नवीन लेखन...

कुठून आली व्यंगचित्रे?

एकोणिसाव्या शतकात जर्मनीमध्ये बाजाराच्या दिवशी काहीजण पथारी मांडून आल्यागेल्याची व्यंगचित्रे चितारून विकत असा उल्लेख आहे. जेव्हा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रिंटींग मशीनचा शोध लागला तेव्हापासून व्यंगचित्रे नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागली. नियतकालिके त्याअगोदर हस्तलिखित स्वरूपात होती; पण (प्रत्येक कॉपीवर तेच चित्र चितारणे जवळपास अशक्य होते.) पंच, टाइम्स, लाइफ ही प्रिंटिंग मशीनवरची नियतकालिके, व्यंगचित्रे प्रसिद्ध करू लागली.

युरोप, इंग्लंड या भागांतून व्यंगचित्रे हळूहळू दूरवर गेली. अमेरिकेत सॅटरडे इव्हिनिंग पोस्ट, कालियर्स यात व्यंगचित्रे दिसू लागली. दुसर्या महायुद्धाच्या काळात आत बाहेर इंग्लंडमधून ‘लिलिपुट’ आणि ‘लंडन ओपिनियन’ ही पुस्तकाच्या आकाराची नियतकालिके ब्रिटिश साम्राज्यात पोचली. प्रामुख्याने बिटिश अधिकारी आणि सैनिक यांच्यासाठी त्यांचे वितरण असे. तिथे ती जुनी झाली की; तिथल्या बाजारात येत. व्यंगचित्रे हा या दोन्ही नियतकालिकांचा खास आकर्षणाचा भाग असे. या आणि अशा नियतकालिकांतून व्यंगचित्रे जगभर पसरली. पार अमेरिकेपासून जपानपर्यंत तत्कालिन सोव्हिएट युनियनमध्ये पोचलेली व्यंगचित्रे तिथल्या हुकुमशाहीत कोंडली गेली. खुरटली. अद्याप त्यांची अवस्था बरी नाही. ‘पाहणार्याला हसविण्याच्या उद्देशाने चितारलेली चित्रे ती व्यंगचित्रे’ अशी व्यंगचित्रांची सोपी व्याख्या या दरम्यान प्रस्थापित झाली. सुरुवातीची व्यंगचित्रे अतिरेषाळ असत. विनोद चित्राखालच्या लिखित शब्दांत असे. संवादात असे. व्यंगचित्राचे स्वरूप शब्दातल्या विनोदाला सपोर्टिंग असे होते.

नंतरच्या काळात शब्दातला विनोद हळूहळू चित्रात येऊ लागला. लिखित शब्द कमी होऊ लागले. चित्रात शिरून बसले. कालांतराने तिथूनही शब्दांचे उच्चाटन झाले आणि व्यंगचित्रांना शब्दविरहित अशा मूक भाषेचे स्वरूप आले. चित्रातल्या रेषा कमी कमी होत किमान गरजेपुरत्या राहिल्या. तपशील देखील आवश्यक तेवढेच राहिले. व्यंगचित्रांचा स्वतःचा प्रवास हा असा होत गेला. आता तर ते त्याच्या मूळ व्याख्येत सुद्धा मावेनासे झाले आहे.

व्यंगचित्रे ही आता फक्त हसविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. त्यातून अत्यंत गूढ गहन गंभीर असा फिलॉसॉफिक सिद्धांत इथपासून तो तरल, नाजुक, काव्यात्म आशय इथवर सर्वव्यापी परिणामकारकतेने आणि नेमकेपणाने व्यक्त होऊ लागला आहे. कमीतकमी तपशिलात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

आपल्या देशात व्यंगचित्रे युरोपासून पोचत असल्याचे वरकरणी दिसत असले तरी त्यांचे अस्तित्व पुराणकाळापासून असावे. रावणाची भीषणता त्याच्या दहा तोंडांनी दहापट वाढवण्याचा प्रयत्न किंवा ‘जांभईमाजी आकाश पुढे’ हे बिभीषणाचे वर्णन आणखी काय दर्शविते? व्यंगचित्रांच्याच कल्पनाशब्दापाशी अडखळून थांबल्या. फक्त एक पाऊल पुढे-एवढ्याच अंतरावर व्यंगचित्र राहिले होते.

महाराष्ट्रातील व्यंगचित्र आणण्याचा मान शंकरराव किर्लोस्करांकडे जातो असे ज्ञान इतिहासावरून दिसते. सामाजिक विसंवादावर बोट ठेवून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी व्यंगचित्रांतून केला.

हरिश्चंद्र लचके, दलाल, गोरे, ठाकरे यांनी सामाजिक, राजकीय व्यंगचित्रे लोकप्रिय केली. वसंत सरवटे यांनी स्वतःचा वेगळा मार्ग स्वीकारला. फडणिसांनी ‘ग्रेसफुल’ व्यंगचित्रे रुजवली. वाईरकरांनी कॅरिकेचर्समधे वाटचाल केली. महाराष्ट्रातच, पण दीर्घकाळ इंग्लिश नियतकालिकात वावर असलेले आर.के. लक्ष्मण आणि मारिओ लक्षात राहिले. मारिओ त्यांच्या स्वतंत्र आणि धमाल शैलीबद्दल, तर आर.के. राजकीय व्यंगचित्रांबद्दल फिल्मस्टार्सपासून नेत्यांच्यापर्यंत त्यांनी चितारलेली कॅरिकेचर्स ही सर्वश्रेष्ठच म्हणावी लागतील. पॉकेट कार्टून्समध्ये त्यांच्यातल्या कार्टूनिस्टपेक्षा साहित्यिकाचाच प्रभाव जास्त आहे. त्यांच्या एकाही पॉकेट कार्टूनमधल्या चित्रात विनोद नाही. तो खालच्या लिखित शब्दात आहे. शब्द झाकले तर नुसते चित्र काहीही कम्युनिकेट करत नाही. (ही खरेतर व्यंगचित्रांची प्राथमिक अवस्था होय.) तसेच त्यांचा ‘कॉमन मॅन’ हा टाइम्स वाचणारा अन् कॉमन मॅन आहे. तो महाराष्ट्रातला किंवा देशातला खरा कॉमन मॅन नाही. साहजिकच आर.के.ची व्यंगचित्रे टाइम्स वाचणार्या (अन् कॉमनमॅन) पर्यंत पोचली. त्या पलीकडे ती गेली नाहीत. बाळ ठाकरे आणि राज ठाकरे हे व्यंगचित्रकार राजकारणाने गिळंकृत केले.

एकीकडे व्यंगचित्रांची वाटचाल कुठे कुठे जोमाने झाली तर अलीकडच्या काळात व्यंगचित्रकार मात्र, त्यांना जे गवसले, जेवढे गवसले त्याच्याभोवतीच रुंजी घालताना दिसत आहेत. सरळ रेषेतली वाटचाल बहुतांश ठिकाणी संपली. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांत प्रत्येक स्क्वेअर सेंटिमीटरला जाहिरातींचा भाव चिकटल्यामुळे उरल्यासुरल्या कोपर्यात, सांदीफटीत व्यंगचित्रे ढकलली गेली. स्त्री देह आणि सेक्स अपील यांच्याभोवती फिरणार्या आणि वर्षानुवर्षे चावून चोथा झालेल्या चित्रांना कुठे कुठे अद्याप मुखपृष्ठावर स्थान मिळते आहे.

महत्त्वाकांक्षा घेऊन या प्रांतात येणारे नियतकालिकांची कवाडे ही बंद झालेली पाहून आणि व्यावसायिक जाहिरातींना बळी पडून अॅनिमेशनच्या प्रांतात जम बसवण्याचा प्रयत्न करतात. तिथे कलेपेक्षा तांत्रिक करामत जास्त महत्त्वाची ठरत असल्यामुळे, कलाकारापेक्षा तंत्रज्ञांची निर्मिती होत आहे. तंत्र अवगत आहे; पण स्वतंत्र प्रतिभेने कल्पना सुचत नाही अशी परिस्थिती बहुतांश ठिकाणी दृष्टीस पडते. मग याची कल्पना उचल, त्याची कल्पना हाण या उद्योगातच धन्यता मानणारी मंडळे वाढत्या संख्येने तिथे निर्माण होत आहेत. वस्तुतः अॅनिमेशन आणि व्यंगचित्रे ही भिन्न क्षेत्रं आहेत. एकमेकांना पूरक असली तरीही एकाच कारखान्यात कार्स आणि पेट्रोल दोन्ही उत्पन्न होत नाही. हे उद्योग भिन्न आहेत. पूरक असले तरी वेगळे आहेत.

कलेचे कुठलेच क्षेत्र कधी निर्णायक होत नाही. कुणी ना कुणी निर्माण होत राहते. वाटचाल करत राहते. व्यंगचित्रांचीही वाटचाल होतच राहील. वेग कधी कमी, कधी जास्त एवढाच काय तो फरक पडेल.

(साभार :शब्द दर्वळ दिवाळी अंक,२००८)

-मंगेश तेंडुलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..