नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग २

Modern American Agriculture and Animal Farming - Part-2

अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्णता ही कोणत्याही देशाच्या सरकारची प्राथमिक स्वरूपाची जबाबदारी असते. १९३० आणि १९४० च्या दशकामधले अमेरिकन सरकारचे कृषी विषयक धोरण हे शेतकरी धार्जिणे होते. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्‍यांना शेतीवर उपजीवीका करून, संपूर्ण देशाला पुरेसे अन्न उत्पादन करण्यासाठी अनुकुल अशा योजना राबवल्या जात होत्या. शेती हे एक उपजीविकेचे महत्वाचे साधन असल्यामुळे, छोटे छोटे शेतकरी देखील स्वत:च्या जमिनीवर कष्ट करून, अर्थार्जन करू शकतील याबद्दल सरकार जागरुक असायचे. त्यामुळे देशभर पसरलेल्या लाखो लहान मोठ्या फार्म्सच्या वैविध्यपूर्ण उत्पादकतेतून, देशाला पुरेसे धान्य आणि पशुजन्य अन्न पदार्थ उत्पादन करण्यास पोषक असे वातावरण देशात होते. १९५० आणि १९६० च्या दशकांत, कृषी आणि पशुपालनाच्या क्षेत्रांत, उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात येऊ लागला. शेती व्यवसायाचे अधिकाधिक औद्योगीकरण करून, कमी शेतकर्‍यांकरवी अधिक धान्योत्पादन शक्य होऊ लागले. या नव्या धोरणांमुळे धान्योत्पादनाची परिसीमा गाठली गेली. संपूर्ण देशाला पोटभर खायला घालून भरपूर उरेल एवढा धान्याचा सुकाळ सुरू झाला. मग पुन्हा अमेरिकन शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून, या अमाप धान्याला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या धोरणामुळे, शेतीचा सारा बाजच बदलून गेला.

अमेरिकन शेती व्यवसायातील दोन महत्वाची पिकं म्हणजे मका आणि सोयाबीन. या पिकांच्या एकूण जागतिक उत्पन्नापैकी अमेरिकेचा हिस्सा अनुक्रमे ४१% आणि ३८% आहे, हे लक्षात घेतलं तर या पिकांचं महत्व समजून येईल. या पिकांच्या निर्यातीला अमेरिकन शेती व्यवसायात मोठंच मानाचं स्थान आहे. त्यामुळे या पिकांच्या बाबतीतलं अमेरिकन शेतकर्‍यांचं जगातील अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं. त्याचबरोबर जी धान्यं इथे पिकवण्यापेक्षा दुसर्‍या देशांतून विकत घेणं आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत होतं, ती धान्यं परदेशातून आयात करण्याचं प्रमाण वाढत होतं. थोडक्यात अमेरिकन सरकारचं कृषीविषयक धोरण अन्नाच्या बाबतीतल्या स्वयंपूर्णतेकडून, जागतिक बाजारपेठेच्या आर्थिक समीकरणाकडे झुकत चाललं होतं.

जी गोष्ट शेतीच्या बाबतीत तीच गोष्ट पशुसंवर्धनाच्या बाबतीत. विसाव्या शतकात अमेरिकेतील पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात विस्मयकारक प्रगती आणि त्या अनुषंगाने फार मोठे बदल झाले आहेत. पशुसंवर्धनाच्या क्षेत्रातला हा आमूलाग्र बदल घडवून आणण्याला चार महत्वाचे घटक कारणीभूत झाले आहेत –

१. फार्म्सचा वाढलेला आकार / आवाका
२. उत्पादनाच्या पद्धतीमधे झालेला बदल
३. अधिकाधिक होत जाणारे विशिष्ट बाबतींतले कौशल्य (specialization)
४. उत्पादनाच्या विविध पातळ्यांमधले एकसूत्रीकरण (Tighter vertical coordination)

या सर्व बदलामागे नवीन तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. ही तांत्रिक प्रगती, यांत्रिक (mechanical), जैविक (biological), आणि रासायनिक (chemical) स्वरूपाची आहे. बी बियाण्यांच्या सुधारित जातींमुळे, रासायनिक खतांच्या वापरामुळे, मोठमोठी यंत्रसामुग्री वापरून, आता एक शेतकरी कुटुंब, कमी कष्टात अधिक जमिनीतून प्रचंड प्रमाणात धान्य उत्पादन करू शकतं. त्याच प्रमाणे पशुपालनातल्या तांत्रिक प्रगतीमुळे, तेवढंच खाद्य आणि कष्टाच्या मोबदल्यात, जनावरांच्या वजनात, दुग्धोत्पादनात वाढ झालेली असल्यामुळे, फार्म्सची दूध, अंडी, मांस पैदा करण्याची क्षमता कैकपटीने वाढली आहे.

उदाहरणच द्यायचं झालं तर कुक्कुटपालन आणि वराहपालनाचं देता येईल. १९५५ सालामधे ३.१ पाउंड वजनाचा एक ब्रॉयलर (मांसोत्पादनासाठी वापरल्या जाणार्‍या विशिष्ट जातीच्या कोंबड्या) तयार व्हायला ७३ दिवस लागायचे. एकूण १०० पाउंड ब्रॉयलर मांस तयार करण्यासाठी २८५ पाउंड खाद्य आणि ४ तास मजुरी लागायची. १९८० सालामधे ४ पाउंड वजनाचा एक ब्रॉयलर तयार व्हायला ५२ दिवस लागायचे आणि १०० पाउंड ब्रॉयलर मांस तयार करण्यासाठी २०८ पाउंड खाद्य आणि ३० मिनिटॆ मजुरी लागायची. त्यापुढेही ही वाटचाल अशीच पण थोड्या कमी गतीने चालू राहिली. ब्रॉयलरचे आकारमान वाढतच चालले होते. त्यामुळे २००५ साली ५.४ पाउंड वजनाचा एक ब्रॉयलर तयार व्हायला केवळ ४९ दिवस लागत होते आणि १०० पाउंड ब्रॉयलर मांस तयार करण्यासाठी फक्त १२५ पाउंड खाद्य लागत होते.

हाच प्रकार वराहपालनाच्या क्षेत्रात देखील दिसून येतो. १९९२ साली दर १०० पाउंड पोर्क तयार करण्यासाठी ३८३ पाउंड खाद्य लागायचे, तेच २००४ साली केवळ २१४ पाउंड खाद्यातून साधलं जाऊ लागलं. हे १०० पाउंड पोर्क उत्पादनासाठी १९९२ साली ५३ मिनिटे मजुरी लागत होती, तर २००४ साली केवळ ९ मिनिटे.

पूर्वी जनावरांचा फार्म म्हटलं की थोड्या फार गायी, थोडी डुकरं, काही कोंबड्या असा प्रकार असायचा. अशा तर्‍हेचे फार्म्स आता झपाट्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता जनावरांच्या फार्म्सना जणू फॅक्टरीजचं स्वरूप येत चालंलय. त्यामुळे फार्म्स देखील एखाद्या विशिष्ट जाती प्रजातीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करू लागले आहेत. असे हे कारखान्याच्या स्वरूपाचे फार्म्स, जनावरांना चरायला मोकळं सोडण्याऐवजी, त्यांना मर्यादित जागेत बंदिस्त करून खाऊ पिऊ घालतात. पूर्वी आपल्या फार्मवरच्या जनावरांसाठी आपल्याच जमिनीत उगवलेलं धान्य शक्यतो खाऊ घालण्याची पद्धत होती. आता अधिकाधिक फार्म्स जनावरांचं खाद्य बाहेरून घेणं पसंत करतात.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..