले. साहजिकच, पहिलेच केबिन असल्यामुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर गेली. कामाबाबत जुजबी माहिती विचारली आणि विभिन्न विषयांवर माझे मत विचारले. प्रत्येक केबिनसमोर उभे राहून त्यांनी कर्मचार्‍यांची विचारपूस केली आणि त्यांच्या सोबत चर्चा ही केली.

सर्वात शेवटी, अर्थात माझ्या केबिनच्या समोरच्या केबिनमध्ये बसणाऱ्या स्टाफची विचारपूस केली. त्यांची नजर अलमारीवर ठेवलेल्या ७–८ रिकाम्या चहाच्या कपांवर गेली. त्यांनी मिस्कीलपणे विचारलं, “बहुत चाय पीते हो आप लोग?”

स्टाफमधल्या एका कर्मचार्‍याने उत्तर दिलं, “सर, सारे कप हमारे नहीं हैं, और लोग भी अपने खाली कप यहाँ रख देते हैं.”

पंतप्रधान हसले आणि म्हणाले, “दोस्तों, आपने अकबर-बिरबल की कहानी सुनी है?”

आम्ही सर्व टक लावून त्यांच्या कडे बघू लागलो. पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.

त्यांनी अकबर-बिरबल गोष्ट सांगायला सुरुवात केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत):

एकदा अकबर बादशाह बिरबलच्या घरी गेले. पाहतात काय—बिरबल आणि बिरबलाची बेगम एका मंचकावर बसून आंबे खात होते. आत येताच अकबर बादशाहचं लक्ष जमिनीवर टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेलं.

अकबर बादशाहने मनात विचार केला—बिरबल स्वतःला शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बिरबलला दाखवायला पाहिजे की बादशाहही किती बुद्धिमान आहे.

अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या आणि म्हणाले, “बिरबल, मी सांगू शकतो की माझ्या इथे येण्याआधी तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत.”

बिरबल अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे हे त्याने सहज ओळखलं. तो मिस्कीलपणे म्हणाला, “जहाँपनाह, आपण चुकत आहात. या खाली टाकलेल्या कोयी मी खाल्लेल्या आंब्यांच्या आहेत. माझी बेगम तर कोयींसह आंबे खाते.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले आणि सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय स्पष्ट झाला. आम्हीही मुक्तपणे हसलो.

(कहाणीचा अर्थ मला जो कळला—बिरबलने आपल्या चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनवले असेल, पण मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका. उगाच दुसऱ्यांचे नाव कशाला घेता? हा सर्व चहा तुम्हीच गटकला आहे!)

पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्‍यांशी अशा पद्धतीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर-बिरबलची गोष्ट सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.

– विवेक पटाईत 

Avatar
About विवेक पटाईत 201 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..