नवीन लेखन...

कुंकू… काल आणि आज

१९३७ साली व्ही. शांताराम यांनी “प्रभात”च्या बॅनरखाली ‘कुंकू’ या कृष्णधवल चित्रपटाची निर्मिती केली होती. शांता आपटे व केशवराव दाते यांची त्यात प्रमुख भूमिका होती. ह. ना. आपटे यांच्या कथेवरुन केलेल्या या चित्रपटाने त्याकाळी अमाप यश मिळविले.

सत्तावन्न वर्षांनंतर निर्माता-दिग्दर्शक सचिन पिळगांवकरने याच नावाचा रंगीत चित्रपट करुन प्रदर्शित केला. त्याला फारसे यश मिळाले नाही..

म्हणजेच दोन पिढ्यांनंतर ‘कुंकू’चं महत्त्व कमी झालं असावं…

भारतीय स्त्रीला सौभाग्याच्या या लेण्याची पूर्वापार परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे. खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरुन त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे. राजा रवीवर्माच्या अनेक देवी, अप्सरा, ऋषिकन्यांच्या चित्रांतून आपण त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खूण पाहिलेली आहे.

कुंकू लावल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यात आमूलाग्र बदल होतो, तेच कपाळ मोकळं असेल तर तो चेहरा प्रफुल्लीत वाटत नाही. नैराश्य जाणवते. पूर्वी कपाळावरील कुंकवाचा आकार मोठा होता, कालांतराने तो लहान होत गेला. आता तो इतका लहान असतो की, त्याचं अस्तित्वच जाणवत नाही.

पूर्वी विवाहित स्त्री, ठसठशीत कुंकू पाहून कळून यायची. सहसा तिच्या वाटेला कोणी जात नसे. आता विवाहित व अविवाहित असा फरकच राहिलेला नाही.

पन्नास वर्षांपूर्वी गावी गेल्यावर माझी आजी स्नान झाल्यावर कुंकवाची लाकडी पेटी समोर घेऊन बसायची. ती उघडून त्यातील आरसा तिरपा लावून मेणाच्या डबीतील मेण बोटावर घेऊन आपल्या कपाळावर गोल पसरवायची. मग कुंकू बोटावर घेऊन त्या मेणावर दाबून लावायची. मोठ्या रुपयाएवढा गोल करुन झाला की, साडीच्या पदराच्या टोकाने तो कुंकवाचा आकार गोलाकार करुन घ्यायची. मग ती लाकडी पेटी कोनाड्यात ठेवून ती घरकामाला लागत असे. तिचे हे कुंकू लावण्याचे कसब, मी टक लावून पहात बसे.

सत्तर साली आजोबा गेले आणि तिचे कुंकू लावणे भूतकाळात गेले. तिच्या मोकळ्या कपाळाची जागा आता काळ्या बुक्याने बळकावली होती. त्यामुळे ती मला ‘धार्मिक’ वाटू लागली. उर्वरित सव्वीस वर्षे तिने आपल्या कपाळावर बुक्का आणि ज्योतिबाच्या गुलालाला कधीही अंतर दिले नाही.

माझी आई देखील, आजी प्रमाणेच कुंकू लावत असे. आता ती जुनी लाकडी पेटी इतिहासजमा झाली होती. त्याऐवजी एक मेणाची डबी व हळदी कुंकवाचा करंडा होता.

शहरात आल्यावर देखील आईने कुंकूच लावणे चालू ठेवले होते. दरम्यान आधुनिक स्त्रीच्या राहणीमानात खूप बदल झाले. शृंगार कंपनीने ओल्या लाल गंधाच्या डब्या बाजारात आणल्या. त्यांतील काडीने स्त्रिया कपाळावर गोल ठिपका लावू लागल्या. तो ओला गंध सुकल्यावर बराच काळ टिकू लागला.

काही काळानंतर कुंकवाच्या टिळ्याला पर्याय म्हणून बाजारात लाल रंगाच्या टिकल्या मिळू लागल्या. फॅशन म्हणून त्यात सर्व रंगाच्या शेड्स मिळू लागल्या. म्हणजे निळी साडी असेल तर तिला मॅचिंग असलेली ‘निळी’ टिकली, पिवळ्या साडीला ‘पिवळी’ टिकली! जिलेटिनच्या पेपरवर चिकटवलेल्या वेगवेगळ्या आकारातील, रंगातील टिकल्या बोटाने काढायच्या व कपाळावर लावायच्या. पाच मिनिटांचं काम, पाच सेकंदात होऊ लागलं. अशा अनेक टिकल्यांच्या प्लॅस्टिकच्या डब्याही मिळू लागल्या.

त्यात आवडीनुसार चकमक लावलेल्या, चंद्रकोरीच्या आकाराच्या, कोयरीच्या आकाराच्या डिझाईन मिळू लागल्या. टिकलीला असलेला गोंद हलक्या प्रतीचा असेल तर कपाळावर त्याच्या अ‍ॅलर्जीचे डाग दिसू लागले.

अलीकडच्या अनेक मुलींना लहानपणापासून कपाळावर काही लावायला नको असते. तसे केल्यास ‘काकूबाई’ म्हणून त्यांना चिडवले जाईल अशी भीती असते. काॅलेजमध्ये फक्त ‘साडी डे’ लाच पारंपरिक पोशाख असताना ‘टिकली’ आवर्जून लावली जाते.

महाराष्ट्रीयन लग्न समारंभात ‘टिळा’चा कार्यक्रम असतो. काही वर्षांनंतर या परंपरा लोप पावत जातील. पूर्वी सगळीकडे दिसणारी भरलेली कपाळं, काही वर्षांनंतर एखादी जरी टिकली लावलेली स्त्री दिसली तर तिला पाहण्यासाठी बघ्यांना नक्कीच औत्सुक्य असेल…

© – सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

१५-४-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 66 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on कुंकू… काल आणि आज

  1. लेखन छान आहे , कुंकवाचे महत्व याचाही थोडा उहापोह हवा होता
    विषय महत्वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..