नवीन लेखन...

नवरात्र सण व मार्केटिंगचे फंडे

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो आहे.

काल प्रसिध्द हिंदुत्ववादी लेखक, भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांति ज्योतिषरत्न डॉ. गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे. परवापासून चार-पाच महिलांनी दूरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व एक विचारणा केली, “गुरुजी, नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात व देवीची, नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडियाद्वारे प्रसारित होत आहेत, हे सत्य आहे का?” काही महिलांनी तर “नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले, गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते दागिने घालावेत आणि त्यांनी देवीची कशी कृपा होते ? याचेही मेसेज आपणास आले आहेत” असे सांगितले. “धर्मशास्त्रात असे काही दिले आहे का ?” असे विचारले.

“गरबा व दांडिया खेळ हाच देवीला आवडतो व तो खेळलात की लक्ष्मी प्राप्त होईल” अशाही चर्चा होत आहेत. यात सत्यता आहे का ? “गुरुजी, धर्मशास्त्रात हे दिले आहे का? असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतो आहे”. मुंबई येथील सौ. सावंत नावाच्या महिलेने सांगितले की ऑफीसमध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या व त्याला अनुसरुन मँचिंग बांगड्या, कानतले वगैरे अलंकार असे घालावेत असे ठरतंय. “मी गरीब आहे, शिपाई पदावर काम करते, नवरा सतत आजारी असतो. मी एवढा खर्च करु शकत नाही, तेव्हा मी काय करु ? देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर ?” हा प्रश्न ऐकून मात्र मी हादरलोच व ठरवलं की यावर एक लेख द्यावा.

४ वेद, ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथ, जवऴपास ६० स्मृतिग्रंथ यात कोठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करा असं दिलेलं नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करा (सकच्छ म्हणजे नऊवार साडी असेल तर उत्तम) असे दिले आहे. जे तुमच्याजवऴ अलंकार असतील ते घाला मँचिंग हवंच असं नाही.

मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरुन हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केला आहे व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बीभत्सपणा आला आहे. प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. उदा.महाराष्ट्रात “घटस्थापना ” ही प्रधान असते. त्याच सोबत अखंड नंदादीप, काहीजणांकडे त्रिकाळ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी कुमारिका पूजन व भोजन व माळा बांधणे अशा पध्दतीने नवरात्र होते. ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होम हवन, सरस्वती आवाहन पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र व गोवा प्रांतात असतात. कर्नाटकात दसरा मोठा असतो. कच्छ, सौराष्ट्र, गुजराथ प्रांतात देवीचे प्रतिमापूजन करुन रात्री जागरण, गरबा तसेच होमहवन वगैरे पध्दतीने हा उत्सव करतात. प. बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.

इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात, सरमिसळ करतात व नवीनच पध्दत निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो व त्यात देवीची उपासना हा सर्वात मुख्य भागच नसतो. प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट्य असते, परंपरा असतात त्या जपल्याच पाहिजेत; अन्यथा काही वर्षांनी आपली मुले-नातवंडे नवरात्र याचा अर्थ डीजे लावून गरबा दांडिया खेळणे एवढाच घेतील. मातृशक्तीचा उत्सव हा त्यांना कळणारच नाही. मी हिंदू आहे म्हणजे माझे आचार-विचार, संस्कृती माझ्या धार्मिक परंपरा यांचा मला एकदा विसर पडला की गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा, काहीच फरक पडणार नाही (माझे धर्मांतर करणे अगदी सहज सोपे व सुलभ होणारे). नेमकी हीच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे.यात काही झाले तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.

एखाद्या गरीब भगिनीला हे “हाय फाय” नवरात्र जमणार नाही, ती देवीपूजन करणार नाही. म्हणजे हळुहळु ती नास्तिक होईल (यांचे धर्मांतर करणे अगदी सोपं). श्रीमंती व धर्मशिक्षणाचा अभाव आणि मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या “डिजे व गरबा दांडियाला” नवरात्र समजतील. कारण यांनाही नवरात्र म्हणजे देवी उपासना हे माहितीच नाही. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल. थोडक्यात काय, तर पराभव हा हिंदूंचाच होईल व याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदू समाजच कारण आहेत.

काही वर्षांपूर्वी “डे” संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा “गिफ्ट वस्तूंच्या कंपन्या व ग्रीटिंग कार्ड कंपन्या” आपल्या देशात आल्या तेव्हापासन हे “डे”चं खुळ डोक्यात शिरले आहे. चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे या दिवसात करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे की मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगावे लागते, हे “डे” मात्र ते लक्षात ठेवतात.

गोकुळाष्टमी ही “राजकीय पुढारी” मंडळींच्या कृपेने अशीच “डीजे व मद्यमय” झाली. किमान आईचा उत्सव असा होता कामा नये असे वाटते आहे. चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारुन त्यांचा उत्पात, शमन करुन जगदंबेने जी विश्रांती घेतली त्याचा काळ हा नवरात्र आहे. या युध्दाचा शीण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे (आपण युध्द करतच नाही, केवऴ नाचतो). या काळात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही रूपातील देवीची सेवा करणे, आपल्या परंपरेनुसार नंदादीप, माळ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडून सरस्वतीची उपासनाही विद्या व बुध्दी करता करुन घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरिता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रू संहार, सामर्थ्यप्राप्तीकरिता महाकालीची उपासना करावी.

मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिळवून उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणाऱ्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे या करता देवीचे माहात्म्य व पराक्रम वाचावेत, ऐकावेत. आज काळाचीही गरज आहे.

हिरॉईनसारखे नाचण्यापेक्षा महाकालीसारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तूरच्या चन्नमा, जिजाबाईंसारखा पराक्रम दाखवण्याची ही वेळ आहे. आज गरज त्याचीच आहे. नाचणारे खूप झालेत, पण पराक्रमी मात्र कमी होत आहेत.

या दांडिया व गरब्याच्या काळात “संतति नियमन साधनांची” विक्री दुप्पट होते आहे. नंतर शालेय व कॉलेज तरुणींचॆ गर्भपात प्रमाणही वाढते आहे. याबाबत काही सेवाभावी संस्थांनी सर्वेक्षण करुन अहवाल सादर केले आहेत. “लव्ह जिहाद” याच काळात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुला-मुलींना या धोक्यांची जाणीव करुन देणे हे कर्तव्य आपले आहे.

तेव्हा या मार्केटिंग व इव्हेंट फंड्यांना बळी न पडता सात्विकपणे आनंदाने आपल्या परिस्थितीनुरुप जगदंबेची सेवा करावी, देवीची कृपा प्राप्त करावी ही विनंती.

वरील माहितीत चूक असेल तर क्षमस्व.
वेदभूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले, 9404170656

(वरील लेख लेखकाच्या नावागावा सहित अन्य समूहावर देऊ शकता. याने तात्विक समाधान लाभेल व चौर्यकर्म पातक लागणार नाही).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..