नवीन लेखन...

माणुसकी जपणाऱ्या एका गुरूची पुनर्भेट

 
दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचा मी बालवर्गापासूनचा विद्यार्थी. शाळेचा प्रचंड आभिमान बाळगणारा. 1971 मध्ये (म्हणजे सहावी इयत्ता पास झाल्यावर) दादर सारखं मध्यवर्ती ठिकाण सोडून ठाण्याला राहायला आल्यावर सर्वप्रथम वडिलांनी माझ्या शाळा प्रवेशाचं काम पूर्ण केलं, आणि ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मला प्रवेश मिळाला. शाळेची सकाळ आणि दुपार अशी दोन सत्र होती. मी दुपारच्या सत्रात प्रवेश घेतला होता. खरं म्हणजे मला दुपारची शाळा अजिबात आवडतं नव्हती. कारण संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर फारच थोडा वेळ खेळायला मिळायचा. पण त्यावेळी सकाळच्या सत्रात जागा रिकामी नसल्यामुळे मला दुपारची शाळा स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. मला शाळेची वेळ होईपर्यंत जेवण झालेलं असल्यामुळे झोप यायला लागायची. अखेर सातवी आणि आठवी इयत्ता दुपारच्या सत्रात काढून नववीमध्ये मला सकाळची शाळा मिळाली. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आता दुपारी शाळेतून आल्यावर जेवून झोपायचं आणि संध्याकाळी लवकर खेळायला पळायचं या स्वप्नात मी पहिल्या दिवशी वर्गात प्रवेश केला, आणि…….. वर्गातले सह विद्यार्थी पाहून माझा आनंद मावळायला लागला. मागच्या बाकावर बसलेले विद्यार्थी दाढी मिशा फुटलेले होते. आडदांड धीप्पाड विद्यार्थी पाहून माझा उत्साहच संपला. कारण दुपारच्या सत्रात सगळे साधारण त्या इयत्तेच्या वयाचेच विद्यार्थी होते. पण इथे तर हाताच्या बोटावर मोजण्याएव्हढे विद्यार्थीच तसे दिसत होते. मी दबकतच एका बऱ्या आणि मवाळ वाटणाऱ्या विद्यार्थ्याच्या शेजारी जाऊन बसलो. माझाही पहिला दिवस असल्याने सगळेच हा कोण नवीन? या नजरेने माझ्याकडे पहात होते. ते, मागच्या बाकावरचे सगळे विद्यार्थी गडी, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला वगैरे असायला हवेत असे दिसत होते. शाळा सुरु झाली. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांची बारीक आवाजात चेष्टा करणे आणि आणलेल्या एकमेव वहीत अभ्यास सोडून चित्र काढत बसणे एव्हढाच त्यांचा उद्योग सुरु होता. शिक्षकांनी वर्गाबाहेर जा म्हटलं की त्यांना खुन्नस देत आणि मित्रांकडे पाहून हसत सरळ शाळेबाहेर निघून जायचे. सकाळची शाळा घेऊन आपण चूक केली की काय? असा विचार माझ्या मनात येऊ लागला. अर्थात आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. पहिले तीन तास असेच पार पडले. आणि अचानक वर्गात मला थोडी कुजबुज, चलबिचल जाणवू लागली. आश्चर्य म्हणजे “गोपूजकर बाईंचा तास, गोपूजकर बाईंचा तास असं त्या मागच्या बाकावरच्या तगड्या विद्यार्थ्यांकडून दबक्या आवाजात बोललेलं कानावर आलं. “तू केलायस का अभ्यास? नाय! आता मेलास! असेही शब्द कानावर आले. माझा पहिलाच दिवस असल्याने मी निर्धास्त होतो. पण मला पडलेला प्रश्न होता, सकाळपासून बिनधास्त वावरणारे, पुरुष शिक्षकांनाही उलट बोलणारे हे विद्यार्थी नामक महाभाग आताच एव्हढे टेन्शनमध्ये का आलेयत? अशा कोण बाई येणार आहेत वर्गावर? कुणीतरी जबरदस्त व्यक्तिमत्व नक्कीच असणार. त्याशिवाय हे एव्हढे का घाबरतील? आणि मग मी ही आतुरतेने त्या ग्रेट शिक्षिकेची कुतूहलापोटी वाट पाहू लागलो. आणि त्याचवेळी त्या वर्गाच्या दारात उभ्या होत्या. संपूर्ण वर्गात ज्याला पिन ड्रॉप सायलेंस म्हणतात तो झालेला होता. मी हळूच मान वर करून पाहिलं, आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. एक फार उंची नसलेलं, तरतरित नाक आणि लांब केसांची एक वेणी घातलेलं व्यक्तिमत्व नजरेतली जरब दाखवत वर्गात शिरलं. मला कळेना या बॅक बेंचर्सनी घाबरून शांत बसावं असं यांच्यात काय आहे? गोपूजकर बाईंनी हातातली पुस्तकं टेबलावर ठेवली आणि एक तीक्ष्ण नजर वर्गावर फिरवली. आता मागून जराही आवाज येत नव्हता. जरब देत फिरणारी ती नजर पुढच्या बाकावर आली तेव्हा थोडी मवाळ झालेली होती. मधल्या सुटी नंतरचा पाहिला तास होता त्यांचा.
बाईंनी हजेरी घेतली तेव्हा मागच्या बाकावरचे काही ज्येष्ठ विद्यार्थी घरी गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मी आज फक्त बाईंचं निरीक्षण करत होतो. वर्गात आल्यापासून चिडचिड, रागावणं, ओरडणं, यातलं त्यांनी काहीही केलं नव्हतं. आणि मला वाटतं याची त्यांना जरुरीही नव्हती. बाईंचा ऑराच इतका जबरदस्त होता की कुणाची हिम्मतच नव्हती गडबड, दंगा करण्याची. अगदी त्या मागच्या थोर विद्यार्थ्यांचीही. आणि हे मला खरंच अगदी नवीन होतं. बाईंची नजर आणि मुखातून येणारे ठाम शब्द सगळा वर्ग ताब्यात ठेवत होते. त्यांची खडू उचलण्याची, फळ्यावर लिहिण्याची आणि पुन्हा खडू टेबलावर ठेवण्याची एक विशिष्ठ पद्धत होती. त्यांच्या प्रत्येक कृतीत एक नेमकेपणा जाणवत होता. हजेरी घेताना माझं नवीन नावं दिसल्यावर त्यांनी लगेच विचारलं, “दुपारच्या सत्रातून आलायस का?”
मी निरीक्षणात दंग होतो. अचानक आलेल्या प्रश्नामुळे गडबडत उभं राहून,
“हो हो ! असं म्हणालो.
मला एकदा आपादमास्तक न्याहाळून त्यांनी बसायला सांगितलं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. तो संपूर्ण तास आणि पुढेही मी बाईंच्या शिकवण्यात बुडून जात असे कारण इंग्रजी विषय त्या फारच सुंदर शिकवायच्या. त्या भाषेची भिती न वाटता मला ती जवळची वाटू लागली ती गोपूजकर बाईंमुळेच.
माझ्या पहिल्या दिवसाचा बाईंचा तास संपला. बाई वर्गाबाहेर पडल्या आणि पुन्हा एकदा वर्ग पूर्वस्वरूपात आला. आम्हा काही आठ दहा विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांचं मत चांगलं होतं. आमचा अभ्यासही नेटका असायचा आणि वागणूकही त्यामुळे असावं. पण तो आदरयुक्त धाक मात्र कायम असायचा.
ठाण्याला बाई त्यावेळी ज्या सोसायटीत राहायच्या ती आमच्या शेजारीच होती. आमच्याकडे दरवर्षी संक्रांतीचं हळदीकुंकू असायचं. आईने मला बाईनाही बोलवायला सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला. बाईंच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलायचं म्हणजे मला जरा संकटच वाटत होतं. अखेर घाबरत घाबरत गेलो बापडा. बेल वाजवल्यावर बाईंनीच दार उघडलं , आणि मला पहाताच “अरे प्रसाद ! ये ये आत ये” म्हणाल्या.
मला तो आवाजाचा टोन पूर्णपणे नवा होता. वर्गातल्या बाई मला इथे कुठेही दिसत नव्हत्या. एक प्रेमळ माऊली माझ्याशी बोलतेय असं मला वाटलं. बाईंनी आतून एका ताटलीत तिळाची वडी आणून दिली. मी आपला घेऊ की नको विचार करत होतो. “अरे खाऊन टाक पटकन” बाई मला म्हणाल्या. मी लगेच वडी तोंडात टाकली. घरात अरविंद घोष यांची मोठी तसबीर होती. आणि त्यासमोर एक गोरीपान , मागे वळवलेले केस राखलेली व्यक्ती ध्यानस्थ बसलेली होती. बहुधा बाईंचे यजमान होते ते. मी आईचा निरोप सांगितला आणि एकदा बाहेर पडलो. आज मात्र बाईंचं एक वेगळं रूप मला पाहायला मिळालं होतं.
त्यानंतर एकदा आमच्या घरी काही कौटुंबिक कार्यक्रम होता. मी आईला म्हटलं बाईंची परवानगी घेऊन मी लवकर घरी येईन. पण वाण नाही पण गुण लागला म्हणतात तसं मी परवानगी न घेताच मधल्या सुट्टीत घरी आलो. आईला मात्र हे सांगितलं नाही. बाई वर्गावर आल्या. ‘ प्रसाद आला नाही का ‘ विचारल्यावर मित्रांनी सांगितलं , ‘ आला होता पण मधल्या सुट्टीत घरी गेला. बाईंच्या माझ्यावरच्या विश्वासाला मी ठेस पोहोचवली होती. दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यावर माझ्याकडे एक सणसणीत कटाक्ष टाकून म्हणाल्या , “काय आईने कौतुक केलं असेल ना मधल्या सुट्टीत पळून घरी आल्याबद्दल ?” मी मान खाली घातली. पण त्यानंतर मात्र कधीही असा वागलो नाही. नववी पास होऊन मी दहावी इयत्तेत गेलो. नवीन अभ्यासक्रमानुसार दहावी ची आमची पहिली बॅच होती. त्यानंतर मला वाटत बाईंनिही आमच्या जवळची जागा सोडली आणि त्या दुसरीकडे राहायला गेल्या. आता गोपुजकर बाईंशी चांगली ओळख झाली होती पण आता ती फक्त शाळेपुरतीच राहिली होती. पुढे दहावी पास होऊन शाळेतच अकरावी बारावी पूर्ण केलं आणि शाळा सुटली ती कायमचीच. पुढे कॉलेज संपवून माझी नोकरी सुरू झाली , लग्न झालं. त्यानंतरच्या अनेक वर्षात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं.
आणि एक दिवस ठाण्याला रहाणाऱ्या आणि सामाजिक कार्यात मनापासून काम करणाऱ्या माझ्या एका बहिणीशी फोनवर बोलताना तिच्याकडून अचानक एका नावाचा उल्लेख झाला , गोपुजकर ! आणि मी तिला अधिरपणे म्हटलं ,
“त्या शिक्षिका होत्या का ?” त्यावर ती म्हणाली ,
“हो ! का रे ?” (माझा आनंद वाढत होता)
म्हटलं , “थांब थांब ! मला सांग , त्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिक्षिका होत्या का ?”
ती म्हणाली , “हो ! पण तू का विचारतोयस ?”
म्हटलं , ” आम्हाला त्या शिक्षिका होत्या.” “त्यांना प्रसाद कुळकर्णी नाव सांगून बघ. आठवतं का विचार. कारण मध्ये खूप वर्ष गेली आहेत. आणि प्लीज मला त्यांचा नंबर दे.”
माझी ही बहीण ज्या गतिमंद मुलांच्या शाळेत शिकवते त्याला बाई यथाशक्ती आर्थिक किंवा वस्तुरुपात मदत करत असल्यामुळे तिची ओळख झाली होती. कित्येक वर्षानी मला बाई परत भेटणार होत्या. मी काही स्कॉलर विद्यार्थ्यांमध्ये गणला जात नव्हतो, तरीही माहीत नाही कसा पण मी त्यांना आठवत होतो. मलाही जरा आश्चर्यच वाटलं पण आनंदही झाला. बहिणीने दिलेल्या नंबरवर मी फोन केला. मनात पूर्वीची ती धाकधुक होती. समोरून फोन उचलला गेला , आणि हॅलो ऐकू आल्याबरोबर मी म्हटलं “बाई नमस्ते ! मी प्रसाद कुळकर्णी बोलतोय. ओळखलं का ?”
त्यावर आलेला बाईंचा आवाज मी लगेच ओळखला.
“अरे ओळखलं मी , काय म्हणतोयस ? कसा आहेस ?”
मी म्हटलं , “तुम्हाला आठवतंय ?”
तर म्हणाल्या , “हो अरे ! कसं माहीत नाही, पण तुझा चेहरा आठवतोय मला.”
आणि मग मधली वर्ष उडून गेली . मस्त गप्पा झाल्या. ठाण्याला आल्यावर आपल्याकडे येण्याचं त्यांनी दहा वेळा बजावलं.
म्हटलं , “नक्की येईन.”
त्यांच्याशी गप्पा मारताना तो शाळेतला आब आज कुठेही जाणवत नव्हता. शाळेत असताना त्या नेहमी म्हणायच्या , शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक अलिखित अंतर असायला हवं. शिक्षकाने विद्यार्थ्याचा मित्र होण्यापेक्षा चांगला मार्गदर्शक व्हावं.
शाळेत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक चांगली वाईट स्थित्यंतरं घडली. त्यांच्या एकुलत्या एक लेकीचं लग्न झालं , त्यांचे यजमान वारले. बाईंशी गप्पा मारताना कळलं की त्या २००७ साली शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्या. बाईंची लेक आपला नवरा आणि दोन मुलांसह अमेरिकेत असते.
२०१६ साली बाईना brain inflammation चा अटॅक आला. पण पुन्हा तेच . जिद्द , इच्छाशक्ती आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं तर स्वामी समर्थांच्या कृपेने बाई या severe आणि त्रासदायक आजारातून बाहेर आल्या.
बाईंचा स्वभाव स्पष्टवक्ता. जे असेल ते तोंडावर बोलून मोकळा होणारा. पण त्याचबरोबर कुणाच्याही गरजेला धावून जाणारा. अशावेळी मी कशाला जाऊ ? ते पाहतील आपलं. असं म्हणून कच न खाणारा. गरजवंताला उपदेशाचे डोस पाजत न बसता शक्य होईल तेव्हढी मदत त्याला करायची हा खाक्या. अर्थात कुणी चुकीचं 🙏🙏 तर मागे पुढे न पहाता त्याला बाई तिथेच फटकारणार. मग तो त्यांचा विद्यार्थी असो की आणि कुणी. आपलं काम निस्वार्थी भावनेने करत राहिल्याने शाळेत त्यांचे अनेक हितशत्रू निर्माण झाले. याच हितशत्रूंना त्यांच्या अडचणीच्या वेळी बाईंनी मदत केली होती , पण आपला कार्यभाग साध्य झाल्यावर माणूस ते उपकार सोयीस्करपणे विसरतो. पण बाई मात्र या सगळ्यांना पुरून उरल्या. परंतु काही सहकारी शिक्षकांनी त्यांची साथ सोडली नाही ती अगदी आजपर्यंत. कारण त्यांनी बाईंचा निस्पृह स्वभाव पुरेपूर ओळखला होता. कित्येक माजी विद्यार्थ्यांना अगदी आजही त्यांची आठवण येते आणि मग फोन करून ते विद्यार्थी बाईंकडे धडकतात. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधत आणि त्यांची व्यवस्थित पोटपूजा करून बाई विद्यार्थ्यांना निरोप देतात.
मी सुद्धा भेटायला गेलो. माझ्या डोळ्यांसमोर बाईंचा तो चेहरा आजही स्पष्ट होता. घरी गेल्यावर इतक्या वर्षांनी बाईना पाहिलं. तोच चेहरा ,वयानुसार थोडा बदल झालेला. डोळ्यात तेच निर्भिड भाव आणि बोलण्यात तोच समोरच्या व्यक्तीला दिलासा देणारा आत्मविश्वास. भरपूर गप्पा झाल्या. सध्या त्या घरात एकट्याच असतात. वर्षातून एकदा लेकीकडे जाण्याचा
त्यांचा नेम या वर्षी कोरोना मुळे चुकला आहे. पोहे चहा घेऊन निघताना , पुढच्या वेळी सापत्निकच यायचं हे बजावून बायकोसाठी लाडू चिवड्याची खाउपुडी सोबत दिली. निरोप घेऊन आणि पुढच्या वेळी आम्ही दोघंही येणार हे ठरवून मी परतलो आणि हा कोरोना सुरू झाला.
आजही बाई विद्यार्थ्यांपासून ते गरजू व्यक्तींपर्यंत यथाशक्ती आर्थिक मदत करत असतात आणि आपली तब्येत सांभाळून जवळच्या कुणाला काही प्रत्यक्ष मदत हवी असेल तर ती ही करत असतात. कोरोना काळात लॉकडाउन असताना आपल्याला गरजवंतासाठी इच्छा असूनही काही करता येत नाही तर जे करतायत त्यांना यथाशक्ती आर्थिक मदत करून त्या आपलं सामाजीक भान राखत होत्या. देव देव करत बसण्यापेक्षा माणसातला देव जाणून त्यासाठी होईल ते करावं हा त्यांच्या जीवनाचा फंडा आहे. आपल्यासाठी कुणालाही त्रास पडू नये याकडे आजही त्यांचा कटाक्ष असतो. आजही त्या आपल्या मनाप्रमाणेच जीवन जगतात. मी लिहिलेल्या लेख , कवितांना फक्त प्रतिक्रिया देऊन न थांबता वाचल्यावर लगेच फोन करून आवडल्याचं सांगतात. कधी मी ऑनलाईन दिसलो की आवर्जून फोन करतात आणि मग बाइंशी छान गप्पा होतात. गप्पांमध्ये विविध विषय येतात आणि अनेक वेळा बाई इतक्या छान मनमोकळ्या हसतात की क्षणभर मी ही माझ्या एकेकाळच्या गुरुंशी बोलतोय हे विसरून जातो. गोपुजकर बाई आज हिरक महोत्सवी जन्मवर्षाच्या जवळ आलेल्या आहेत. गप्पा मारताना क्वचित त्यांच्या बोलण्यात निराशावादी किंवा कंटाळा आल्याचा दृष्टिकोन डोकावतो , पण तो तितकाच असतो. बाईंचे विद्यार्थी अगदी भाजी विक्री करणाऱ्यांपासुन ते उच्च पदांवर विराजमान झालेल्यांपर्यंत सगळ्या क्षेत्रात पसरलेले आहेत. या महामारी काळात त्यांच्या जवळपासचे अनेक विद्यार्थी बाईना काय हवं नको ते अगदी आपलेपणाने पहात असतात. बाई मात्र शक्यतो मदत टाळून जेवढं जमेल तेव्हढं स्वतःच सगळं स्वतः करत असतात. कोरोना संपल्यावर मला सपत्नीक भोजनालाच येण्याचं आग्रहाचं निमंत्रण आहे. मी नको म्हणण्याचा प्रयत्न केला , म्हटलं “कशाला उगाच तुम्हाला त्रास” त्यावर म्हणाल्या “मला काही होत नाही , या तुम्ही.” काय बोलणार ?
आपल्या आजवरच्या आयुष्यात अनेक चढउतार पहात आणि सांभाळत बाईंनी वाटचाल केली आहे. अगदी सख्ख्या नात्यांपासून दूरच्या नात्यांपर्यंत , आपल्या सहकारी शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत ते अगदी प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांपर्यंत अनेकांना सांभाळत , मार्ग दाखवत , आधार देत आणि वेळेला स्पष्ट शब्दांची समज देत गोपुजकर बाई आनंदात जीवन जगतायत. थकवा वाटला , तब्येत बिघडली की शक्यतो कुणाला प्रकृतीचं गाऱ्हाणं सांगत न बसता घरातच विश्रांती घेतात आणि बरं वाटल्यावर पुन्हा उभ्या रहातात.
अशा या आमच्या गोपुजकर बाई , एक प्रसन्न , करारी आणि स्वावलंबी व्यक्तिमत्त्व.
जिवेत् शरद: शतम्
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..