
या कादंबरीतील तरुण तरुणींची कहाणी म्हणजे आपल्या आजूबाजूच्या तरुण पिढीच्या मनातल्या दलदलीची कहाणी . त्यांना भोगाव्या लागणाऱ्या समस्यांची , त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांची कहाणी वापरून फेकून देणाऱ्या प्रवृत्ती , उपभोगशून्य पदव्यातील निरर्थकता , संभ्रम , संशय , उद्विग्नता आणि शेवटी… निराशेतून कोणत्याही टोकाला जाण्याची आणि पर्वा न करणाऱ्या मनोवृत्तीची ही कहाणी !
ही कहाणी केवळ केतकी, गुलशन , विकी , रॉनी , गुणवंत , मकरंद पार्थिव या तरुण तरुणींची नाही . तर माहीमच्या झोपडपट्टीतील भाई , हिरॉईन बनण्यासाठी आलेली पण फसवणूक झाल्याने भाईची बायको बनलेली रितिका , केतकीचा डॉक्टर असलेला क्रूर बाप आणि तिची मम्मी , राजकारणातला दलाल कामेरकर अशा अनेकांची कहाणी .
जगण्यासाठी , अस्तित्वासाठी जिवाच्या आकांताने संघर्ष करणाऱ्या तरुण पिढीची , मन सुन्न करणारी आणि अंतर्मुख व्हायला लावणारी ही कहाणी . या कथानकाचा शेवट मी सांगणार नाही , तो वाचायलाच हवा , तेव्हाच आपल्या आजूबाजूला काय घडतंय आणि आपण किती सावध व्हायला हवंय ते कळेल .
—–
गंमत सांगायची तर , या कादंबरीची जुळवाजुळव करताना कथानक ज्या परिसरात घडते तो परिसर मला कल्पनेने उभा करणे अशक्य होते , कारण माहीमची झोपडपट्टी मी केवळ ऐकून होतो . पण मुंबईच्या माझ्या एका मित्राने मला दोन दिवस झोपडपट्टीची सैर घडवली . तो एक भयंकर अनुभव होता . पण त्यामुळे माझ्या लेखनाला वास्तवतेचा स्पर्श होऊ शकला . या कादंबरीत असलेला भाई मी तेथेच अनुभवला . यातला रॉनी मला तिथेच त्या भाईच्या झोपडपट्टीतल्या पॉश ऑफिसमध्ये भाईचे अकौंटस सांभाळताना दिसला . असं बरंच गमतीचं काही यानिमित्ताने अनुभवलं .
ही कादंबरी बेळगाव तरुण भारताच्या अक्षरयात्रा मधून क्रमशः प्रसिद्ध झाली आणि २०१३ साली पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली . क्रमशः प्रसिद्ध होत असताना तरुण वर्गाने खूप चांगला प्रतिसाद दिला होता .
मार्शिलँड ! सध्या बुकगंगा वर उपलब्ध आहे .
———–
डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
Leave a Reply