नवीन लेखन...

माझे डॉक्टर – ३ – दंतकथा

भाग ३

“अपॉइंटमेंट आहे का?”
“नाही.”
“डॉक्टर त्या शिवाय वेळ नाही देऊ शकत!” ती ततंगडी रिसेप्शनिस्ट मला सांगत होती.
“मला हे माहित नव्हतं! आणि माझ्या दातांना पण माहित नव्हतं, नसता मी आधी तुमची अपॉंटमेंट घेतली असती आणि मग, त्या कोपऱ्यातल्या दाढेला, ‘बाई, आता तुला दुखायला हरकत नाही.’ म्हणून सांगितलं असत!”
दाढदुखीने मी हैराण होतो अन हि बया अपॉंटमेंटच महत्व मला सांगत होती.
” तुझ्या डॉक्टरांना सांग, मला आत्ताच्या आत्ता त्यांची भेट हवी! सकाळी नऊ ते रात्री नऊ दवाखाना उघडा राहील म्हणून, रस्ताभर आडवी पाटी लावलीत. आणि मी त्या वेळेत आलोय!”
“अरे, तुम्ही दादागिरी करताय!”
“अहो, येथे दाढदुखीने जीव जातोय! तुम्ही प्लिज डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा!”
“ते– ते सिनेमाला गेलेत! सहा वाजता येतील! या तुम्ही सहाला!”

झकत घरी आलो. काय करतो? आणि सहाला दवाखान्यात गेलो. साडेसातला डॉक्टर आले!

दात दुखी अन कानदुखी या दोन दुखण्याचं सूर्यनारायणाशी काय वैर्य आहे माहित नाही. हि दोन दुखणी सुर्यास्थानांतर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर, जेवण खाण करून अंथरुणाला पाठ टेकवली कि डोकं वर काढतात! कानातला ठणका आणि दाढेची कळ साधारण रात्री अकरा नंतर जोर धरते! का माहित नाही. आमच्या लहानपणच्या सगळ्या गोष्टी बदलून गेल्यात. पण या दोन दुखण्याच्या वेळात काडीचाही फरक पडलेला नाही!

माझ्या लहानपणी आमचे मांडे डॉक्टर दातदुखी असो कि अजून काही असो. एखाद्या गोळीत किमान दुखणं तरी थांबवत. त्या काळी डेंटिस्ट आठवडी बाजारात नाजूक हातोडी घेऊन बसत. न रहे दात, न रहे दात दुखी! अशी डायरेक्ट मेथड होती.

एकदा माझी दाढ दुखत होती म्हणून ‘दंतवैद्य’ पाटी असलेल्या दुकानात गेलो. हल्ली ‘डेंटल क्लीनिक’ किंवा ‘डेंटिस्ट’ असे लेबल असते. एक घाऱ्या डोळ्याचे गृहस्थ आत बसले होते.

“काय होतंय?”
“दाढ दुखतीयय!”
“रूट कॅनॉल करायला पाचशे, अन दाढ काढायला पन्नास, बोला काय करू?”
“काढून टाका!” मी खिशावर हात ठेवत म्हणालो.
इतकी झपटपट बोलणी फक्त, माझ्या लग्नाचीच झाली होती!
काय पक्की होती हो, ती दाढ? त्या घाऱ्याडोळ्याला उपटताना घाम फुटला होता! खरे सांगतो, याहून थोडा अधिक जोर त्या कलावंताने लावला असता तर, — तर माझा खालचा जबडा, हनुवटीच्या कातड्यातून निसटून निघाला असता!
पण हल्ली खुपच व्यावहारिकपणा या प्रांतात घुसलाय. ‘दात कोरून पोट भरत नसत!’ अशी एक म्हण मी बालपणापासून एकात आलो होतो. दात कोरून, आपलंच काय? घराबराच, रिसेप्शनिष्टच, बायकोच्या ब्युटीपार्लरच्या मालकाचं सुद्धा पोट भरून, शिक्कल रहात! हे या डेंटल क्लिनिकवाल्या कडे पाहून खात्री पटते. अस्तु.

मला एक सोलापुरात असताना डेंटिस्ट भेटले होते, म्हणजे मलाच त्यांना गाठावं लागलं. त्याच्या खुर्चीत जाऊन मी बसलो.
“तोंड उघडा!”
मी माफक तोंड उघडले.
“अजून थोडे उघडा.”
आता लग्न झालेल्या पुरुषाला जितके शक्य असते तितकी उघडले होते. थोडा अजून जोर लावून ‘आ ‘ केला. डोक्यावरच्या सर्च लाईट मध्ये त्यांनी त्या गुहेची टेहळणी केली.
“आहाहा! ” त्यांना त्यांचा आनंद लपवणे शक्य झालेच नाही. जणूकाही माझे तोंड म्हणजे अलिबाबाची गुहा होती!
“काय झालं डॉक्टर?”
“कुलकर्णी, आहो तुमच्या खालच्या आणि वरच्या सगळ्याच दाढा किडल्या आहेत!”
हि काय आनंदाची बातमी होती?
म्हणजे आमचे दाखवायचे दात शाबूत होते, तरी खायच्या दातांना दुसरच कोणी तरी खात होत. (पुढे बऱ्याच डॉक्टरांनी खाल्लं म्हणा!)
“काय? मग सगळ्याच दाढा उपटून काढणार?”
“अहो, त्याची गरज नाही. आपणस त्या भरून घेता येतील!”
‘कीड मुळासगट उपटून काढावी.’ हे थोरामोठ्यांची उदगार आम्हाला वेद वाक्य.
“भरून?”
“हो, दाढेवरला तो किडका भाग आपण ड्रिलने काढून टाकू. मग तेथे खड्डा पडेल, त्यात सिमेंट, किंवा काही तरी रिफील करता येईल.”
“कशाने भरता?”
“आपल्याकडे तीन पर्याय आहेत. एक सिमेंट, दुसरे चांदी, आणि तिसरे सोने!”
“तुम्ही काय रिकमंड करता? म्हणजे चांगले काय?”
“अर्थात सोने भरून घ्या. दहा वर्ष बघायला नको!”
मी स्वभावाने आणि पैशाने माध्यम वर्गीय.
“चांदी भरा!”

एकंदर खर्च पहाता, मी हप्ते पडून घेतले. सोन्याच्या भावात सौदा गेला. खोदकाम आणि चराई भरण्यास तीन महिने लागले. हप्ते मात्र वर्षभर पुरले. तरीही, मी त्या डॉक्टरांचे आभारच मानेन. कारण त्यानंतर पंचेवीस वर्ष मला ‘दातदुखीचा’ त्रास झाला नाही! असे डॉक्टर नशिबानेच मिळतात.
आजून हि, ते चांदीवाले दात टिकले असते. पण आमची मस्ती नडली. त्याच काय झालं कि, मध्यन्तरी एक चुईंग गमची ऍड पहिली. म्हणे, ती गम तोंडात सारखी चावत ठेवल्यास, चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम होतो, चेहऱ्याचे तेज वाढते! आणि दात शुभ्र पांढरे होतात. वर सिगारेट सोडण्यास मदत होते! नेकी और पुच्छ पुच्छ? लगेच च्युईंगमची खरेदी झाली. चारच दिवसात त्या चुईंगमने आपला प्रताप दाखवला. भरलेली चांदी उखडून टाकली! दाढा पोकळ झाल्या. चुरमुऱ्याचा चिवडा खाताना सुद्धा, दाताचे तुकडे पडू लागले! एका रिसेप्शन गुलाबजामून खाल्ले, झाल्या अत्याचारा विरुद्ध, सुळ्या शेजारच्या दाढीने बंड पुकारले! पुन्हा दाती तृण धरून डेंटिस्टला शरण गेला! एव्हाना मी पन्नाशी पार केली होती.

या पंचेवीस वर्षात दाताचे दवाखाने आमूलाग्र बदललेले होते. पूर्वी डेंटिस्टकडे, फोटो फ्रेमच्या दुकानाचा फील यायचा. आता हॉस्पिटलचा वास जाणवतो. चकाचक काम झालाय! दाताला व्हाईट्नर लावतात, त्यापेक्षाहि ज्यास्त शुभ्र त्यांचे फ्लोअरिंग होते! पेशंटची खुर्ची तर माझ्या सिंगल बेड पेक्षाही मोठी होती! पहिल्यांदा जेव्हा नि त्यात विराजमान (हो हाच शब्द योग्य आहे, त्यावर ‘बसलो’ म्हणणे म्हणजे त्या आसनाचा अपमान होईल!) झालो तेव्हा, मला उगाचच कोणी तरी, ‘बा आदब, बा मुलाहिजा–‘ असा पुकार करत असल्याचा भास झाला! फक्त एकाच भीती वाटत होती. ती खुर्ची, इतकी डोक्याकडे कलली होती की, उन्हाळ होऊन पाय वर येतात कि काय असे वाटले.

“सर, कीड लागली आहे. एक क्सरे घ्यावा लागेल!” पेशंट दाढेला चारपाच वेळेला हातातल्या स्टीलच्या चमचा सारख्या अवजारेने ठोकून तपासून झाल्यावर त्या डॉक्टरांनी जाहीर केले.

“डॉक्टर किडली असेल तर, टाका कि काढून.”

“आपण ती दाढ वाचवू शकतो! नका काढू. आधीच तुमच्या तोंडात केवळ तीनच दाढीचे सेट, म्हणजे खालची अन वरची दाढ एकत्र मिळू शकणारी जोडी!, अन्न चावायला शिल्लक आहेत! हि दाढ काढली तर जेवायला त्रास होईल!”

या दृष्टीने मी कधीच विचार केला नव्हता. खाण्याला त्रास म्हणजे, पोटाला त्रास, आणि तेथून एकंदरच आरोग्यालाच!
“ठीक आहे!”
“तुम्हाला शुगरचा त्रास आहे का?”
“हो!”
“मग सर, त्या आधी तुम्हाला, तुमच्या डॉक्टरांचे ‘शुगर’ नॉर्मल असल्याचे पत्र आणावे लागेल!”

मला ‘दिवार’ सिनेमातल्या अभिताभ बच्चनची आठवण झाली. ‘ जाओ! पहिले, ऊस आदमी का साइन लेके आवो जिसने मेरे हात पे—-”
मी ते आणले.

मग क्सरे, रूट कॅनाल सगळेच सोपस्कार झाले. मला हा डॉक्टर दोन कारणा साठी आवडला. एक तर त्याने मला दिलेला सल्ला प्रामाणिक होता, आणि रूट कॅनाल झाल्यावर ‘या ऑपरेशन नंतर एक आईस्क्रीम खा!’ म्हणून दिलेला दुसरा सल्ला फारच भावला!!

तेव्हा ‘दात खाण्या पेक्षा’, आणि नको त्यावर ‘दात धरण्या पेक्ष्या’ दोन वेळेस, त्यातही रात्री झोपताना ब्रश करणे श्रेयसकर असते. हि अक्कल मला पासष्ठीत आली. म्हणजे आधीहि कळत होत,पण वळत नव्हतं. नशीब बलवत्तर आपण भारतात आहोत. अमेरिकेत, माझ्या एका मित्राने रूट कॅनाल करून घेतले होते. त्याच्या बिलाचा आकडा ऐकल्यावर मी त्याला म्हणालो, “नरश्या, इतक्या पैशात भारतीय डॉक्टर खालच्या जबड्यासगट ब्रँड न्यू सेट बसवून देतील!”

— सु र कुलकर्णी,

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय, पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..