मास्टर दीनानाथ

वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं ! आज चोवीस एप्रिल २०१७ रोजी वंदनीय मास्टर दीनानाथांची पंचाहत्तरावी पुण्यतिथी आहे,

|| मालक ||
“माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही”, असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या नि-या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, “तू काय हमालाची बायको आहेस का ?”

आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा सा-या स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !

माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? “यापुढे पान बंद”, असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, “जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा” !

एक दिवस मालक, खालूनच “माई, माई”, अश्या मोठ्याने हाका मारीत आले. “अहो काय झालं?” मी विचारलं, पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं, म्हणाले, “तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय”! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !

माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला “घाटी” म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, “अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?”

इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुस-याला हसवायचे !
मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभ-याची भाजी फार आवडायची. मटण, मासे,कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत, कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, ” काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास कां नाही ? नाही तर ये आणि जेवून जा.”
काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, “खाली पडलेल्या नोटा भिका-यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये.”

प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्या बरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !

मालाकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मी ही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे.”माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन.”

मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.

मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं तर भगवं धोतर !

मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, “मुलीच कां झाल्या ?” असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलीना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.

श्रीमंगेशावर मालकांची अगाध श्रद्धा होती ! लताच्या, बाळच्या आजारपणांत अगदी हळवे व्ह्यायचे. लताच्या आजारपणांत मालक कुंडली उघडून बसायचे. तंबोरा वाजवीत तोंडाने सारखी रामरक्षा म्हणायचे. लता देवीच्या आजारातून उठल्यावर तर मालकांनी बँड लावला होता. जेवढ्या बायका, लताला पहायला आल्या होत्या, तेवढ्या सगळ्यांची मी खणा-नारळांनी ओटी भरली होती ! उषाच्या पाठीवर मला मुलगा झाला, म्हणून उषाच्या वाढदिवसाला मालक उषाच्या पाठीची पूजा करायचे. उषा उगवली की प्रकाश येतो, म्हणून बाळला हे प्रकाश म्हणायचे. लताला हे “तताबाबा” म्हणायचे. आशा अगदी भोळसट म्हणून तिला हब्बू म्हणायचे. तर नाकाचं टोक जरा वरती म्हणून उषाला बुंडरी म्हणून हाकारायचे.
आम्ही सांगलीला होतो, तेव्हाची एक आठवण ! मालक नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायचे. एकदा रुसून मी ह्यांना म्हणाले, “इतके नेहेमी मुंबईला जाता, तर माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणा”. मालकांनी येतांना खरंच माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणली, त्यातल्या एका लुगड्याची मी घडी मोडली, तेवढ्यात दाराशी एक भिकारीण गात गात आली. तिच्या बरोबर तिची बारा-तेरा वर्षांची पोरगी होती, ती नाचत होती. ते पाहून मालकांना रडू आलं, मला म्हणाले, “पोटासाठी ती पोर नाचवीत आहे, ते मला बघवत नाही. तुझ्या अंगावरचे हे लुगडं, तिला देऊन टाकशील कां ?” काय करणार ? अंगावरचे लुगडं सोडून, मी त्या भिकारणीला देऊन टाकले. दिलदार असे की, एकदा त्यांनी नव्या आणलेल्या चादरी, दुस-याला देऊन टाकल्या.

मालक म्हणजे देवमाणूस होते ! लग्न झाल्यावर मी कधी माहेरी गेलेच नाही. कंपनीच्या किल्ल्या माझ्यापाशीच असायच्या.
मालकांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली, पण त्यांच्या संगीताचा जराही विसर पडला नाही.त्यांच्या गायकीपुढे आजचे तरुण गायक नम्रतेने मान झुकवतात. मालकांचा विलक्षण पल्लेदार आवाज, त्यांच्या नाट्यसंगीताला असलेला शास्त्रीय संगीताचा जबरदस्त आधार, रागदारी आणि लय यावरची त्यांची हुकमत, पंजाबी आणि राजस्थानी संगीताचा त्यांच्या गायकीत झालेला गोड मिलाफ, यामुळे त्यांच्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी सुटत नाही. मालक दिवसभर गाणं म्हणायचे. पहाटे चार वाजता उठून तंबोरा घेऊन बसायचे. आपला आवाज ताब्यात ठेवायचे. मालक गातांना कधी वेडे-वाकडे तोंड करायचे नाहीत. लता, मीना, आशा, ह्यांच्याजवळ गाणं शिकायच्या. केव्हां केव्हां गणूलाही (गणपत मोहिते) मालक शिकवायचे. नाटकाच्या पदांच्या तालमी तेवढे मालक घ्यायचे.

नाटक नसलं की, रिकाम्यावेळी मालक गाण्याच्या बैठकी करत. व-हाडामध्ये मालकांच्या गाण्याचे खूप कार्यक्रम झाले. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धारवाड, इंदूर, ग्वाल्हेर, सिमला अश्या कितीतरी ठिकाणी ह्यांच्या गाण्यांच्या मैफली रंगल्या ! मालकांची सर्व नाटकं मी आवर्जून बघितली. प्रत्येक पटाला वन्समोअर घेणारे, टाळ्यांच्या गजराने, डोक्यावर घेतलेले थिएटर मी पाहिलेय !

मालकांना ज्योतिषाचा भारी नाद होता. ज्योतिष विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मालकांनी मला पत्रिका बघायला शिकविलं. “हे तारे बघ, त्या कुंडल्या काढ,” असं सारखे मला म्हणायचे. आपली पाची मुलं पुढे नामवंत होतील, हे भाकीत फार पूर्वीच त्यांनी वर्तविले होते !

मालकांनी पुण्याला घर घेतलं, तेव्हां गृह्शांतीला ब्राह्मण नाही बोलावले. आपल्या मुलांकडून, त्यांनी संस्कृत मंत्र म्हणवून घेउन, घराची शांती केली. मालकांची स्मरणशक्ती तल्लख होती. संस्कृत भाषेचं त्यांना खूप वेड होतं ! ते सामवेद म्हणायचे. मोठमोठी पुस्तकं वाचली होती त्यांनी. मालकांनी मला खूप हिंडवले, फिरवले !

मालकांना शिकारीची आवड होती. कधी कधी ते शिकारीला जातांना मलाही बरोबर न्यायचे. एकदा तर तान्ह्या आशाला बरोबर नेले होते. कधी सांगलीच्या रानात, तर कधी थेट बेळगावपर्यंत जायचे. शनिवार, रविवार, बुधवार कंपनीची नाटकं असायची, तर बाकी दिवस शिकारीचे. मी रान उठवायची. ते, तितर, सश्यांची शिकार करायचे. मालकांनी वाघ मात्र कधी मारला नाही, कारण, “ते आमचे कुलदैवत आहे,” असे ते म्हणायचे !

मालकांनी “बलवंत सिनेटोन” ही चित्रपट कंपनी काढून, “कृष्णार्जुन युद्ध” हा चित्रपट निर्माण केला. दुर्दैवाने ह्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यश लाभलं नाही आणि त्यातूनच त्यांच्यावर भरलेले खटले आणि झालेला तीव्र मनस्ताप फार कठीण काळ होता तो. त्या परिस्थितीमध्ये मालकांची तब्येत ढासळली, ती कायमचीच !

सोळा डिसेंबर एक्केचाळीसचा तो दिवस, लताचं रेडिओवरून पहिल्यांदा गाणं झालं, तेव्हां मालकांनी आपल्या लताचं गाणं, घरी बसून ऐकलं मात्र, मला म्हणाले, “माई, आज मी माझं गाणं ऐकलंय, आता मला जायला हरकत नाही”. मालकांनी लताला शेवटची चीज शिकविली ती, “म्हारा मुजरा”. मालकांनी लताला स्वतःची चिजांची वही आणि तंबोरा दिला. पुढचं भाकीत मालकांना उमजलं होतं !
मालकांनी लताचं गाणं ऐकलं पण वैभव पाहायला दैव नाही लाभलं. मालकांचं राज्यच वेगळं होतं, आता हे राज्यही मोठंच आहे, पण ते सत्तेच होतं……

शब्दांकन : उपेंद्र चिंचोरे
संदर्भ.इंटरनेट

ऊपेंद्र चिंचोरे
About ऊपेंद्र चिंचोरे 14 Articles
श्री उपेंद्र चिंचोरे हे विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. त्यांचे सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…