नवीन लेखन...

महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ – दशा आणि दिशा

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला दामोदर मोरे यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 


महाविद्यालयातून मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम हद्दपार का वर्षांपासून या प्रश्नाची ठणक अनेकांच्या मनात आहे. ज्या अर्थी धूर निघतो आहे त्याअर्थी कुठतेरी अग्नी असणारच. कुठतेरी पाणी मुरत असले पाहिजे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला जात आहे, ही आनंदाची बाब आहे.

महाविद्यालयातून मराठी वाङ्मय मंडळाच्या कर्यक्रमांना जी ओहीटी लागलेली आहे त्याचे भान विद्यापीठालाही आहे. मार्च २००९ मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. कृ. व्यंकटरमणी यांनी, या संदर्भात महाविद्यालयांना पाठवलेल्या पत्राची आठवण होते. त्या पत्रात ते म्हणतात “मा. कुलगुरूंच्या आदेशानुसार असे सूचित करण्यात येते, की शैक्षणिक वर्ष जून २००९ पासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रत्येक महाविद्यालयात व विद्यापीठामध्ये मराठी भाषा व वाङ्मय मंडळ असे नाव असलेल्या उपक्रमाची अनिवार्यपणे स्थापना केली जावी.”

उपरोक्त पत्रामुळे आपल्या लक्षात येते, की अनेक महाविद्यालयात मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळेच अस्तित्वात नसावीत हे लक्षात आल्यामुळेच कुलसचिवांना हा आदेश काढावा लागला. पण अशी वाङ्मय मंडळे आतापर्यंत स्थापन का झाली नाहीत? अस्तित्वात आहेत ती कार्यशील आहेत का? नसतील तर का नाहीत? या प्रश्नांची चर्चा करणे आवश्यक आहे.

मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्य आणि संस्कृतिविषयी प्रेम निर्माण करणारे एक सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन अभिरुची निर्माण करणे, या अभिरुचीला वाङ्मयीन जडण-घडण करण्याचे फार मोठे सामर्थ्य वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात असते.

पण सर्वच महाविद्यालयांत हे कार्य घडताना दिसत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.

१) वाङ्मयाविषयी अनास्था

महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम हद्दपार व्हायला एक कारण म्हणजे काही प्राचार्य किंवा काही मराठीच्या प्राध्यापकांच्याच मनात असलेली वाङ्मयीन कार्यक्रमा विषयीची अनास्था हे होय. विहिरीतच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? पण अशा प्राध्यापक, प्राचार्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. एवाद्या भाषेचेच प्राचार्य असलील किंवा भाषेविषयी प्रेम असलेले प्राचार्य असतील तर ते मात्र प्रोत्याहन देत असतात.

२) भाषिक प्रेमाच्या पर्यावरणाचा अभाव

सर्वत्र इंग्रजी भाषेचा बोलबाला आहे. मराठीत बोलणे काहीजण कमीपणाचे समजतात. इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयातील जवळ-जवळ सर्व कार्यक्रम इंग्रजीतून होतात.

काही वेळा तर गरज नसतानाही इंग्रजीत होतात. त्यामुळे महाविद्यालयीन वातावरणात जो मराठीपणा आवश्यक असतो तो हरवतो. काही अमराठी प्राध्यापक, मराठी घेऊन तुम्ही करणार काय? मराठीला कुठे स्कोप आहे? हे अधून मधून विद्यार्थ्यांच्या गळी उतरवत असल्याने मराठी घेण्याच्या संदर्भात मराठी विद्यार्थीच नकार देतात. अगदी शंभरपैकी चौयाऐंशी गुण मराठीत असले तरी त्याला मराठी घेण्यापासून परावृत्त केले जाते.

३) अपुरा निधी

महाविद्यालयात मनासारखे दर्जेदार वाङ्मयीन कार्यक्रम राबवायचे असतील तर त्यासाठी निधीची गरज असतो. पण विविध महाविद्यालयात हाच अनुभव येतो, की मोठ्या खर्चाच्या वाङ्मयीन कार्यक्रमांना कात्री लावली जाते.

४) वजनदार मानधन

वाङ्मयीन कार्यक्रम आणि मानधन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पाचशे रुपये किंवा एक हजार रुपये मानधन असेल तर प्राचार्य ते आनंदाने मान्य करतात. पण आता परिस्थिती अशी आहे, की जेवढे वजनदार नाव तेवढे वजनदार मानधन. वाङ्ममय मंडळाच्या कार्यक्रमाचा माझा अनुभव असा, की दरवर्षी आम्ही नामवंत लेखकांना आणत असतो. पण काही वेळा मानधन दहा हजार रुपये सांगितले जाते. इच्छा असूनही तो कार्यक्रम घेता येत नाही. वक्ता, पाहुणा नामवंत नसेल तर विद्यार्थी कार्यक्रमाकडे पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहा हजार मानधन मागितल्यावर प्राचार्य तरी काय करणार? त्यांना एकच कार्यक्रम करायचा नसतो. अन्य विविध विषयांचीही मंडळे असतात. वजनदार मानधन नाही, त्यामुळे मोठा पाहुणा येत नाही. वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमास येण्यासाठी पाहुणे हे फार मोठे आकर्षण असावे लागते. साधारण पाहुणा बोलावला तर प्रत्येक वर्गात कार्यक्रमाला उपस्थित राहा म्हणून जाऊन सांगावे लागते. असे सांगूनही विद्यार्थी येतीलच याची खात्री नसते.

५) वजनदार मानधनाच्या सवयी

जे लोकप्रिय कवी-लेखक आहेत, जे गाजलेले किंवा गाजवलेले आहेत. त्यांचा मानधनाचा भाव जरा जास्तच असतो. ज्या शिक्षणसंस्था श्रीमंतांच्या, साखर कारखानदारांच्या हातात आहेत, उद्योगपतीच्या हातात आहेत; ते या कवींसाठी मनापासून खर्च करतात. त्यांना पोटभर खाऊपिऊ घालतात. आणि वजनदार मानधन देतात. त्यांना एकदा ही सवय लागली, की त्यांना मानधनाचा सर्वत्र तोच मोठा आकडा दिसायला लागतो. मग शिक्षणसंस्थाचालक साखर कारखानदार नसले तरी त्यांची मानधनाची मागणी मात्र तीच असते. खाली उतरायला ते तयार नसतात. वैयक्तिक संबंध असतील तर मात्र त्यांना आणता येते. वीस-पंचवीस हजार घेणाऱ्या महान कलावंताला केवळ स्नेहसंबंधामुळे मी एक हजार रूपयांत आणले होते. प्रचंड गर्दी, कार्यक्रम अविस्मरणीय झाला. मुद्दा हाच, की वजनदार मानधनाच्या सवयी वाङ्मयीन कार्यक्रमाच्या मार्गातील गतिरोधक आहेत.

6) वाचन संस्कृतीला ओहोटी

वाङ्मयीन कार्यक्रम हद्दपार होण्यामागे हेही एक कारण आहे. आजचा विद्यार्थी वेगवेगळ्या वाहिन्यांच्या कार्यक्रमात हरवला आहे. अडकला आहे. वाहिन्यांवरील कार्यक्रमाचे आकर्षण मोठे आहे. त्या सहज उपलब्ध होणाऱ्या मनोरंजनाच्या तुलनेत वाङ्मय मंडळाचे काही कार्यक्रम त्याला अळणी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या विद्यार्थ्यांचे वाचन इतके कमी झाले आहे, की अवांतर वाचन ही फार दूरची गोष्ट झाली. आजचा विद्यार्थी अभ्यासाला लावलेली पुस्तकेही खरेदी करत नाही. बरेचसे विद्यार्थी  ते वाचतही नाहीत. मार्गदर्शिका वाचूनच येऊ घातलेल्या परीक्षेचे ते कसेबसे पोट भरतात. 

७) आजचा विद्यार्थी: ज्ञानार्थी नव्हे,परीक्षार्थी

माहिती आणि ज्ञान आजच्या विद्यार्थ्यांच्या अवती-भवती धो-धो वाहते आहे. पण या विद्यार्थ्याला ज्ञानाची तहानच नाही. फार कमी विद्यार्थी असे भेटतात, ज्यांना ज्ञानाची उत्कट तहान आहे. बाकी आयुष्याच्या शिदोरीचा विचार न करता परीक्षेच्याच शिदोरीचा विचार करतात. काही तर अत्यंत आळशी असतात. कार्यक्रमाला यायची त्यांची इच्छाच नसते. काही विद्यार्थ्यांत माहिती आणि ज्ञान यांचा इतका दुष्काळ, की आपण अवाक् व्हावे. मी प्रत्येक वगात दरवर्षी एक प्रश्न विचारतो, ‘कुणा कुणाच्या घरात वर्तमानपत्र येत नाही?’ उत्तरादाखल प्रत्यक वर्गात पाच-सात किंवा दहा तरी विद्यार्थी जेव्हा उभे राहतात तेव्हा मी अस्वस्थ आणि गंभीर होतो. हे विद्यार्थी वाङ्मयापासून किती कोस दूर आहेत?

८) अभिजन विद्यार्थ्यांचीमराठीकडे पाठ

दहा-पंधरा वर्षांपूवी पदवी पातळीवर मराठी विषय घेणाऱ्यामध्ये अभिजन विद्यार्थी आघाडीवर असत. पण मराठी विषयाला फारसे भवितव्य उरलेले नाही याची जाणीव झाल्यामुळे की काय, अभिजन विद्यार्थ्यांनी मराठी विषयाकडे पाठ फिरवली आहे असे माझे सामाजिक निरीक्षण आहे. तृतीय वर्ष कला मराठीच्या वर्गात, सर्व महाविद्यालयात या त-हेची पाहणी केली तर मी अधोरेखित केलेल्या विचारातील सत्यता कुणाच्याही प्रत्ययाला येईल. ज्यांच्या घरात साहित्य, कला, संस्कृती आणि ज्ञान होतं, त्या घरातील विद्यार्थ्यांनी मराठीकडे पाठ फिरवून, काळाची दिशा ओळखून व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे आपला मोर्चा वळवला. परिणामी कला, संस्कृती, मराठी भाषा यांना स्वाभाविकपणे दुय्यम स्थान लाभले. त्याचाही परिणाम वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमावर झाला का; हा शोधाचा विषय आहे.

९) हा पाहा अज्ञानाचा गडद अंधार

आजच्या विद्यार्थ्यांच्या मानासिकतेवर प्रकाश पडावा यासाठी एक अनुभव या ठिकाणी नोंदवत आहे. आमच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रा. विद्याधर वालावलकर यांन वर्गातल्या विद्यार्थ्यांना भगवान श्रीकृष्णाविषयी माहिती विचारली तेव्हा वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांनी, भगवान श्रीकृष्ण कोण त्यांच्याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगताच प्रा. वालावलकर अस्वस्थ झाले.

एका रेल्वेस्थानकावर आम्ही तीन-चार प्राध्यापक गप्पा मारत होतो. वर्तमानपत्रातील एका बातमीवरून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा विषय निघाला. तेव्हा तेथे उभ्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने आम्हाला प्रश्न विचारला ‘कोण आंबेडकर?’ त्या प्राध्यापकाच्या प्रचंड अज्ञानाची आम्हाला कीव आली.

पण हे अज्ञानाचे आव्हान आम्हाला पेललेच पाहिजे. मराठीपणा, मराठी कणा, मराठी बाणा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती टिकवावयाची असेल तर मराठीच्या प्राध्यापकांवर फार मोठी जबाबदारी आहे. जर मराठीचे प्राध्यापक रसाळ शिकवत असतील तर वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना ते ‘चला’ म्हणताच विद्यार्थी येतात; कारण त्याच्या चांगल्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांना ते आवडतात. पण प्राध्यापक जर नेहमीच रटाळ शिकवत असतील तर ते प्राध्यापक नावडते होतात. नावडत्या प्राध्यापकाने काही सांगितले तरी विद्यार्थी कानाडोळा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तो वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम जरी असला तरी काही विद्यार्थी त्याला दांडी मारतात.

सर्वच महाविद्यालयांतून मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम हद्दपार होत आहेत असे म्हणणे योग्य नाही. जेथे कल्पकतेने मराठी वाङ्मय मंडळाद्वारे वेगवेगळे प्रयोग केले जातात. तेथे विद्यार्थी कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद देतात. ज्या ज्या ठिकाणी मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमांना ओहोटी लागली असेल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही प्रयोग करण्याची गरज आहे.

वाङ्मय मंडळाच्या कार्याची दिशा:

१. मराठीच्या विद्यार्थ्यांना मराठी वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम आपला वाटला पाहिजे, असे कार्यक्रम आयोजित करणे.

२. वाङ्मय मंडळातर्फे दरवर्षी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वाचन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, कथकथन स्पर्धा, ललित लेख अभिवाचन स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, अभिनय स्पर्धा, वक्तृत्व तसेच वादविवाद स्पर्धा, कविता लेखनाच्या कथालेखनाच्या, कथाकथनाच्या, अभिनयाच्या कार्यशाळा घ्याव्यात. अशा कार्यक्रमामुळे मराठी न घेतलेले विद्यार्थीही वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होतात.

३. लेखन करण्याऱ्या विद्यार्थ्यांना वाङ्मय मंडळाचे प्रमुख असलेल्या प्राध्यापकाने वैयक्तिक मार्गदर्शन केले पाहिजे. मी स्वतः अशा विद्यार्थ्यांना मागदर्शन करतो. कविता खूपच चांगल्या लिहिल्या असतील तर त्या विद्यार्थीकवीचे कवितेचे पुस्तक यावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ‘पहाटवारा’ नावाचा कविता संग्रह आम्ही तो विद्यार्थी महाविद्यालयात शिकत असतानाच प्रकाशित केला. यावर्षी एका विद्यार्थिनीचा कविता संग्रह प्रकाशित करण्यास आम्ही मदत करीत आहोत.

४. मराठी वाङ्मय मंडळाने असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, की जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तित्वाचा शोध घेण्याची संधी मिळाली पाहिजे. माझ्या महाविद्यालयात मी असे प्रयोग केले आहेत. चित्र-काव्य आणि काव्याचित्र स्पर्धेचे आयोजित मी केले होते. समोर चित्र ठेवून विद्यार्थ्यांना एका तासात त्यावर कविता लिहायला लावणे तसेच समोर कविता ठेवून त्या कवितेवर विद्यार्थ्यांना चित्र काढायला लावणे; या माझ्या प्रयोगाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

५. मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी सर्व पातळ्यावर प्रयत्नांची गरज आहे.

६. मराठी माणूस जोडण्यासाठी मराठीच्या बोलीभाषांना ग्राम्य, गावंढळ म्हणण्याची सवय सोडून देऊन वेगवेगळ्या बोलींची, कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ओळख देणे मोठे रंजक आणि उद्बोधक ठरेल.

७. विद्यार्थ्यांची भाषिक जाणीव समृद्ध होईल.

– दामोदर मोरे

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला दामोदर मोरे यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..