नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ८

Modern American Agriculture and Animal Farming - Part-8

अमेरिकन खाद्य संस्कृतीचे औद्योगीकरण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सुरू झाले. याचा प्रारंभ झाला मांसोत्पादनाच्या उद्योगापासून (Meat Packing Industry). मांसोत्पादनाच्या साखळीतला, कत्तलखाना हा एक मोठा महत्वाचा दुवा आहे. सुरवातीला स्थानिक पातळीवर किरकोळ स्वरूपाचा व्यवसाय करणारे कत्तलखाने, मोठे होता होता आपले स्वरूपदेखील बदलू लागले. त्यामुळे कत्तलखान्यांना जसजसं संघटीत व व्यावसायिक रूप येत गेलं, तसतसं त्या साखळीतला केवळ एक दुवा बनून रहाण्यापेक्षा, संपूर्ण साखळीच आपल्या नियंत्रणाखाली आणणे हे कत्तलखान्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू लागले. मांसोत्पादनाच्या उद्योगामधे, विक्रीसाठी परीपूर्ण वाढ झालेली जनावरे गोळा करणे, त्यांना ट्रक्समधून, रेल्वेगाड्यांमधून मोठमोठ्या औद्योगिक स्वरूपाच्या आधुनिक कत्तलखान्यांमधे आणणे, त्यांच्या कत्तलीनंतर अत्याधुनिक साधनांनी त्यांच्या मांसाचे भाग करणे, शीतगृहामधे त्या मांसाची काळजीपूर्वक साठवणी करणे, वातानुकुलित ट्रक्स आणि रेल्वे गाड्यांमधून त्या मांसाची देशभर आणि विमानातून किंवा बोटीतून परदेशात पाठवणी करणे, असा हा मोठा पसारा असतो. जसजसा मांसोत्पादनाचा उद्योग वाढू लागला तसतशा, हा संपूर्ण पसारा सांभाळणार्‍या सर्वसमावेशक अशा कंपन्या उदयास येऊ लागल्या. थोडक्यात म्हणजे एका टोकाला जनावरांच्या स्वरूपातला कच्चा माल उचलण्यासाठी हजारो फार्म्स आणि दुसर्‍या टोकाला ग्राहकांना प्रिय असे बीफ, पोर्क, बेकन, चिकनचे वेगवेगळे भाग (कट्स) सुबक, आकर्षक वेष्टनात मांडून ठेवणार्‍या, देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेल्या सुपर मार्केटच्या साखळ्या, यांच्यामधला लांबच लांब सेतू म्हणजे या मांसोत्पादन करणार्‍या कंपन्या.

जसजशा या कंपन्या आकारमानाने वाढू लागल्या तसतसा त्यांचा कारभार देखील अधिकाधिक मनमानी होऊ लागला. शेवटी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ नये म्हणून, सरकारने १९२१ साली कायदेशीररित्या हा सारा मांसोत्पादनाचा उद्योग आपल्या नियंत्रणाखाली आणला. पुढील काही दशके हा मांसोत्पादनाचा उद्योग सरकारी निर्बंधाखाली बर्‍याच अंशी सुनियंत्रितपणे चालला होता. परंतु १९७० च्या दशकापासून या उद्योगावरची सरकारची पकड ढिली पडू लागली. त्यामुळे १९८० सालापासून पुन्हा एकदा या कंपन्यांचा अनिर्बंध कारभार सुरू झाला. त्या सुमारास, अमेरिकेतील सर्वात मोठ्या चार मांसोत्पादन करणार्‍या कंपन्यांमधे मिळून ३६% गाईगुरांची कत्तल व्हायची. त्यानंतर पुढच्या २५ वर्षांत या कंपन्यांनी लहान व मध्यम आकाराच्या इतर कंपन्यांना गिळंकृत करून स्वत:चे आकारमान एवढे वाढवले की, २००५ साली अमेरिकेत कत्तल झालेल्या एकूण गाई गुरांपैकी तब्बल ८०% जनावरे या चार कंपन्यांच्या मालकीच्या कत्तलखान्यांमधे मारली गेली होती. आज केवळ मांसोत्पादनच नव्हे तर खाद्यनिर्मितीशी निगडीत अशा कुठल्याही क्षेत्रामधे काही मोजक्याच कंपन्यांचे राज्य दिसते.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..