नवीन लेखन...

जोशीबुवा मासिकवाले

मी पत्र्या मारुती चौकातून लोखंडे तालमीकडे चाललो होतो, तेवढ्यात एक सडपातळ व्यक्ती समोरुन येताना दिसली. गेल्या बेचाळीस वर्षांत त्या व्यक्तीमध्ये काहीही बदल झालेला मला जाणवला नाही. होय, असंही घडू शकतं. तोच तो मागे वळवलेल्या केसांचा भांग, भव्य कपाळ, बटाटे डोळे, दाढी न केल्याने वाढलेली गालावरील खुंटं, अंगात सदरा, खाली पांढरा पायजमा व पायात चपला अशा वेशभूषेत उजव्या हातात खांद्यावरुन पाठीवर धरलेली मोठी कापडी पिशवी. तेव्हापासून आजपर्यंत त्या पिशवीत काय नवीन पहायला मिळेल? ही उत्सुकता मला कायमच राहिलेली आहे.
रमेश अभिनव कला महाविद्यालयात होता. तेव्हाच जोशींची ओळख झाली. जोशी काॅलेजमधील विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना चित्रकलेवरची हवी ती परदेशी पुस्तके, मासिकं पुरवीत असत. कमर्शियल व पेंटींग या दोन्ही विषयांचा त्यांचा अभ्यास होता, कारण ते देखील अभिनवमध्येच शिकलेले होते. शिकून झाल्यावर नोकरी किंवा दुसरा व्यवसाय न करता त्यांनी पुस्तक विक्रीचाच व्यवसाय निवडला होता.
रमेशचा वर्गमित्र आनंद बोंद्रे हा जोशींचा जास्त परिचयाचा. आम्ही आनंद बोंद्रेकडे गेल्यावर तिथं जोशीबुवा सायकलवरुन आलेले असायचेच. त्यामुळे त्यांची हमखास तिथे भेट होत असे. त्यावेळी वाॅल्टर टी फोस्टर या परदेशी प्रकाशनची चित्रकलेवरील अनेक विषयांवरची पुस्तकं मिळत असत. आम्ही त्यातील काही पुस्तकं जोशींकडून विकत घेतली. एरवी ही पुस्तकं घेण्यासाठी कॅम्पमधील ‘मॅनीज’ नावाच्या पुस्तकांच्या मोठ्या दुकानात जावं लागायचं.
जोशींनी पुस्तकं व मासिकांबरोबरच इंग्रजी मासिकातील कथाचित्रं (इलेस्ट्रेशन्स) विकायला सुरुवात केली. आम्ही फर्ग्युसन काॅलेज रोडला जाऊन त्या दोन कथाचित्रांसाठी वीस रुपये खर्च करायचो तीच दोन चित्रे आम्हाला जोशींकडून दहा रुपयांत घरपोच मिळू लागली. अशी अनेक चित्र आम्ही जोशींकडून खरेदी केली.
त्याकाळी रिडर्स डायजेस्ट सारखेच बुक डायजेस्ट नावाचे अमेरिकन मासिक मिळायचे. त्यांचे अनेक अंक आम्ही संग्रही जमा केले. नॅशनल जिआॅग्राफी हे मासिक वन्यजीवनाला वाहिलेले होते. त्यातील फोटोंसाठी जोशींकडून खूप अंक जमवले. कोणतंही नवीन पुस्तक, मासिक आलं की जोशी आॅफिसमध्ये घेऊन दाखवायचे. फोटोग्राफी विषयावरील अनेक मासिकं, पुस्तकं त्यांच्याकडून खरेदी केली.
जोशी ही एक अवलिया व्यक्ती आहे. ते ब्रह्मचारी राहिले. आई, वडील आणि ते असे तिघेजण संजीवन हाॅस्पिटलच्या पुढे असणाऱ्या एका मोठ्या तीन मजली चाळीत रहात होते. एके रविवारी आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो. चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत त्यांचा चित्रसंसार मांडलेला होता. त्यांनी त्यांच्याकडील मासिकांची, चित्रांची एकेक गाठोडी सोडली. आम्ही ती नजरेखालून घालत होतो. सलग चार पाच तास सगळं काही पहाताना आम्ही थकून गेलो. मात्र जोशींनी एवढं जमवून ठेवलं होतं की ते सर्व पहाणं एका दिवसात तर शक्यच नव्हतं. संध्याकाळी आम्ही त्यातील निवडक चित्रं घेऊन घरी परतलो.
जोशींचा आवाज हा चिरका होता. बोलताना ते हसत हसत बोलायचे. हसले की त्यांच्या गालावर एक नाही, अनेक खळ्या पडायच्या. त्यांनी गप्पा मारताना अशा काही गोष्टी सांगितल्या की, त्या ऐकून आम्ही चकीत झालो. ते सांगायचे, ‘शबाना आझमी माझी खास मैत्रीण आहे. मी तिला ‘शब्बो’ म्हणायचो.’ असं त्यांनी अनेक सेलेब्रिटींबद्दल सांगितले.
मध्यंतरी ते काही महिने दिसले नाहीत. आम्ही आनंदाकडे त्यांची चौकशी केली, तेव्हा समजलं की त्यांना कित्येक वर्षापासून मुतखड्याचा त्रास आहे. उपचारानंतर सहा सात महिन्यांनी ते पुन्हा हिंडूफिरु लागले. मात्र आता त्यांची सायकल सुटलेली होती. जेव्हाही दिसले, पायीच फिरत होते. दरम्यान त्यांचे वडील मागेच गेले होते आता आईही देवाघरी गेली. आता जोशी एकटे पडले होते. ते रहात असलेली चाळ पाडून तिथे मोठी बिल्डींग उभी राहिली. प्रत्येक भाडेकरुप्रमाणे जोशींना देखील नवीन फ्लॅट मिळाला. पुन्हा एकदा ब्रह्मघाऱ्याचा संसार सुरू झाला.
२००० सालापासून डिजीटल तंत्रज्ञान आले. इंटरनेटमुळे पाहिजे तो संदर्भ सेकंदात मिळू लागला. जगातील कोणत्याही चित्रकाराची माहिती, चित्रं सहज उपलब्ध होऊ लागली, डाऊनलोड करता येऊ लागली. परिणामी जोशी बुवांचा व्यवसाय कालबाह्य झाला.
अलिकडच्या कमर्शियल, फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांना पूर्वीसारखी परदेशी पुस्तकांची, रेफरन्सची गरज राहिलेली नाही. त्यांना त्यांच्या मोबाईलवरच अगाध ज्ञान मिळते आहे. त्यामुळे जोशीबुवा आता चरितार्थ कसा चालवतात हा मोठा प्रश्नच आहे.
‘जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती l’ असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे… तसंच गेल्या चाळीस वर्षांपासून एखाद्या ‘दीपस्तंभ’प्रमाणे असंख्य भावी ‘चित्रकारांच्या कल्याणा, जोशीबुवा सांगाती’ असंच त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल म्हणता येईल….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१७-८-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..