नवीन लेखन...

आठवण अंदमानची….

आता काही काळ अशाच आठवणीवर जगायचे, नवीम काय हा प्रश्न सतत त्रास देतो म्हणून अशा आठवणी आधार देतात.

अंदमान म्हटले की सर्वप्रथम सावरकर बंधू , सेल्युलर जेल आणि त्यात असणारे ,भारतातून सर्व राज्यातून आलेले स्वातंत्र्यसैनिक सैनिक आठवतात , स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ काळे पाणी ‘ आठवते. आणि त्यानंतर आठवतो तो तेथील निसर्ग . खरेच आपण तिथे काय आहे ही नीट पाहिले आहे का ? तेथील पाणी बुळबुळीत लागते. परंतु त्याची कसर नारळाच्या पाण्याने भरून काढली आहे. तिथे मला कुठेही फारसे पोलीस दिसले नाही , आणि आश्चर्य म्हणजे एकही स्कूटर किवा बाईक चालवणारा हेल्मेटशिवाय दिसला नाही. तर कोपऱ्यावर चिट्ठी फाडणारा पोलीस किवा घासाघीस करणारा माणूस सापडला नाही. म्हणून मी एकाला विचारले लोक इतके प्रामाणिक कसे तेव्हा म्हणाला जर पकडला गेला तर १००० रुपये दंड आहे आणि तो आम्हाला परवडणार नाही. इथे फारसे गुन्हेही घडत नाहीत कारण पळून जाऊन जाऊन जाणार कुठे सर्व बाजूनी १००० मैल समुद्र. त्याचप्रमाणे कुठल्याही बोटीत चढा ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किवा pan कार्ड दाखवावे लागते. तर दुसरीकडे कुठेही बाजारात किवा कुणाच्याही हातात प्लास्टिकची पिशवी दिसली नाही. चांगल्यापैकी स्वच्छता होती. कुणीही क्गादाचा बोळा फेकून टाकला तर त्याच्याकडे अशा नजरेने पाहत की त्याला चूक सुधारावी लागेल. मी भारतात आहे की बाहेर याचा मला प्रश्न पडला होता.

खरे तर मार्को पोलो या अंदमान मध्ये पाहिल्यांदा आला , जवळ जवळ ५७२ बेटे आहेत. आत्ता जगातील सर्वच तिथे येतात. परंतु यात एक नीटनेटकेपणा आहे अर्थात गरीबी आहे पण अगदी गरीब नाही. सर्वजण काही ना काहीतरी कामे करतात. रस्त्यावर कुठेही पोस्टर नाहीत वाढदिवसाचे , दादा, भाऊ, नाना , अप्प्पा लोकांचे तर अजिबात नाहीत .फक्त निवडणुकीच्या धामधुमीत महिनाभर असतात. मग मात्र नाही. एकजण म्हणाला इथे पोलिसांना खूप मान आहे , लोक होमगार्डला पाहून देखील घाबरतात. पोलिसांना मान म्हटल्यावर जरा विचित्र वाटले. कारण मुंबई सारख्या मोठ्या शहरात पोलिसांची अवस्था काय आहे हे आपण पहात आहोतच. तिथे त्यानी आपला मान राखून ठेतला आहे हे मला निर्विवादपणे सांगावेसे वाटते. रस्त्यावरून फिरताना खरेच पोलीस फार दिसत नव्हते. तेथे गुन्हे हल्ली होतात पण प्रमाण कमी , कारण करणारे ते करणारे बहुतेक बाहेरून आलेले असतात. सर्वच समुद्र किनारे स्वच्छ आहेतच कारण तिथे नियमांचे पालन काटेकोरपणे होते. प्लास्टिक तर नाहीच नाही.

तेथे एक जमात आहे ती म्हणजे ‘ जारवा ‘ जमात. त्यांचा राखीव विभाग आहे. तिथे आपल्याला जाता येत नाही. आपल्याला त्या भागातून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी जावे लागते त्याचा जाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. पुढे पोलिसांची गाडी आणि आपल्या सर्व गाड्यांच्या मागे पोलिसांची गाडी असते. पोलिसांच्या गाडीवर लाल फडके असते. जारवा लाल रंगाचा आदर करतात. जाता जाता मधूनच एखादा दिसतो. पण त्याचा फोटो काढण्यास परवानगी नाही कारण ते जवळजवळ नग्नाअवस्थेत असतात. त्यांना कुणीही खायला द्यायचे नसते कारण आपले अन्न खाऊन ते आजारी पडतात आणि मरतात. काही NGO त्यांना माणसात आणण्याचा , त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या गाड्या त्या भागातून जात असताना अचानक एक मोठे झाड खाली पडले त्याच्याबरोबर काही लहान झाडेपण पडली. रस्ता बंद झाला , जंगल विभागाचे अधिकारी आणि काही पोलीस येऊ लागले तशी चार जारवा तेथे आले , अंगभर कपडे होते पण तोंडे मात्र रंगवलेली होती. पाच मिनिटात ते निघाले तशी जाता जाता मोडक्या हिंदीत म्हणाले ‘ हमे हिंदी आता है ‘ अनेकांचे हात खरे कॅमेराकडे गेले होते ,पण पोलिसाना पाहून थांबले. तिथे एका संग्रहालयात जारवा भाषेचे पुस्तकही दिसले.

अंदमानमध्ये बघण्यासारखे , अनुभव घेण्यासारखे खूप आहे स्कुबा डायविंग, सी वॉक करता येते ते सर्व चागल्या पद्धतीने हायलॉक आयलंड वर करता येते परंतु मला तिथे जरा वेगळेच बघायचे होते , त्या आयलंड वर एक दीपस्तंभ होता , झाडीमुळे तो अर्धा झाकला गेला होता. आपण २० रुपयाच्या नोटेवर बारीक दीपस्तंभ बघतो तो तो आहे परंतु त्याचा जिथून फोटो घेतला होता ते ठिकाण माउंट हेरीयेट हे आहे . माउंट हेरीयेट वरून जे दृश्य दिसत होते त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे , त्या माउंटवर एक ३६० डिग्री फिरणारी मोठी तोफ होती , आत्ता त्याचा चौथरा आहे वास्तविक पाहता ती ब्रिटिशानी स्वतःसाठी बांधली होते पण १९४२ च्या यु युद्धात जपान्यांनी ब्रिटिशाविरुद्ध तीच वापरली. तिथे २.५ किलोमीटरवर एक फार मोठा कातळ आहे त्या भागाचे नाव आहे ‘ काला पत्त्थर ‘ . प्रचंड मोठा काळा दगड आहे, आणि खाली खोल दरी तिथून म्हणे ब्रिटीश सैनिक खतरनाक कैद्यांना काम करायला म्हणून घेऊन येत आणि वरून खाली ढकलून देत आणि आपल्या अधिकाऱ्यांना सांगत की त्या कैद्याने आत्महत्या केली. खरे तर तिथे जायचे होते परंतु तिथे अडीच किलोमीटरच्या रस्त्यात प्रचंड जळवांचे साम्राज्य आहे.

‘ पोर्ट ब्लेअर ‘ हे काय आणि इतर बेटे समुद्रात वसलेली आहेत. मनात विचार आला की मग ह्यांना गोडे पाणी मिळते कसे. तर दुसरीकडे ‘ काला पहाड ‘ नावाचा मोठा तलाव आहे त्यात झर्यांचे पाणी येते. ते साठवले जाते.जर कमी पडले तर शासनातर्फे पुरवले जाते अंदमानमध्ये पाउस कधी पडेल हे सांगता येत नाही. खरे तर त्यांचे उत्पन्न आहे भात , नारळ आणि काही बेटांवर सुपारी. पोर्ट ब्लेअरला फक्त एकाच सिनेमाघर आहे. मी तिथल्या मुलांशी सवांद साधला तेव्हा ती म्हणाली आम्ही पुढल्या शिक्षणासाठी चेन्नईला जातो. त्यांचा आवडता हिरो आहेत सलमानखान आणि शाहरुख खान तिथे केरळीय आणि मुस्लीम वस्ती खूप आहे.

त्या बेटांनी त्सुनामीचा तडाखा सोसला आहे पोर्ट ब्लेअरला इतका नाही परंतु इतर बेटांना फटका बसला आहे. रॉस आयलंडवर गेले असता समोरच अनुराधा राव दिसल्या , आत्ता ह्या अनुराधा राव कोण हा प्रश्न अनेकांना पडला असेल , अनेकांनी तिच्याबद्दल आईकले आहे. त्या त्या बेटावर रहातात. सतत त्या भटकत असतात त्याच्या मागोमाग, सांबरे, कोंबड्या , कावळे फिरत असतात. त्या त्या प्राण्यांना त्या नावाने हाक मारत असतात. अनुराधाचे वडील रॉस बेटावरचे रहिवासी , ते जेव्हा या बेटावर आली तेव्हा तीन वर्षाची होती. तेव्हा शिकारी प्राणी मारत , ते त्याच्या मागे दगड घेऊन मागे लागायची . ज्या बेटावर दोन हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्राणी उरले त्यांची संख्या हजारावर गेली ती तिच्यामुळे . १९८७ साली रॉस बेट सैन्याच्या ताब्यात गेले आणि त्यानी अनुराधाला मदत केली. ‘ रेश्मा ही हाक मारल्यावर एक लांडोर तिच्याजवळ पळत आले.ती पक्षांना सांगते जा सर्वाना घेऊन ये असे म्हटल्यावर काही वेळात पक्षांचे थवे तिच्याजवळ येतात. कोंबड्या , ससे , कावळे ,ह्या सर्वांशी ती बोलते , भूक लागली की सर्व जन तिच्या जवळ येतात मग ती आपल्या पिशवीतून पदार्थ काढून देते तो पदार्थ त्यांना पचणारा असतो , कुणी एखाद्या प्राण्याला आपले शहरी पद्रार्थ दिले तर ती अक्षरशा बोंबलते कारण ते पदार्थ खाऊन ते प्राणी-पशु-पक्षी आजारी पडतात आणी मरतात , जवळ कुठे उपचाराची सोय नसते त्यांना घेऊन पोर्ट ब्लेअरला यायचे म्हटले तर बोटीच्या वेळेप्रमाणे शक्य नसते आणि ते प्राणी-पक्षी मरतात .तिची भाषा त्यांना कळते त्या प्रमाणे ते प्राणी पक्षी आईकतात मला याचे खूप आश्चर्य वाटले कारण माणसाला माणसाची भाषा न कळण्याच्या जमान्यात असे घडू शकते. तिची सावरकरांवर नितांत श्रद्धा आहे आमच्या लोकांनी ती असे बोलली असती तर जातीयवादीचे लेबल लावले असते परंतु ती त्यांच्याबद्दल जे बोलते हे आईकून आमचे ‘ पुरोगामी ‘ दहा वेळा आंघोळ करतील. पण ती छातीठोकपाने सांगते कारण तिने जात , धर्म, पशु, पक्षी , निसर्ग यांच्या सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत.

तेथे मड वोल्कॅनो बघायला मिळाला तो बारटांगमध्ये २००१ साली अचानक बाकूच्या परिसरात १५ मीटरच्या ज्वाला उसळू लागल्या , हे सर्व जमिनीतल्या वायुमुळे झाले आजही त्या भागातून बुडबुडे दिसतात. आत्ता तो विभाग राखून ठेवला आहे तिथे पर्यटकांना जाता येते.

अंदमानमध्ये खूप काही आहे फक्त वेळ हवा. त्याबाबतीत परदेशी पर्यटक सुदैवी आहेत ते भरपूर वेळ काढून येतात आम्ही मात्र घड्याळाच्या तालावर नाचणारे , निघायची वेळ झाली होती. मनात एकच वेचार येत होता परत येथे येणे कदाचित होणार नाही , म्हणून डोळे भरून पाहून घेत होतो , विमानाने आकाशात झेप घेतली तेव्हा मागे वळून वळून ती चिमुकली बेटे बघण्याचा प्रयत्न करत होतो , पण ती प्रचंड वेगाने ढगात विरून गेली होती .

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..