नवीन लेखन...

खंडूबा माझ्या साथीला (कथा)

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये शि. भा. नाडकर्णी यांनी लिहिलेली ही कथा.


बालेवाडीच्या क्रीडा संकुलाबाहेर जत्रेचं स्वरूप आलं होतं. संकुलाच्या प्रमुख प्रवेशद्वारापुढे भली मोठी कमान उभारलेली होती त्यावर लक्ष घेणारा लांबलचक कापडी फलक लटकवलेला होता, “अखिल भारतीय राज्यातंर्गत मैदानी स्पर्धा २०१९.”

दुपार ढळू लागली होती. स्वागतकक्षात स्पर्धक नोंदणीसाठी एकच गडबड उडाली होती. पुणे रेल्वे स्थानकावरून स्पर्धकांना क्रीडा संकुलात बसेस एकामागोमाग येत होत्या आणि आपापले सामान सावरत स्त्री-पुरुष स्पर्धक बसमधून उतरून स्वागतकक्षासमोर जमत होते. संघप्रबंधक, प्रशिक्षक, आपापल्या राज्याचा फलक लावून येणाऱ्यांना रांगेत उभे करत होते. राजस्थान, हरियाणा, केरळ, पंजाब राज्यांच्या फलकासमोर काही स्पर्धक शिस्तबद्ध उभे होते. प्रबंधक, त्यांचे सहाय्यक समूह नोंदणीसाठी स्पर्धकांची यादी स्वागतकक्षात बसलेल्या कार्यकर्त्याला देऊन तिथून मिळालेले स्पर्धकांसाठीचे सामुग्रीसंच एकेका स्पर्धकाला वितरित करण्यात व्यस्त होते. संकुलातल्या वसतीगृहातील खोल्यांचा आवतण तक्ता मिळाल्यावर प्रत्येक प्रशिक्षक एकेकाला सामानासकट वसतीगृहाकडे पाठवत होते. एका खोलीत तीन स्पर्धक राहणार होते. महाराष्ट्राचा फलक लावलेल्या ग्रूपमध्ये संख्या थोडी कमी होती. स्थानिक स्पर्धक एस.टी. बसने, स्थानिक वाहननि येतच होते. दुपारी साडेचार वाजेपर्यंत नोंदणी चालू राहणार होती. सोलापूरवरून आलेली गौरी मोकाशी आणि नाशिकहून  आलेली लता अन्साने तसेच इतर महाराष्ट्राचे स्त्री पुरुष स्पर्धक शिस्तीत उभे होते. महाराष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक नवलेसर स्पर्धकांना संकुलातील नियमावली, सरावाचे वेळापत्रक समजावून सांगत होते.

उंच शिडशिडीत बांध्याची गौरी थाळीफेक स्पर्धेत, तर जाडजूड बांध्याची लता भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत होत्या. गतवर्षी पतियाळाला झालेल्या राष्ट्रीय खेळसंमेलनात दोघींनी महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं होतं. दोघी एकमेकांना ओळखत होत्या. आपापले सामान आणि मिळालेले संच सावरत दोघींनी मुलींच्या वसतीगृहातील खोलीचा ताबा घेतला. तिसरी सहनिवासिनी म्हणून अजून कोण येणार यांची दोघींनाही उत्सुकता होती. थोडी विश्रांती घेतल्यावर ताजेतवाने होऊन दोघी मैदानाकडे साडेपाच वाजता स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आपापल्या सराव क्षेत्रात दाखल झाल्या. सरावासाठी एकच दिवस उरला के होती. उद्यापासून स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या सुरू होणार होत्या. एक किलो वजनाची थाळी आखलेल्या वर्तुळातून गिरक्या घेत बरोबर वेळ साधून जास्तीत जास्त दूर अंतरावर फेकायच्या कौशल्यात सुधारणा करायचा प्रयत्न गौरी करत होती. दोन तीन प्रयत्नांनंतर थाळी जेमतेम एकोणसत्तर मीटरवर गेली. प्रशिक्षक जोंधळे तिच्या थाळी फेकण्याच्या क्रियेतील उणिवा दाखवून काही क्लुप्त्या सुचवत होते. किमान सत्तर मीटरचे लक्ष्य गाठले तरच उपांत्य फेरीत जाण्याची संधी होती. तासभर सराव केल्यानंतरही साडे एकोणसत्तर मीटरपर्यंत गेली. थकल्यावर गौरी थोडीशी निराश होऊन वसतीगृहाच्या दिशेने निघाली. वसतीगृहाच्या बाहेर नवलेसर एका लहानखोर बांध्याच्या काळ्यासावळ्या वर्णाच्या, गांवढळ मुलीशी बोलत होते. “शिलिम्ब गावचे सरपंच बजाबाकडून जसे पाठीवर छापलेला निळा टीशर्ट आणि काळी पँट त्या मुलीने परिधान केली होती. शाळकरी मुलाकडे असते तशी प्लास्टिकची पाण्याची बाटली खांद्यावर लटकत होती. बाजूला जमिनीवर हिरव्या रंगाची पत्र्याची बॅग. अस्सल ग्रामीण अवतार.

“शकुंतला, साडेचार वाजता रिपोर्टिंग होते आणि तू साडेसहाला आलीस? काही शिस्त आहे की नाही?” नवलेसर झापत होते. त्यावर ती मुलगी काकुळतीला येऊन म्हणाली,

“गुर्जी, तुमी हापिसातून पाठवलेलं पत्र आजचसकाळला मिळालं.आम्ही तिसऱ्या मावळातल्या शिलिम्ब गावच्या डोंगरवाडीत राहणारी मानसं. पोस्टमन आमच्या गावात कंदीतरी यतो. पत्र उशिरा मिळाल्यात.” त्यावर सर भडकून म्हणाले, “अगं, आम्ही मोबाईलवर मेसेज पाठवला. ईमेलवर कार्यक्रमाचे वेळापत्रक पाठवलं. एवढं करूनही तुला उशीर झाला?” त्यावर गयावया करत ती मुलगी म्हणाली, “धनगरवाडीच्या वस्तीत नेटवर्कच येत नाय. मंग मोबाईलचा खोका मुका होतू. माझा मामा तालुक्याच्या गावाहून येताना रोज पोस्टमन जायचा. आजच माज्या नावाचं पत्र गावलं पोस्टात..तो बिगीबिगी निगाला सूर्य डोईवर आला तवा मला पत्र मिळालं. मंग म्या लगीच निघाले.”

“पंधरा दिवसांपूर्वी पाठविलेलं पत्र आज मिळालं?” सरांनी विचारलं.

“याच वेळेला लेट झाला गुर्जी. आधी अंडर सिस्किटीनची स्पर्धा झाली व्हती अंबरनाथला तवा चांगलं पंर्धा दिस आधी पत्र मिळालं व्हतं. याच टायमाला पत्राला उशीर झाला. माझी काय चूक?” शकुंतला म्हणाली.

“बरं जा तुझ्या खोलीत. आजचा सराव चुकला तुझा उशिरा आल्यामुळे.” सर वैतागून म्हणाले.

“मी पहाटेला लवकर उठून सराव करीन की.” शकू म्हणाली.

“रात्रीपासून मैदानात मार्गिका आखायचं काम सुरू होईल. मधे उद्घाटनासाठी व्यासपीठ बांधणार. मैदान मोकळे मिळणार नाही. आता थेट स्पर्धा फेरीत उतरायला मिळेल. मग बोलू नको सराव करायला मिळाला नाही.” नवले सर म्हणाले. त्यावर आपली ट्रक चक्क डोक्यावर घेऊन शकू ताडताड जिन्याच्या पायऱ्या चढू लागली.

नवलेसरांना पाहून गौरी थांबली. “सर, मी गौरी. आताच थाळीफेक करायचा सराव करून आली.”

“किती मीटरपर्यंत थाळी गेली?” नवलेंनी विचारलं. “साडेएकोणसत्तर मीटर्सपर्यंत गेली.”

“अजून चांगला प्रयत्न कर. जोंधळे सरांनी मार्गदर्शन केलं असेलच. फेकताना सारे लक्ष उजव्या हाताच्या मुठीत एकवटायचं. नक्की सुधारणा होईल. ती आता गेलेली मुलगी पाहिलीस? शकुंतला दुमडा. मावळ तालुक्यातील डोंगरपाड्यातली अकरावीत शिकणारी मुलगी. चारशे मीटर, आठशे मीटर तिचे आवडते क्रीडाप्रकार. राज्यस्तरीय अंडर सिक्स्टिीनच्या स्पर्धेत दोन्ही प्रकारामध्ये विजेतेपद पटकावलेन. अनवाणी पायाने धावते. पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर धावणारे. आत्मविश्वास आणि एकाग्र मन या दोघांच्या जोरावर जबरदस्त कामगिरी करून दाखवतीय. खूप अपेक्षा आहेत तिच्याकडून.सरांनी सांगितले. गौरी जिने चढून आपल्या खोलीपाशी आली आणि बघितलं तर शकुंतला तिच्याच खोलीतील तिसरी पार्टनर! जमिनीवर आपली लांबलचक ट्रंक पसरून त्यातले कपड़े काढत होती. या गावंढळ मुलीशी आपल्या दोघींचं कितपत जमेल याची गौरीला काळजीच वाटली. शकुंतला आपल्या परीने बिनधास्त होती. “ताई, तुम्ही कुठल्या भागातल्या? तुम्हाला मराठी येतं ना बोलायला?” तिने सरळ विचारायला सुरुवात केली.

“माझं नाव गौरी, सोलापूरची मी. थाळीफेक करते. गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत एक कास्य पदक मिळालं मला.” गौरीने उत्तर दिले.

“बरं झालं बगा, तुमच्यासारखी चांगली जोडीदारीन मिळाली. म्या मागासलेल्या भागातली. शहरी लोकांमध्ये वावरतानी बिचकायला व्हतं. इथं कसं राहायचं ते तुमच्यासारख्यांकडून शिकायला मिळेल.. खरंतर गौरीताई, स्पर्धा खेळायची ही माझी तिसरी खेप. नववीत व्हते तवा पळतानाचा माझा वेग बघून आमचे म्हात्रे गुर्जी म्हणाले आंतरशालेय स्पर्धेत धाव. धावली तर चारशे मीटरच्या प्रकारात सोन्याचं पदक मिळालं. मग अंडर सिक्स्टिन गटात मला अंबरनाथच्या क्रीडा संकुलातील स्पर्धेत पाठवलं. तिथं चारशे आणि आठशे मीटर अशी दोन सोन्याची पदकं मिळाली.’

“अरे वा! कौतुक आहे. एवढ्या लहान वयातच पदकं मिळवायला लागली. हा धावायचा छंद तुला कसा काय लागला?” गौरीनं विचारलं.

“धावणं आमची मजबुरी व्हती. धनगरवाड्यातली आमची झोपडी उंच डोंगरावर हाय. लहानपणी शेळ्या चरायला अनवाणी पायांनीच जायचे. पायाला टोचणारे दगडगोटे आणि काटे सवयीचे झाले. मग पाच मैलांवर असलेल्या शाळेत नाव घातले. डोंगरदऱ्यांमधून जाणाऱ्या पायवाटेने गेले तर पाऊण तास लागायचा शाळा गाठायला. चौथीत गेली तवापास्नं दूरच्या बावेवरून पाणी आणायला आयेला मदत करू लागली. दरवर्षी संक्रांतीनंतर बावेचं पाणी कमी व्हायचं. शेंदायला वेळ जास्त लागायचा मंग शाळेत निघायला उशीर व्हायचा शाळेपर्यंतचं अंतर पळत जायला लागायचं नाहीतर उशीर झाला म्हणून मागं बसायची. डोंगराच्या पायवाटेवरून जाताना दोन्ही बाजूला रानटी झुडुपं माजलेली. धावताना जवळून कंदी चार पायांनी तर कंदी सरपटणारी जनावरं जायची ना. मंग धावताना खाली वाटेकडं, माजलेल्या गवताच्या जंगलाकडे समोरच्या उतारचढावाच्या रस्त्याकडे एकाचवेळी तीन तीन ठिकाणी नजर फिरवत धावायची सवय झाली.’

“रानातून धावताना कधी हिंस्त्र जनावरं मागे लागत होती का?” गौरीने विचारले.

“हो तर. मला भय कंदीच वाटलं नाय. कारण माझा खंडूबा नेहमी माझ्या आसपास असतो. मंग कुठली भीती? माझी माय म्हणते खंडोबाची साथ आसंल तर घाबरायचं नाय.”

“बरंय बाई, तुला खंडोबाचा आशीर्वाद आहे. जेवायची वेळ झाली. फ्रेश होऊन येते.” असं म्हणत गौरी बाथरूममध्ये शिरली. शकू ट्रंकेतले कपडे बाजूला काढून आतला एकेक खाण्याचा डबा काढू लागली. तेवढ्यात भालाफेकीचा सराव करून परतलेली लता खोलीत शिरली. काही क्षण जमिनीवर फतकल मारून बसलेल्या त्या गावंढळ मुलीला न्याहाळत बसली. गौरी बाथरूममधून बाहेर आली. दोघींची नजरानजर झाल्यावर आपापसात हसू लागल्या. कदाचित त्या तिसऱ्या पार्टनरच्या अवताराकडे बघून. मग गौरीच म्हणाली, “ही शकू दुमडा. चारशे मीटर आणि आठशे मीटरची स्पर्धक आहे. मूर्ती लहान कीर्ती महान या लहान वयात चारशे मीटर आणि आठशे मीटरची सुवर्णपदकं कमावली आहेत.” ऐकून शकू लाजूनलाजून जांभळी झाली.

“लता लवकर कपडे बदल. जेवायची वेळ झाली आहे. पोटात कावळे ओरडताहेत.” गौरी म्हणाली. त्याबरोबर लता बाथरूममध्ये घुसली. ट्रकेतून डबा बाहेर काढत शकूनं विचारलं, “ताई, रानकळ्याचा धपाटा खाणार? माझ्या आईनं खास बांधून दिलाय.” म्हणत शकूने डब्यातला गोल आकाराचा जाडजूड धपाटा बाहेर काढला.

“अगबाई, काय ग हे?” गौरी चित्कारत बोलली. त्यावर हसत शकू बोलली, “रानकेली सुकवून, दळून त्याच्या पिठापासून केलाय, धावताना दम टिकून राहतो त्याने, मी स्पर्धेच्या दिवसात हेच खाते.”

“अगं, हे असलं खाणं सरांना दाखवलंय का? स्पर्धेआधी आपल्या चाचण्या करताना रक्तात एखादा निषिद्ध घटक किंवा उत्तेजक सापडलं तर अपात्र ठरवून स्पर्धेबाहेर काढतात. माहितैय का?” गौरी म्हणाली.

“आत्तापर्यंत झालेल्या स्पर्धांच्या आधी हेच खात आली. मला कधीभी प्रॉब्लेम आला नाय. मी मेसमध्ये जेवतच नाही. माझा स्पर्धेच्या दिवसामधला हाच आहार. दोन धपाटे आणि तोंडाला आवळ्याचं लोणचं. हे धपाटे सहा सात दिवस खराब होत नाईत. अंबरनाथला खेळायला गेल्ते तवा हेच धपाटे खाऊन पोट भरत व्हते.” शकूने उत्तर दिलं. तोपर्यंत लता फ्रेश होऊन आली. दोघींनी आपापले कपडे बदलले. संचामध्ये वापरायला दिलेली स्पोर्ट्स जॅकेट्स घातली आणि त्या दोघी जेवायला भोजनगृहाकडे वळल्या.

हे भोजनगृह फक्त महिला स्पर्धकांसाठी होते. बुफे पद्धतीचं जेवण टेबलावर मांडलं होतं. टेबलामागे एक आहारतज्ज्ञ महिला स्पर्धकांना सल्ला देत होती. खाद्यपदार्थ शरीरास आवश्यक कॅलरीजचा विचार करून बनवले होते. मंद संगीताच्या पार्श्वभूमीवर हातात प्लेट घेऊन दोघी जेवण करत होत्या. हळूहळू भोजनार्थांची गर्दी वाढत होती. बोलता बोलता गौरीचं लक्ष गेलं शकू हळूच आत आली. हातात एक स्टीलची चपटा डबा. गौरीने लताला हळूच कोपरखळी मारून लताचं लक्ष शकूकडे वेधलं. दोघी गालातल्या गालात हसल्या. शकू टेबलामागील वाढणाऱ्याशी काहीतरी बोलली. त्या डब्यात दोन तीन पदार्थ भरून घेतले आणि मागच्या मागे पसार झाली.

जेवण संपवून स्टेडियनममध्ये एक चक्कर मारून दोधी खोलीवर परतल्या तेव्हा शकू आपल्या गादीवर चादर अंथरून झोपायच्या तयारीत होती.

“काय गं धपाट्यांनी पोट भरलं नाही म्हणून जेवायला आलीस तर आमच्याबरोबर येऊन जेवायचे होते ना. डब्यात पदार्थ भरून घेऊन कुठे गेलीस?’ गौरीने विचारलं.

‘माझ्या उपाशी खंडूबाला निवेद दावला न परतले.’ निष्पाप चेहऱ्याने शकूने उत्तर दिले आणि दोघी खदाखदा हसू लागल्या. गौरीने लताकडे बघत डोक्याचा स्क्रू ढिला असल्याची खूण केली. शकू त्यांच्या चेष्टेचा विषय बनली होती. शकू म्हणाली, “ताई, मी झोपी जाते आता. उद्या पहाटेला सराव करायचाय. लवकर उठावं म्हणते.”

“उद्या कुठल्या मैदानात सराव करणार आहेस? उद्घाटनाच्या तयारीसाठी स्टेडियन बंद करणार आहेत. मंत्रीसंत्री येणार तर सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्तपण असेल. आता विसर सराव.” गौरी म्हणाली.

तोंडावर पांघरुण घेऊन शकू केव्हाच झोपेच्या आहारी गेली होती.

सकाळी सहा वाजता गौरी उठली तेव्हा शकूचा बिछाना रिकामा. वसतीगृहाच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची धूमधाम चालू होती. व्यासपीठ रात्रीच उभारून झालं होतं. लाल गालिचे, प्लास्टिकच्या खुर्त्यांची मांडणी, ध्वनियंत्रणेची उभारणी या सर्व गडबडीत कार्यकर्ते मग्न होते. ९ वाजता उद्घाटन समारंभ ठेवला होता. सर्व स्पर्धकांना आपापल्या संघाच्या जर्सी घालून, संघाचा प्रातिनिधिक झेंडा बरोबर घेऊन ध्वजसंचलन करायचे होते. मंत्रीमहोदय उद्घाटन करून संचालनाचं निरीक्षण करून संघाच्या सलामी स्वीकारणार होते.

गौरी आणि लता आपापली आन्हिकं आणि नाश्ता उरकून साडेसात वाजेपर्यंत मैदानात उतरणार होत्या. सात वाजता तयार झाल्या खऱ्या पण शकूचा कुठे पत्ताच नव्हता. शेवटी दोघी खोलीच्या दरवाजाला कुलूप लावून मेसमध्ये निघणार, तोच धाडधाड जिन्याच्या पायऱ्या चढत शकू अवतरली. डोक्यावरचे केस कंगवा फिरवून फिरवून पाठीवर लटकणाऱ्या शेपट्यांच्या पेड्यांमध्ये गच्च बांधलेले. अंगात कालचाच सरपंचाच्या नावाचा टीशर्ट आणि स्कर्ट, पायात चपला, बूट काही नव्हतं.

“काय गं कुठे गेली होतीस तू?” गौरीने विचारले. ‘सराव करायला! मैदान बंद होतं म्हणून एकलीच बाहेरच्या हमरस्त्यावर तासभर पळून आले.”

‘काय तू बाहेर एक्स्प्रेस वेवर पळून आलीस? पहाटे अंधारात पळताना भीती नाही वाटली?” गौरी म्हणाली.

“त्यात घाबरायचं ते काय? खंडूबा बरूबर असतो ना आमच्या रक्षणासाठी.” शकू म्हणाली.

“चल लवकर तयार हो. साडेसात वाजता ट्रॅकसूट घालून मैदानात परेडसाठी ये. नाश्ता केलास का?” लता काळजी करत म्हणाली.

“येताना मेसमध्ये दूध पिऊन घेतलं. आता अंगावर पाणी घेणार, स्पर्धेसाठीची कापडं घालणार अन् बरोबर टायमात येणार.” शकू म्हणाली.

गादीवरचा टॉवेल घेऊन बाथरूममध्ये घुसली.

उद्घाटनाच्या भव्य सोहळ्यानंतर मैदानी स्पर्धा सुरू झाल्या. लंबगोलाकार मैदानात चुन्याच्या फकीने आखलेल्या मार्गिकांवर प्रथम धावण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या. गौरीची आणि लताची स्पर्धा आज नसल्यामुळे मोकळा वेळ होता. स्टेडियमच्या मोकळ्या पायऱ्यांवर बसून त्या धावण्याच्या स्पर्धेच्या फेऱ्या बघू लागल्या. शंभर मीटर, दोनशे मीटरच्या पुरुष, महिलांच्या बाद फेयांनंतर उपांत्य फेऱ्या संपवून अंतिम फेरीसाठी आठ धावपटूचं चयन झालं… त्यानंतर महिलांची चारशे मीटरची स्पर्धा सुरू झाली. पहिल्या फेरीसाठी शकू आणि तिच्या बरोबरचे सात स्पर्धक आपापल्या मार्गिकांमध्ये उभे होते. पंजाब, हरियाणा, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या थोराड स्पर्धकांमध्ये शकू एकदम लहानखोर कोकरासारखी दिसत होती. पण शिट्टी वाजताच जी मुसंडी मारून हरणासारखी पळू लागली ती थोड्याच क्षणांमध्ये सर्वांना मागे सारून आघाडी घेत धावू लागली. आडदांड स्पर्धकांमध्ये ती प्रथम आली. त्यानंतर झालेल्या उपांत्य फेरीमध्येसुद्धा ४९.१ सेकंदाचा वेळ नोंदवत पहिली आली आणि अंतिम फेरीत देखील दाखल झाली. दुपारी आठशे मीटरच्या फेऱ्या झाल्या. त्यातसुद्धा शकूनं अंतिम फेरी गाठली.

प्रेक्षागृहात पायऱ्यांवर उभ्या सर्व स्थानिक प्रेक्षकांमध्ये तिचीच चर्चा होती. आपल्या मराठी मातीतील धावपटू म्हणून आरोळ्यांनी कौतुक होत होतं. पण मागे बसलेल्या एका टोळक्याकडून मात्र अस्वस्थपणे तिची हेटाळणी, तिच्या नावाने चाललेली कोल्हेकुई गौरीच्या कानावर आली. पण स्पर्धेचं वातावरण तसं असतं. संध्याकाळी थाळीफेकीच्या सरावासाठी गौरी गेली तेव्हा प्रतिकूल वातावरणात धावून प्रथम येणाऱ्या शकूचा चेहरा डोळ्यांसमोर वारंवार येऊ लागला. आणि तनमन एकाग्र करून तिने थाळी फेकली.सत्तर मीटर रेषेवर असलेला स्वयंसेवक बघत राहिला. थाळी रेषेवरून खूप पुढे जाऊन पडली होती. आजचा पहिलाच प्रयत्न. दूर उभ्या असलेल्या जोंधळे सरांनी “कीप इट गौरी,” म्हणत आवाज दिला. नंतरच्या दुसऱ्या प्रयलातसुद्धा थाळी नेहमीपेक्षा जास्त दूर गेली. हे कसं झालं? गौरीला कळलंच नाही. कदाचित शकूचा तिच्या तनामनावर जादूने प्रभाव पडला असावा. या प्रदर्शनानंतर हवेत तरंगत ती वसतीगृहात आली, तेव्हा शकू जमिनीवर बसून स्वत:च्या पोटांना उग्र वासाचे तेल चोळत बसली होती.

‘काय ग शकू, आज मैदान चांगलंच गाजवलंस तू. आता कसलं तेल चोपडत बसली आहेस पायाला?” गौरीनं विचारलं.

उत्तर मिळालं, “घोरपडी तेल हाये हे. अंग दुखीवर झकास उपाय. दुखया शिरा न् शिरा मोकळं करतं. तुम्हीपण अंगाला चोळून अनुभव घ्या की.”

“नको ग बाई, निषिद्ध औषधांच्या यादीत असलं तर महागात पडेल.”

त्यावर शकू काहीच बोलली नाही. तेवढ्यात भालाफेकीचा सराव करून लता आली. शिरताच बोलली, “शकू, आज कमाल केलीस. मला सांग तू सकाळी तासभर धावलीस, चारशे मीटर शर्यतीच्या तीन फेऱ्या धावलीस, आठशे मीटरच्या तीन फेऱ्या धावलीस, थकली नाहीस अजिबात?”

“मी बोलली होती ना रानकेळ्याचा धपाटा खाल्ला की दम टिकून रहातो म्हणून. एकदा खाऊन बघणार?” शकूनं विचारलं. दोघी फक्त हसल्या.

दोघींनी आळीपाळीने बाथरूममध्ये जाऊन स्नान केलं तोपर्यंत जेवणाची वेळ झाली. तेव्हा भोजनगृहाकडे निघाल्या. तोवर शकूनं आपलं धपाटे भोजन उरकलं होतं. भोजनकक्षात बेताची गर्दी जमली होती. आपापले ताट वाढून घेऊन दोघी बाजूला सरकल्या. मागे पाच-सहा जणींचा घोळका कोपऱ्यात उभ्याने जेवत होता. त्यातल्या दोन मुलींना तिने ओळखलं. चारशे मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या मुली. आज झालेल्या शर्यतीविषयी चर्चा चालू होती. “वो गवार चिडियां बहुत उछल रही है! उसका हाल वैसाही करना पडेगा जो मेरी डेकर का हुआ था.” असे बोलून तिघीही खुनशी हसल्या. गौरीला त्याचा अर्थ कळला नाही पण त्यांचा काहीतरी कट शिजतोय याचा अंदाज आला. दोघी जेवून बाहेर पडल्या तर वसतीगृहा बाहेरच नवले सर उभे होते. “गौरी, आज तुझा सराव खूप चांगला झाला. अशीच प्रगती उद्या केलीस तर नक्की पदक मिळेल. लता, तू भालाफेकीत अजून हवा तसा जोरदार झटका देत नाहीस,” नवले सरांनी आपले मत व्यक्त केलं. गौरी हलकेच सांगायला लागली,

“सर, तुम्हाला एक सांगू? मघाशी चारशे मीटर पळणाऱ्या काही मुली म्हणत होत्या, उद्या आपल्या शकूची अवस्था मेरी डेकरसारखी करू या. म्हणजे नेमके काय ते कळले नाही, पण शकूची काळजी वाटली म्हणून सांगितलं.” यावर नवले सर गंभीर झाले, मेरी डेकर १९८४ च्या ऑलिंपिकमध्ये तीन हजार मीटर शर्यतीत सुवणपदकाची अपेक्षित विजेती होती, पण अंतिम फेरीत एका मुलीने अलगद पाय लावून तिला पाडलं ती शर्यत हरली. कोणी घेतलं मेरी डेकरचे नाव?” नवलेंनी विचारलं “जेवताना एका ग्रुपमध्ये चर्चा चालली होती. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये असले डावपेच नेहमीच चालत असतात. शकूला सावध राहायला सांग. तुझी प्रगती अशीच चालू राहू दे.” एवढे बोलून सर निघाले. दोघीही खोलीत परतल्या तेव्हा शकू झोपायच्या तयारीत होती. “शकू, उद्या धावताना पूर्ण काळजी घे. तुझे प्रतिस्पर्धी काहीतरी घात करून तुला मागे टाकतील. जपून राहा.” गौरीने विषयाला सुरुवात केली. “ताई, आतापर्यंत रानातून अनवाणी धावताना कित्येक धोके पार करायची सवय झाली आहे. कधी लांडगा आडवा येतो, तर कधी साप सरपटत जातो. पण भीती कशाला वाटून घ्यायची? माझा खंडूबा माझ्याबरोबर असतो!” शकूने उत्तर दिलं. त्यावर लता म्हणाली, “जनावरं परवडली गं. त्यांच्यापेक्षा खतरनाक माणसाची जात असते. तुझे काही प्रतिस्पर्धी कट करतील, शर्यतीत कोंडाळं करीत तुझा रस्ता ब्लॉक करीत धावतील. तुझी ही पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा आहे. मोठ्या मुलींमध्ये पळायचा अनुभव तुला कदाचित नसावा. काळजी घे ग बाई.’ खरंच या मुलीविषयी या दोघींना काळजी वाटू लागली होती. पण शकू एकदम बिनधास्त होती.

“ताई, असं असेल तर मी उद्या अनवाणी धावेन. कुणी पायानं अडवायचं बघितलं तर अद्दल घडवेन चांगली. पुन्ना हिंमत नाही करणार.” असे बोलून ती शांतपणे झोपायला गेली.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात महिलांच्या धावण्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीने झाली. सर्वांत औत्सुक्याची शंभर मीटर शर्यत पार पडली. केरळच्या दोन मुलींनी आघाडी घेऊन पंजाब, हरियाणाच्या मुलींवर मात केली. दोनशे मीटर शर्यतसुद्धा केरळच्या मुलींनी जिंकली. कालच्या त्या हिंदी भाषिक टोळक्यामध्ये विलक्षण अस्वस्थता जाणवत होती. चारशे मीटरची अंतिम फेरी चालू झाली. लंबगोलाकार मैदानात आठ मार्गिकांवर आखलेल्या एकेका आरंभ रेषेवर आपापला डावा पाय टेकवून स्पर्धक मुली दक्ष झाल्या होत्या. सर्वांत बाहेरच्या कडेला असलेल्या मार्गिकेत अनवाणी शकू उभी होती. तिच्या आरंभ रेषेचे स्थान केंद्रबिंदूतून परिघापर्यंत आखलेल्या तिरक्या रेषेत सर्वांच्याच पुढे होतं. केरळ, पंजाब, हरियाणा, दिल्लीच्या धिप्पाड मुलींच्या तुलनेत बुटकी, पोरसवदा, सडसडीत बांध्याची अनवाणी शकू सिंहाच्या छाव्यासारखी दिसत होती. बंदूकीचा बार होताच मुलींनी धावायला सुरुवात केली. नेहमीसारखी मुसंडी मारत दोन पायांच्या ढांगांनी झपाझप अंतर तोडत शकूने आघाडी घेतली. साधारण तीसेक सेकंदात अर्ध्याहून अधिक अंतर पार करून ती सपकन वळणावर आली, समोर शंभर मीटरचा अंतिम टप्पा दिसला. तेवढ्यात उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून पुढच्या मार्गावर काहीतरी विचित्र दिसलं. मातकट रंगाच्या जमिनीवर भुरकट रंगाचा पसरट डाग तोही तिच्याच मार्गिकेवर. मेंदूने इशारा दिला, वाळूचा थर असावा, पाय घसरेल. बाजूच्या मार्गिकेवर पाय टाकला असता फाऊल झाला असता. एवढी मेहनत वाया गेली असती. वेग कमी करण्यापेक्षा पसरलेल्या वाळूचा अंदाज घेत उडी मारावी तिने क्षणभर अंदाज घेतला आणि तोल सांभाळत लांब उडी मारली. अगदी पावसाळ्यात तुडुंब वाहणाऱ्या ओढ्यावरून पलिकडचा तीर गाठण्यासाठी मारावी तशी. नशीब बलवत्तर होतं, उडी वाळूचा तेवढा भाग टाळून पलीकडे बसली. ती तशीच धावत अंतिम रेषेपर्यंत पोहोचली. विजेतेपद तर मिळालं पण उजव्या पायाचा स्नायू दुखावला होता. नवले सर धावत आले, “शकू, काय झालं? उडी का मारलीस?” विचारू लागले.

“गुर्जी, लेनमंदी वाळू टाकली होती कुणीतरी…अनवाणी धावत होते, म्हणून वाचले. बूट असते पायात तर घसरून पडलेच असते. पायाची नस दुखावली गेली आहे. त्येलानं चोळायला लागंल नाहीतर आठशे मीटर धावायला अवघड जाईल.” शकूने उत्तर देताच नवले सरांनी आरडाओरड केली, आयोजकांनी धावपट्टी तपासली. प्रेक्षागृहाच्या पायऱ्यांवरून कोणीतरी वाळू टाकली होती. शकू जागरूक असल्याने अपघात होता होता वाचल होती. एक वैद्यकीय मदतनीस स्प्रेचा कॅन घेऊन आला. शकू नवले सरांना हळूच काहीतरी बोलली आणि एका स्त्री मदतनीसाला पाठवून शकूच्या खोलीतील तेलाची बाटली मागवली. ती बाटली येताच शकू पायाच्या दुखऱ्या नसांवर तेल चोळू लागली.

अर्ध्या तासानंतर शकू आठशे मीटरच्या अंतिम फेरीच्या शर्यतीला जिद्दीने उभी राहिली तेव्हा नवले सरांना आश्चर्य वाटलं. तिने शर्यत पूर्ण करावी एवढीच अपेक्षा ठेवली होती. बंदूकीचा बार उडताच उजवा पाय झाडत शकूनं सुरुवात केली. हळूहळू वेदना लुप्त होऊ लागल्या. तिने वेग वाढवला. मैदानाची एक फेरी पूर्ण केल्यावर सर्वच स्पर्धक आतल्या एकाच मार्गिकेत धावू लागले. आता सावध रहाणं गरजेचं होतं. नजर चौफेर भिरभिरत पळणाऱ्या मुलींच्या हालचाली टिपत ती एकेकीला मागे टाकत आघाडीवर धावणाऱ्या दोघींच्या मागे तिसऱ्या स्थानावर आली. पुढल्या दोघी अजिबात पुढे जाऊ देत नव्हत्या. एकमेकांना खेटल्याप्रमाणे धावत होत्या. शर्यतीचा खूप अनुभव होता त्यांच्याकडे. शकूने उजवीकडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डाव्या अनवाणी पायाच्या बाजूला एका निळ्या बुटाच्या पायाची अचानक झालेली तिरकस हालचाल तिच्या नजरेने क्षणार्धात टिपली. अजून तीनशे मीटर अंतर पार करायचं होतं, एवढ्यात त्या बूटाच्या पायाला धडा शिकवायची वेळ आली नव्हती. तिने वेग किंचित कमी करून आपला डावा पाय चिरडला जाणार नाही याची काळजी घेतली. तशीच पळत राहिली. दुसऱ्या स्थानावरची मुलगी कधीतरी आघाडीवरच्या मुलीला मागे टाकायचा प्रयत्न करेल, त्या क्षणाची वाट पाहत धावत राहिली. पुन्हा तेच सपक वळण आलं. उरला होता शंभर मीटरचा टप्पा. ती शांतपणे भिरभिरत्या नजरेने अंदाज घेऊ लागली, आणि तो क्षण आला, दुसऱ्या स्थानावरच्या मुलीने डावीकडे पूर्ण लक्ष ठेवत मुसंडी मारली. नेमक्या त्याच संधीचा फायदा घेत उजवीकडून शकूने उसळी घेतली पण डावीकडून निळ्या बूटाची रिकस हालचाल, क्षणात शकूने आपल्या डाव्या पायाचा अंगठा बूटाच्या वरच्या भागात फिरवला. अंगठ्याचे टोकदार नख बूटावरच्या पायमोज्यातून आत पोटरीला टोचताच बूट अद्दल घडल्यासारखा बाजूला झाला. शकूने दोघींना पिछाडीला टाकलं, ते सरळ अंतिम रेषेपर्यंत. नवले सर धावतच अभिनंदन करण्यासाठी सरसावले. सगळ्या शर्यती संपल्यानंतर पोडियमवर दोनदा चढून शकूने दोन सुवर्णपदके गळ्यात घालून घेतली.

संध्याकाळी आपलं सामान ट्रंकेत भरून ती वसतीगृहातून निघाली. तोपर्यंत गौरीसुद्धा अनपेक्षित रौप्य पदकाची कमाई करून परतत होती. “शकू, आजचा दिवस विसरूच शकणार नाही. मी तुझ्याकडून स्फूर्ती घेऊन चांगली कामगिरी करीत रौप्य पदकाची कमाई केली. तुलासुद्धा प्रतिकूल परिस्थितीत दोन सुवर्णपदकं मिळाली. खंडूबानं आजच्या दोन्ही शर्यतीत नक्कीच पाठराखण केली तुझी.’ गौरी म्हणाली.

“पाठीराखण करायला खंडूबा कुठून येणार त्याला आत घेऊन यायची परवानगीच नव्हती.” शकूच्या त्या उत्तराने गौरी चक्रावली. “म्हणजे खंडूबा कोण आहे?’

“खंडूबा माझ्या जिवाभावाच्या कुत्र्याचं नाव आहे. नववीत असल्यापासून माझ्याबरोबर सोबतीला यायचा. शाळा संपेस्तोवर बाहीर बसून राहायचा. रानावनातून फिरताना एवढा चपळ आणि ढालगत असतो, लांडगे, साप, अस्वलं सारे घाबरतात त्याला. माझा एवढा लळा हाय त्याला की इकडे यायला निघाली तवा सोडेनाच मला. संगतीला घेऊन आले त्याला.” शकू म्हणाली.

“अगं मग ठेवलास कुठे त्याला?” गौरीने विचारलं.

“बाहिर हायवेवर एक चहाची टपरी हाय आमच्या एका गाववाल्याची. त्या टपरीत बशिवला त्याला. परवा तुम्ही विचारलं डबा भरून कुठं नेलास. त्याच्यासाठी टपरीत घेऊन गेल्ती. चपाती आणि मटण खिलवलं, मग शांत झोपला. त्येची समज माणसावानी हाये. काल पहाटे मी सरावाला गेली, तवा माझ्या बरुबरीनं धावला. मला कसलंच भ्या वाटत नाही त्यामुळे.” गौरीची उत्सुकता शिगेला पोहोचली. “मला दाखवशील तुझा खंडोबा?” गौरीने विचारलं, तसं शकू खूप खूष झाली, दोघी बालेवाडीच्या स्टेडियमबाहेर आल्या. बाहेरच एका टपरीजवळ शकूचे खेडवळ वेशातले वडील आणि एक भुरकट रंगाचा लांबरुंद शरीरयष्टीचा कुत्रा उभा होता. शकूला बघताच ते धूड धावत आलं आणि तिच्या अंगाभोवती आनंदानं नाचू लागलं. “खंडू, हे बघ, दोन पदकं मिळाली.” म्हणत तिने गळ्यातील पदकं दाखवताच त्या प्राण्याने मागच्या दोन पायांवर उभा राहून पुढच्या दोन पायांनी पदकं पकडत शेपूट हलवत खुशी प्रकट केली. शकूच्या वडिलांनी शकूच्या डोक्यावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडली. गौरी हे दृश्य पाहून थक्क झाली. शकूने मग वडिलांशी ओळख करून दिली. “मुळशीत आमच्या वाडीला येऊन जा.’ वडिलांनी प्रेमाचं आमंत्रण दिलं. “शकू, तुम्ही खंडोबाला घेऊन इथे कसे आलात?” गौरीने विचारलं. “ते काय आहे बाळा, मुळशी स्वारगेट एस.टी.ला नानूतात्याचा गणप्या ड्रायव्हर व्हता. त्येनं केबिनमध्ये खंडूबाला बसवून आणलं. आता जाताना बी सातच्या एस.टी.ला गणप्याच हाये. तो परत घेऊन जाणार. मग मुळशी स्टँडवर सारे गाववाले बैलगाड्या घेऊन येणार आहेत. पोरीची मिरवणूक काढणार आहेत. मेडल मिळाले म्हणून कळवलं त्येना. गावाचं नाव रोषन केलं शकूने.’ वडिलांनी उत्तर दिलं. गौरीला शकूचं कौतुक वाटलं आणि हेवाही. असं पुया गावाकडून होणारं कौतुक आपल्या शहरात सोलापूरला कधीच होणार नाही याची खंत वाटली…. आयुष्यात पहिल्यांदाच आपण शहरात वाढलो, मोठे झालो, याचे दु:ख झालं.

— शि. भा. नाडकर्णी
ए १०१, रेसिडेन्सी, विश्वेश्वर रस्ता,
गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०० ०३६

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..