नवीन लेखन...

कुराण शपथ

 

या गोष्टीला झाली आता बारा वर्षे. मी त्यावेळी बँकेत दादर मुंबई येथे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होतो. दिवाळी जवळ आली होती. खातेरदारांची पैसे काढण्याची गर्दी रोज होत असे. कामकाज चालू असताना एका रेडीमेड कपडे बनविणाऱ्या व्यापाऱ्याचा मला फोन आला. त्याचे नाव धीरजभाई.  तो मला सांगू लागला की, त्याच्या अकौंटला चाळीस हजार रुपये डेबिट पडले आहेत, ते कसले?

मी त्याला सांगितले तुला अर्ध्या तासात त्याचा तपशील देतो. मी शिपायाकरवी व्हौचर्स मागवली व चाळीस हजाराची एन्ट्री शोधून त्याला फोन केला व चेक नंबर सांगितला. तर तो मला म्हणाला, ‘साहेब, मी तो चेक चाळीस नव्हे, तर चार हजारांचा दिला आहे.’

मी तो चेक नीट पाहिल्यावर लक्षात आले की त्याचे लिखाणात चाळीस हजार वाटत असले तरी ते चार हजार होते. गर्दी असल्यामुळे अक्षरी रुपये बघणे कॅशियर व पासिंग ऑफिसर या दोघांच्या नजरेतून सुटले. असे जास्त गेलेले पैसे बहुतेकवेळा साम दाम दंड भेद हे उपाय वापरून वसूल होतात या अनुभवामुळे मी निश्चिंत होतो. तो व्यापारी व त्याने ज्याला पैसे दिले तो मुलगा दोघांना बँकेत बोलावून घेतले. तो मुलगा कपडे तयार करणाऱ्या एका कारागीराकडे नोकरीला होता. तो कारागीर मालक व तो मुलगा दोघेही युपीचे मुसलमान होते. कारागीर व मुलगा बँकेत आले, पण तो मुलगा कॅशियरने चारच हजार रुपये दिले असे सांगू लागला. अर्धा तास वादावादी होऊनही तो कबूल होईना. त्याला ‘पोलिसात तक्रार करू’ सांगितल्यावरही तो घाबरेना. त्याचे आपले पालुपद एकच ‘मुझे कॅशियरने चार हजार रुपयाही दिया है.’

काही वेळाने ते निघून गेले. पोलीस तक्रार करण्यात फारसे हशील आहे असे वाटत नव्हते. धीरजभाई आणि मी त्या कारागिराला दिवसातून तीन वेळा फोन करीत होतो. पोलीसात तक्रार करण्याची धमकी देत होतो. पण काही उपयोग होत नव्हता. तो पोरगा उलट म्हणत होता, ‘तुमचा कॅशियरच चोर आहे आणि त्यानेच छत्तीस हजार रुपये घेतले असतील.’

एकंदरीत पैसे मिळण्याची शक्यता मावळू लागली. त्यामुळे मी कॅशियर आणि ऑफिसर या दोघांना अठरा अठरा हजार रुपये भरावे लागतील असे मी त्या दोघांना सांगितले. अन्यथा बँक नियमाप्रमाणे चौकशी होऊन कारवाई होईल जी तापदायक होऊ शकते हे सांगितले. कारण चार हजारांचे चाळीस हजार पास करणे व देणे ही त्या दोघांची चूक होतीच. मात्र एकीकडे माझे वसुलीचे प्रयत्न चालू होते.

एक दिवस त्या कारागिराने त्या मुलाला मारून खरे काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो बधला नाही. धीरजभाई आता माझ्यामागे बँकेने छत्तीस हजार रुपये त्याला परत करावे असे सांगू लागला. कारण दिवाळी तोंडावर आल्यामुळे त्यालाही पैशाची गरज होती.

आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी अकरा वाजता मला धीरजभाईचा फोन आला की तो मुलगा कबुल झाला. मी त्याला सांगितले तुम्ही सगळे बँकेत या. ते येईपर्यंत मी कुणाला काही बोललो नाही. दुपारी एक वाजता तो कारागीर आणि धीरजभाई बँकेत आले. सोबत तो मुलगा नव्हता. त्या कारागिराने छत्तीस हजार समोर ठेवले. मी ते धीरजभाईच्या स्वाधीन केले आणि चेकची रक्कम चाळीस हजार करून योग्य ठिकाणी सह्या घेतल्या.

माझ्या दृष्टीने समस्या संपली होती. चहा मागवला. मनात मात्र, मार खाऊनही जो मुलगा काबुल होत नव्हता तो अचानक कबुल कसा झाला ही उत्सुकता होती. हा प्रश्न त्या कारागिराला विचारला. त्याने सांगितलेली गोष्ट खरंच थोडी अजब होती. तो म्हणाला, ‘मी त्या मुलाला सांगितले की तू जर खरे बोलत असशील तर कुराणावर हात ठेऊन तसे सांग, त्याला मात्र तो मुलगा तयार होईना आणि शेवटी त्याने चाळीस हजार रुपये मिळाल्याचे कबुल केले. धर्माचा प्रभाव ऐकून मी आणि आमचा स्टाफ चकित झालो.तर अशा तर्‍हेने ती दिवाळी आम्हा सर्वांना आनंददायी ठरली.

-अनंत जोशी

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..