नवीन लेखन...

‘मीरा’ – उपेक्षित नाममुद्रेची उपेक्षा !

श्रीकृष्णाशी दोन नावे सतत जोडली जातात आणि त्यांच्यात डावे -उजवे ठरविण्याची अहमहमिका खूप पुरातन आहे- “राधा आणि मीरा” ! दोघी चिरंतन झाल्या असल्या तरीही समाजमान्यतेच्या परिभाषेत कायम परिघाबाहेर राहिलेल्या आहेत. मीरेबाबत अस्सल दस्तावेज उपलब्ध नाहीत त्यामुळे ती तुकड्या -तुकड्यातून जोडावी लागते. भगवान कृष्णावरील आत्यंतिक प्रेमापोटी तिने ऐहिक जीवनाचा त्याग केला. तिच्या रचनांमध्ये भगवान कृष्ण योगी आणि प्रियकर तर ती त्याची योगिनी आणि दासी !

मात्र त्यातील मीरेच्या नक्की कोणत्या याबाबतही वाद आहेत. एक खरे की तिच्या काव्यात “समर्पण “भाव आहे. भगवंत आपला पती आहे ही धारणा तिच्या रचनांमध्ये आढळते म्हणून त्या उत्कट वाटतात.

ऐतिहासिक पुराव्यां अभावी एक सर्वमान्य निष्कर्ष असा आहे की – मीरा कृष्णभक्त होती , तिने कृष्णभक्तीपर रचना केल्या (ज्या कधींच्याच अक्षर वाङ्मयांत सामील झालेल्या आहेत) आणि ती नि:संशय भक्ती संप्रदायातील एक महत्वाची संत कवयित्रीं होती.

गुलजारसारख्या अंतर्बाह्य कवीला यापेक्षा अधिक काय हवे?

आपले आवडते कलाकार (हेमा मालिनी आणि विनोद खन्ना ) घेउन त्याने १९७९ मध्ये हा चित्रपट तयार केला. सोबतीला डॉ लागू ,शम्मी कपूर ,अमजदखान ,विदया सिन्हा अशी तगडी मंडळी होती.

अकबर शिरजोर होत आहे म्हणून रजपूत मंडळी एकजुटीने त्याचा सामना करण्यासाठी एकत्र येतात. राजकीय समझोत्याचा भाग म्हणून शम्मी कपूर आणि डॉ लागू रोटी -बेटीचा व्यवहार करावयाचे ठरवितात. विदया सिन्हाचा विवाह भोजराजाशी ठरवितात. मात्र परिस्थितीच्या वळणांमुळे प्रत्यक्षात हेमा मालिनीचा (मीरा ) विवाह (तिच्या मनाविरुद्ध ) भोजराजाशी संपन्न होतो.

तिच्यामते ती आधीच विवाहीत आहे आणि बाळपणापासून ती कृष्णपत्नी आहे. १५व्या शतकातील सासरी हे कसे पटावे? विवाहानंतरही तिच्या भावजीवनक्रमात आणि कृष्णभक्तीत बदल होत नाही. पतीच्या समजूतदारपणालाही शेवटी मर्यादा असतात. ती पत्नीव्रतात कमी पडते ,सासरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यात कमी पडते आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये कसूरवार ठरते. त्याकाळातील बंडखोरीची (त्यातही स्त्रिच्या) ही कमाल मर्यादा होती. त्यासाठी तिला समाजाने शिक्षा करायला हवीच. हातात एकतारी (येथे बंडखोर भाष्यकाराच्या भूमिकेत ” ए. के . हंगल ” आहे.) घेउन ,कुळाच्या मर्यादा ओलांडून फिरणारी मीरा समाजाला कशी मान्य होणार? ” तू मुक्त आहेस पण ते घराच्या चार भिंतीत ” असं नवरा तिला बजावतो. धर्मसंसदेचा प्रमुख (ओम शिवपुरी) तिला मर्यादांचे भान आणून देतो. ती मात्र ठाम, निश्चयी ! “जा तुम्हाला माझ्या मृत्यूदंडाच्या गुन्ह्यातून मी माफ केलं आहे ” हा तिचा संयत स्वर सर्वांना हलवून सोडतो. ” तुमच्या राज्याच्या सीमा तुम्हाला दिसतात तेवढयाच असतात आणि त्याही कालौघात बदलत असतात. ” असे ती धर्मसंसदेला ठणकावून सांगते. असले निर्भय स्त्रीत्व आजही जर खटकत असेल तर पाच शतकांपूर्वीची परिस्थिती कशी असेल याची कल्पना करता येते. विरोधाचे सूर विझवण्याचे जुने तंत्र मीरेच्याही बाबतीत अमलात आणले जाते. धर्मसंसदेच्या हुकुमानुसार तिला विषप्राशन करावे लागते.

इथे मीरेची व्यक्तिरेखा स्त्रीची प्रतिनिधी बनते. पौराणिकपेक्षा हे कथानक ऐतिहासिक बनते. चूल आणि मूल या संकल्पनांच्या पार जाउन स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वप्रतिमेच्या प्रतिष्ठेसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी स्त्रीला हे करण्याचा हक्क असतो आणि तिच्या झगडयाचा स्वर दाबून टाकणे हा आपला हक्क आहे ही समाजाची ठाम समजूत असते. अशा “विषम” लढ्याचा अंत चिरपरिचित असतो.

इथे मीराबाईमुळे कवी गुलजारला व्यक्त (काव्यातून ) होता आले नाही. मीरेच्या वस्त्रांमधून तिचा आध्यात्मिक प्रवास सूचकपणे “दिसतो.” विशेषतः श्वेतवस्त्रधारी हेमा मालिनी खूपशी मीरा भासते. त्यामानाने दुय्यम भूमिकेतही विनोद खन्ना सगळ्या छटा प्रामाणिकपणे व्यक्त करतो. पंडीत रविशंकरांचे संगीत , वाणी जयरामचा आवाज,भानू अथय्या यांची वेशभूषेची करामत तो काळ सुसंगतपणे उभा करते. मीरेची खूप परिचित पदे कानी येतात.

असे असले तरीही हा चित्रपट चालला नाही. यशाची /प्रेक्षकांच्या आवडी-निवडीची गणितं आजवर भल्याभल्यांना सुटली नाहीत. राज कपूर ( “मेरा नाम जोकर “), गुरुदत्त (“प्यासा “) अशांनाही विषाचा प्याला प्राशन करावा लागला आहे.

मीरा कलाकृती म्हणून काळजात घर करू शकली नाही. काही घटक नियंत्रणाबाहेर असतात असे म्हणायचे आणि आपल्या “अशक्त “बाळावर अधिक प्रेम करायचे एवढेच गुलजारच्या हाती होते.

मीरा अजूनही वेशीबाहेर उपेक्षित आहे- मग ते वसंत कानेटकरांचे “मीरा-मधुरा ” हे नाटक असो वा गुलजारचा “मीरा”असो.

हायसे इतकेच वाटते की “मीरेवर ” या गोष्टींचा परिणाम होत नाही. ती विरक्तीच्या पल्याड गेली आहे आणि कृष्णात विरून गेली आहे.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

(सदर लेख माझ्या “गुलज़ार समजून घेताना ” या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.)

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..