नवीन लेखन...

दिवाळी अंक साकारताना… भाग पहिला

काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मासिक ‘मनोरंजन’च्या वाचकांना काही तरी नवे आकर्षण वाटावे म्हणून १९०९मध्ये पहिला दिवाळीचा अंक काढला. तेव्हापासून दिवाळी अंक ही प्रथा इतकी वाढत गेली की, आजही दरवर्षी तीनशे-चारशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यात हौशे-गवशे-नवशे असे सगळे जण असतात. पण त्यामधे प्रत्येकाला काही तरी प्रकट करावेसे वाटते, हे विशेष! आज ‘आवाज’ बंद पाडण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. अशा वेळी ह्या माध्यमाचे महत्त्व अधिक वाटते. अशा या वाटचालीत कुठलीही शिस्त न बाळगता केलेली भटकंती म्हणजे हा लेख. यामध्ये जेवढं सांगितलं आहे, त्यापेक्षा न सांगितलेलं अधिक आहे. कुणालाही नामोल्लेखाने मारायचं हे मनातदेखील नाही. हे लक्षात घेऊन ह्या मर्यादित पण मुक्त भटकंतीचा आस्वाद नक्कीच घेता येईल.

मराठी वाचनानंदात मग्न असलेल्याला दिवाळी अंक नाहीत नाही, असं होऊच शकत नाही. ही चटक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९मधे लावली आणि दिवाळी अंकाचे हे लोण इतकं पसरत गेलं आहे की, त्याची व्याप्ती आकाराच्या बाबतीत मोजायची झाली तर ती रामायण-महाभारतालादेखील मागे सारील!

अशा वेळी रामायण-महाभारत दहा-पाच लोकात सांगायची हिकमत काही जणांनी दाखवली आहे, मात्र दिवाळी अंकाच्या आजतागायतच्या वाटचालीची नुसती झलक दाखवायची म्हटलं तरी एक ग्रंथ होईल, एवढं सरस आणि सुरस अक्षरधन त्यात दडलेलं आहे. फक्त तुम्हाला ही अलिबाबाची गुहा उघडण्याचा ‘तिळा तिळा दार उघड…’ मंत्र मिळायला हवा…

एकदा का ही किल्ली सापडली की, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच…

तर ह्या प्रवासातील काही कथा-दंतकथा आणि चित्तरकथा तुम्हाला सांगायला बसलो तर ‘अरेबियन नाईट्स”प्रमाणे रात्री संपतील, पण गोष्टी संपणार नाहीत. अशा गोष्टींचा हा वानवळा. त्यात ‘मनोरंजन’ आणि विविध ज्ञानविस्तार होईल, असा प्रयत्न आहे.

देणं दिवाळी अंकांचं

दिवाळी अंक वाचल्याने रुचकर फराळ केल्याचा आनंद वाचकांना होतो, पण खुद्द लेखकांना काय वाटते? व्यंकटेश माडगूळकरांनी स्वच्छ म्हटलं आहे की, ‘१९४५-४६च्या ‘अभिरूची’त माझी पहिली कथा ‘काळ्या तोंडाची’ आली. नंतर मला दुसरा धक्का दिला तो ‘नवयुग’च्या संपादकांनी आपली एक कथा ‘नवयुग’ दिवाळी अंकासाठी पाठवा, असं चक्क प्रल्हाद केशव अत्रे यांच्या सहीचे पत्र मला आलं. ‘वडार वाडीच्या वस्तीत’ ही कथा मी लगेच पाठवून दिली.” पुढे व्यंकटेश माडगूळकर लिहितात ते महत्त्वाचे; ते म्हणतात- ‘दिवाळी अंकात आलेली ही माझी पहिलीच कथा. या कथेचे मानधन म्हणून पंचवीस रुपयाची मनिऑ र्डर जेव्हा आली तेव्हा मला वाटले, आता मात्र आपण लेखक झालो. ‘ आता पु. ल. देशपांडे यांची हकीगत-त्यांनी ‘जनवाणी’, ‘साधना’, ‘हंस’, ‘दीपावली’, ‘विविधवृत्त’, ‘गिरीष’, ‘किर्लोस्कर’, ‘सत्यकथा’ इत्यादी दिवाळी अंकात लिहिलं आणि त्याचाच संग्रह आला-बटाट्याची चाळ. त्याबाबत त्यांनी म्हटलंय. ‘बटाट्याची चाळ’ दर दिवाळीला थोडी थोडी बांधत आणली. श्री. श्री. पु. भागवतांच्या तगाद्यामुळे शेवटी ती पुरी झाली. माझ्या आयुष्यातल्या निदान चार-पाच दिवाळ्या ह्या चाळीत गेल्या. ह्या मंडळींवर माझा लोभ आहे. वाचकांचाही जडावा, ही इच्छा.

बटाट्याच्या चाळीचे प्रकाशन १९५८ साली मौज प्रकाशनातर्फे झाले. सध्या त्याची ४२ वी आवृत्ती-पुनर्मुद्रण उपलब्ध आहे. याचाच अर्थ ही लेखन मोहिनी वाचकांवर अव्याहत चालत आली आहे.

व्यंकटेश माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे या दोघांच्या हकीगतीत दिवाळी अंक आणि त्याचे लेखक-वाचक ह्याचं जग सामावलेलं आहे आणि यापुढेही राहील !

दिवाळी अंकाचे आधारस्तंभ कोण तर लेखक-कलावंत मंडळी. अर्थात, काही चतुर संपादक खरे आधारस्तंभ जाहिरातदार, असंही म्हणतात. पण तो साहित्यबाह्य चर्चेचा विषय स्वतंत्र प्रकरणाचा… तर काही लेखकांचं दिवाळी अंकाबाबतचं जग पाहा-

श्रेय

खुद्द का. र. मित्र यांना दिवाळी अंकाची कल्पना कशी सुचली? 

जानेवारी १८९५ मध्ये मासिक ‘मनोरंजन’ सुरू झालं. आणि यशस्वी ठरलं. कारण पहिल्या वर्षातच दोन हजारावर वार्षिक वर्गणीदार भेटले. आपल्या अंकाबद्दल कायम कुतूहल वाटलं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून मित्र नित्यनियमाने इंग्रजी-अमेरिकन मासिकं पाहून त्याप्रमाणे आपल्याला काय करता येईल, असा विचार करत असत. त्याप्रमाणे योजना राबवत असत. या ओढीमुळेच मित्रांना वाटलं की, इंग्रजी मासिकाचा जसा ख्रिसमस स्पेशल असं असतो, तसं आपण दिवाळी अंक काढायला काय हरकत आहे? लगेच का. र. मित्र कामाला लागले. त्याचेच दृश्य स्वरूप म्हणजे १९०९मधे मासिक ‘मनोरंजन’चा दिवाळीचा अंक प्रकाशित झाला. इथे एका गोष्टीचा खुलासा करायला हवा. तो घोटाळा मित्र ह्या बंगाली ढाच्याच्या नावामुळे झाला असावा. काहींनी असा अंदाज केला आहे की, मित्र यांच्या पाहण्यात बंगाली दूर्गापूजा विशेषांक असावा. पण इथे नोंदवायला हवे की, दूर्गापूजा अंक प्रथा १९१४ पासून सुरू झाली आहे….

(क्रमश:) 

रविप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिलेला हा लेख व्यास प्रतिभा दिवाळी २०१५ मधून साभार…. 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..