नवीन लेखन...

मिडास टच

दिग्दर्शकाची कारकिर्द ही साधारणपणे वीस वर्षांची असते. या वीस वर्षांत तो आपला असा ठसा उमटवून जातो, की त्यानंतरच्या येणाऱ्या, अनेक पिढ्यांना त्याचे चित्रपट हे ‘गाईड’ (मार्गदर्शक) होतात.
असाच तीन भावांमधील, एक धाकटा भाऊ हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या दोघांहून अधिक सरस ठरला. पंजाबमधील गुरुदासपूर येथे आईविना, एका वकील पित्याने लहानाचे मोठे केलेल्या दोन मुलांनी मुंबई गाठली. चेतन आणि देव यांचे चित्रपटसृष्टीत बस्तान बसल्यावर धाकटा विजय मुंबईत आला.
मुंबई ते महाबळेश्वर प्रवासात त्याने देवला आपली कथा ऐकवली. देवला ती आवडली व ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या पहिल्या चित्रपटापासून ‘गोल्डीयुग’ सुरु झालं.
त्यानंतर ‘नो दो ग्यारह’, ‘काला बाजार’, ‘तेरे घर के सामने’, ‘हम दोनो’, ‘तीन देवीया’ हे त्यांच्या शिरपेचात रोवले गेले. ‘काला बाजार’ या एकाच चित्रपटात तिघाही बंधूंनी एकत्र काम केलेलं आहे.
प्रत्येक श्रेष्ठ दिग्दर्शकाचं, आयुष्यात एकाच हिट चित्रपटाने नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जात. तसं विजय आनंदचं नाव अजरामर झालेलं आहे ते ‘गाईड’ साठी!!!
‘गाईड’ खरं तर राज खोसला करणार होते, मात्र वहिदानं त्यांना नाकारलं. मग तिथे वर्णी लागली विजयची! विजय आनंदने पटकथा, संवाद, दिग्दर्शन, संगीत व गाण्यांवर मेहनत घेतली व चित्रपट यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवला.
‘गाईड’मधील प्रत्येक फ्रेम सर्वोत्कृष्ट आहे. संवाद अप्रतिम आहेत. गाण्यांचं चित्रीकरण करण्यासाठी अपार कष्ट घेतलेले आहेत. त्यासाठी फली मिस्त्री या कॅमेरामनचं योगदान वादातीत आहे. फ्लॅशबॅक तंत्राचा अतिशय खुबीने वापर करुन चित्रपटाची कथा उत्कंठावर्धक मांडलेली आहे. आजही ‘गाईड’ हा चित्रपट या क्षेत्रातील उमेदवारांना ‘दीपस्तंभा’ प्रमाणे मार्गदर्शक ठरतो आहे.
‘तिसरी मंझील’चा नायक खरंतर देव आनंद होता, काही कारणाने तिथं शम्मी कपूर नक्की झाला. आशा पारेख नायिका, प्रेमनाथ खलनायक. आरडीची झिंग आणणारी, एकसे बढकर एक अशी हिट गाणी! यातील थरारक रहस्याची गुंतागुंत विजय आनंदने उत्कृष्टरित्या सादर केली. प्रत्येक गाण्याचं टेकींग हे अफलातून केलं. त्यातील ‘ओ मेरे सोना रे, सोना रे’ हे आजही ताजंतवानं वाटतं, यांचं सर्व श्रेय फक्त गोल्डीलाच जातं.
‘ज्वेल थीफ’ या रहस्यमय चित्रपटाची तुलना हाॅलीवुडपटाशी होऊ शकते, ती विजय आनंदच्या क्रिएटिव्ह दिग्दर्शनामुळेच! पहिल्यांदा हा चित्रपट पहाणाऱ्याला देव आनंदचा डबल रोल आहे असा भास होतोच. तनुजा, वैजयंतीमाला, अंजु महेंद्रु, हेलन, फरियाल या पाच तारका घेऊन या चित्रपटाच्या वेगवान कथानकाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत जागचे हलू दिले नाही. यातील कळसाध्यायाचे ‘होठों पे ऐसी बात.’ हे चौदा मिनिटांचे गाणे आजही हिट गाण्यांमध्ये मोडले जाते.
‘जाॅनी मेरा नाम’ हा चित्रपट, उत्कृष्ट संकलन कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठच आहे. विजय आनंदने टायटल्स पासून शेवटपर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवलंय. प्रत्येक गाण्याचं चित्रीकरण लाजवाब केलंय. या चित्रपटाच्या पुढे दिलीप कुमारच्या ‘गोपी’ व राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’ ने हात टेकले होते.
या चित्रपटानंतर गोल्डीने ‘तेरे मेरे सपने’ हा चित्रपट केला. एका वेगळ्या विषयावरील या चित्रपटाने त्याला पुन्हा यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. यातील प्रत्येक गाण्यांचं टेकींग हे ‘मिडास टच’चं आहे.
याच दरम्यान विजय आनंद ओशोंच्या संपर्कात आला. त्यानंतरचे त्याचे चित्रपट सुमार दर्जाचे होऊ लागले. ‘छुपा रुस्तम’, ‘रजपूत’, ‘राम बलराम’, ‘बुलेट’, ‘ब्लॅक मेल’, इत्यादी चित्रपटांवर मेहनत घेऊनही ते बाॅक्स आॅफिसवर यशस्वी ठरले नाहीत.
विजय आनंदने काही चित्रपटांतून भूमिकाही साकारल्या. मात्र तो त्यांचा पिंड नव्हता. रेखा बरोबरचा ‘डबल क्राॅस’, जया भादुरी सोबतचा ‘कोरा कागज’, नूतन बरोबरचा ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ असे चित्रपट त्याची प्रेक्षकांवर छाप पाडू शकले नाहीत.
१९९८ पर्यंत विजय आनंद या क्षेत्रात होता. त्यानंतर या मायानगरीपासून तो दूर राहिला. २३ फेब्रुवारी २००४ रोजी त्याचं हे सुवर्णयुग अंनतात विलीन झालं.
आम्ही देखील तिघेहीजण बंधू चित्रकला क्षेत्रातील. मोठ्या बंधूंने उपजिवीकेसाठी सरकारी नोकरी स्विकारली. आम्ही दोघेही जाहिरातींच्या क्षेत्रात रमलो. या तिघां बंधूंपैकी मोठ्याने वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. देव आनंदने चाॅकलेट बाॅयच्या भूमिका केल्या. विजय आनंदने आपल्या अफाट बुद्धीमतेच्या जोरावर सर्वोत्तम चित्रपट दिले.
ऐंशीच्या दरम्यान मी विजय आनंद यांना ‘हाॅटेल विश्र्व’ मध्ये चहा घेताना पाहिलं होतं, एकदा सदाशिव पेठेतील रस्त्यावर स्कुटरवरुन जाताना पाहिलं. मात्र त्यांच्याशी बोलण्याची धाडस झालं नाही, याचं आज वाईट वाटतं आहे.
असा ‘परीस’ शतकांतून एखादाच जन्माला येतो. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे त्याचा कोणताही चित्रपट आपण कधीही पाहू शकतो. ‘गाईड’ची तर मी अनेकदा ‘पारायणं’ केलेली आहेत. आज गोल्डीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पुन्हा पहाणार आहे.
केवळ त्या ‘गोल्डी’साठीच. आज फिर ‘जीने’ की तमन्ना है.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-१-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..