काव्यदीप च्या एका जुन्या अंकात सुप्रसिद्ध निवेदक आणि संवादक सुधीर गाडगीळ यांनी लिहिलेला हा लेख…
गदिमा ते ग्रेस, आणि मंगेश पाडगावकर ते महानोर बहुतांशी मराठीतल्या सर्व कवींशी भेट होण्याचं भाग्य मला लाभलं. आणि काहींशी मनमुराद गप्पा करण्याचा आनंद मिळाला. मनमोहन नातू ते चंद्रशेखर गोखले- संदीप खरे अशा तीन पिढ्यांमधल्या कवींना रंगमंचावरून बोलक करण्याची संधी मिळाली.
माझ्या व्यावसायिक निवदेनाच्या कारकीर्दीची सुरुवातच मूळात ग.दि. माडगूळकरांसारख्या श्रेष्ठ कविवर्य गीतकाराच्या शब्दांच्या साथीनं झाली. कार्यक्रम होता ‘चैत्रबन’. श्रीधर माडगूळकरच्या दोस्तीमुळे, अण्णांच्या ‘पंचवटीत’ त्यांना थेट भेटण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच भेटीत अण्णांनी मला एक प्रवासवर्णनपर पुस्तक भेट दिलं. खुद्द अण्णांशी बोलून, त्यांचे लेखनिक बाळ बापट, तसेच सुधीर मोघे, बाबूजी, श्रीधर यांच्याशी गप्पा करता करता, गदिमांच्या गाण्यांमागच्या कहाण्या कळल्या आणि त्या कहाण्या संपादीत करत मी गदिमांच्या चित्रपटगीतांचं निवेदन केलं आणि टाळी मिळवली. पु. ल. देशपांड्यांच्या वाणी आणि लेखणीतून खरेखुरे कविवर्य ग. दि. माडगूळकर सोप्या शब्दात मनात रुजत गेले.
कुंडल, माडगूळ, किर्लोस्करवाडी अशा सारख्या ग्रामीण भागात माडगूळकरांचं बरचंस बालपण गेलेलं. साहजिकच पारावर बसून गप्पा मारण्याची त्यांना विलक्षण हौस. या पारावरच्या गप्पाष्टक करणाऱ्यांचं एक वैशिष्ट्य असतं. एखाद्या प्रसंगाचं चित्र आपल्या शब्दातून ही मंडळी नेमकं उभं करतात. आता हीच एक कविता बघा….
गवत उंच दाट दाट
वळत जाय पाय वाट
वळणावर अंब्याचे, झाड एक वाकडे
त्या तिथे, पलिकडे, तिकडे,
माझिया प्रियेचे झोपडे… “
गदिमांची अशी अनेक गीत, त्यांच्या निर्मिती मागच्या कहाण्यांसकट पाठ होत गेली. साहित्य परिषदेच्या सभागृहात, पारखे परिवारात, आमदार निवासात, वऱ्हाड – वाजंत्री चित्रपटाच्या पार्टीत अशा विविध ठिकाणी गदिमांची भेट घडली. पार्टीत अण्णा अधिक अनौपचारीकपणे खुलले होते. नकला केल्या होत्या.
कोल्हापूरात मंगळवार पेठेतील लता मंगेशकरांचा घडलेला ‘शेजार’ पासून साऱ्या आठवणी सांगत चित्रपटाला स्वत:चा उमेदवारी काळ त्यांनी कथन केला होता. पु. भा. भावे. ते यशवंतराव चव्हाण अनेक स्नेहीजनांची व्यक्तिचित्र त्यांनी अनेक मैफलीत गप्पातून उभी केली होती. त्यांच्या तुलनेत सर्वाथान लहान असूनही केवळ पत्रकारितेच्या पाठबळावर या मैफलींना हजेरी लावायला मिळाल्याने ही व्यक्तिचित्र खुद्द अण्णांच्या तोंडून ऐकण्याचं भाग्य लाभले.
हिरव्या, जांभळ्या किंवा मरून रंगातल्या काठपदराच्या पांढऱ्या कॉटन साडीचा पदर डोईवरून घेऊन, उजव्या हातानं सरसावत, चष्म्याआडचे डोळे ‘अचंबायुक्त’ मोठे करीत, झक्कपैकी मांडी घालून बसलेल्या शांताबाई शेळके. स्वतःच्या रेखीव अक्षरातलं टिपण समोर ठेवलेलं. बाजुला कुठला न कुठलं पुस्तक. आचार्य अत्रे, लतादीदी यांच्यावरून भोवतीच्या कुणी एखादा मुद्दा गप्पात काढला की शांताबाईंचे डोळे लकाकत. शब्दांची ओघवती बरसातच सुरू होत असे. संस्कृत श्लोकांच्या किंवा जुन्या कवितांच्या ओळीच्या ओळी तोंडपाठ.
जबरदस्त स्मरण. आठवणीतून त्याही व्यक्तिचित्र फुलवत, रसाळ वाणीनं अनेक मुखोद्गत कविता म्हणत शांताबाई शब्दांच्या राज्यात रमत. मी त्यांच्या समवेत अनेक मैफलीत सहभागी झालोय. अहमदनगरला प्रदीर्घ प्रकट मुलाखतही घेतलीय.
“तुम्हाला सांगते सुधीर, अगदी लहान पाच-सहा वर्षांची असल्यापासून मला शब्दांचं आकर्षण. त्यामुळे साहित्याकडे वळले “शांताबाईंच्या बोलीला एक सुंदर नाद होता. भाषा अतिशय सोपी, साधी सरळ, घरगुती उदाहरणातून फुलत गेलेली. शब्दांच्या सोपेपणाची शक्ती शांताबाईंना आचार्य अत्र्यांच्या सहवासानं लाभलेली.
जिवलगा, कोळीगीत, तोच चंद्रमा नभात ही सांगून केलेली गाणी पण त्या कविताच आहेत. या गाण्यांमागची गंमत शांताबाई सांगायला लागत आणि मध्येच म्हणत, “सुधीर मी जास्त बडबडत नाही नां?” शांताबाई बोलताना हा सावधपणा सतत दाखवत. आपली उपस्थिती, आपलं बोलणं कुणाही समोरच्याला सक्तीचं होऊ नये, याची सतत दक्षता घेत. गंमतीशीर किश्श्यांनी पूर झालेलं. त्यांचं एखाद भाष्य पुरं झालं की, पुन्हा डोईवरचा पदर सरसावून ‘मजा झाली नाही? ” असं म्हणत, डाव्या हाताच्या चिमटीत दाबलेल्या रुमालानं एकवार तोंड पुसून आपल्या प्रतिक्रियेचा अंदाज त्या घेत. शीला भट्टारिकाच्या “या कौमार्य हरः स एरवी वरह’ या श्लोकावरून ‘तोच चंद्रमा’ जमल्याचं मोकळेपणी सांगत.
पंत, संताच्या रचना, यावरून स्वतंत्र रचना करणं म्हणजे केवळ भाषांतर नाही, चौर्य नाही, तर ही पुनर्निर्मिती. मुळात परंपरा, उत्तम साहित्य, परंपरेतून आलेल्या भलेपणाच्या कल्पना हे सारे रंग घेऊन त्याला स्वतःच परिमाण देऊन, तो गीतकारानं सामान्यांपर्यंत पोहचवयाचच असत. बहुजन हा ज्ञानी नसतो, तेव्हा पारंपारिक शब्दधन, शास्त्रीय बाज, सामान्यांची अभिरुची यातला युवा गीतकारानं बनायचं असतं. असं त्या सांगत. मी प्रकट मुलाखत घेतसे तेव्हा त्या दासबोध, मॅकबेथ, ज्ञानेश्वर पुन्हा वाचत होत्या. प्रतिभावंताचं वाचणं हा स्मरणरंजनाचा आनंद देणारी बाब असे म्हणत जे वेड मजला लागले, रुपास भाळलो मी, आज चांदणे उन्हात हसले, सारखी अफाट लोकप्रिय गाणी माझीच असूनही ती आमचे फॅमिली डॉक्टर वसंत अवसऱ्यांची म्हणून नोंदवली गेलीत. कारण मी त्यावेळी सेन्सॉर बोर्डावर होते पण डॉक्टरांचं टोपण नाव घेतलं होतं. असा गौप्यस्फोटही शांताबाईंनी एकदा माझ्याजवळ गप्पा मारताना केला होता.
मुंबईपासून ४७०० किलोमीटरवर ‘मॉरीशस’ मध्ये पहाटेच्या वेळी, काही वर्षांपूर्वी बीचवरच्या नारळाचा झाडांच्या असंख्य झावळ्यांच्या अंधारमय पावसात कुसुमाग्रजांची माझी भेट झाली होती. मॉरीशस मध्ये बीचकडे जात असताना, खिडकी पलीकडचा हिरवेगारपणा पाहून अनेकांच्या ओठी, ‘हिरवे हिरवे गारगालिचे’ या ओळी आल्या. पण गंमत म्हणजे बसमध्ये बसलेल्या शब्द प्रभू कुसुमाग्रजांची प्रतिभा यापुढेही झेपावली होती. आणि दुर्तफा डोलणारा भरगच्च ‘ऊस’ पाहून, मूळ ओळीत थोडा बदल करत ते त्यावेळी म्हणाले होते ‘हिरवे हिरवे गोड गालिचे’
याच मॉरीशसच्या मुक्कामात एका पौर्णिमेच्या रात्री शीला बापू बायनं पंचतारांकीत हॉटेलात पार्टी ठेवली होती. त्या हॉटेलची एक वाट अथांग समुद्रात जराशा दूरवर बेटवजा गोलावर उतरत होती. त्या बेटावर महानोरांच्या मैफलीचा आनंद मी घेतलेला आहे. भोवतीच्या पाण्यात अचानक लकाकणारं चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ना. धो. महानोर मला म्हणाले, होते, ‘चांदण्याचे बन पेटले.’
पळसखेडाचे ना. धों. महानोर, ग्रंथालीच्या साहित्य जत्रेत गुलालाने माखलेले, ‘वही’ वाचणारे, पुण्याच्या टिळकरोडवरच्या नीळकंठ प्रकाशनाच्या प्रकाश रानडेंच्या दुकानात एखाद्या संध्याकाळी ‘वाऱ्यावर गंधभार, भरलेले ओचे. झाडातून लद बदले बहर कांचनाचे’ म्हणणारे महानोर मला ऐकायला मिळाल होते. प. हृदयनाथ मंगेशकरांच्या गोतावळ्यात किंवा शरद पवार यांच्या संगतीत ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येतंऽऽ या आभाळ’ ऐकवणारे महानोर अनुभवले होते. केवळ मुंबईत आहेत. म्हणून अचानक दूरदर्शनवर कॅमेऱ्याच्या पुढ्यात महानोरांना बसवून मुलाखतही मी घेतली हाते. ‘गावात दुष्काळ पडला असताना, मुंबईच्या पंचतारांकीत हॉटेलात रमलेले सहकारी आमदार पाहिल्यावर तुमच्यातल्या संवेदनाक्षम कवीला काय वाटतं?’ असे मी थेट त्यांना विचारलं होतं. ते कमालीचे अस्वस्थ झाल्याचे मी अनुभवलेले होते.
जरा मागे सरकलं तर पाण्यातच बुडी अशा समुद्राकाठच्या मैफलीत, विस्तीर्ण पाणी, वर चांदणं फुललेलं, पाण्यात चांदणं उतरलेलं, दूरून मैफलीच्या दिशेन सरकत येणारं पाण्याच फुटलेलं दही पाहून ‘समीन्दराचं भरलं गाणंवाल्या महानारोंना उधाणं’ आलेलं पाह्यलं होतं. पाण्यातल्या चांदण्याच्या प्रतिबिंबाकडे बघत, ‘पाण्याचे चांदण्याचे बन पेटले’ असं महानोरांनी म्हणताच मॉरीशसला जमलेल्या अनिवासी मराठी भारतीयांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याचेही मी अनुभवलं होते. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ रमणाऱ्या ना. धों. महानोरांच्या लेण्यांजवळच्या पळसखेड गावच्या त्यांच्या शेतावर मला गोविन्दराव तळवलकरांबरोबर जाण्याचा योगही आला होता. ‘स्वागताला केल्या झाडांच्या झालरी, पाऊलांचे पुण्य लागो देई’ अशा काव्यमय पक्तिंचं पीकच या कवी आमदाराच्या शेतात फुलल्याचं मी पाह्यलं होतं. पळसखेडच्या या प्रतिकूल माळरानावर चवदार सीताफळाच्या एक हजार झाडांची सुंदर बाग महानोरांनी नुस्ती उभी केलेली नाही. तर या बागेला ‘लता मंगेशकर उद्यान’ नाव देऊन, अवघ्या रानाचं ‘गाणं’ करून टाकलेले महानोर अनुभवलेत.
समुद्रावरून आठवलं कविवर्य बा. भ. बोरकर उर्फ बाकी बाब यांच्यावर दूरदर्शनसाठी अनुबोधपट करायला अरुण काकतकरांबरोबर मी गेलो होतो आणि ‘दही फुटल्या… कविता त्यांच्या तोंडातून फेसाळत्या लाटा बघत मी ऐकल्या. ‘गोव्याच्या दौऱ्यात मासे-खेकडे खात नाही म्हणून’ मग आलास कशाला गोव्यात? ‘ असं अनुनासिक स्वरात चिडून विचारणारे बाकीबाब मी स्वतःच अनुभवले आहेत.
‘ग्रेस’च्या गावी नागपूरलाही अनेकदा गेलो. ‘ग्रेस’ नागपूरातच असतात हे सांगावे लागावं इतक नागपूरच्या साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमांपासून ते अलिप्त, त्याकाळी असतं. त्यांना स्पष्टच विचारलं की तुम्ही कुठं समारंभात वगैरे दिसत नाही. ‘कां हो?’ तरी ‘ग्रेस’ मला म्हणाले होते.
मी रफ ट्यूशनवाला प्राध्यापक नाही. इमाने इतबारे वर्गात शिकवतो. वर्गात शिकवायला जाताना मी रोज प्रार्थना करतो की, ‘तू जर कोणी असशील तर माझी अब्रू राख. मला नवं समजावून देता येऊ दे. शिकवण्यात इतकं गुंतल्यावर आणि फ्रेश राहिल्यावर बाहेर जायची जरुरच काय?
नागपूर रेल्वे लाईनी पलिकडच्या त्यांच्या क्वॉर्टर्स मध्ये मी अपॉईंमेंट न घेता, काही वर्षांपूर्वी गेलो होतो. माणिक गोडघाटे’ हे बंगलीच्या दारावर त्यांचं नाव. बेल दाबली. दाढी वाढलेले, चष्म्यातून भेदक बघणाऱ्या ग्रेसनी दार उघडले. मला म्हणाले, “तुम्ही थेट इथवर आलात म्हणून विचारतो. माझी बदनामी फारशी कुणी केली नाही वाटत? मी म्हटलं, “केली ना. तुम्ही भेटालच असं नाही. बोलालच असं नाही. असं कळलं होतं.”
‘मी बदनामीनुसार आत्ता तुमच्याशी वागलो असतो तर? ‘ ग्रेसनी मला विचारले, मी म्हटलं ‘समजा, तुम्ही हाकलत तर इथं कोण आहे पाहायला? पण जर तुम्ही आत घेतलत तर आवडत्या कवीशी गप्पा होतील, त्या माझ्या स्तंभात छापता येतील.’ यावर ते खळाळून हसले. ‘या आत’ म्हणाले, आत गेलो. सुभाष अवचटनं चितारलेली ‘ग्रेस’ यांची विविध स्केचेस कोपऱ्यात लावलेली पाह्यली. आपल्या मुलीचा एक फोटोही मला दाखवला. इनग्रीड बर्गमनचा विषय निघाल्यावर खूप खुलले.
अंगठा आणि पहिलं बोट यांची चिमूट करून दाखवत म्हणाले, “माझं इतकसं जग आहे. ते मी सुंदर करणार.’ आजुबाजूच्या जगाशी मला घेणं नाही. इतरांना टाळलं तरच थोडं फार काम होऊ शकतं.’
त्यांनी त्यावेळच्या माझ्या मित्राकडे, बाळ फुलेकडे पुण्यात फ्लॅट घेतला होता. मला म्हणाले, तुम्ही पुण्याला परत जाणार नां? माझा फ्लॅटबाबतचा निरोप बाळला द्या. तुम्ही हे काम करा. मी ही तुमच्या उपयोगी पडेन, कधी जर तुमची अडचण असेल, तर निवेदन मी करीन. पाठोपाठ खळाळून हंसले. मग बाहेर आल्यावर म्हणाले, ही रेल्वेलाईन पाह्यलीत? नागपूर देशाचा मध्य आहे. इथून रोज सर्व दिशांना गाड्या जातात. मी मनात आणलं तर इकडे-तिकडे पाहतो. आणि त्या गाड्यांबरोबर रोज संध्याकाळी भारताच्या कानाकोपऱ्यात फिरून येतो..
पुढे ग्रेसनी मनात आणलं आणि अनेकदा पुण्यात आले. भर भरून बोलत राह्यले. त्यांच्या प्रमाणे सुरेश भट हे देखील मला आधी नागपूरात, अमरावतीत, पुण्यात अनेकदा भेटले. आशा भोसल्यांच्या कार्यक्रमात पुण्यात मांडी घालून बसून गाणी ऐकताना दिसले. पुण्याच्या मंडईत एका पाठोपाठ खन्नाच्या हॉटेलात साऱ्या डीश फस्त करताना अनुभवले. मी एकदा थेटच विचारलं की, केव्हातरी पहाटे, तरुण आहे, मलमली तारुण्य माझे असं तरल लिहिणारे तुम्ही एरवी इतके खाताना वागताना अर्वाच्च कंसे? त्यावर भट साहेब म्हणाले होते की मी फार पूर्वी वारावर जेवलोय. त्यामुळे जिथलं अन्न खाल्लं तिथला गुणावगुण अंगी उतरणारच. कविता लिहिताना मात्र मी फक्त सुरेश भट असतो.
सुधीर मोघेंशी नुस्ती भेटच नाही. तर त्यांनी निवेदनाची दिशा देत, संहीता सांगत, माझ्याकडून ‘स्मरणयात्रा’चा निवेदन करून घेतले. दादरला मी उमेदवारी काळात काकतकरांच्या घरी राहात असताना, तिथं ‘मोघे’ कायम असायचे. त्यांच्या अनेक ताज्या कविता, त्यांनी आम्हा रुम पार्टनर्सना प्रथम ऐकवल्या आहेत. ‘किर्लोस्करवाडी’ हा त्यांचा जिव्हाळ्याचा आणि भरभरून सांगण्याचा विषय होता. हा खेळ सावल्यांचा, शापीत, अशा चित्रपटांची गाण्यांची निर्मिती आमच्या डोळ्यादेखत झालीय. हृदयनाथ मंगेशकर आणि मोघे यांच्या शब्द-सूरांवरून चालणाऱ्या गप्पांचाही मी साक्षी आहे.
प्रेमाचा विषय किंवा प्रेमाची गाणी लागली की ‘भारलेली मंत्र वेळा आणि ओले चांदणे’ किंवा दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी उन पडतं, तसंच काहीसं आपल्या आयुष्यात प्रेम येत’ या त्यांच्या कविता आम्ही त्यांना म्हणायला सांगत असू. नाकावरचा चष्मा सरसावत एकदा ते कविता म्हणू लागले की मग त्याला खंडत नसे. बाबूजी हा ही त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.
बाबूजी म्हणजे सुधीर फडकेंसमवेत काम करण्याचा अनुभव थरारक, सुखावह कसोटीला लावणारा, स्वतः मधील अनपेक्षित गवसायला मदत करणारा होता.
पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या खोलीत सूरांवर शब्द बांधण्यासाठी बसलेले मोघे मी पाह्यलेत. ते म्हणत की, इथं मी गोवळकोंड्याचा कैदी असतो. बाबा म्हणजे दीनानाथांची मूळ चाल बंदीशीतून ऐकली आणि मला चालीवर चटकन शब्द सुचले- ‘बालपण उतू गेले, तारुण्य नासले, वार्धक्य साचले’, पाच-सहा शब्दातच आयुष्याच सारं सार मला मांडता आले. सुरेश वाडकरांची आवडती रचना. त्यांना सर्वात आनंद झाला होता तो म्हणजे सुरेश भटांसारख्या समर्थ कवीराजांच्या शब्दांना, या कवी राजानं संगीतकार बनून चाल दिली, तेव्हा…. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ आरती प्रभू म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर पुण्यातल्या जिमखान्यावरच्या एका लॉजवर मुक्काम ठोकून असत. तिथे त्यांच्याशी गप्पा मारताना अमोल पालेकर, हृदनाथ अशा अनेक व्यक्तित्वांवर नेमक व्यक्तिचित्र अनुभवताना ऐकलाय. ‘कालाय तस्मै नम:’ या नाटकावर ते खूप बोलत.
पी. सावळारामांचे वसंत प्रभूंशी जुळलेले सूर, खेबूडकरांचं, राम कदमाशी सजलेले नात दोघांशी गप्पा मारताना ऐकता आलय. खेबूडकर सतत ‘टाय’ घालत. मी यावर त्यांना विचारता ते म्हणाले होते की, मला परीणामकारक पर्सनॅलिटी नाही. टाय हा आयडेंटी दर्शवण्याचा भाग होता. शांतारामबापूंनी पिंजऱ्यातल्या एकेका गाण्यासाठी अकरा ते चवदा वेळा लिहून घेतलय.
मंगेश पाडगावकरांच्या अनेकदा प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. ‘जिप्सी’ ते ‘सलाम’ वारंवार ऐकलय. गाण्या इतकाच खाण्या-पिण्यात त्यांना रस आहे. ज्योतिषाचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. शंकर वैद्यांशी अरुण दातेंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप गप्पा झाल्या होत्या. माझ्या वृत्तपत्रीय लेखनाला त्यांच्यासारख्या ज्येष्ठ माणसाने पत्र पाठवून दाद दिली होती. वसंत बापटांशी फार पूर्वी ‘गगन सदन’ गाण्यावरून, स्मिता पाटील या त्यांच्या लाडक्या अभिनेत्री वरून ते साधनात संपादक असताना आणीबाणी विचार स्वातंत्र्य या विषयावर, गप्पा झाल्या होत्या. कायम नेटके कपडे, सोनेरी काडीच्या चष्म्यातून रोखलेले डोळे, काहीसं अंतर राखून बोलण्याची पद्धत यामुळे त्यांच्याशी बोलताना दरारा जाणवे. पं. भीमसेन जोशींच्या ‘संतवाणी’चं मी निरुपण करू लागल्यावर त्यांनी मला संतवाङ्मय मांडण्याची तयारी कशी करावी याची दिशाही दाखवली होती. अरुणा ढेरे तर आमची समवयस्क, इंटेन्स मैत्रीण. मी गंमतीनं तिला नेहमी म्हणतो की खऱ्या खुऱ्या प्रेमात पडली असतीस तर उगाच रामायण-महाभारतातल्या प्रेमावरच लिहावयाची मर्यादा पडली नसती. यावर ती चिडत नाही, हे नशीब. सुनीताबाई देशपांडेंची ‘अरुणा’ एकदम लाडकी. खरं तर ‘अरुणा’ साहित्य संमेलनाची अध्यक्षा व्हायला हवी.
विंदा करंदीकरांना पाडगावकर बापटांबरोबर कविता सादर करताना जास्त वेळा ऐकलं. भेट फार कमी. शांताबाईंमुळे एकदा त्यांच्या घरी जाण्याची संधी आली. पण संवाद साधण्याचं दडपण फक्त या एकाच कवीबाबत आलं. संदीप खरे, गुरु ठाकूर, सौमित्र (किशोर कदम) प्रवीण दवणे या अलीकडच्या पिढीतल्या लोकप्रिय कवींच्या प्रकट मुलाखती घेण्याचाही योग आला. चौघेही कविता लिहिण्याइतकेच, कविता सादरी करणातही वाकबगार. अनुभवच घ्यायला हवा. तीन पिढ्यातल्या मला भेटलेल्या कवींविषयी खूप काही बोलता येईल. पण कुठ तरी थांबायला हवं.
शब्द समजून घ्या
शब्द उमजून घ्या
हवा तेव्हा, हवा तिथे
निःशब्दाला मान द्या
म्हणून थांबतो.
सुधीर गाडगीळ
काव्यदीप च्या एका जुन्या अंकात सुप्रसिद्ध निवेदक आणि संवादक सुधीर गाडगीळ यांनी लिहिलेला हा लेख…


Leave a Reply