नवीन लेखन...

मी ना-कुमारी, ना-विवाहिता

१९३३ सालातील ऑगस्टचा महिना. मुंबईच्या दादर परिसरातील अनाथाश्रमाच्या पायरीवर, रात्रीच्या वेळी एका इसमाने एका लहान बालिकेला गुपचूप ठेवले व तो दबक्या पावलांनी माघारी फिरला. थोडा दूरवर गेल्यानंतर, त्याच्या मनातील विचारांनी तो गोंधळून गेला. तो पुन्हा अनाथाश्रमात आला व पायरीवर ठेवलेल्या बालिकेला घेऊन, त्याने स्वतःचे घर गाठले.

त्या इसमाचा नाव होतं, अली बक्श व ती बालिका म्हणजे मेहजबीन बानो उर्फ ट्रॅजेडी क्वीन, मीनाकुमारी!! या पहिल्या घटनेपासून, तिला आयुष्यभर दुःखच भोगावे लागले. प्रत्येक अभिनेत्रीची कारकिर्द घडविण्यात तिच्या आईचाच सहभाग असतो, हिच्या बाबतीत मात्र तिचा जन्मदाता वडीलच, शनी होऊन तिला सतत पिडाच देत राहिला.

घरची गरीबी एवढी होती की, तिन्ही मुली शाळेतही जाऊ शकल्या नाहीत. तीन मुलींमध्ये मेहजबीन, ही मधली. वडील, अली बक्श हे कलाकार होते. एका चित्रपटात त्यांनी कामही केले होते. आई, प्रभावती ही बंगाली ख्रिश्चन असून लग्नानंतर ती इक्बाल बेगम झाली. ती नर्तिका होती.

वयाच्या सातव्या वर्षापासून मेहजबीन, चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करु लागली. तेराव्या वर्षी चित्रपटात काम करताना तिचं नाव मीनाकुमारी हे ठेवलं गेलं. चित्रपटांतून काम करताना ‘तमाशा’ या चित्रपटाच्या सेटवर तिची व कमाल अमरोहीची पहिली भेट झाली. अमरोहीने तिला आपल्या ‘अनारकली’ चित्रपटासाठी ऑफर केली. मात्र या चित्रपटाचे शुटींग होण्यापूर्वी एका कारच्या प्रवासात झालेल्या अपघातात, तिला डाव्या हाताची करंगळी गमवावी लागली. मीना रुग्णालयात असताना, कमाल तिला भेटायला येत असे. दोघांमध्ये फोनाफोनी होतं असे. इथूनच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

१९५२ साली ‘बैजू बावरा’ हा चित्रपट मेहजबीनला मिळाला. या पहिल्याच चित्रपटाने तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. फिल्मफेअर पुरस्कार याच वर्षी सुरू झाला व पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मीनाकुमारीला जाहीर झाला.

‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या दरम्यानच मीनाकुमारीनं कुणालाही न सांगता, कमाल अमरोही यांच्याशी लग्न केलं. अवघ्या एकोणीस वर्षांची, मीना व चौतीस वर्षांचा कमाल अमरोही. दोघांच्या वयात असलेलं पंधरा वर्षांचं अंतर, हे पुढेही वाढतच राहिलं. ते शरीराने तर सोडाच, मनानेही कधी जवळ आलेच नाहीत. तिला कल्पनाही नव्हती की हे लग्न करुन झालेली चूक, आपल्याला आयुष्यभर भोगावी लागेल.
‌‌
कमाल अमरोहीचं आधी लग्न झालेलं होतं. त्यांना तीन मुलंही होती. त्याला मीनाशी केलेलं लग्न, मीडियापासून गुप्त ठेवायचं होतं. तरीदेखील ते सर्वांना समजलं. अली बक्शला हे समजल्यावर त्यानं मीनाला, कमालपासून घटस्फोट घ्यायला सांगितला. मीना आता वडिलांकडे राहू लागली.

१९५३ साली ‘डेरा’ नावाच्या चित्रपटासाठी कमालनं, मीनाला काम करण्याची गळ घातली. अली बक्शने तो चित्रपट नाकारुन, मेहबूब खान यांच्या ‘अमर’ चित्रपटात काम करण्यास तिला सांगितले. शुटींग दरम्यान मीनाचे व मेहबूब खान यांचे भांडण झाले व तिने तो चित्रपट सोडून, कमालच्या ‘डेरा’चे शुटींग करु लागली. अली बक्श यांना हे समजल्यावर ते संतापले व मीनासाठी त्यांनी घराचे दरवाजे बंद केले. मीना पुन्हा कमालकडे गेली.

आता मीनाकुमारीला एकाहून एक सरस चित्रपट मिळू लागले. प्रसिद्धी मिळाली. हे कमालला पचवणे जड जाऊ लागले. त्याने तिच्यावर कडक निर्बंध घातले. मेकअप रुममध्ये, मेकअप करणाऱ्याशिवाय कुणीही असता कामा नये. शुटींग संपवून संध्याकाळी ६.३० वाजता घरी परतायला हवे. या अटी पाळूनही कमालच्या वागण्यात फरक पडला नाही. शेवटी कंटाळून मीनाने लग्नाच्या एक तपानंतर, १९६४ मध्ये कमालपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

एका चित्रपटासाठी गुलजार यांना मेकअप रुममध्ये येण्यास तिने संमती दिली. हे कमालचा सहायक, बकर अलीने पाहिले व त्याने मीनाच्या थोबाडीत मारली. हे सहन न होऊन मीना कमालकडे न जाता, तडक बहीणीच्या घरी गेली.

मीना आता एकटी पडली. तिच्या जीवनात गुलजार आले. दोघेही कवी असल्यामुळे त्यांची मैत्री झाली. काही काळानंतर ‘फूल और पत्थर’ चित्रपटाच्या निमित्ताने धर्मेंद्र आले. हा चित्रपट तुफान गाजला. नंतर निर्माता दिग्दर्शक, सावनकुमार यांचं नाव घेतलं जाऊ लागलं.
‌‌
याच दरम्यान तिला एकटेपणानं निद्रानाशाचा विकार जडला. डाॅक्टरांनी तिला झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी थोडी दारु घेण्याचा सल्ला दिला. तीच सवय वाढत जाऊन ती व्यसनाच्या आहारी गेली. परिणामी तिचं यकृत निकामी होऊ लागले.

१९५८ साली मुहूर्त झालेला ‘पाकिजा’ चित्रपट, कमालशी झालेल्या घटस्फोटानंतर रखडला होता. कमालच्या आग्रहाखातर तिने पुन्हा शुटींगला येणे सुरु केले. मात्र आता प्रकृती साथ देत नव्हती. तिच्या लाॅंगशाॅटला पद्मा खन्नाची, बाॅडी डबल घेऊन चित्रपट पूर्ण केला. ४ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला. प्रिमिअर शोला ती कमाल समवेत उपस्थित राहिली होती.

त्यानंतर काही आठवड्यांनी तिचा आजार बळावला. तिला हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. ३१ मार्च १९७२ रोजी तिची, या दाहक जीवनातून सुटका झाली. ती गेल्यानंतर एकवीस वर्षांनी कमाल अमरोही, त्याच वाटेवरुन गेले. मीनाच्या शेजारीच, त्यांचेही दफन केले गेले. आयुष्यात एकत्र व जवळ येऊ शकले नाहीत, ते मृत्यूनंतर जवळ-जवळ आले.

मीनाकुमारीच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘साहिब बीवी और गुलाम’ हा होता. तिला बारा चित्रपटांसाठी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं, त्यांपैकी चार चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळाला. तिला शायरी लिहिण्याचा छंद होता. तिच्या शायरीने भरलेल्या डायऱ्या आज गुलजारजींकडे शाबूत आहेत. तिच्या धाकट्या बहीणीने विनोदी अभिनेता, मेहमूदशी लग्न केलं होतं. भारत सरकारने तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक टपाल तिकीटही काढलं होतं.

आज मीनाकुमारीला जाऊन पन्नास वर्षं पूर्ण होत आहेत. आज आपण युट्युबवर तिचे चित्रपट पाहू शकतो. मुंबईमधील तिच्या आईच्या जमिनीवर, कमाल अमरोहीने ‘कमालिस्तान’ हा भव्य स्टुडिओ उभा केलेला आहे. तिथे आजपर्यंत ‘रजिया सुल्तान’सह शेकडो चित्रपटांचे शुटींग झालेले आहे. तिच मीनाकुमारीच्या स्थावर मालमत्तेची, एक जितीजागती आठवण राहिलेली आहे..

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

५-६-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..