नवीन लेखन...

लेखक गोनीदां ऊर्फ गोपाल नीलकंठ दांडेकर

रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखक गोनीदां ऊर्फ मा.गोपाल नीलकंठ दांडेकर यांचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी विदर्भातील परतवाडा येथे झाला.

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी गोनीदांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. ‘सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी;’ असे गोनीदां म्हणत, नर्मदेची पायी परिक्रमा हा गोनीदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता. या परिक्रमेत त्यांनी जीवन पाहिले. माणसे पाहिली. त्यांचे वागणे-बोलणे सारे पाहिले. या अनुभवाचा त्यांना पुढे लेखनात फार उपयोग झाला.

‘आमचे राष्ट्रगुरू’ ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचे पहिले लेखन. ‘साभार परत’ हा शब्द माहीत नसलेला मी लेखक आहे, असे गोनीदा म्हणत. ‘बिंदूची कथा’ ही त्यांची पहिली कादंबरी. मग त्यांनी ‘माचीवरला बुधा’, ‘पूर्णामायेची लेकरं’ (ही वऱ्हाडी बोलीतील पहिली कादंबरी),’आम्ही भगीरथाचे पुत्र’, ‘मोगरा फुलला’, ‘पडघवली’, ‘शितू’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘मृण्मयी’ अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या.

‘मृण्मयी’ गोनीदांची सर्वात आवडती कादंबरी. ‘पडघवली’पासून आपल्याला लेखनशैली सापडली, असे ते म्हणत. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’ या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. ‘पवनाकाठचा धोंडी’ला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. ‘शितू’, ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘पडघवली’ या कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.

गोनीदां अनेक गड हिंडले. राजगड हा त्यांचा सर्वात आवडता गङ व्याख्यानांनिमित्त ते अमेरिकेला गेले होते, तेंव्हा त्यांना राजगडाची स्वप्ने पडायची. ते बेचैन व्हायचे. तिथून आल्या आल्या त्यांनी आधी राजगडावर धाव घेतली होती. या भटकंतीवर त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दुर्गदर्शन, महाराष्ट्र दर्शन, गगनात घुमविली जयगाथा, शिवतीर्थ रायगड अशी अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून, या माणसाचे दुर्गप्रेम पाहून थक्क व्हायला होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह त्यांनी शिवछत्रपती राज्याभिषेक त्रिशताब्दीनिमित्त विशाळगड ते पन्हाळगड हा प्रवास पायी केला होता.

गोनीदांना संतसाहित्याचे खूप आकर्षण. लहानपणापासूनच गाडगेबाबा, अकोल्याचे जगन्नाथ जोशी, ह.भ.प. सोनोपंत दांडेकर, धुळयाचे महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक, गोळवलकर गुरूजी यांच्या सहवासात राहिल्याने अप्पांवर धार्मिक संस्कार झाले. आळंदीचे मारूतीबुवा गुरव यांचेही ज्ञानेश्वरीचे संस्कार झालेले. अप्पांनी मग मुलांना समजेल अशी ‘सुलभ भावार्थ ज्ञानेश्वरी’, तसेच ‘श्री रामायण’, ‘भक्तिमार्गदीप’, ‘कर्णायन’, ‘कृष्णायन’, ‘दास डोंगरी राहतो’, ‘तुका आकाशाएवढा’ ही पुस्तके लिहिली.
साहित्यातही सर्व प्रांती या मुशाफिराने संचार केला. ‘जगन्नाथाचा रथ’, ‘काका माणसात येतो’, ‘वनराज सावध होतात’, ‘कुऱ्हाडीचा दांडा’, ‘संगीत राधामाई’, ही नाटके त्यांनी लिहिली. ‘छंद माझा वेगळा’ हे आपल्या छंदाविषयीचे पुस्तक त्यांनी लिहिले; एवढेच नाही तर, ‘पाच संगीतिका’ हे त्यांचे काव्यही प्रसिध्द झाले आहे.

वयाची साठी पूर्ण झाली, तेंव्हा गोनीदा पुणे ते लोणावळा हे अंतर पायी चालून गेले. दर वाढदिवस एखादया गडावर साजरा करायचा असा त्यांचा उपक्रम असायचा. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते शक्य होईना तेंव्हा ते विलक्षण बेचैन होत. ‘जोपर्यंत मी राजगडावर जाऊ शकतो, तोपर्यंत दिवा विझलेला बरा. मी विनाकारण भारभूत होऊन जगू इच्छित नाही. माझ्याभोवती भरपूर माणसे आहेत; पण त्यांना भार होऊन बसणे बरे नव्हे.’, अशी भावना गोनीदांनी त्यांची ७१ वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी ‘सकाळ’ला मुलाखत देताना व्यक्त केली होती.

गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. ‘सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,’ असे त्यांचे सांगणे होते.

मराठी भाषेविषयी गोनीदांचे प्रेम वेळोवळी दिसून येई. ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे.

मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ”माचीवरला बुधा’ हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,’ असे ते म्हणाले होते. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, ‘मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे.’ या माणसाची शेवटची इच्छाही शिवरायांच्या गड-किल्ल्यात माती बनून कायमचे मिसळून जावे, अशीच होती. त्यांना पुणे विद्यापीठ मानद D.Litt पदवी मिळाली होती.

गोनीदां यांचे १ जून १९९८ निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. Marathi World

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..