नवीन लेखन...

ध्वनी-वेगापेक्षा अधिक वेगाने उडणारी पहिली महिला वैमानिक आणि ‘वास्प’ची निर्माती जॅकी कॉकरन

ध्वनी-वेगापेक्षा अधिक वेगाने उडणारी पहिली महिला वैमानिक आणि ‘वास्प’ची निर्माती

अमेरिकेच्या लष्कराच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पश्चिम टेक्सास शहराच्या मध्यभागी एक विलक्षण लष्करी जागतिक स्वरूपाचा प्रयोगच झाला होता. टेक्सासमधील जगातील पहिल्याच ठरलेल्या केवळ स्त्री वैमानिकांच्या असलेल्या लष्करी तळावर संपूर्ण अमेरिकेतून हजारो स्त्रियांनी त्या महिला वैमानिकांच्या गटाला ‘वुमन एअर फोर्स सर्व्हिस पायलटस्’ म्हणजेच ‘वास्प’ असे संबोधले जात होते.

अमेरिकेतील तो पहिलाच महिला वैमानिकांचा लष्करी तळ असला तरी त्याच्या मूळ कल्पनेचे श्रेय अमेरिकन लष्कराला देता येत नव्हते. उलट प्रथमतः अमेरिकन लष्कराचा स्त्री वैमानिक या कल्पनेलाच विरोध होता. महिला वैमानिकांच्या संदर्भातील मूळ कल्पनेची जन्मदात्री होती जॅकी कॉकरन. ही अमेरिकेतीलच एक स्त्री वैमानिक !

१९३० ते १९४० च्या दरम्यान जॅकी कॉकरन ही स्त्री वैमानिक म्हणून प्रसिद्धीस आलेली होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्ध जिंकण्यास लष्करास वैमानिकांची आवश्यकता आहे, हे जॅकी कॉकरनने जाणले होते. हजारो प्रशिक्षित आणि विमानोड्डाणाचा परवाना मिळविलेल्या महिलांचा उपयोग लष्करातील पुरुष वैमानिकांची असलेली तूट भरून काढण्यास होऊ शकेल, हेही जॉन कॉकरनच्या लक्षात आले होते. परंतु त्या काळी अमेरिकेच्या लष्करा धिकाऱ्यांच्या डोक्यात अशी भ्रामक कल्पना होती की, लष्करी विमाने फक्त पुरुष वैमानिकच उडवू शकतात. स्त्रियांचे हे काम नव्हे! स्त्रिया लष्करात वैमानिक म्हणून काम करू शकतील या कल्पनेवर लष्करी अधिकारी विश्वास ठेवायलाही तयार नव्हते.

अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांना महिला वैमानिकांच्या संदर्भातील आपली योजना कॉकरनने सतत दोन वर्षे पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. मग कॉकरनने अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचा नादच सोडला. ब्रिटिशांच्या लष्करी गटाची विमाने इकडून तिकडे नेण्यास मदत करण्याची एक योजना कॉकरनने आखली. ही योजना जेव्हा प्रत्यक्षात येऊन फक्त स्त्री वैमानिकांचा गट ब्रिटिश लष्करास मदत करण्यात यशस्वी झालेला दिसला तेव्हा अमेरिकेच्या लष्काराधिकाऱ्यांचे डोळे उघडले. त्यांच्या बुद्धीवरचे महिलांच्या कर्तृत्वासंबंधी असलेले झापड दूर झाले. अमेरिकेतील सरकारनेच कॉकरनच्या योजनेत रस घेतला.

मग काय? अमेरिकेतील सरकारच्या अनुकूलतेमुळे कॉकरनला अमेरिकेच्या लष्कराचा आशीर्वादच लाभला! लष्करी विमानांना चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कॉकरनने महिला वैमानिकांचे अर्जच मागविले.

वस्तुतः कॉकरनला सुमारे दोन हजार महिला वैमानिकांची लष्करात भरती करावयाची होती. अत्यंत धोकादायक असलेल्या वैमानिकांच्या जागेसाठी दोन हजार महिला कशा मिळणार, असा प्रश्न कॉकरनला विरोध करणाऱ्या हीकाकारांनी उपस्थित केला होता. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की, दोन हजार महिला वैमानिकांच्या जागांसाठी पंचवीस हजार अर्ज आले होते! कॉकरनच्या प्रशिक्षण वर्गास समाजातील विविध थरांतील महिलांनी प्रतिसाद दिलेला होता. त्यात गृहिणी, शिक्षिका आणि सेक्रेटरी म्हणून नोकरीत असलेल्या अमेरिकेतील या टोकापासून त्या टोकापर्यंत राहणाऱ्या महिला होत्या प्रत्येकीला निळ्या विशाल आकाशात धाडसी झेप घेऊन आपल्या देशाची सेवा करण्याची जबरदस्त इच्छा होती!

कॉकरनच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण विस्तृत आणि खडतर स्वरूपाचे होते. पदवीधर होण्यासाठी प्रशिक्षणार्थी महिलेस आकाशातील सर्व तऱ्हेच्या ‘लूप्स’ आणि ‘स्पिन्स’सारख्या कसरतीच्या हालचाली करण्यावर प्रभुत्व मिळविणे आवश्यक असे. विमानांच्या कारखान्यांपासून नागरी विमानतळापर्यंत विमाने नेऊन ती आकाशात उडविण्यासाठी नेण्यासारख्या नेहमीच्या जबाबदाऱ्या प्रशिक्षणार्थींना पार पाडाव्या लागतच होत्या. त्याखेरीज सदोष लढाऊ विमानांची चाचणी घेणे, नवीन विमानांच्या धोकादायक कसरती करणे आणि लढाऊ विमानांच्या प्रशिक्षणार्थी पुरुष वैमानिकांसाठी (टार्गेट्स) ‘निशाणी’ ओढून नेणे इत्यादी जबाबदाऱ्या ‘वास्प’कडून पार पाडल्या जात होत्या.

लष्करात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक जातीच्या विमानांचे उड्डाण कसे करावयाचे याचे शिक्षण ‘वास्प’द्वारे घेतले जात असे. पी-४७ सारख्या ‘थंडरबोल्ट’ जातीच्या पाठलाग करणाऱ्या जलदगती विमानांचे आणि बॉम्ब टाकण्याची महत्त्वपूर्ण अवघड कामगिरी करणाऱ्या बी – १७ सारख्या ‘फ्लाईंग फोट्रेस’ जातीच्या विमानांची उड्डाणे करण्यास ‘वास्प’च्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. प्रशिक्षणार्थ एकूण १८३० महिलांना प्रवेश दिला गेला असता १०७४ महिला वैमानिक उत्तीर्ण Ich ersich झाल्या होत्या.

‘वास्प’ योजना ही तशी अल्पायुषी ठरली. परंतु या योजनेमुळे स्त्रिया या पुरुषांइतक्याच लष्करी उड्डाणांसाठी उपयुक्त ठरतात हे प्रथमच आणि कायमस्वरूपी सिद्ध केले होते. ‘वास्प’च्या अखेरच्या अहवालात कॉकरनने केलेली नोंद फार महत्त्वपूर्ण व बोलकी होती. तिने नोंदवले होते की, “पुरुषांइतकीच स्त्रियांची सहनशक्ती असून ज्या वेगाने पुरुष शिकू शकतात, त्याच वेगाने स्त्रियाही शिकतात. पुरुषांइतक्याच स्त्रियाही सुरक्षितता सांभाळतात, असे सर्व नोंदी दर्शवितात!”

असे असूनही ‘वास्प’ वर अमेरिकेच्या सरकारने अन्यायच केला. हा अन्याय अमेरिकेतील सरकारच्या ‘पुरुषी’पणाचा द्योतकच असावा. कारण जरी ‘वास्प’ने पुरुष वैमानिकांप्रमाणेच महिलांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि त्यांची आयुष्येच जिवावर उदार होऊन राष्ट्रप्रेमाने ‘वास्प’ योजनेस समर्पित केलेली होती तरी अमेरिकेतील सरकारने ‘वास्प’ ला लष्करी दर्जा दिला नाही. त्यामुळे लष्करातील व्यक्तींना वा वैमानिकांना मिळणाऱ्या सवलती-सुविधा वा हक्काने मिळणारे लाभ ‘वास्प’ला मिळू शकले नाहीत. उदाहरणार्थ, वैमानिकांच्या क्षेत्रात आवश्यक असलेल्या (इन्शुरन्स) आयुर्विम्याच्या लाभापासून ‘वास्प’ला वंचित ठेवले गेले. प्रशिक्षणासाठी जाण्या-येण्यासाठी प्रवासखर्च ‘वास्प’च्या महिला वैमानिकांना स्वतःचा स्वतः करावा लागत असे. योजनेच्या प्रारंभी गणवेषाचा आणि कपड्यांचा खर्चही त्या महिला वैमानिकांना स्वतःच्या पदरातूनच करावा लागे !

‘वास्प’बाबत अमेरिकन सरकार अत्यंत निर्घृण होते. आपले कर्तव्य बजावीत असताना वास्पच्या अडतीस महिलांना आपले प्राण गमवावे लागले होते. तत्कालीन अमेरिकेच्या सरकारने त्या अडतीस महिला वैमानिकांच्या अंत्यविधीचा तर खर्च केलाच नाही, पण त्यांच्या घरी त्यांची ते पोहचविण्यासाठी आलेला खर्चही केला नव्हता!

दुसरे महायुद्ध संपत आले असता वास्प योजनेस १९४४ अखेरीस निरोप देण्यात आला. जॅकी कॉकरनने जन्म देऊन अल्पावधीत सबळ केलेली वास्प योजना केवळ दोन वर्षांतच संपली होती. अल्पायुष्यातच ‘वास्प’ने भीमपराक्रम केलेला होता!

वास्पच्या महिला वैमानिकांनी विलक्षण स्वरूपाचा त्याग करूनही आणि काही महिला वैमानिकांनी आपल्या प्राणांचे दान देऊनही लष्करी मान्यता देण्याच्या पद्धतीनुसार वा संकेतानुसार आभार मानण्याचा औपचारिकपणाही दाखविला गेला नाही आणि कोणतेही लष्करी लाभही दिले गेले नाहीत याचे आश्चर्य वाटते !

तीस वर्षांहून अधिक काळ वास्पला स्वतःच्याच देशात एकप्रकारे मानहानीची वागणूक दिली गेली होती. १९७७ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी वास्पला लष्करी दर्जा देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी करून वास्पला अखेर शेवटी न्याय मिळवून दिला. महिलांना नाइलाजाने आणि फार उशिरा का होईना परंतु पुरुषांनी न्याय देण्याची परंपरा फक्त भारतातच नसून ती जागतिक पद्धत आहे, हेच कटुसत्य आहे!

खरेतर एकट्या जॅकी कॉकरनची महिला वैमानिक म्हणून जागतिक स्वरूपाची उतुंग कर्तबगारी होती. तिच्या कर्तृत्वाच्या निकषावर आकाशाच्या उनीवरील महिलांची ताकद अजमावणे लष्कराला अशक्य नव्हते. गावाजाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने आकाशसंचार करणारी जॅकी कॉकरन ही पहिली महिला होती. त्याचप्रमाणे, हवाई उड्डाणांच्या क्षेत्रातील इतिहासात कोणत्याही स्त्री वा पुरुष वैमानिकांपेक्षा अधिक संख्येतील विक्रम जॅकी कॉकरनच्या नावावर नोंदविलेले आहेत.

वैमानिकांच्या जीवनात ‘कॅटर पिलार क्लब’चे सदस्य असणे ही गोष्ट फार प्रतिष्ठेची मानली जात होती. एखादा वैमानिक जर काही कारणाने विमानाबाहेर फेकला जाऊन जिवंत राहिला तर त्याला ‘कॅटर पिलार’ क्लबचे अधिकृत सदस्यत्व दिले जात असे. वास्पच्या एका महिला वैमानिकेस हे सदस्यत्व कसे लाभले याची थरारक कथा सांगितली जाते. वास्पची ही वैमानिक एकदा हवाई कसरत करीत विमान स्वतःभोवती गरगर फिरवीत असताना तिचा सुरक्षापट्टा सुटला होता. ती विमानाच्या बाहेर फेकली गेली; परंतु लष्करी तळावर ती पुन्हा चालत जाताना सर्वांनी पाहिली. तिच्या हातात त्यावेळी तिच्या पॅरेशूटचे ‘रिपकार्ड हँडल’ होते. तिला ‘कॅटर पिलार’ क्लबचे सदस्यत्व मिळवून देण्यास आवश्यक ठरणारे ते रिपकार्ड हँडल होते!

जॅकी कॉकरनची प्रेरणा घेऊन अनेक महिला वैमानिकांनी कर्तबगारी दाखवून प्रसिद्धी मिळविलेली आहे. मॅज लिऑन मूर, मागरिट चेंबरलेन टॅपलीन, अलिस स्टिव्हन्स रोहरर आणि डोरोथी ब्रिट मान या काही महिला वैमानिकांनी आपल्या कर्तबगारीने नावलौकिक मिळविला आहे.

आता कोणत्याही देशातील हवाई उड्डाणांच्या साहसी वैमानिकांना जॅकी कॉकरनचे जीवन हा एक आदर्शच वाटतो!

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..