नवीन लेखन...

कादंबरी ते नाटककार एक प्रवास

ठाणे रंगयात्रामधील प्रा. प्रदीप ढवळ यांचा लेख.


ईश्वर प्रेरणेने आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडत असतात. ‘नरेंद्र ते विवेकानंद – एक झंझावात’ हे चरित्र म्हणजे माझ्या आयुष्यातील योगायोग म्हणावा लागेल, किंबहुना हा दैवी चमत्कारच ठरला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. विवेकानंदांचे चरित्र वाचता वाचता सांगत गेलो, सांगता सांगता लिहीत गेलो. ते लोकांना आवडेल, त्यांनी उचलून धरले. हे कसे घडले? या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहीत.

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना त्यांच्या फलटणच्या घरी जाऊन भेटलो. स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर खूप बोललो. माझे बोलणे त्यांना आवडले, म्हणाले, ‘प्रदीप बोलण्याच्या ओघात आणि कार्यक्रमांच्या मालिकेमुळे माझ्याकडून खूप काही लिहिण्याचे राहून गेले. पण तू असं करू नकोस.’ त्यातूनच या कादंबरीचा जन्म झाला. कादंबरी लोकांना आवडली. तिच्या चार आवृत्त्या निघाल्या. पण हे करत असताना नाट्यलेखनाकडे कसा वळलो हेदेखील इथे मला सांगावेसे वाटते.

कणकवलीला अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होते. यानिमित्त अशोक समेळ माझ्या कणकवलीच्या घरी आला होता.  मी अशोकला म्हणालो,  ‘तू अनेक नाटके लिहिलीस. कादंबरीवरून नाटक लिहिणारे कमी नाटककार आहेत. तू माझी कादंबरी घे आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आपण एक सुंदर नाटक करू या.’  त्यावर अशोक म्हणाला, ‘माझा विवेकानंदांविषयी अभ्यास नाही.’ खूप वेळ विचार केला, पण काही कारणांमुळे विवेकानंदांच्या साहित्याकडे मी ओढला गेलो नाही.  पण तू मला नाटक लिहिण्यासाठी मदत केलीस तर हे शिवधनुष्य मला नक्की पेलेल.’  अशोकने शब्द दिला.  पुढे तो माझ्या  व्याख्यानासाठी उल्हासनगरला आला.  मी प्रेक्षकांसमोर अखंड विवेकानंद उभे केले.  शेवट तर इतका प्रभावी झाला की, अशोक प्रेक्षकांमधून डोळे पुसत माझ्याकडे आला व माझ्या हातातला माईक घेऊन प्रेक्षकांना साक्षी ठेवत म्हणाला, ‘प्रदीप, आपण काही दिवसांतच विवेकानंद रंगभूमीवर आणायचे!’

माझ्या व्याख्यानामुळे अशोक समेळला नाटक सापडले होते. त्या कादंबरीचा आधार घेत नाटक उभे राहिले.  जवळजवळ 35 जणांच्या समूहासकट नाटक अवघ्या 15 दिवसांत उभे राहिले.

संग्राम समेळ हा केळकर कॉलेजात मास मीडियाच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा मुलगा विवेकानंदांच्या भूमिकेसाठी मला खूप भावला. आपल्याला स्वामी विवेकानंद साकारायचे आहेत म्हणून त्याने ध्यास घेतला. काही दिवस तर त्याने मांसाहारसुद्धा सोडला.  इतका तो स्वामी विवेकानंदांच्या भूमिकेशी एकरूप झाला होता. प्रश्न होता रामकृष्ण परमहंस कोण होणार? कोणताही विचार न करता मी अशोकला म्हणालो, ‘अरे कोण होणार काय? यासाठी एकच नाव माझ्यासमोर येत आहे ते म्हणजे आमदार संजय केळकर.’ अशोक म्हणाला, ‘अरे तो तर नेता आहे, अभिनेता कसा होईल? वेळ देईल का?’ अशोकला म्हटलं, ‘चल, त्यांनाच जाऊन विचारू या.’

अगदी हुबेहूब रामकृष्णांसारखा दिसणारा आमचा मित्र संजय केळकर आपल्याला नकार देणार नाही, याची खात्री होती. त्यांना भेटताच कुठेही वेळ न घालवता त्यांनी लगेच होकार दिला. हा हा म्हणता नाटक रंगभूमीवर उभे राहिले. गीतकार अशोक बागवे, संगीतकार डॉ. विद्याधर ओक, नेपथ्य राजन भिसे, गणेश भावसार, प्रकाशयोजना राघू  बंगेरा, दिग्दर्शक व नाट्यसंवाद अशोक समेळ ही सगळी मंडळी माझ्या आयुष्यात आली.  माझ्या दोन्ही मुली डॉ. नमिता व प्रांजली यांनीही आपण या नाटकात योगदान देण्याचे मान्य केले. समेळ वहिनी, आकाश राऊत, सतीश आगाशे, प्रा. हर्षला लिखिते ही सगळी मंडळी माझ्या मागे उभी राहिली आणि ‘संन्यस्त ज्वालामुखी’ हे नाटक साकार झाले. मग, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, इंदोर असा झंझावात सुरू झाला. 26 नोव्हेंबर 2008 साली एकच नव्हे तर 10 अतिरेक्यांनी मुंबईवर जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याला उत्तर म्हणून या नाटकाचे 40 तासांत सलग 11 प्रयोग करून या नाटकाने जागतिक विक्रम केला. केवळ गिनिज बुकात नोंद व्हावी म्हणून हा आमचा प्रयत्न नव्हता, तर त्या अतिरेक्यांना प्रत्युत्तर म्हणून  विवेकानंदांच्या विचाराने आणि भारतीय सभ्यतेने एक चांगली शिकवण दिली पाहिजे, हा संकल्प आम्ही सोडला व प्रचंड चिकाटीने ते सगळे प्रयोग पूर्ण केले.  मला स्वत:ला नाटकामुळे प्रचंड प्रेरणा मिळाली. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, शं. ना. नवरे, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, जयंत पवार, संजय डहाळे, रवींद्र पाथरे, कमलाकर नाडकर्णी या सर्व ज्येष्ठ मंडळींकडून आशीर्वाद मिळाला.

या अनुभवातून मी नाटकाकडे वळलो. ‘शिवबा’ हे शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 80 कलावंतांचं नाटक, ‘द्वंद्व’ हे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील नाटक, ‘बँक ऑफ बालपण’ हे बालनाट्य मी लिहू शकलो.  थोड्याफार प्रमाणात का होईना, नाटक हा विषय मीसुद्धा हाताळू शकलो हा विश्वास मनात निर्माण झाला. ही सगळीच नाटकं लोकांना आवडली. कोकण कला अकादमी व प्रेरणा कलासंस्था या संस्थांमार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही नाटके मला सादर करण्याचा सन्मान मिळाला.

नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर माझ्या प्रेमातच पडले. ते म्हणाले,  ‘यापुढे मी तुझ्याबरोबर ‘शिवबा’ या महानाट्याच्या प्रयोगाच्या वेळी महाराष्ट्रात कुठेही नाटक असले तरी येणारच व मध्यंतरानंतर लोकांबरोबर संवाद साधणार.’ गोवा राज्याने ‘शिवबा’ या नाटकाचे 25 प्रयोग घेतले, तेव्हा ठाण्यात 84वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरले होते. मला साहित्यभूषण पुरस्कार मिळणार होता.  मात्र तो दुर्दैवी दिवस होता. माझा सत्कार झाल्यावर पणशीकर व मी गोव्याला निघणार होतो. पण नियतीला ते काही मान्य नव्हते.  पणशीकरांचा नाट्यप्रवास संपला होता व त्यांनी आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली होती. तो क्षण माझ्यासारख्या नवोदित नाट्यलेखकाला फारच धक्का देणारा होता.  माझ्या पत्नीने काही दिवसांपूर्वी पणशीकर पति-पत्नीला आमच्या घरी बोलावून पाद्यपूजन केले होते.  त्यावेळी नटश्रेष्ठ पणशीकर म्हणाले होते, ‘प्रेरणा, या पुढचा माझा सगळा प्रवास आता मी प्रदीपबरोबर करणार!’

‘शिवबा’ या नाटकानेसुद्धा मला खूप मोठे केले. मी नाटक लिहू शकलो तेदेखील ऐतिहासिक. हे प्रमाणपत्र मिळाले ते इतिहासतज्ञ प. पू. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून. त्यांनी तर ‘शिवबा’ हे नाटक तीनवेळा पाहिले. या नाटकाचे दिग्दर्शन केले प्रा. मंदार टिल्लू याने.

पुढे माझ्या हातून ‘द्वंद्व’ हे नाटक लिहिले गेले. या नाटकाचे सलग 13 प्रयोग करून मी माझाच रेकॉर्ड मोडला. या नाटकाचे दिग्दर्शन केले ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व अभिनेते राजन शंकर बने यांनी. पण इथेही सामाजिक भान होते. या नाटकातून डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथे उभारल्या जाणाऱ्या हॉस्पिटलला आपल्याकडून काही तरी मदत व्हावी यासाठी ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात प्रयोग सादर झाले. ठाणेकरांनी यासाठी उदंड प्रतिसाद दिला. अनेकांचे हात पुढे आले. पहिल्याच प्रयोगाला डॉ. विकास आमटे, डॉ. मंदा आमटे, डॉ. तात्या लहाने व नाट्यक्षेत्रातील खूप मोठी मंडळी उपस्थित होती.  माझे ज्येष्ठ मित्र व ठाण्याचे पालकमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदेसाहेब, उदय निरगुडकर, आमदार संजय केळकर ही मंडळी माझ्या मागे उभी होतीच, पण अनेक शाळा, कॉलेज यांनीही यात सहभाग घेतला होता. प्रयोग झाले. त्या प्रयोगातून 15,55,555 रुपयांचा निधी डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्रकल्पाला देण्याचे भाग्य मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना लाभले. मला जन्मात कधी वाटले नव्हते की मी नाटककार होऊ शकेन. पण हे भाग्य लाभले ते ठाणेकरांमुळे. त्यांनीच मला प्रेरणा दिली. मराठी रंगभूमी समृद्ध आहे, तिची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे हेच माझे भाग्य समजतो. हे सगळे करण्याचे सामर्थ्य मिळाले ते माझ्या वडिलांकडून. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून इथेच थांबतो…

प्रा. प्रदीप ढवळ – 9322680113

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..