नवीन लेखन...

‘कोशिश’ – शब्देविणू संवादू !

“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती (मी हळवी म्हणत नाहीए ) हा चित्रपट पाहून झाल्यावर आतून गदागदा हलल्याखेरीज राहात नाही. मुक्तहस्ताने या मंडळींनी आपल्यावर चांगल्या अनुभवांची उधळण केलेली आहे. चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम जिवंत झालेली आहे आणि हा शब्देविणू संवादू आपण कोरडेपणाने पाहूच शकत नाही.

शब्द /भाषा हे आमचे संभाषणाचे साधन ! पण इथे संभाषणाची जागा संवाद घेतात आणि त्यासाठी त्यांना शब्दांच्या कुबड्या लागत नाहीत. फक्त देहबोली (त्यातल्या त्यात चेहेऱ्यावरील हावभाव ) पुरून उरते आणि पडदा सजीव होतो.

पाच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आपण सगळे जीवनानुभव घेत असतो. सहजासहजी मिळालेल्या या इंद्रियांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे आपल्या लक्षात येत नाही ,उलट आपण त्यांना गृहीत धरतो. ज्यांच्याकडे यापैकी काही इंद्रियांचा अभाव आहे (त्यांचा काहीही दोष नसताना ) असं एक जोडपं हरी (संजीवकुमार) आणि आरती (जया भादुरी) यांच्या रूपाने कोशिशमध्ये आपल्याला भेटते. दोघेही मूक-बधीर ! फिल्मी स्टाईलने त्यांची भेट होते. म्हणजे जयाचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओंना संजीव सामोरा जातो.

यथावकाश ठरवून केलेल्या भेटींचे रूपांतर प्रेमात आणि विवाहात होते. तसे दोघेही “अनुरूप “(?) त्यांना यापेक्षा अधिक चांगले सहचर कोण भेटले असते ?

असरानी नावाचा खलनायक या जोडप्याच्या राशीला लागतो. त्यांचे पहिले बाळ असरानी च्या लोभी स्वभावामुळे गमवावे लागते. कालांतराने दुसरे अपत्य होते. दोन्ही वेळी या बाळांना बोलता येते की नाही ,ऐकू येते की नाही हे जाणून घेण्याची जी विलक्षण तगमग संजीव आणि जया आपल्या समर्थ अभिनयाने व्यक्त करतात ती फक्त अनुभवण्याची चीज आहे.

देहबोलीच्या उत्तुंग आविष्कारात दोघे कोठेही कमी पडत नाहीत. तुलनेत जयाची भूमिका छोटी आहे. संजीव दोन कारणांसाठी भाव खाऊन जातो – चित्रपटाच्या अखेरीपर्यंत त्याला वाव आहे म्हणून आणि त्याही पेक्षा पुरुष असूनही स्त्रीचं अंगीभूत मार्दव हा गृहस्थ सहजपणे भूमिकेतून व्यक्त करतो. पुढे जाऊन हाच संजीव “नमकीन “मधला रांगडा “गेरुलाल” होईल याची कल्पनाही कोशिश बघताना मनाला शिवत नाही. इतक्या विरुद्धार्थी भूमिका तो सहज निभावतो. जयाच्या निधनानंतर संजीव अलवारपणे मुलाला वाढवतो. ज्या छापखान्यात तो कष्टाने वरिष्ठपदी जाऊन पोहोचतो तेथील त्याचे साहेब एक दिवस स्वतःच्या मूक -बधीर मुलीला सून म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव संजीवकुमार समोर मांडतात.

सकृतदर्शनी संजीवला यात काही गैर वाटत नाही. त्यानेही असा संसार यशस्वीपणे निभावला असतो. फक्त आर्थिक विषमतेची दरी त्याला अडविते. पण मुलाचे तसे नसते. त्याला पंचेंद्रिये असतात. कोठल्याही सामान्य माणसाप्रमाणे ,तडजोड न करता त्याला अधिक चांगला जोडीदार मिळू शकतो तेव्हा त्याने अशा मुलीशी लग्न का करावे ? त्याहीपेक्षा आई -वडिलांची झालेली फरफट ,त्यांच्या वाट्याला आलेल्या अवहेलना ,समाजाकडून मिळालेली असंवेदनशील वागणूक सारं सारं त्याने बघितलेलं असतं ,सहन केलेले असते. नकार देण्याची त्याची भूमिका /कारणे सहजी पटण्यासारखी आहेत. पण संजीवकुमारवर हा आघात असतो.

संतापाने मुलाला आईच्या फोटोसमोर खेचत तो अभिनयाचा प्रखर वस्तुपाठ सादर करतो आणि संजीवकुमार ही काय चीज आहे हे आपल्याला नव्याने पटतं .

मुलाला आपली चूक उमगते आणि वडिलांची माफी मागून तो विवाहाला आणि त्यानंतरच्या जीवनाला सामोरं जातो.

असरानीला, ग्रे शेडची नायकाला समांतर भूमिका मिळाली आहे आणि त्या संधीचे सोने करीत तो गुलजारचा विश्वास सार्थ करतो. ओम शिवपुरीच्या रूपाने एक दिव्यांग पात्र येथे भेटते. या जोडप्याला शेवटपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी गुलजारने या “अंध “पात्रावर सोपविली आहे आणि ओम शिवपुरीने ती डोळसपणे पार पडली आहे. याचबरोबर ” सोजा बाबा मेरे ” ही रफीची कर्णमधुर अंगाई गाण्याची कामगिरीही तो पार पडतो.

गुलजारच्या हळुवार हातांनी केलेली कलाकुसर नजरेआड करणे शक्यच नाही. अतिरेकी आणि राजकारण्यांवर चित्रपट काढताना जो गुलजार लोहाराचे घाव घालतो तोच येथे सोनाराच्या भूमिकेत जाऊन नर्म /नाजूक कारागिरी करतो. मूक -बधीर जोडप्याच्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या छोट्या छोट्या घटनांचे चित्रीकरण तो अलगद व अचूक करतो. काही बारकाव्यांचे नमुने-

१ ) चित्रपटाची सुरुवात (टायटल्स) आणि शेवट मूक -बधिरांच्या खुणांनी (साइन -लँग्वेजने) होते.
२ ) बोलता -ऐकता येत नसल्याने दोघेही एकमेकांना चिट्ठ्या लिहून संवाद साधतात.
३ ) मुलाला ऐकू येते की नाही हे तपासण्यासाठी दोघेही आलटून -पालटून त्याच्या कानाशी शिट्ट्या वाजवतात आणि शेजारी जमल्यावर ओशाळे होतात.
४ ) मुलाच्या गॅदरिंगच्या वेळी त्याचा स्टेज -परफॉर्मन्स काळजीपूर्वक बघतात आणि नजरेत सार्थ अभिमानाची छटा दर्शवितात.
५) पहिल्या बाळाच्या मृत्यूचा शोक त्याच्या इतःस्ततः पडलेल्या खेळण्यातून व्यक्त होतो.
६) रात्री बाळ रडू लागल्यास ओम शिवपुरीने पायाला बांधलेल्या दोरीमुळे संजीवकुमार जागा होतो आणि इतिहासाची पुनरावृत्ती टाळली जाते.
७) छोटे -छोटे आनंद पती -पत्नी विनातक्रार साजरे करतात. कोठेही हा जीवनाशी चाललेला विषम लढा सोडून ते मैदानाबाहेर पळ काढत नाही.
८ ) ते संघर्षपूर्ण जीवन जगतात आणि अंती विजयी होतात. कोठेही आक्रस्ताळेपणा नाही ,सूडबुद्धी नाही. आहे तो फक्त जीवनाचा “आहे तसा स्वीकार “!
९) आसपासच्या संवेदनाशून्य जगात सहानुभूतीची भीक मागत नाहीत की कोणत्याही स्वरूपाची याचना करीत नाहीत. स्वतःचे संघर्ष ,वेदना यातूनच आयुष्याची कोरीव मूर्ती घडवितात.
१०) समुद्रकिनारी अंध नारायणाच्या तोंडी काळीज चिरत जाणारे वाक्य – ” हे भगवान , ये कैसे दो हमजबान मिला दिए तूने !”
११) टेलिफोन बूथवरील फोन करण्याचा निर्भेळ आनंद (दोघांनाही बोलता -ऐकू येत नसतानाही )
१२) दवाखान्यात बाळाचा जन्मानंद अधीरपणे (कोठल्याही सर्वसामांन्य पालकांप्रमाणे ) भोगणं !

ही वानगीदाखल काही उदाहरणे दिली. प्रत्यक्षातील नजाकत केवळ अनुभवण्यासारखी !

“कोशिश” असा आपल्याला श्रीमंत करतो. अभिनयाला शब्दांचे /भाषेचे टेकू लागत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करतो. अभिनय क्षेत्रात काहीतरी करू बघणाऱ्यांसाठी वस्तुपाठ बनतो. अधिक कोवळीक ,अधिक सजग अनुभूती घेऊन आपण चित्रपटगृहाबाहेर पडतो. पण बाहेर जाताना आपण पूर्वीचे नसतो. गुलजारचे काम नेहेमीप्रमाणे झाले असते कारण याचसाठी तर त्याने सारा अट्टाहास केलेला असतो.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..