नवीन लेखन...

जागृत मंगळ…

मंगळावर अनेक ज्वालामुखी आढळतात. एके काळी जागृत असलेले हे ज्वालामुखी आज मृतावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळ ग्रह हा भूगर्भीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला आहे. मात्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून, मंगळ वाटतो तसा निष्क्रिय नसल्याचं दिसून आलं आहे. किंबहुना मंगळावर सतत भूकंप होत आहेत, इतकंच नव्हे तर मंगळाच्या पृष्ठभागाखाली शिलारस अस्तित्वात असल्याचंही दिसून आलं आहे. हे शोध लागले आहेत ते, नासानं मंगळावर उतरवलेल्या ‘इनसाइट लँडर’ या यानसदृश-साधनावर बसवलेल्या उपकरणाद्वारे.

नासाचं हे इनसाइट लँडर सन २०१८ सालच्या नोव्हेंबर महिन्यात ‘इलिझिअम प्लॅनिशिआ’ या, मंगळाच्या विषुववृत्ताजवळच्या, ज्वालामुखींनी व्यापलेल्या प्रदेशात उतरलं. मंगळाच्या अंतर्भागातल्या विविध भूगर्भीय थरांच्या रचनेचा अभ्यास करण्याची कामगिरी या लँडरवर सोपवली गेली होती. त्यासाठी या यानावर मंगळावरील भूकंपांत निर्माण होणाऱ्या, विविध कंपनसंख्येच्या भूलहरी नोंदवणारं उपकरण बसवलं होतं. भूकंपात निर्माण होणाऱ्या भूलहरी जेव्हा जमिनीखालून प्रवास करतात, तेव्हा जमिनीच्या तिथल्या स्वरूपानुसार या लहरींचं स्वरूप बदलतं. त्यामुळे या लहरींच्या स्वरूपावरून जमिनीची, खोलवरची जडण-घडण समजू शकते. मंगळावरील जमिनीचा भूशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या या लँडरचं कार्य गेल्या डिसेंबर महिन्यात संपुष्टात आलं. चार वर्षांच्या आपल्या कार्यकाळात या लँडरनं मंगळावर झालेल्या तेराशेहून अधिक भूकंपांची नोंद केली. यांतील बहुतेक सर्व भूकंप इलिझिअम प्लॅनिशिआ या प्रदेशातल्या ज्या भागात घडून आले, तो भाग ‘सर्बरस फोसे’ म्हणून ओळखला जातो. हा सर्बरस फोसे भूशास्त्रीय घडामोडींतून निर्माण झालेल्या भेगांनी व्यापला आहे. इनसाइट लँडरचं या सर्बरस फोसे भागापासूनचं अंतर सुमारे बाराशे किलोमीटर इतकं होतं.

इनसाइटद्वारे गेल्या चार वर्षांत नोंदल्या गेलेल्या तेराशेहून अधिक भूकंपांपैकी, सर्वांत मोठा भूकंप ४ मे २०२२ रोजी नोंदला गेला. तब्बल चार तास चालू असलेला हा भूकंप, रिश्टर मापनानुसार ४.७ प्रतीचा होता. इतका दीर्घ काळ चाललेला आणि इतका तीव्र असणारा असा भूकंप मंगळावर प्रथमच नोंदला गेला. पृथ्वीवरील भूकंपांच्या दृष्टीनं हा भूकंप तीव्र नसला तरी, मंगळावरच्या भूकंपांच्या दृष्टीनं हा भूकंप तीव्र भूकंप होता. भूशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय अवस्थेतील मंगळावर या तीव्रतेचा भूकंप आजच्या घडीला अपेक्षित नव्हता. या अगोदर २०२१ सालच्या ऑगस्ट महिन्यात इनसाइट लँडरद्वारे नोंदला गेलेला ४.२ प्रतीचा भूकंप, मंगळावरचा यापूर्वीचा नोंदला गेलेला सर्वांत तीव्र भूकंप होता. दीर्घ काळ चालू राहिलेला आताचा भूकंप हा, त्या भूकंपापेक्षा पाचपट तीव्र होता. आताच्या या भूकंपात उत्सर्जित झालेली एकूण ऊर्जा, मंगळावर आतापर्यंत नोंदल्या गेलेल्या सर्व भूकंपांतील एकत्रित ऊर्जेपेक्षा अधिक होती. हा तीव्र भूकंप इनसाइट लँडरवरील उपकरणांच्या क्षमतेची कसोटी पाहणारा ठरला.

फ्रान्समधील सीएनआरएस या संस्थेतील ताइची कावामुरा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या भूकंपाचा तपशीलवार अभ्यास केला. इनसाइटवरील उपकरणानं नोंदवलेल्या भूकंपलहरींवरून या भूकंपाचं केंद्र, सर्बरस फोसे या प्रदेशात नसून ते या क्षेत्राच्या बाहेर असल्याचं स्पष्ट झालं. हे केंद्र इनसाइट लँडरपासून दोन हजार किलोमीटर दूर होतं. हा भूकंप जिथे घडून आला, त्या प्रदेशात भूशास्त्रीय घडामोडींची कोणतीही खूण दिसून येत नाही. इनसाइटवरील उपकरणांनी टिपलेल्या भूकंपलहरींच्या दिशांवरून, या भूकंपात निर्माण झालेल्या भूकंपलहरी संपूर्ण मंगळावर पसरल्या असल्याचं दिसून आलं. इतकंच नव्हे तर, या भूकंपाचे भूकंपलहरींच्या स्वरूपातले पडसाद तब्बल दहा तासांपर्यंत उमटत होते. इनसाइटवरील उपकरणांद्वारे नोंदल्या गेलेल्या, मंगळावरच्या आतापर्यंतच्या कोणत्याच भूकंपाचा परिणाम, इतका दीर्घ काळ टिकलेला दिसून आला नव्हता. या भूकंपात निर्माण झालेल्या भूलहरींचं स्वरूपही, मंगळावरील सर्वसाधारण भूकंपात निर्माण होणाऱ्या भूलहरींपेक्षा काहीसं वेगळं होतं. त्यामुळे हा भूकंप मंगळाच्या अंतर्भागाबद्दलचं कुतूहल वाढवणारा ठरला आहे. ताइची कावामुरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या शोधपत्रिकेत लवकरच प्रसिद्ध होत आहे.

इनसाइटनं नोंदवलेल्या बहुतेक सर्व भूकंपांचे केंद्रबिंदू हे सर्बरस फोसे या प्रदेशात असल्यानं, संशोधकांनी आपलं लक्ष पूर्वीपासून या प्रदेशावर केंद्रित केलं आहे. हे सर्व भूकंप ज्या परिसरात घडून येतात, त्या परिसरात दिसणाऱ्या भेगा या पूर्वीच्या काळातील भूशास्त्रीय घडामोडींदरम्यान निर्माण झाल्या असण्याची शक्यता, संशोधकांनी याअगोदरच व्यक्त केली आहे. युरोपिअन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस या मोहिमेतील अंतराळयानानं घेतलेल्या छायाचित्रांत, इथल्या एका भेगेजवळ, काळसर रंगाच्या धुळीचे ढिगारे दिसतात. सर्व दिशांना पसरलेली ही धूळ, तिथल्याच एखाद्या ज्वालामुखीतून उत्सर्जित झाली असावी. या धुळीचा काळसर रंग, ही धूळ आजूबाजूच्या प्रदेशातील मातीच्या तुलनेत नंतरच्या काळात निर्माण झाली असल्याचं दर्शवतो. संशोधकांच्या मते, ही धूळ अलीकडच्या पन्नास हजार वर्षांपेक्षा कमी काळात उत्सर्जित झाली असावी.

स्विट्झरलँडमधील इन्स्टिट्यूट ऑफ जिओफिजिक्स या संस्थेतील सायमॉन स्ट्येह्‍लर आणि त्यांच्या इतर आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी या सर्बरस फोसेच्या परिसरात झालेल्या विसाहून अधिक निवडक भूंकपांचा तपशीलवार अभ्यास केला. या भूकंपांत उत्सर्जित झालेल्या भूलहरींचं स्वरूप हे तिथल्या जमिनीखाली, ज्वालामुखीच्या परिसरात आढळते, तशी परिस्थिती असल्याचं दर्शवत होतं. सायमॉन स्ट्येह्‍लर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून, सर्बरस फोसे इथल्या पृष्ठभागाखाली सुमारे तीस ते पन्नास किलोमीटर खोलीवर वितळलेल्या खडकांचं – शिलारसाचं – अस्तित्व असल्याचं दिसून आलं. शिलारसांचे हे साठे म्हणजे मंगळाचा अंतर्भाग अजूनही जागृत असल्याचा पुरावा आहे. शिलारसाच्या या साठ्यांमुळे होणाऱ्या भूगर्भीय हालचाली, सर्बरस फोसेच्या परिसरात घडणाऱ्या भूकंपासारख्या घटनांना कारणीभूत ठरत असाव्यात. सायमॉन स्ट्येह्‍लर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे लक्षवेधी संशोधन ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

इनसाइट लँडरद्वारे केल्या गेलेल्या या सर्व संशोधनावरून मंगळाचा अंतर्भाग आजही सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं आहे. मंगळाचा अंतर्भाग जरी सक्रिय असला, तरी मंगळावरचे ज्वालामुखी मात्र कदाचित यापुढे पुनः जागृत होणार नाहीत. कारण हा शिलारस म्हणजे मंगळावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या शिलारसापैकी उर्वरित शिलारस असू शकतो. मात्र शिलारसाचे हे साठे जरी भूतकाळातल्या शिलारसाचे अवशेष असले, तरी या साठ्यांना एक वेगळंच महत्त्व आहे. या शिलारसाच्या साठ्यांपासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे, मंगळावरच्या जमिनीत दडलेलं पाणी न गोठता द्रवरूपात राहू शकतं. हे द्रवरूप पाणी म्हणजे सूक्ष्मजीवांचं वसतिस्थानही असू शकतं. त्यामुळे मंगळावरच्या शिलारसाचा हा शोध भविष्यात, फक्त खगोलशास्त्राच्या आणि भूशास्त्राच्याच नव्हे तर, जीवशास्त्राच्या दृष्टीनंही महत्त्वाचा ठरू शकतो.

चित्रवाणीः इनसाइट लँडर

(छायाचित्र सौजन्य: ESA/DLR/FU Berlin and NASA)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..