नवीन लेखन...

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ५ – कोकम

कोकण हा महाराष्ट्रातील अत्यंत रमणीय सदाहरित अरण्याचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशावर निसर्गाचा वरदहस्त आहे. या प्रदेशात आंबा, फणस काजू यासारखे बहुगुणी फळे आहेत. पण ह्या फळामध्ये गेली एक दोन दशके दुर्लक्षित राहिलेले बहुगुणी औषधी फळ आहे. त्याचो आज आपण माहिती घेणार आहोत. त्याचे नाव कोकम किंवा रातांबा आहे. उन्हाळ्यात कोकणात आंबा, फणस व काजू सारखी अतिरथी महारथी फळे बाजारात मिळत असल्यामुळे याच्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. परंतु जसजशी त्याच्या औषधी उपयोगाबद्दल माहिती उजेडात येऊ लागली तशी त्याला बरीच मागणी वाढली आहे व ह्या फळ झाडाचे नशीब सध्या जोरावर आहे.

कोकम हा सदापर्णी वृक्ष क्लुसिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव Garcinia indica आहे. या वृक्षाचे मूलस्थान भारताचा पश्चिम किनारी प्रदेश आहे. याची लागवड चीन, मलेशिया, सिंगापूर इ. देशांत केली जाते. यांच्या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे हा द्विदल वर्गातील असूनसुद्धा याच्या पानांमध्ये समांतर शिरा असतात.

कोकमचे झाड हे सदाहरित अरण्यामध्ये, नदीकिनारी व खूप पावसाच्या ठिकाणी चांगले वाढतात. ह्याची क्वचित ठिकाणी शेती केली जाते. बहुतांश ठिकाणी ही झाडे घराभोवती व शेताच्या बांधावर लावली जातात. बाकीच्या ठिकाणी हि नैसर्गिक रीत्या जंगलामध्ये वाढतात. ह्याला खास पाण्याची सोय व कीटकनाशकाची फवारणी करावयास लागत नाही.

जगात ह्याच्या जवळ जवळ एकूण २०० प्रजाती आहेत पैकी भारतात १७ प्रजाती आहेत. या १७ भारतीय प्रजाती पैकी ७ प्रजाती ह्या पश्चिम घाटावर आढळतात व बाकी अंदमान निकोबार बेटावर आढळतात. सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील कोकम फळाच्या व्हरायटीस भौगोलिक संकेत (Geographical Indications, GI टॅग) मिळाले आहेत.

रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण छोट्या अशोकाची वाढतात तशी. रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते मात्र त्यामध्ये ५० टक्के नर आणि ५० टक्के मादी झाडे निपजतात. ह्याची पाने लांबट असतात, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पातळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट, आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी चवीला आंबटसर असतात. हे झाड ज्या वेळेस पूर्ण वाढते त्या वेळी ते पिरॅमिड सारखे दिसते.

फुले पांढरी, लहान झुबक्यामध्ये असतात. याचे फळ संत्र्याच्या आकाराचे व नारिंगी रंगाचे, रसदार असते. फळ पूर्ण पिकल्यावर त्यात पाच ते सात बिया असतात व त्यांचे वजन फळाच्या २०-२५ टक्के एवढे असते व मगजाचे प्रमाण साधारण ४५% असते. बिया ह्या ऍसिडिक लगद्यात दाबून बसलेल्या असतात. ह्या झाडास साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात.

सुधारीत जातीः

• कोकण अमृताः डॉ. बा.सा.कोंकण कृषी विद्यापीठाने (दापोली) ही मादी प्रकारची जात विकसीत केली आहे. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १४० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळे पावसाळयापूर्वी पिकतात त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.

• कोकण हातीसः डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठाने (दापोली) ही दुसरी मादी प्रकारची जात विकसीत केली आहे. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १५० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. या जातीची फळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात. मोठया आकाराच्या फळामुळे या जातीची मागणी जास्त आहे.

लागवड आणि निगा:

• लागवडीसाठी मे महिन्यात ६x६ मीटर अंतरावर ६०x६०x६० सेमी आकाराचे खड्डे काढावेत आणि पावसाळयापुर्वी चांगली माती, १ घमेले कुजलेले शेणखत व एक किलो सुपर फॉस्पेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचे अथवा कलमांचे वाळवीपासून सरंक्षण करण्यासाठी ५० ग्रॅम २ टक्के फॉलीडॉल पावडर प्रत्येक खड्डयात टाकावी आणि पावसाच्या सुरूवातीला प्रत्येक खड्डयात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी रोपे किंवा कलमे लावावीत.
• विषेशतः कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्याला काठीचा आधार दयावा. आधार देवून सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पन्न देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पन्न मिळू शकते.
• कोकमामध्ये फळधारणा ५ व्या वर्षापासून सुरू होते. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात.

उपयोग :

• अ. आयुर्वेदिक औषधी गुणधर्म :

कोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बीयांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे.
उपयोग
० चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.
० कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
० कोकममध्ये पाणी घालून त्याचा कल्क (काढा) बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
० कोकमचा कल्क, नारळाचे दूध, कोथींबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
० अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमच्या कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.
० अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.
० पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
० हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
० हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.
० हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.
० रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
० कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.
० कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
० शंभर ग्राम कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
० मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.

ब. औषधी गुणधर्म:

१. कोकुमच्या बियांमध्ये २३-२६ टक्के तेल असते. तेलाचे प्रमाण वाढवायचे असेल तर बिया ५-६ दिवस राखेत ठेवतात त्यामुळे तेलाचे प्रमाण ४०% होते असा अनुभव आहे. बिया वाळवून उकडून उकळत्या पाण्यात टाकतात. त्यामुळे बियांतील तेल तरंगून वर येते. थंड झाल्यावर त्याचा गोळा बनतो. तो साठवून ठेवतात. .त्याचा उपयोग चॉकोलेट व कन्फेकशनरीत करतात.
२. थंड झाल्यावर त्याचा गोळा बनतो. हे बटर तेल टाचेच्या भेगांवर व मुरुमांवर रामबाण उपाय आहे.
३. तेलाचा उपयोग त्वचा निरोगी व तजेलदार राखण्यासाठी होतो.
४. याच्या फळांच्या सालीत Hydroxycitric acid (Hca ) हा घटक असतो. नवीन संशोधनानुसार याचा उपयोग वजन कमी करण्यास होतो. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या उतिसंवर्धन विभागात यावर बरेच संशोधन झाले आहे. सध्या पाश्चिमात्य देशात जवळ जवळ ५० टक्के लोक अति वजनाचे शिकार बनले आहेत. व तेथे हे Hca वापरून औषधी गोळ्या बनवतात व औषधी कंपन्या ते भरमसाठ किमतीत विकतात. त्यामुळे भारताला खूप परकीय चलन मिळते.
५. कोकम सरबत व आगळ बनवण्याचे छोटे उद्द्योग कोकणात खूप प्रमाणात आहेत व त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराचे साधन मिळते.

क. स्वयंपाक घरातील उपयोग :

कोकमच्या फळाची गर काढलेली साल म्हणजे ओले आमसूल. ओले आमसूल साखरेत घालून ४-५ दिवस उन्हात ठेवतात व त्याचा रस म्हणजे कोकम सरबत.

गर काढलेली साल साखर न घालता रस केला कि तो आगळ या नावाने ओळखला जातो. साखर नसल्यामुळे तो मधुमेही व्यक्तींना उपयोगी असतो.
फळाची ओली साल सूर्यप्रकाशात पूर्ण व कडक वाळवली कि त्यास आमसूल म्हणतात. ह्याच्या चटणीस श्राद्धाच्या जेवणात मानाचे स्थान असते. आमसूल चिंचेच्या ऐवजी आमटीत घालतात. त्यात आंबटपणा कमी असतो. कोकमचा पल्प, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवतात.

कोकम सरबत व सोलकढी हि पेये सर्वाना आवडतात व त्याचा खप उन्हाळ्यामध्ये प्रचंड होतो. त्यामुळे परदेशी थंड पेयांचे मार्केट निम्म्यावर आले आहे व आपल्या देशाचे परकीय बाजारात जाणारे वाचत आहे.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 15 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. mob. 9881204904

1 Comment on महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ५ – कोकम

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..