मै अकेलाही मजनू था

“जवा बघाव तवा जुन्याच गप्पा , जुनेच  सिनिमा , जुनीच  गाणे , जुन्याच आठवणी ! तुम्ही नुसती भूत झालात ,भूत ! आजच्या काळात का नाही जगत ? अस काय आहे त्या तुमच्या काळात जे आज आमच्या काळात नाही ?” असा खडा सवाल ,एका सो called ‘तरुणा’ने (जो जेष्ठ नागरिक वाटत असलातरी पन्नाशीच्या आसपास लोंबकळतोय ) ,’ अस काय आहे त्या मोहिनीत  जे माझ्यात नाही !’ या उषा चव्हाणने दादा कोंडकेना विचारलेल्या प्रश्ना प्रमाणे त्याने मला प्रश्न विचारला .

नेहमी प्रमाणे झटकन उत्तर देता आले नाही . खरच अस काय होत माझ्या भूतकाळात जे आज दुर्मिळ झालाय ?………

लहान पणी सकाळी डाव्याहातावर काळ मंजन घेवून दात घासत जेव्हा घरा बाहेरच्या भल्या थोरल्या दगडावर बसायचो तेव्हा समोर डोंगर दिसायचा , त्याच दिशेने गार वारा मस्तीत भिरभिरायचा . डोक्यात कसलीच कालवाकालव नसायची . निवांत वाटायचं .

कधी कोमट,तर कधी गार पाण्याची अंघोळ . गबाळे पण चुरचुरीत, कडक उन्हात वाळवलेले कपडे घातले कि मस्त प्रसन्न वाटायचं . त्याच कपड्यात शाळा,शाळा सुटल्यावर सूरपारंब्या,गिल्ली-दांडू ,लगोरच्या,गोट्या,सगळे  खेळ . संध्याकाळ पर्यंत पार पोतेरे व्हायची . पण आई कधी रागवची  नाही . कशी रागवेल ? मोजकेच कपडे असायचे ना !

हातपाय धून मग जेवण . बरेचदा भाकरी ताक, कारळ जवसाची चटणी ,कधी वरण पोळी,तर कधी दुध पोळी , कैरीच करकरीत लोणच . पण आवडता मेनू -तव्यावरच पिठलं +पोळी +आंब्याचा, नीरदम (बिन पाण्याचा ) रस ! जगातल्या  सर्व चविष्ट भाज्या ,कुरुड्या,पापड्या , सारे भज्याचे प्रकार , एकत्र केले तरी त्या पिठल्याच्या चवीच्या पासंगालाही पुरच्या नाहीत ! पाण्याच्या घोटालाही जागा नसायची !
गरिबी तर होतीच . पण एखादी गोष्ट पाहिजेच ,पाहिजे अशी हाव कधीच  वाटली नाही. कधी श्रीमंन्तांचा हेवा वाटला नाही ,कि गरीबीची लाज वाटली नाही . गरिबी जरूर होती ,दारिद्र्य नव्हते !

चार गल्ल्या ओलांडल्या कि मोकळे मैदान लागायचे . तेथे तिन्ही त्रिकाळ आम्ही खेळायचो ,ज्यास्त करून पतंग उडवायला मस्त वाटायचे . कारण आत्ता सारखे पतंग अडवणारे लाईटचे खांब नव्हते ! रद्दी कागदाचे, लांब सडक शेपटीचे पतंग थोड उंच गेले कि साधू बाबा सारखे ध्यानस्त व्हायचे . खुपदा मी अश्या उंच पतंगाचा धागा एखाद्या बाभळीच्या झुडपाला बांधून घरी यायचो ! दुध पोळीचा काला खाऊन पुन्हा मैदानात जायचो . पतंग तसाच असायचा ! मांजा ,काटाकाटी, कधी परवडली नाही आणि कधी आवडलीही नाही .

हे खेळाचे मैदान ओलांडले कि गोल गोट्यांचा किनारा असलेली ,बारमाही वाहती नदी लागायची .  तेथे आईचे धुणे , कापड वाळू घालण , मग त्या वाहत्या पाण्यात आमच्या डुबक्या . बरेचदा उन्हाळ्यात सक्काळीच अंघोळीला चंदुदादा सोबत जायचो .  पाणी कोमट असायचं ,धारोष्ण दुधा सारख !

रात्री माळवदावर झोपायचो . माळवदावर लांब लचक चवाळ, त्यावर फाटकी सतरंजी ,त्यावर आज्जी नि हाताने शिवलेल्या  ,सश्यासारखी मऊ गोधड्या  ! त्यावर घरातले सगळे पोर सोर ,चारदोन वडीलधारे झोपायला यायचे.   आभाळातल्या चांदण्या पहाताना वाटायचे ,आपल्याला चांदण्या जवळ आभाळात जाता येईलका ? तेथे गेलोतर वरून आपल घर ,हि गच्ची कशी दिसेल ? या विचारात झोप कधी लागली कळायचे पण नाही . मग रात्री कधीतरी आई तीच जून लुगड , अलगद अंगावर पांघरूण घालून जायची ,दुधा वरच्या साई सारखी !

घर जूनच होत . सारवलेली ओसरी ,आणि सडा टाकलेलं अंगण . अंगणात घरापेक्षाहि जुना कडूलिंबाचा डेरेदार झाड , बापा सारखी घरावर सावली धरून उभा होत! त्याचा एका आडव्या भक्कम फांदीला दोरखंडाचा  बांधलेला झोका . अजून डोळ्या समोरून हालत नाही .  मागल्या अंगणात तुलस ,त्या समोर दगडी महादेव ,अन तिथ आईन लावलेली सांजवात. !

उन्ह तेव्हा पण तापायची . त्यात आत्ता सारखी रुक्षता आणि दाहकता नव्हती . ते उन्हाळे  थोडेसे मायाळूच वाटायचे . लगेच ढग सावली धरायचे . दोन्ही हात पसरून आम्ही पोर अंगणात गाऱ्यागाऱ्या  भिन्गोऱ्या  किवा येरे येरे  पावसा म्हणत स्वतः भोवती गोल गोल फिरायचो . नेमलेल्या नक्षत्रावर पाऊस पडायचा . घरा समोर पाण्याचे ओहळ वहायचे , त्यात आमच्या कागदी नावा  !

असाच एखादा पावसाळा अनामिक हुरहूर घेवून यायचा . कुठे तरी ,काहीतरी हरवल्या सारख वाटायचं . काहीतरी हव असायचं पण काय ,ते कळायचं नाही . मनात खोल कुठतरी एक पोकळी जाणवायची . भिरभिरत्या नजरेला, जेव्हा एखादी अशीच भिरभिरती’ नजर ‘ भिडायची ,तेव्हा ती मनातली पोकळी क्षणात भरून वाहायची ! ‘इन दो नयनोकि सागर मे ,कोई दिल कि नय्या डूबोता है ‘ या गाण्याच्या ओळींचा अर्थ समजून जायचा ! मग सगळ जग,सगळे संदर्भ बदलून जायचे ! सगळजगआपलस  वाटायचं !

———–असो . फार ताणात नाही . आज हि खूप काही चांगल आहे . पण त्या काळी काही ‘वेगळ ‘ होत हे मात्र नक्की . थोडक्यात सांगायचे म्हणजे ,

ओ जमाना कुछ और था ,
ओ जुनून कुछ और था ,
सारी दुनिया ‘लैला ‘ थी ,
और ———————
मै अकेलाही मजनू था !

— सुरेश कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच , Bye .

About सुरेश कुलकर्णी 86 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…