नवीन लेखन...

श्री स्वामी समर्थ अवतार रहस्य – अलौकिक व कर्तृत्व

अनादी काळापासून भारतीय संस्कृती ही श्री दत्त अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यांच्या आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा संजीवन प्रवाह विश्वाच्या स्पंदनातून, चराचरातुन अखंड अविरतपणे धर्मरक्षणासाठी कार्य करीत आहे. श्री. दत्तात्रेयांचा पहिला अवतार सत्ययुगात महान तपस्वी श्री. अत्रीऋषी आणि महापतिव्रता साध्वी श्री. अनसुया यांच्या तपोबलामुळे झाला. व तो अखंड, शाश्वत. चिरंतन अवतार असल्याने त्याच परंपरेत त्यांचा अवतार मानले जाणारे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे श्री. दत्तात्रेयांच्या तीन प्रमुख अवतारा पैकी श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री. स्वामी समर्थ महाराज एक आहेत. परंतु त्यांचे सर्वच चरित्र अद्भुत, अगम्य व दैवी आहे.

पहीला दत्त अवतार हा प्राचीन असुन सत्ययुगामध्ये (त्रेतायुग) आहे. अशा या अनादीकालापासुन असलेल्या योगिराज दत्तात्रेयांनी कलियुगात प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ शके १२४२ (इ.स.१३२०) निर्वाण शके १२७२ (इ.स.१३५०) व दुसरा अवतार श्रीगुरू नृसिंहसरस्वती शके १३०० (इ.स.१३७८) व त्यांची अवतार समाप्ती शके १३८० (इ.स. १९४५६) आहे. श्री गुरुचरित्रात श्री गाणगापुर येथून निघून त्यांनी गुरुप्रतिपदा (माघ प्रतिपदा) शुक्रवारी शके १३८० रोजी निजानंदगमन केले. त्याचा उल्लेख गुरुचरित्र अध्याय ५१ व ओवी क्र. ४८ मध्ये “आम्हा सांगितले मुनी। आपण जातो कर्दळीवनी । सदा वसो गाणगाभुवनी। ऐसे सांगा म्हणितले।” म्हणजेच नृसिंह सरस्वतीनी देहत्याग न करता ते कर्दळीवनी अदृश्य झाले. नंतर संचार करीत उत्तरपंथी झाले व श्री. नृसिंहसरस्वतीनी काही काळ समाधिस्त रहावे म्हणून ते एका प्रशस्त, निर्वात व योगी जनांचे तपोधाम म्हणून घनदाट अरण्यात गेले. तेथे जवळजवळ ३०० वर्षे समाधिस्त अवस्थेत दिर्घकाळ राहील्याने त्यांच्या शरीरात अर्तंबाह्य पालट घडून आल्यने शरीरावर प्रचंड वारुळ तयार झाले व एकदा एक लाकुडतोड्या त्या ठिकाणी आला असता कुऱ्हाडीचा घाव वारूळात बसून समाधिष्ठीत राहीलेल्या नृसिंहसरस्वतीच्या मांडीपर्यंत पोहचला व त्यांची समाधि उतरल्याने तेच दत्त अवतार श्री. स्वामी समर्थ असे अद्भूत चैत्र शुध्द द्वितीय शके १८३७ च्या सुमारास मंगळवेढ्यास प्रथम प्रकट झाले. त्यांचे अद्भुत प्रकटीकरणाचा इतिहास स्वामी भक्तांना ज्ञात आहे.

श्री स्वामी समर्थ असतांना ब्रह्मनिष्ठ श्री. वामनबुवा (बांबोटीकर) यांनी “श्री समर्थ गुरुलिलामृत” ग्रंथ लिहीला त्याचे आधारे श्री स्वामी समर्थ मंगळवेढे या गावी शके १७६० मध्ये अचानक प्रकट झाले तेथे १२ वर्षे साधना केल्यावर ते अक्कलकोट क्षेत्री येवून खंडोबाचे देवळातील कट्ट्यावर आसनस्थ झाले. त्यांचे अजानबाहु, धिप्पाड, उंच व तेजपुंज शरीर व डोक्यातील प्रखर तेज पाहून गावकरी आश्चर्यचकीत झाले. गावकऱ्यांनी त्यांना सन्मानाने गावात आणले आणि त्यांना कोठून आले विचारले असता ते म्हणाले, “आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, नाव नृसिंहभान कर्दळीवनातून आलो. मूळ वटवृक्ष दत्तनगर हे धाम, साक्षात अंबा आमचे गुद धूत होती”. या श्री स्वामी समर्थाच्या उद्गारावरून ते श्री. भगवान नृसिंहसरस्वतीचा अवतार होते याची जाणीव स्वामीभक्तांना झाली. तेव्हा अक्कलकोट क्षेत्राचे मूळचे नाव प्रज्ञापुरी होते. कालांतराने श्री. स्वामी समर्थ च्या वास्तवामुळे ते तीर्थक्षेत्र झाले. व तेथेच स्वामीचे वास्तव्य वटवृक्ष स्वामी महाराज मठ, बाळप्पा मठ, जोशीबुवा मठ, राजेराय मठ व संस्थानिक मालोजीराव यांचा वाडा या सर्व ठिकाणी संचार व अद्भुत लीला करीत लोकांच्या आत्मोद्वाराचे अनमोल कार्य केले. त्यांच्या भक्तांच्या कथा व लिला स्वामीभक्तांना ठाऊक असल्याने येथे द्विरुक्ती करीत नाही.

स्वामी अवतारकालाचे अलौकिकत्त्व – श्री स्वामी समर्थ यांचा अवतार व कार्य अलौकिक व दैवी असल्याने त्यांच्या वयाच्या व ठिकाणाच्या आगमनाबद्दल त्यांच्या मुखातून प्रकट झालेली दैवीवाणी व ते असताना नगरचे सुप्रसिध्द पिंगळा ज्योतिषी श्री. नाना रेखी यांनी बनविलेली कुंडली पत्रिका व साक्षात त्या खरेपणाबद्दल श्री स्वामीचे उद्गार “क्या देखता है। नौबत बजाऔ ।” हे एकताच नाना दर्ग्यातील नौबतीजवळ जावून ती वाजवू लागले व साक्षात दक्षिणा म्हणून समर्थानी नानांच्या उजव्या हातावर दक्षिणा म्हणून समर्थांनी हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. नानांच्या हातावर निळ्या रंगाचे लहानसे विष्णुपद उमटले ते त्यांच्या हातावर शेवटपर्यंत होते.

श्री नानारेखी यांनी बनविलेल्या कुंडलीचा पत्रिकेच्या अर्थावरून श्री स्वामी अवतार शके १०७१ चैत्र शुध्द द्वितीया, वार गुरुवार, रास अश्विनी नक्षत्र, दुसरे चरण, प्रतियोग, प्रातःकाली दोन घटिका दिवस, नाडी आघ-गण-देव, यजुर्वेद, काश्यप गोत्र (टोपण नाव नृसिंहभान जन्म नाव-चैतन्यस्वामी मेष राशी (स्वामी मंगळ) हस्तिनापुराजवळील १२ कोसावर छेलेखेडा ग्रामी वडाच्या झाडाखाली धरणी दुभंगून अष्टवर्षीय स्वरुपात म्हणजे बटु रुपात स्वामी प्रकट झाले. (सदर पत्रीका व कुंडली अहमदनगरच्या स्वामी मठात आहे.) स्वामीचा जन्मवेळी लखलखीत अशी शेंदरी कांती जणू गजाननच मूर्तीरूपाने स्वरूपात प्रकट झाले असे चित्तवेधक वर्णन ग्रंथात आहे. या माहिती वरून असे दिसते की, श्री नृसिंह सरस्वती निर्वाण शके १३८० व श्री. स्वामी समर्थांनी घेतलेली समाधी शके १८०० मध्ये यावरून स्वामीचे आयूष्य ७२९ वर्षाचे ठरते. हे सर्व अघटीत, अलौकीक व दैवी आहे. हे मान्य करावे लागेल त्यांच्या जवळजवळ ८०० वर्षांचा कालखंडाचा शोध व सस्तुनिष्ठ आढावा घेण्याचे कार्य अनेक स्वामी चरित्राकारांनी प्रदान केले आहेत. त्या प्रसंगी लेखकापैकी श्रीपाद शास्त्री किंजवडेकर यांचे स्वामी चरित्र कार्य खंड तसेच श्री स्वामी चरित्रांचे सविस्तर तीन खंडात चरित्र लेखन करणाऱ्या स्वामी अभ्यासक विदुषी प्रा. नम्रता भट, आशीर्वादाने करीत आहेत व श्री समर्थ गुरुलिलामृत या ग्रंथातही एक इंग्रज बॅरिस्टर व त्यांचेबरोबर आलेले पारशी गृहस्थ यांनी अक्कलकोट येथे मोदी वाड्यात भेट घेतल्याच प्रसंगी, त्यांनी श्री स्वामींना विचारले की, आपण कोठून आलात? तेव्हा स्वामींनी त्यांना सविस्तर कालखंड उलगडून दाखवितांना सांगितले की ते कर्दळीवन, कलकत्ता, बंगाल, गंगातटाक हरिद्वार, केदारेश्वर, गोदावरी, हैद्राबाद व मंगळवेढ्याची प्रकट हकीकत सांगितली आहे. त्या वरून त्याचे अवतारकार्य दैवी आहे.

श्री स्वामी महाराजांचे अलौकिक रुप व लीला – श्री स्वामी महाराजांची कांती दिव्य व शरीराचा वर्ण तेज:पुंज व ते आजान बाहू होते. त्यांच्या शरीरावर इतके तेज प्रखर असे की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणी पाहू शकत नसत. त्यांची काया सुंदर होती. गंडस्थळ शोभिवंत, नासिका सरळ, भिवया उत्तम, नेत्रकमळ दिव्य व कपाळ भव्य होते. कमरेस मेखलेची शोभा असे. ते कौपीन नेसत. त्यांच्या मांड्या केळीच्या खांबासारख्या दिसत. डोक्यात कधी वुलनाची गोल टोपी असे. हाताचे तळवे व त्यांचे चरण कमलासारखे कोमल होते. कान मोठे व ऊर विशाल होते. पोट लंबोदरासारखे. त्यांची अवस्था बालपिशाच्य अवधूत योग्यासारखी असे. त्यांचे चालणे तेज असे. त्यांच्या बरोबर चालणाऱ्याला धावावे लागे. त्यांचे लांब पायाचे आसन जमिनीशी समांतर असे. त्यांच्या चलन वलनाला स्थळ काळाचे बंधन नसे. देहक्रीडा विक्षीप्त होत्या. कधी सामान्य माणसासारखे बोलत. तर कधी लहान मुलासारखे निरागस, तर कधी रागीट मुद्रा धारण करीत. हातात अंगठी व विश्वरुप गोटी होती. ती हातात घेवून क्रीडा करीत. कधी लंगोटी फेकून देत तर मुखी खेटर लाव, जुते मारेंगे म्हणत कधी आरती पालथी करीत पुराणे प्रवचने बंद करीत. रागात कधी कुणी दर्शन घेणाऱ्याला छाटी, जोडे फेकून मारीत पण भक्तांना मात्र तो कृपाप्रसाद असे. त्यांच्या सामान्याच्या, अहंकारी दांभिक योगीयांचा पाणउतारा करण्याच्या तहा विचीत्र असत. सर्व जण त्यांना वचकून असत ते ईश्वर चिंतनात सदा मग्न असत ते शांतीब्रह्म, दया करूणा क्षमेचे सागर होते. ते नेहमीच अंर्तयामी निजानंदी, नित्य- जागृत व स्वतःच्या मायेत रमत. त्यांना भक्ताकडून निर्मळ प्रेम व, श्रध्दा हवी असे. त्यांना नामाचे महत्व अपार असे कारण ते स्वत: ईश्वर चिंतनात राहून स्वत: देखील “जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो” असा जप करीत.

स्वामी कार्य व उद्देश – श्री. स्वामी महाराज असतांना त्यांच्या दर्शनास अनेक राजे, शास्त्रीपंडीत, कीर्तनकार, प्रवचनकार, योगी व क्रांतीकारक देशभक्त येत असत. त्यांच्या मनातील भाव ओळखुन ते वर्तन करीत व उपदेश देत त्यांच्या निःसीम सेवेत श्री बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई, मालोजीराजे हे असत. त्यांच्या प्रभावात आलेले अनेक शिष्य पुढे लोकोत्तर संत झाले व त्यांनी स्वामीमठ बांधून अनमोल कार्य केले त्या मध्ये श्री. तात महाराज, श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री. शिवराम बावडेकर, श्री रामानंद बीडकर, ब्रह्मनिष्ठ श्री वामन बुवा, आळंदीचे श्री. नृसिंह सरस्वती, श्री. गोपाळ रामचंद्र केळकर, क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके इ. सत्पुरुषांचा समावेश आहे. त्यांची कठोर परीक्षा घेवून नंतरच त्यांचेवर कृपा केली.

त्यांच्या कार्याचा उद्देशच मुळी सामान्यांना दु:खापासून दिलासा व उन्मत्त व अहंकारी, दांभिकाना वठणीवर आणण्याचा असे हे ईश्वरी अवतार असल्याने त्यांना अनेक सिध्दी प्राप्त होत्या पण लोककल्याणासाठी त्यांनी वापर केला. त्यांनी लोकांना अंधश्रध्दा दूर करुन त्यांना खऱ्या भक्ती मार्गाला लावले. त्यांना सोवळे- ओवळ्यास कर्मकांड, कोंबडे-बकऱ्याचे बळी देण्यास प्रखर विरोध असे. उदाहरणादाखल एक कथा सांगतो. अक्कलकोट शहरात सारसबागेत एक खोलगट दगड होता. अक्कलकोट निवासी त्या दगडाला गानदेवी म्हणत. ती गानदेवी नवसाला पावते असे समजून लोक कोंबड्या बकऱ्याचा बळी देत. स्वामीनी त्या दगडाचा शौचकूप म्हणून उपयोग करण्यास सुरुवात केली व लोकांना तो दगड गानदेवी नसून घाणदेवी आहे हे पटवून दिले. बुवाबाजी, भोंदुगिरी, जादुटोणा, मंत्रतंत्र करणाऱ्या भोंदु साधूंना ते सळो की पळो करुन सोडत. एके दिवशी स्वामीचा सेवेकरी चोळप्पा याच्या घरात घुबड शिरले ते अपशकून मानून चोळप्पाने घरी जाणे बंद केले. स्वामींना कळल्यावर स्वामी चोळप्पाच्या घरी जावून राहीले व घुबडाला हातात घेवून सोडून दिले.

अशा रितीने स्वामीचे सर्वच चरित्र अदभुत व दैवी आहे. लोकांच्या आत्मोउद्दारासाठी त्यांचा अवतार होता.

त्यांनी शके १८०० चैत्र वैद्य १३ ला अवतार समाप्त केला तरी त्यांच्या केवळ श्रध्देने “श्री स्वामी समर्थ ” या सिध्द नाम जपाने लोकांना आजही अनेकांना प्रत्यक्ष दर्शन देवुन “हम गया नही जिंदा है ।” ही दिव्यत्वाची प्रचीती येते. त्यांच्या पुण्यतीथी निमीत्त साक्षात त्रिवार वंदन.

— श्री. उमेश जाधव.

मो: ९६६४८८८७१३

सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १ ला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..