नवीन लेखन...

गुंतवणूक नियोजन

गुंतवणूक ही उत्तम प्रकारे करणं, पैशाला कष्ट करायला लावणं हे अतिशय आवश्यक असतं. आजही आपली कुटुंबपद्धती उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे आपली पुढची पिढी आपली काळजी घेतेच, पण आपली अशी अपेक्षा असते की आपला आर्थिक भार पुढच्या पिढीवर पडू नये. तसेच पुढच्या पिढीची जी स्वप्नं आहेत, त्या स्वप्नपूर्तीसाठीसुद्धा आपला हातभार लावणं ही प्रत्येकाची इच्छा असते.

सध्याच्या काळात गुंतवणुकीचे फारच महत्त्व आहे. अगदी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील खालील अभंगातून खूप मोठा संदेश दिला आहे, गृहस्थाश्रमामध्ये कसे वागावे याबद्दल छान मार्गदर्शन केले आहे.

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे
उदास
विचारे वेच करी
उत्तमचि
गती तो एक पावेल
उत्तम
भोगील जीव खाणी

आपण जे धन मिळवतो ते उत्तम प्रकारेच मिळवले पाहिजे. आपल्या परंपरेमध्ये असे सांगितले आहे की, उत्तम प्रकारे मिळवलेले धनच टिकते. नाही तर ते व्यर्थ खर्च कसे होते आपल्यालाच कळत नाही. त्याच बरोबर तुकाराम महाराज पुढे सांगतात की, हे जोडलेले धन विरक्तीने खर्च करावे. या सांगण्यात अध्यात्म तर आहे, पण त्याचबरोबर बचतीचे महत्त्व देखील सांगितले आहे. बचत झाली तरच गुंतवणूक होऊ शकेल आणि म्हणून बचतीचे महत्त्व आहे. बचतीचा मार्ग हा जीवनशैलीतून जातो. जेवढी राहणी, जीवनशैली साधी तेवढी बचत अधिक होते. म्हणूनच बचत हीच गुंतवणुकीची पहिली पायरी ठरते.

गुंतवणूक म्हणजे काय?

गुंतवणूक म्हणजे पैशाला कष्ट करायला लावणे. गुंतवणूक का महत्त्वाची? आपली मिळवत राहण्याची शक्ती, क्षमता ही कालमर्यादित असते. आज आपण पहातो, वेगवेगळी माणसं निवृत्त झाल्यानंतर समाजात सक्रिय असतात, समाजाला योगदान देतात आणि तसं करत असताना इच्छा असेल तर ज्या काळामध्ये ते उद्योग, नोकरी, व्यवसाय करत असतात, त्या काळामध्ये उत्तम प्रकारे गुंतवणूक करणं हीच निवृत्तीनंतरच्या सुखमय, आनंदमयी जीवनाची गुरुकिल्ली असते. म्हणून गुंतवणूक ही उत्तम प्रकारे करणं, पैशाला कष्ट करायला लावणं हे अतिशय आवश्यक असतं. आजही आपली कुटुंबपद्धती उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे आपली पुढची पिढी आपली काळजी घेतेच, पण आपली अशी अपेक्षा असते की आपला आर्थिक भार पुढच्या पिढीवर पडू नये. तसेच पुढच्या पिढीची जी स्वप्नं आहेत, त्या स्वप्नपूर्तीसाठीसुद्धा आपला हातभार लावणं ही प्रत्येकाची इच्छा असते.

गुंतवणूक कधी करावी?

जेवढ्या लवकर आपण सुरू करू तेवढे चांगले. जगातले धनाढ्य अब्जाधीश वॉरेन बफेट हे लहानपणी घरोघरी जाऊन पेपर टाकत असत. त्या मिळालेल्या पुंजीतून त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केली. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, मी वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधीच सुरुवात केली असती तर चांगले झाले असते. तरुणवयात तसेच निवृत्तीनंतर गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी? हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यातील काही समान सूत्रांचा आपण आधी विचार करूया –

-जी समजून केली जात नाही ती गुंतवणूक नव्हे तर तो सट्टा असतो. त्यामुळे गुंतवणुकीची मूलतत्त्वे समजून घ्यावीत.

-चक्रवाढ व्याज या संकल्पनेची शक्ती खूप आहे, ती समजून घ्यायला हवी. मुद्दलावर जे व्याज किंवा परतावा मिळतो तो चक्रवाढ व्याजाने वाढू शकतो, त्याचा विचार केला पाहिजे.

-पैशाला कधी रिकामा बसून देऊ नये, त्याला लवकरात लवकर कामाला लावावे, म्हणजे तो गुंतवावा. मग तो चक्रवाढ व्याजाची करामत करून दाखवतो.

-गुंतवणुकीतून पैसे लागतील तसे काढून घेता यायला हवेत. गुंतवणुकीचा हा सर्वात मोठा निकष आहे. ‘गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची क्षमता’ हा मोठा निकष आहे. भविष्य निर्वाह निधी यासारख्या माध्यमात गुंतवणूक जरूर केली पाहिजे. पण दूरगामी पद्धतीने आपले भविष्य सुरक्षित करण्यापलीकडे जेव्हा आपण विचार कराल, तेव्हा मला माझ्या अडचणीच्या काळात पैसे सहज काढण्याची सोय आहे का? हे जरूर तपासा. नदीकाठावरील घरांच्या जाहिरातींना बळी पडून आपण घरे घेतो, पावसाळ्यात जाणवत नाही पण उन्हाळ्यात पाणी नाही आणि नदीदेखील नाही हे नंतर समजतं. मग आपण पुन्हा घर विकण्याचा विचार करतो, तेव्हा खूप अडचणी येतात. मग अशी गुंतवणूक काय कामाची? ज्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. म्हणून खूप विचार करून पावले उचलली पाहिजेत.

-अधिक परताव्याचे आमिष कोणी दाखवत असेल तर सावध राहावे. अधिक परतावा तिथे जोखीम आणि फसवणूक होण्याची शक्यता अधिक. शेअर बाजार व्यतिरिक्त जे अधिक परताव्याचे पर्याय, आमिष दाखवलं जातं, तिथे सावध राहण्याची आवश्यकता असते. कारण तिथे आपलं मुद्दलही बुडू शकतं.

-गुंतवणूक आपण कशात करावी हे कालसापेक्ष आहे. कोणतीही गुंतवणूक सदैव वाईट किंवा चांगली असते असे नाही. शेअर बाजार जेव्हा तेजीत असेल तेव्हा पैसे गुंतवणे अयोग्य. पण शेअर बाजार पडलेला असताना केलेली गुंतवणूक ही फायद्याची असते. कोविडच्या काळात शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ होता. काही काळ शेअरसाठी अतिशय अनुकूल, तर काही सोन्यासाठी, जमीन जुमल्यांसाठी असतो. मात्र शेअरमधील गुंतवणूक ही दीर्घकाळात सातत्याने सर्वोत्तम परतावा देणारी आहे. तिच्याकडे डोळसपणे बघण्याची आवश्यकता आहे.

-शेअरमधील गुंतवणूक स्व-विचारानेच करावी. जाणकारांकडून त्यातील सूत्रे जरूर शिकावीत. पण त्यांच्यावर अवलंबून राहू नये. इतरांच्या सल्ल्याने करू नये. स्वतःच्या विचारांनी करावी.

-जेवढी सुटसुटीत गुंतवणूक तेवढी चांगली. हे तत्त्व समजलं की अवडंबर कमी होते, गुंतवणूक सुटसुटीत होते.

-सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे सूत्र : ‘आपला भारत देश जसा अधिकाधिक प्रगत होतो आहे तसतशी, महागाई आणि व्याजदर कमी होण्याकडे कल असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘मी व्याजावर जगेन’ या भ्रमातून जेवढे आपण लवकर बाहेर पडू तेवढे चांगले. आपण वाढणाऱ्या मुद्दलातून जगणार आहोत, ही भावना मराठी माणसाने वाढवायला हवी.

तरुणांसाठी असे सांगेन की, स्वतःमधील गुंतवणूक सर्वात आधी करा. नवनवीन कौशल्य आत्मसात करा. डोळसपणे शेअर गुंतवणुकीकडे बघा, तो सट्टा नाही. शेअर ट्रेडिंग करण्यात आपली शक्ती खर्च करू नका. मात्र गुंतवणुकीतून दीर्घकालीन पुंजी निर्माण करणे अतिशय उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकतं, अशी शेअरमधील गुंतवणूक आहे, याचा जरूर विचार करावा. शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुमचा व्यवसाय, नोकरी यात कौशल्य संपादन करा आणि त्यातून गुंतवणूक करा. यातूनच तुमचा भविष्यकाळ अधिक समृद्ध होईल.

वृद्धांसाठी मी असे सांगेन की, आपले मुद्दल जपा. काही प्रमाणात शेअर गुंतवणुकीकडे वळा, इंडेक्स फंडांच्या माध्यमातून सहज गुंतवणूक करता येते आणि आपले पैसे मोठ्या कंपन्यांतच गुंततील असे बघता येते. ज्येष्ठांना अधिक महागाई आणि अधिक व्याजदर परवडतो, मात्र कमी महागाई आणि कमी व्याजदर असा काळ कधी परवडत नाही. पण येणारा काळ कमी व्याजदराच्या  दिशेचा आहे. म्हणून सावध रहा. त्याचबरोबर मुदतठेवींबरोबर सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांकडे देखील अवश्य बघा. उतरणाऱ्या व्याजावर तो एक रामबाण उपाय आहे.

डॉ. अभिजित फडणीस

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..