नवीन लेखन...

कोकण

कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते.चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो.माती लाल,रस्ते लाल,पाणदी लाल, चिर्याची घरे लाल,  कौले  सुद्धा लाल,झाडांची पाने आपला मुळचा रंग दडवून   लाल झालेली असतात. त्यावर माती आपला रंग रांगोळीसारखा विखुरते.काही पाने विटकरी,काही गडद लाल, काही तपकिरी लाल,आकाशात ढगांचे पांढरे पुंजके तरंगत असतात.जोराचा वारा येऊन लाल मातीचा भोवरा तयार होतो,तो फुफाटा बनून रस्ता, शेते, माळ ,कोरडे ओहोळ यात घुमत राहतो.काही वेळाने सारे शांत होते.एव्हाना आंब्याचा मोहोर फुलून येतो .हळूहळू फळ धरू लागते. झाडावर फणस अगदी बुंध्यापर्यंत  लटकू लागतात.रातांबे धरतात.  उन्हाळा आणखी जोर धरू लागतो. हा,हा,म्हणता मे येऊन ठेपतो.करवंद जांभूळचा रानमेवा भराला येतो. आंबा रवाना होतो.साठवणीच्या कामांना वेग येतो.वाळवण मांडली जातात.रातांबे,आंबे,फणस यांची वाळवणे सुरु होतात त्यांच्या आंबापोळी, फणसपोळी, घरासाठी व विक्रीसाठी तयार होतात. अथांग सागर लाटा उसवळत  असतो .थोडेच दिवसात मासेमारी बंद होणार म्हणून समुद्रात जाण्यासाठी  गलबत,होड्यांची लगबग सुरु असते.कोळणी साठवणीची मासळी वाळवायला घेतात.मोरी,बोंबील यांची सुकट वाळवायला कोळीवाड्यात पसरली जातात.त्याचा घमघमाट सगळ्या कोळीवाड्यात भरून राहतो. मुंबईहून चाकरमानी गावी आलेला असतो. गावच्या हाटेलात त्याच्याकडून चाय,शेवलाडू,चिवडा,खाज्या, गावकऱ्याकडून उकळला जातो.बिडीकाडीचा व्यवहार होतो.गावच्या गजाली  तिखटमीठ लाऊन सांगितल्या जातात.हाटेलासमोर लाल डब्याची एस.टी येते. आणि लाल धुराळा उडवीत निघून जाते.शेतकरी नांगरणीला लागतो. झाडावर,सातभाई,मैना,पोपट,एखादा चुकार धनेश, भारद्वाज दिसतात.चरणाऱ्या जनावरावर बगळे किडे शोधात असतात.पहाटे कोकीळ गात असतो.आणि अचानक पावश्या साद घालतो.

जूनचा पहिला आठवडा येतो.इतके दिवस दिसणारे ढगांचे पांढरे पुंजके नाहीसे होऊन काळे अक्राळविक्राळ ढग आकाशात जमा होतात.हा हा म्हणता धुवाधार पाऊस बरसू लागतो.तापलेल्या जमिनीवर पाऊस पाडून मातीचा वेगळा सुगंध आसमंतात दरवळू लागतो. एकदा सुरु झालेल्या पावसाला दोन तीन दिवस खळ नसते. घरे,वाड्या सुस्त होतात.सगळीकडे  पाणी वाहू लागते.इतके दिवस कोरडे असणारे नाले,ओहोळ दुथडी भरून वाहू लागतात.त्यात पाण्याचे भोवरे तयार होतात.पार करायची हिम्मत होत नाही.त्यासाठी साकवाचा आधार घ्यावा लागतो.इतके दिवस असलेली लाल पाने न्हाऊन निघतात.आणि त्याचा हिरवा रंग दिसतो.त्यात किती छटा असतात,फिकट हिरवा, गडद हिरवा,पिवळसर हिरवा,इतके दिवस लाल रंगाचा माळ हिरवा शालू नेसतो.त्यावर कशिदा काढल्यासारखी सुंदर  रानफुले उगवतात. काही टिकलीच्या आकाराची,  तर काही गेन्दाच्या आकाराची.माळरानाला  नव्या नवरीची नवलाई येते.पण त्यातून जाणारी पायवाट मात्र तशीच असते.आणि अचानक मोर माळावर अवतरतो.आपला पिसारा फुलवून स्वच्छंदीपणे नाचू लागतो.इतके दिवस दिसणारे पक्षी आसरा शोधतात.कावळे चिमण्या तर हक्काने घराच्या वळचणीला येतात. मोकळ्या जागी, परसदारी रानभाज्या फुलतात.सारे कोकण हिरवेगार होते.शेतकरी आपल्या कामात गुंततो.दिवस सरतात.आषाढ सरतो.श्रावण येतो.सणाचा हंगाम सुरु होतो. उन पडू लागते.शालू नेसलेली धरती सोनेरी सूर्यकिरणानी नटते.चाकरमानी चातकासारखी गणपतीची वाट बघत असतो.भाद्रपदात गणपती येतात.आणि कोकणी माणूस पुन्हा उत्सव साजरा करायला सज्ज होतो.

– रवींद्र वाळिंबे.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..