नवीन लेखन...

माझा शिष्य…. (पु.ल.देशपांडे यांना मानवंदना)

सकाळी सकाळी दोन कप बायकोच्या हातचा दोन-अडीच कप चहा पिऊन मी तिकडच्या आमंत्रणाच्या प्रतीक्षेत अस्वस्थ येरझारा घालत होतो…

इतक्यांत मोबाईल वाजला….
फोन करणाऱ्यानं बरोब्बर वेळ साधली होती.

“सर ओळखलंत कां मला?”

“व्वा, न ओळखायला काय झालं?” माझा प्रतिप्रश्न..

“सांगा मग, २००० साली तुम्ही घेतलेल्या बँकिंग सेवा भरती मंडळाच्या शिकवणी वर्गात मला इंग्रजी विषयांत किती गूण मिळाले होते ?”

“तेरा….” माझं आत्मविश्वासपूर्ण उत्तर..
(त्या पेपरात बऱ्याच पोरांचे तीनतेरा वाजले होते.)

“कमाल आहे सर तुमच्या स्मरणशक्तीची.
जीवनसागरात वाहणाऱ्या अगणित ओंडक्यांपैकी
हा ओंडका तुमच्या अजून लक्षात आहे.”

“जीवनसागरात अनंत टक्केटोणपे खात खात हा ओंडका केवळ तुमच्या प्रेरणेने आज टोल नाक्यावर यशस्वीरीत्या येणाऱ्याजणाऱ्या वाहनांचे अचूक टोल फाडतो आहे.”

“माझ्या आयुष्यात आपण दीपस्तंभाप्रमाणे आलात आणि माझ्या जीवनाचं तारू योग्य दिशेनं वाटचाल करत आहे, नाहीतर आजच्या या अक्राळविक्राळ तुफानात हे तारू कुठल्या ओंडक्यावर आपटून ठिकऱ्या ठिकऱ्या झालं असतं, कळलं सुद्धा नसतं.”

आधीच वाढतं प्रेशर आणि वर हे ओंडका अन् तारू..
बरं, मारू म्हणावं; तर ओंडका दिसत नव्हता..

मी पटकन फोन बंद केला आणि नित्यकर्माला लागलो.

दहा मिनिटांनी बाहेर येऊन बघतो तर पंधरा मिस कॉल्स त्याच नंबरवरून.
प्रत्येक कॉल “रँग टेन टाइम्स”..
सोळावा कॉल लगेच..

“सर, कृपा करून भ्रमणध्वनी विच्छेदीत करू नका.”
“माझ्या भावनांचा बांध फुटलेल्या पाईपलाईन सारखा भळभळून वाहू द्या.”
“वाहून जाऊ द्या एकदाचं वर्षानुवर्षे साचलेलं गढूळ पाणी.”
“दिसू द्या तुम्हाला माझ्या नितळ मनाचं निरभ्र बूड.”
गाय जर तुमच्यासारखी पान्हा चोरायला लागली तर आम्हां वासरांनी प्यायचं काय?”

मी पटकन बनियनवर शर्ट चढवला…

“सर, माझ्याकडून काही जघन्य अपराध घडला कां?”
पामराकडून कांही अश्लाघ्य घडलं असेल तर कृपया पोटांत घ्यावे….”

आत्ताच पोट साफ झालं, आता मी काहीच पोटांत घेणार नाही..”
माझ्याही नकळत उत्तर निघून गेलं..

“सर, कृपया आपल्या धुलियुक्त चरणांचे छायाचित्र मला व्हाट्सअप वर प्रेषित करा,
मी तुमची चरणरज कपाळी लावून माझ्या पापाचे क्षालन करीन.
म्हणाल तर चरणरजयुक्त कपाळाचे फोटो फेसबुकवर तुम्हाला टॅग करून,
“फीलिंग पश्चातापदग्ध_टेकिंग प्रायश्चित्त ”
लिहून टाकून देतो.
शेकड्यानी लाईक येतील बघा..
टिप्पणी करणारे हजारो आहेत.
टाकू कां फोटो? सांगा पटकन.??
उद्या नेटपॅक अंतिम श्वास घेणार आहे.

प्रकरण हाताबाहेर चाललं होतं..
इतका भारी ओंडका आपल्या आयुष्यात आला पण पायावर पडला नाही. देवालाच काळजी होती…

“बरं, ओंडकू बाळ, आज भ्रमणध्वनीवर कशी काय आठवण झाली?”

“मी तुम्हाला फेसबुकवर मित्र विनंती पाठवून महिना लोटला, तुम्ही स्वीकार ही केली नाही की नष्ट ही केली नाही…..”
“म्हातारी मेल्याचं दुःख नसते सर,
म्हातारा तेरवीतच दुसरपनी शोधतो ह्याचं वाईट वाटते.”

मनुष्याने आयुष्यांत आशेवर जगायचं तरी किती दिवस?.
एकतर आशा वेडी असते; चावली बिवली तर काय करणार???
चौदा इंजेक्शन घ्यावी लागतात सर, आणि ती ही पोटात..
खूप वेदना होतात हो, सर…

नसेल पटत, तर काढा उपसून फेसबुकची समशेर; आणि होऊन जाऊ द्या एकदाचं दूध का दूध और पाणी का पाणी.”

आयडिया भन्नाट वाटली. उद्यापासून दूधवाला भैया आला की, समशेर घेऊनच दूध घ्यायचं ठरवलं…..

आत्ता मात्र त्या ओंडक्याची ओळख शंभर टक्के पटली.

तोच तो. पु.ल.देशपांडेंच्या सखाराम गटणे चा नातू.

शुद्ध मराठी भाषा, म्हणी व वाक्प्रचार वापरायची प्रचंड हौस आणि लहानपणापासून काला करून जेवायची सवय.
त्यामुळे अनेक म्हणी एकत्र करून वेळेवर जिभेवर येईल ती आपली…….

पुनर्जन्मावर जरी माझा विश्वास नसला तरी पिढीजात स्वभावधर्म नक्की कन्टिन्यू होतात हे मान्य करावेच लागेल..

— प्रकाश रामगीर गोसावी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..