नवीन लेखन...

मेल्टिंग पॉट की सॅलड बाउल ?

म.टा.चा दिवाळी अंक वाचत होतो. सुहास कुलकर्णी यांचा वर्तमानातील अस्मिता आणि त्यांचे भयसूचक नाद यासंदर्भात त्यात लेख आहे. समाज जसजसा विसविशीत होत चालला आहे, त्याची शिवण जसजशी विरळ होत चालली आहे तसतसे धर्म, राजकारण यांची समाजावरील पकड घट्ट होत चालली आहे हा त्यांचा मूळ मुद्दा ! त्या अनुषंगाने त्यांनी सध्याच्या ठेवणीबद्दल मेल्टिंग पॉट आणि सॅलड बाउल अशी संकल्पना मांडली आहे.

तो विचार मला कुटुंबाकडे न्यावासा वाटला.अरे,एकेकाळी यालाच आपण “एकत्र कुटुंबपद्धती ” म्हणत होतो आणि हळूहळू त्या पॉटमधील नातं वितळत गेल्यामुळे (अजूनही माझ्या बघण्यात काही सन्माननीय अपवाद आहेत) आता ती “विभक्त कुटुंब पद्धती” झालीय आणि अविभाज्यपणे जीवनपद्धती म्हणून स्वीकारली गेली आहे. सगळी छोटीछोटी घरे म्हणजे सॅलड बाउल्स !

माझ्या धाकट्या मामाचे लग्न होते. त्या विवाहसमारंभात घालण्यासाठी नवा शर्ट नाही म्हणून रुसून बसलेल्या माझ्या समवयस्क नातेवाइकासाठी कोणालाही न कळविता माझे वडील रात्री नऊ वाजता जाऊन एक रेडिमेड शर्ट घेऊन आले होते. त्यांच्या त्या कृतीचे त्यांनाही अथवा लग्नघरातील कोणालाही अप्रूप वाटले नव्हते. अगदी सहज स्वीकारली गेली ही घटना ! घरातील धार्मिक,कौटुंबिक समारंभात “साथी हाथ बढाना” स्टाईल सर्व नातेवाईक (न बोलावताही) आधी हजर असत आणि कोंढाळं करून, गप्पा मारत बघता बघता लाडू वळत असत. घरातील नणंदा-भावजया सर्रास एकमेकींच्या साड्या वापरत. खामगावला माझ्या आत्याकडे मी उन्हाळ्याच्या सुट्टीला गेलो होतो तर माझी बॅग तिने सहजपणे रिकामी करून, मला न सांगता तिच्या घरमालकाच्या मुलाला परगावी जाण्यासाठी देऊन टाकली होती.

आता “उन्हाळ्याची सुट्टी ” म्हणून कोणत्याही नातेवाईकाकडे आठ -पंधरा दिवस जाणे हे जणू हद्दपार झालेय आपल्या जीवनातून ! सर्व फुले आपापल्या बागेत,फ्लॉवरपॉट मध्ये शोभिवंत, डौलदार !

सगळेजण आपापल्या ओळखी एकाच सामाईक ओळखीत विरघळवून टाकीत. हा एकजीव,एकजिनसीपणा आता आतापर्यंत अस्तित्वात होता. सध्या सहअस्तित्व किंवा स्वतंत्र अस्तित्व (भलेही एका छताखाली असेल) याचेच गोंडस नांव “स्पेस “झाले आहे. त्यामुळे परस्परांच्या आयुष्यात परवानगी न घेता डोकावणेही शिस्तसंमत उरलेले नाही.

काही वर्षांपूर्वी माझ्या नात्यातील एका घरी आकस्मित मृत्यू झाला. आम्ही तेथे गेलो तर त्यांच्या परिवारातील काही मंडळी निरनिराळ्या खोल्यांमध्ये बसून आपापले दुःख ” सहन ‘ करीत होते.

” उगाच तुम्हांला त्रास कशाला ” या वाक्याखाली आजकाल बऱ्याच घटना घडून गेल्यावर जिवलग कळवत असतात. “अमुचा प्याला दुःखाचा ” या केशवसुतांच्या उक्तीप्रमाणे माझं मी काही शेअर करणार नाही, छातीशी घट्ट धरून ठेवेन असे जाणवतेय. व्यक्ती आणि कुटुंब यांच्यातील प्रभावी कनेक्ट दुबळं होत चाललं आहे की काय असे घडताना दिसतेय. सगळीकडे नुस्ते सॅलड बाउल्स !

आमचे लाडके राज कपूर यांनी हे भविष्य आधीच सुंघले असावे. फार्फार पूर्वी म्हणजे – १९६४ च्या “संगम” मध्ये शैलेंद्रच्या लेखणीतून आणि मुकेशच्या गळ्यातून त्यांनी सॅलड बाउलच्याही पुढे एक पाऊल टाकले होते. “ओ मेरे सनम” या गाण्यात even two is a crowd अशा अर्थाच्या खालील ओळी आहेत-

सुनते हैं प्यार की दुनियामे, दो दिल मुश्किल से समाते हैं
क्या गैर वहां अपनो तक के, साये भी ना आने पाते हैं !

सॅलड बाउल चांगले की मेल्टिंग पॉट या फंदात आपण आता वृथा डोके शिणवू नये. दोन्ही टोकांचे आपापले प्लसेस / मायनसेस आहेत.
सुहास कुलकर्णींना मला एवढेच सुचवावेसे वाटते – धार्मिक, राजकीय, सामाजिक,बौद्धिक असे सॅलड बाउल्स कदाचित भारतातील वैविध्यपूर्ण रचनेमुळे तयार झाले असावेत असं मानायला जागा आहे, पण त्याची सुरुवात कुटुंबापासून नक्कीच झाली असावी कारण शेवटी कुटुंब हे समाजाचे मिनिएचर प्रारूप असते.

असो.

बा राज कपूर, तू पुढे जाऊन म्हटलेले इतके दिवस अर्थ न समजून घेताच आवडत होते, आता अनुभवल्यामुळे पटले-

” हम ने आखिर क्या देख लिया, क्या बात हैं क्यों हैरान हैं हम ! ”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..