नवीन लेखन...

मराठीतील कोशवाङ्मय

मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेत कोशरचना सुरू होऊन आता सुमारे १५० वर्षे लोटली आहेत. इतर भारतीय भाषांतील कोशलेखनाचे कार्यही साधारण याच सुमारास सुरू झाले. मराठीत सर्व प्रकारचे कोश तयार झालेले आहेत. मराठी भाषेतून ज्ञानप्रसार होण्यासाठी, सकस साहित्यनिर्मितीसाठी, विज्ञानविषयांवरील ग्रंथनिर्मितीसाठी कोशवाङ्मयाची गरज वाढती आहे. कोशवाङ्मय सकस होण्यासाठी प्रशिक्षणाचीही गरज आहे.

स्थूलमानाने कोशांचे शब्दकोश, ज्ञानकोश, विषयकोश आणि चरित्रकोश असे प्रकार सांगता येतील. शब्दकोशांचे एकभाषी, द्विभाषी आणि बहुभाषी असे उपप्रकारही सांगता येतील.

शब्दकोश

मराठीत १९व्या शतकात जी कोशरचना झाली ती सामान्यतः शब्दकोश-स्वरूपाची झाली. संस्कृतीच्या विकसनशील काळात आधी शब्दकोश निर्माण होतात; त्यानंतर ज्ञानकोशांची रचना होऊ लागते. अव्वल इंग्रजी काळात शब्दकोशरचनेमागच्या प्रमुख प्रेरणा इंग्रजी राज्यकर्त्यांची मराठी भाषा शिकण्याची गरज आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांची धर्मप्रसाराची गरज या होत्या. १८०८ चा रॉबर्ट ड्रमंडचा शब्दसंग्रह, १८१० सालचा विल्यम केरीने मराठी पंडितांच्या सहकार्याने तयार केलेला मराठी शब्दकोश, गिडिऑन हचिन्सनने १८१५ मध्ये शब्दकोश रचण्याचा केलेला प्रयत्न, व्हॅन्स केनेडीने तयार केलेला १८२४ मधील कोश, १८२९ साली प्रकाशित झालेला महाराष्ट्र भाषेचा कोश, मोल्सवर्थचा १८३१ साली प्रसिद्ध झालेला मराठी-इंग्रजी कोश, ही यांपैकी काही उदाहरणे होत. वाक्प्रचार, संप्रदाय, उखाणे यांचेही कोश मराठीत आहेत. धातू-व्युत्पत्तीच्या क्षेत्रातही कोशरचना झाली.

इ.स. १८५५-६० सालापासून जसजशी इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध प्रतिक्रिया संघटित होऊ लागली व असंतोषाने उग्र-रूप धारण केले तसतशी त्यानंतर कोशनिर्मितीमागे राष्ट्रीय अस्मितेची जाणीव निर्माण होत गेली. त्यानंतरही १९२० ते १९४७ या काळात निर्माण झालेले कोशकार्य मौलिक स्वरूपाचे असून ते ध्येयनिष्ठेने, जिद्दीने व समर्पणवृत्तीने उभे राहिले आहे.

महत्त्वाच्या एकभाषी कोशांचा उल्लेख करावयाचा झाल्यास, मराठी शब्दरत्नाकर या कोशाचा प्रथम उल्लेख करावा लागेल. मराठी शब्दांचा मराठीत अर्थ देणारा हा कोश १९२२ साली वासुदेव गोविंद आपटे यांनी रचला. या कोशापूर्वी झालेल्या १८ कोशांची माहिती स्वतः आपटे यांनी दिली आहे. या कोशात ३९,००० शब्द आहेत.

महाराष्ट्र शब्दकोश हा मराठी शब्दकोशांतील अत्यंत महत्त्वाचा, प्रमाण, सर्वसमावेशक कोश य. रा. दाते, चिं.ग. कर्वे, आबा चांदोरकर, चि. शं. दातार या संपादक मंडळाने निर्माण केला. १९३२ ते १९३८ या कालखंडात त्याचे सात भाग प्रकाशित झाले. या सात खंडांत मिळून एक लाख शब्दांची नोंद आहे. कालिक, प्रांतिक भाषेतील शब्द, अनेक व्यवसाय, उद्योग, धंदे यातील शब्द, त्यांतील अनेक शब्दांची अपभ्रष्ट रूपे यांचा समावेश या कोशात आहे.

द्विभाषी कोशांत माधवराव पटवर्धन यांचा फारसी-मराठी कोश १९२५ साली प्रकाशित झाला. फारसी शब्दांचा संदर्भ पाहून त्यांचा तौलनिक व ऐतिहासिक विचार, व्युत्पत्तिविचार, फारसीतून मराठीत आलेले व्याकरणविशेष, शब्दसिद्धी या गोष्टींचे विवेचन त्यात आले असून मराठी कोशकार्याला या कोशाने एक नवी दिशा दिली. यानंतर इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी, असे अनेक द्विभाषी कोश प्रसिद्ध झाले.

बोलीभाषेतील अनेक शब्द आता मराठी साहित्यात व प्रमाण मराठी भाषेत येत आहेत. गोंडी, माडिया, वैदर्भी, झाडीबोली, अहिराणी इ. मराठी बोली भाषांतील शब्दकोश झाले आहेत. उदा. डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा अहिराणी शब्दकोश, एस. बी. पटवर्धन यांचा गोंडी आणि माडिया भाषेचा शब्दकोश, इत्यादी.

स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचे एक माध्यम म्हणून इंग्रजीबरोबरच मातृभाषांचा स्वीकार करण्यात आल्याने अध्ययन-अध्यापनासाठी विविध ज्ञानविषयांतील संज्ञांसाठी मराठी संज्ञांची व विशिष्ट पारिभाषिक आविष्कार शैलीची गरज निर्माण झाली; तसेच प्रत्येक भाषक समाजाला इतर भाषक समाजाशी व्यवहार करणे अनिवार्य होते. या कारणांनी परिभाषा कोश, संज्ञा कोश व इतर प्रकारचे द्विभाषी कोश निर्माण होण्याची निकड निर्माण झाली.

महाराष्ट्र शासन भाषा संचालनालयातर्फे १९७० ते १९९० यादरम्यान साहित्यसमीक्षा, अर्थशास्त्र, धातुशास्त्र, औषधशास्त्र, कृषिशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, जीवशास्त्र, यंत्रअभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, भूविज्ञान, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, मानसशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, इत्यादी अनेक विषयांचे परिभाषाकोश तयार करण्यात आले.

अगदी अलीकडे म्हणजे २००७मध्ये सत्त्वशीला सामंत यांचा शब्दानंद हा त्रैभाषिक व व्यवहारोपयोगी विषयवार शब्दकोश प्रकाशित झाला. त्यामध्ये एकंदर ७० विषयांतर्गत २७००० इंग्रजी संज्ञांचे हिंदी व मराठी अर्थ दिले आहेत.

एकोणिसाव्या शतकात दोन संस्कृत-मराठी कोशही प्रसिद्ध झाले. त्यातील पहिला अनंतशास्त्री तळेकरांचा १८५३मध्ये आणि माधव चंद्रोबा यांचा शब्दरत्नाकर १८७० मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर १९१५ मध्ये जनार्दन विनायक ओक यांचा गीर्वाण लघुकोश हा महत्त्वाचा संस्कृत-मराठी कोश प्रकाशित झाला. त्याची चौथी आवृत्ती काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाली.

ज्ञानकोश

१८५६ साली गोविंद नारायण माडगावकरांनी ज्ञानकोशाच्या आवश्यकतेचा पहिला उच्चार केला. १८६८ मध्ये बडोद्याचे रावजी केशव सांबारे यांनी आणि १८७८ मध्ये रत्नागिरीचे जनार्दन हरि आठल्ये यांनी ज्ञानकोश रचण्याच्या उपक्रमाचा आरंभ केला होता पण तो पूर्ण झाला नाही.

१९०६ सालच्या साहित्यसंमेलनात प्रा. विष्णू गोविंद विजापूरकर यांनी मराठी भाषेत विश्वकोश निर्माण झाला पाहिजे असे मत मांडले; तेव्हा डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांना मराठीत ज्ञानकोश निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली व त्यांच्या अविरत प्रयत्नाने १९२० ते १९२८ या काळात २३ खंड असलेला महाराष्ट्रीय ज्ञानकोश निर्माण झाला. एकंदर भारतीय भाषांचा विचार केल्यास, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा क्रमांक चौथा लागतो. भारतीय भाषांमध्ये पहिला ज्ञानकोश बंगाली भाषेत १८४८ ते १८५१ या काळात प्रसिद्ध झाला. नंतर दुसरा गुजरातीत १८९९ ते १९१८ या काळात आणि तिसरा हिंदीत १९१६ ते १९३२ या काळात प्रसिद्ध झाला. चौथा म्हणजे डॉ. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश.

१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर, मराठी भाषेच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या योजना हाती घेल्या त्यात ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ या संस्थेची स्थापना झाली. या मंडळाने एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या सर्वसमावेशक कोशासारखा मराठी विश्वकोश निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या कोशपरंपरेत अशा तऱ्हेचा कोश रचणे हे एक आव्हान होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली व ते या कोशाचे प्रमुख संपादक झाले. हा विश्वकोश सर्वसमावेशक असावा व तो अकारविल्हे असावा अशी योजना तयार करण्यात आली. त्याचे स्वरूप प्रमाणित करण्यासाठी मराठी विश्वकोश-परिचय ग्रंथ साहित्य संस्कृती मंडळाने १९६५ साली प्रसिद्ध केला.

१९६५ पासून मराठी विश्वकोशाचे कार्य सुरू झाले. त्याचा पहिला खंड १९७५ मध्ये प्रसिद्ध झाला. १९खंड प्रसिद्ध करण्याची मूळची योजना बदलून आता १ ते २० प्रत्यक्ष नोंदींचे खंड, खंड २१ परिभाषाखंड, खंड २२ नकाशाखंड आणि खंड २३ सूचीखंड असे विश्वकोशाचे २३ खंड प्रकाशित होणार आहेत.

विषयकोश

एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये सर्व ज्ञानविषयांत वाढ झाली. विद्यापीठीय शिक्षणाच्या प्रसाराने विविध क्षेत्रांत जिज्ञासू रस घेऊ लागले. अनेक विषयांच्या प्रगत अभ्यासाकरिता संशोधनसंस्था निघाल्या. मूळ विषयातून उपविषय निर्माण झाले व एकाच उपविषयात गती वाढवणे अभ्यासकाला आवश्यक वाटू लागले. अभ्यास विषयांच्या प्रगतीमुळे सर्वसमावेशक ज्ञानकोश ज्ञानार्जनासाठी अपुरे वाटू लागले; कारण अशा ज्ञानकोशातील नोंदी विषयाची तोंडओळख व अल्प इतिहास या स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एखाद्या विषयाचा फक्त सारांश येऊ शकतो. म्हणून विविध उपविषयांचे व्यापक दर्शन होण्यासाठी तज्ज्ञ लेखकांचे लेखन असलेले विषयकोश निर्माण होऊ लागले. अशा विषयकोशांत संबंधित विषयासंबंधीच्या नोंदी विस्ताराने दिलेल्या असतात.

मराठीतील विषयकोशांत सर्वांत महत्त्वाचे नाव पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी दहा खंडांत संपादित केलेल्या भारतीय संस्कृतिकोश या कोशाचे आहे. भारतातील धर्म, पंथ, पीठे, सण, वार, तिथी, देवदेवता, पूजास्तोत्रे, मंत्र, मंदिरे, संत, इत्यादी संस्कृतिसंबंद्ध विषयांवरील माहिती यात दिलेली आहे.

याशिवाय प्रा. दे. द. वाडेकर यांनी संपादित केलेला मराठी तत्त्वज्ञान महाकोश, वाईच्या प्राज्ञपाठशाळेने प्रकाशित केलेले धर्मकोश व मीमांसाकोश, प्रा. स. मा. गर्गे यांनी संपादित केलेला समाजविज्ञान कोश, भारतीय संस्कृतिकोश मंडळातर्फे प्रकाशित होत असेलला कृषि ज्ञानकोश, डॉ. वि. भा. देशपांडे यांनी संपादित केलेला नाट्यकोश, यांशिवाय संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश, विविध देवतांसंबंधीचे कोश, असे महत्त्वाचे विषयकोश प्रसिद्ध झाले आहेत.

विज्ञान-निसर्ग-पर्यावरण या क्षेत्रांमध्येही अनेक महत्त्वाचे कोश प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी जयंत नारळीकर व श्रीराम गीत यांनी संपादित केलेला सृष्टिविज्ञानगाथा हा कोश, सुरेशचंद्र वारघडे यांचा भारतीय वन्यप्राणिकोश, मारुती चित्तपमल्ली यांचा पक्षिकोश आणि मिलिंद वाटवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपादित केलेला आपली सृष्टी आपले धन हा कोश, हे विशेष उल्लेखनीय आहेत.

चरित्रकोश

मराठी भाषेत चरित्रकोश लिहिण्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. भारतवर्षीय ऐतिहासिक कोश हा मराठीतील पहिला चरित्रकोश होय. रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी संपादित केलेल्या ह्या कोशात २२८४ व्यक्तींची चरित्रे असून तो १८६७ साली छापण्यात आला. त्यांनीच भरतखंडाचा अर्वाचीन कोश १८८१ साली प्रसिद्ध केला. अशाच प्रकारे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (१९३२), भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश (१९३९) आणि भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश (१९४६) हा त्रिखंडात्मक चरित्रकोश महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी सिद्ध केला.

अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक हा सात खंडांचा कोश गं. दे. खानोलकर यांनी १९३१-१९६७ या कालावधीत प्रसिद्ध केला.

शास्त्रज्ञांचा चरित्रकोश आणि जागतिक शास्त्रज्ञकोश हे कोश प्र. न. जोशी यांनी अनुक्रमे १९६८ व १९९१ साली प्रकाशित केले.

‘विश्वचरित्र संशोधन केंद्र, गोवा’ या संस्थेतर्फे श्रीराम पांडुरंग कामत यांनी सहा खंडांत मराठी विश्वचरित्रकोश प्रकाशित केला.

सकलसंतगाथा हा चरित्रकोश नम्रता भट यांनी १९९८ साली संपादित केला असून त्यात १००० साधूसंतांची चरित्रे दिली आहेत.

यांनी घडवले सहस्रक या ग्रंथात सुहास कुलकर्णी आणि मिलिंद चंपानेरकर यांनी गेल्या हजार वर्षांतील शास्त्रज्ञांचा परिचय करून दिला आहे. हा ग्रंथ २००३ मध्ये प्रकाशित झाला.

अनंत लक्ष्मण जोशी यांच्या मराठी सारस्वत या कोशामध्ये १९८४ पर्यंत हयात असलेल्या लेखकांची चरित्रात्मक सूची दिली आहे.

बा. द. सातोस्कर यांच्या गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार (१९७६-१९८४) या कोशस्वरूप ग्रंथात गोव्यातील मराठी लेखकांची चरित्रपर व वाङ्मयीन माहिती दिली आहे.

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण-शिल्पकार चरित्रकोश हा अभिनव चरित्रकोश हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे २००९ पासून प्रसिद्ध होत आहे. याचे एकूण १२ खंड संकल्पित असून त्यांपैकी ‘इतिहास’, ‘साहित्य’, ‘विज्ञान-तंत्रज्ञान-शिक्षण’, ‘न्यायपालिका-प्रशासन-संरक्षण’ आणि ‘कृषी-सहकार’ हे पाच खंड आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत आणि ‘ललितेतर साहित्य’, ‘पत्रकारिता’, ‘संगीत’, ‘नाटक’, ‘चित्रकला’, ‘शिल्पकला’, ‘उपयोजित कला’, इत्यादी विषयांवरील उरलेले सात खंड २०१३च्या मध्यापर्यंत प्रसिद्ध होतील अशी अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर आहेत. शीर्षकातील ‘शिल्पकार’ हा शब्द संपादकांनी लाक्षणिक अर्थाने योजिलेला आहे. त्या त्या क्षेत्रात महाराष्ट्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केले त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीस हातभार लावला म्हणून ते ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ ठरतात असे संपादकांना अभिप्रेत आहे. या कोशात अशा व्यक्तींवर चरित्रात्मक नोंदी आहेत.

१९५० ते २००० या काळाकडे पाहिल्यास मराठीतील कोशसंख्या आणि कोशविषयांची संख्या खूप वाढल्याचे लक्षात येते आणि ते अधिक पूर्णतेकडे जाण्याचे लक्ष्य ठेवतात असे जाणवते. तथापि मराठीत विज्ञानविषयक कोशांची गरज आजही फार मोठी आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेला मराठी कुमार विश्वकोश: जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग-१ हे त्यातीलच एक पाऊल आहे.

ज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांची अतिगतिमानता लक्षात घेता, इंटरनेटवरील गूगल आणि विकिपीडियाशी स्पर्धा करताना, कोशवाङमय सतत अद्ययावत करण्याची आणि त्याच्या उपयोगास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

१८०० ते २००३, म्हणजे दोनशे वर्षांत मराठीत प्रकाशित झालेल्या सर्व, त्याचप्रमाणे मराठीची दखल घेणाऱ्या अन्य भाषांतील कोशांची नोंद करणारा मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची हा ग्रंथ राज्य मराठी विकास संस्थेने २००७ मध्ये प्रकाशित केला. या सर्वसमावेशक ग्रंथाचे संपादन डॉ. व. वि. कुलकर्णी यांनी केले आहे.

सूचिसाहित्य मराठीत सूचिसाहित्याचीही मोठी परंपरा आहे. ग्रंथांच्या वाढत्या निर्मितीबरोबर सूचिसाहित्यही वाढत गेलेले आहे. मराठी भाषेतील पहिली सूची ग्रंथालय या नावेकरून पुस्तकांची नामवही (१८५९) ही शामराव मोरजी यांनी लिहिली. सूचिकार्याचा पहिला महत्त्वाचा उपक्रम यशवंत रामकृष्ण दाते यांचा महाराष्ट्रीय ग्रंथसूची हा ग्रंथ १९१९ साली प्रसिद्ध झाला.

मराठीत ग्रंथसूची, ग्रंथकारसूची, ऐतिहासिक साधनांची सूची, हस्तलिखितांची सूची, मराठी नियतकालिकांची सूची, नियतकालिकांतील लेखांच्या सूची, मराठी नियतकालिकांच्या लेखसार सूची, प्रबंधसूची, प्रबंधसारसूची यासारखे वैविध्यपूर्ण सूचिसाहित्य निर्माण झाले आहे.

मराठीत प्रसिद्ध झालेल्या सूचींची सूची हा ग्रंथ सुरेश रा. चुनेकर यांनी १९९५ साली प्रसिद्ध केला १९९५ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सूचींची संपूर्ण माहिती त्यात आहे.

— संकलन : शेखर आगासकर

1 Comment on मराठीतील कोशवाङ्मय

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..