नवीन लेखन...

जेवण संस्कृती पाटपंगत – डायनिंग टेबल ते…….कुठेही.

आमच्या लहानपणी ,
“मुकाट्याने जेव बरं, आणि नंतर काय ती बडबड कर…. “
हे वाक्य जेवताना कमीतकमी एकदा तरी आईच्या तोंडातून यायचंच. म्हणजे जेवायला आम्ही सगळे एकत्र पाटावर बसायचो, पण आजच्यासारखं गप्पा मारत, हास्य विनोद करत जेवण होत नसे. बोलत बसलं की, तेव्हढ अन्न कमी जातं पोटात, ही आयांची धारणा होती. त्यामुळे मोजकच , जरुरीपुरतं बोलायचं आणि व्यवस्थित पोटभर जेवायचं. माझ्या डोक्यात काही ना काही सुरू असायचं, आणि मला खूप काही सांगायचं विचारायचं असायचं. पण जरा बोलणं वाढलं, की आईचा आवाज यायचा,
“आधी मुकाट्याने जेव बरं”.
आपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या. त्यात सणवार असला की गोडाधोडाचं, म्हणजे आणखी काम वाढायचं. वेळेवर स्वयंपाक करण्याच्या गडबडीत, त्यांच्या पोटात काही गेलेलं असायचं नसायचं. कोण चौकशी करणार ? (जुना काळ ) त्यांनाही भूक लागलेली असायची. पुरुषमंडळींची पंगत उठल्यावर यांची पंगत बसणार. बरं, पुरुषमंडळी काय, जेवून झालं की अब्ब! ढेकर देऊन, दिवाणखान्यात पाय पसरून बसायची किंवा जरा आडवी व्हायची. स्त्रियांचं जेवून झालं, आवराआवर, झाकपाक करून जरा पाय लांब करेपर्यंत पुरुषमंडळीची, डुलकी झालेली असायची, की चहाचं आधन चुलीवर(सॉरी गॅसवर) ठेवावं लागायचं.
“चहा तूच घे रे करून, आणि माझाही करून ठेव. फार दमायला झालंय आज, मी पडते जरा”,
हे ऐकण्याचे दिवस आलेले नव्हते. अर्थात हे किती चुकीचं आणि किती बरोबर(म्हणजे पुरुषांनी काहीही न करणं म्हणतोय, गैरसमज व्हायचा उगीच.)हा एक मुद्दा होताच. तर सांगत काय होतो, की मु.जे.ब. यामागे एवढं सगळं वास्तव होतं.
हे मु.जे.ब. पुढच्या आणि आजच्या काळात कुठच्या कुठे वाहून गेलं. एकत्र जेवायला बसण्याची प्रथा, पाटावरून उंचावर, म्हणजे डायनिंग टेबलवर आली खरी, फक्त त्यामधला मुकाट्याने हा शब्द जाऊन ग.गो. म्हणजे गप्पा गोष्टी हा शब्द प्रवेशला. हळुहळु पुरुष मंडळींच्या
पंगतीनंतर , त्यांना मनापासून वाढून त्यानंतर जेवणारी स्त्री मंडळी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसू लागली, अन्नाची भांडी टेबलावरच घेऊन, आपल्याला जे हवंय ते प्रत्येकजण वाढून घेऊ लागला. गप्पा गोष्टी मज्जा करत जेवणं तास तासभर चालू लागली. अर्थात जेवणानंतरची स्त्रियांना करावी लागणारी आवराआवर मात्र कमी झाली नाही, फरक इतकाच पडला, की सारखं ओणवं होऊन, वाकून वाढण्याची आणि सगळी भांडी उचलण्याची, जमीन पुसून घेण्याची कंबरमोड कसरत मात्र कमी झाली. आवरणं वरच्यावर होऊ लागलं . इथपर्यंत सगळं ठीक होतं. पुढे मात्र टेलिव्हिजन नावाच्या इडियट बॉक्सने आणि त्यानंतर मोबाईल नावाच्या गॅजेटने संपूर्ण कौटुंबिक आनंदाची वाट लावून टाकली. पाट संस्कृतीचे अवशेष क्वचितच कुठे दिसत होते, परंतु कुटुंबातल्या सगळ्यांनी सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं किंवा रात्रीचं जेवण तरी एकत्र बसून गप्पा मारत करण्याची डायनिंग टेबल संस्कृती सुद्धा आज अज्ञातवासी झालीय. एक तर घरं विभक्त झाली त्यामुळे घरातली मोठ्ठी टेबलं लहान आणि घडीची झाली, दोन किंवा चार माणसं बसू शकतील एवढी. पण ती सुद्धा एका वेळी उपस्थित असतील तर बसणार ना ! या टेबलांवर जेवणाव्यातिरिक्त अनेक गोष्टी ठेवलेल्या असतात. सकाळचा ब्रेकफास्ट टीव्हीच्या बातम्या पहात, अथवा आपल्या बेडरूममध्ये, किंवा नजर लॅपटॉपवर ठेवून किंवा उभ्याउभ्याच केला जातो, तो ही “उशीर झालाय, मी पळतो” म्हणत अर्धा डिशमध्येच उरतो.
जेवणाची तर वेगळीच गंमत असते. घरातलं लहानसं डायनिंग टेबल आणि खुर्च्या बिचाऱ्या कुणी जेवायला येईल आपल्याजवळ म्हणून आतुरतेने वाट पहात असतात. पण कुणीही येत नाही, जेवणाचं ताट मांडीवर घेऊन टिव्हीवर नजर खिळवून, कानाला लावलेल्या मोबाईलवर बोलत आणि मधूनच एक घास घेत, तर कुणी आई, जमिनीवर फतकल मारून लहानग्यांना कार्टून फिल्म मध्ये गुंतवून घास कोंबत तर कुणी डाव्या हाताने चॅटिंग करत उजव्या हाताने जेवत असतात. आपण काय खातोय, किती खातोय, कुणाला किती भरवतोय याचं कुणालाच भान नसतं. ताटात काही आहे नाही , काही हवंय नकोय याचीही शुद्ध नसते. घरातली कर्ती स्त्री सगळ्यांना सांगून सांगून कंटाळलेली असते, त्यामुळे तिनेही सांगणं सोडून दिलेलं असतं. अनेकदा स्वयंपाक करताना तिला कुणा मैत्रिणीचा किंवा माहेरचा फोन येतो आणि ती त्यामध्ये एव्हढी गुंगून जाते की शूऽऽऽशूऽऽ करणाऱ्या कूकरच्या शिट्ट्या, जळणारी फोडणी, तापून उकळी आलेलं दूध आणि टीव्ही चा आवाज यामध्ये तिला काहीही ऐकू येत नाही. वैतागत गॅस बंद करून, आणि दुसऱ्या खोलीत जाऊन ती आनंदाने फोनवर बोलू लागते.
पाट संस्कृतीमध्ये मु.जे. ब. असलं, तरी सगळे एकत्र बसलेले असायचे, जेवायला सुरवात करण्यापूर्वी हात जोडून श्लोक म्हणायचे, मगच पाहिलं घास घ्यायचा. थोडंफार तरी बोलणं व्हायचं. पानातल्या पदार्थांचं कौतुक होत होतं, त्यात काय कमी जास्त झालंय, ते चव घेऊन सांगितलं जात होतं. श्रमून, कुटुंबातल्या गृहिणीने रांधलेल्या स्वयंपाकाचं सार्थक झाल्याचं तिला जाणवायचं. पुढे अगदी डायनिंग टेबल संस्कृतीत सुद्धा जेवताना,
“हा पदार्थ खूप दिवसांनी झाला नाही ?” किंवा
“हल्ली तो तमुक पदार्थ तू करतच नाहीस”, किंवा
“तुझ्या हाताच्या त्या पदार्थाची सर कश्शा कश्शाला नाही”.
“आज हे अगदी चविष्ट झालंय, कणभर मीठ हवं होतं का ग?”
अशा पोट भरून मनापासून प्रशंसा, कौतुक होत होती. आता कुणी म्हणोत बापडे, की भोळ्या बायकोला हरभऱ्याच्या झाडावर चढवून आपल्याला हवंय ते मिळवायचं (खाण्याचं).
बायको आणि भोळी? जुळतं तरी का हे ? उगाच आपलं, काही लोकांना ना……. जाऊदे.
तर मुद्दा काय, की खरच आज हा आनंद संपत चाललाय का ? घरातल्या अस्सल चवीच्या जेवण खाण्याच्या पदार्थांपासून आपण दुरावत जातोय आणि घरगुती पदार्थांचे माहेरघर अशा होणाऱ्या जाहिरातींकडे आकृष्ट होतोय का ? हॉटेल संस्कृतीला नको इतकं स्थान आपल्या आयुष्यात आणि पोटात दिलं जातंय का ? त्या चवीना आपलसं करत आणि घरातल्या पारंपरिक चवीच्या पदार्थाना नाकं मुरडत, वाढदिवसाला होणारं औक्षण, मुद्दाम बनवलेलं गोडधोड , सगळ्यांनी एकत्र बसून, कौतुकासह झडणारी मेजवानी या आनंदाला पारखे होत हॉटेलमध्ये जन्मदिवस साजरे करतोय, यथेच्च हादडून आणि भरमसाठ बील भागवून, जराही तृप्त न होता, पोटाचे आजार मात्र लावून घेतोय का ? काय बरोबर काय चूक, योग्य काय अयोग्य काय, याचा विचार करायलाही वेळ मिळत नाहीय, इतके आपण पळत सुटलोय.
आजच्या बुफे च्या या काळात त्या पंगतींची, पदार्थांची आठवण येते आणि खूप वाटतं, त्या लोपलेल्या संस्कृती पुन्हा याव्यात……. पण प्रत्यक्षात घडत मात्र काहीच नाही.
मग जुन्या आठवणी काढत भूतकाळात रमत राहायचं, इतकंच हाती उरतं.
प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..