नवीन लेखन...

इंदू वंदन

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व  दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला दीप्ती बर्वे-भागवत यांनी लिहिलेला लेख)


घरची स्त्रीच घराला घरपण देत असते… आज्जीच्या प्रसन्न स्वभावाने कोकणातलं घरही सदैव समाधानाच्या सरींत भिजत राहिलं… पैशांची श्रीमंती असली म्हणजेच माणूस मणभर सुखी होतं नसतो… जे मिळालं आहे त्यात संतुष्टता आणि समाधान मानलं तरच मन भर सुख त्याला मिळतं…

‘दीप्ती अग ये सांगत्ये तुला.. ये बस , अग तिथे कुठे … या इथे माझ्या जवळ बैस …..

ऐक, मी काय म्हणते….’

किती सांगायचं होतं तिला… बापरे… इंदिरा बर्वे माझी काकू आज्जी – वास्तव्य चिपळूण निर्व्हाळ… तिचं वय 98 वर्ष… हो हो 98…. पण उत्साह 16 वर्ष वयाचा….

या वेळी कोकणात खरंतर तिलाच भेटायला गेले होते… आई बाबा तिथे महिनाभर होते… त्यांच्यापाशी फार आठवण काढत होती आज्जी माझी आणि तिच्या पणतीची… म्हणजे माझ्या लेकीची जुईची… मग बोजा बिस्तरा गुंडाळला आणि तडक गेले निर्व्हाळला…एकटी असल्याने, नेहमी माझ्या आत्तेकडे वरच्या घरी असणारी आज्जी काही दिवस खालच्या- बर्व्यांच्या म्हणजे तिच्या घरात राहायला आली होती…. आम्हाला पाहिलं तेव्हा केवढा आनंद झळकला तिच्या डोळ्यात…  98 व्या वर्षीही दृष्टी उत्तम, स्मरणशक्ती सर्वोत्तम, बोलणं सुस्पष्ट, सगळं स्वतःचं स्वतः करणं, याबरोबर सारख्या कोकणी सूचना अन् प्रश्न विचारतं राहणं… ‘काय गो दीप्ती, हे गं काय झालं, ते कुठे ठेवलंस…’ ‘ओ दीप्ती बाई आज तुम्हीच करा – आमटी भात, भात अगदी मऊसूद हवा… आणि सोबत आंब्याचं लोणचं आणि पपईचं रायतही… पपई रायतं माहित्ये ना कसं करतात ते, नाहीतर सांगत्ये हो मी…’ ‘काय गं –  2 वाजले घड्याळात… जेवायचे कधी तुम्ही सगळे… आणि ती भारती कुठे राहिली? (भारती वहिनीवर विशेष जीव तिचा – भारती ही आमच्या कडे काम करणारी – घरचीच एक मेम्बर ) सर्वांच्या चिंता काळज्या वाहते आज्जी आजही…

सगळंच काय ते तिचं अनुभवी सांगणं , पण ऐकत रहावं असं…

कोकण एकवेळ तुम्हाला नुसतं बघून कळणार नाही पण आज्जीला भेटून न बघताही कळेल, असं गमतीनं म्हणते मी तिच्याबद्दल… शेताच्या विहिरीच्या अप्पांच्या माडाच्या झाडांच्या कित्येक गोष्टी आज्जी मला सांगत रहायची आणि ते सारं काही मी पोटभर ऐकत रहायचे… आज्जीच्या गोष्टी लहान असल्यापासूनच ऐकायला आवडायच्या मला… पण आता मोठेपणी आज्जीच्या अनुभवी कथा कहाण्याही फार काही सांगून गेल्या मला … कसा केला असावा संसार तिने इतक्या लहान वयात?

वडील लवकर गेले मग 14 वर्षातच लग्न झालं… लवकर मुलंही झाली पण सगळीच काही जगली नाहीत… घरातही तशी गरिबीच… पुन्हा घरकामाचा व्याप फार मोठा… गाई गुरं म्हशी  सगळाच मोठ्ठा कुटुंबकबिला… पुन्हा आजोबांच्या भिक्षूकीच्या पैशातून केलेला संसार… त्यातही अप्पा आजोबा कधीही कुणाला पूजा कार्याच्या पैशांवरून नडले नाहीत… मैलोन् मैल प्रवास करून आपली कार्य सेवा ते निष्ठेने प्रामाणिकपणे करीत राहिले… रामजी गडी कायम त्यांच्या सोबतीला… अनेकदा तर आपली कामगिरी आटोपून परत घरी येताना रात्र व्हायची त्यांना. मग डोंगरात मिट्ट अंधारात कंदिलाच्या प्रकाशात मैलोन्मैल चालत घर गाठलंय त्यांनी…

घरची स्त्रीच घराला घरपण देत असते… आज्जीच्या प्रसन्न स्वभावाने कोकणातलं घरही सदैव समाधानाच्या सरींत भिजत राहिलं… पैशांची श्रीमंती असली म्हणजेच माणूस मणभर सुखी होतं नसतो… जे मिळालं आहे त्यात संतुष्टता आणि समाधान मानलं तरच मन भर सुख त्याला मिळतं… मग शेणाने सारवलेल्या जमिनीवर – चिराच्या दगडात, मातीच्या भिंतीतही… प्रपंचाचा वसंत ऋतू सर्वकाळ फुलतो,  बहरतो…

आज्जीने जे अन्न खाल्लं ते 100% ऑरगॅनिक फूड – घरचे तांदूळ, आंबे फणस, केळी, काजू, अगदी चिंचही घरचीच काटकसरीचा संसार तरीही कायम आनंद मानला त्यात तिने…

परसात तिने लावलेल्या फळभाज्या…  फुलांची विविधरंगी झाडं वेली, तिची बाग…. वेगवेगळ्या पक्षी फुलपाखरांचे ते निवासस्थान.

‘दीप्ती ती बघ ती चवई… रानकेळीला चवई म्हणतात कोकणात… ऐकलुस का,  त्यालाही येतं हां केळफुल… आणि त्याचीही भाजी खातो, करतो आपण.. छान लागते…’

पाऊस पडत होताच सारखा आणि प्रत्येक पाऊस सरीत कित्येक आठवणीत ती भिजत होती आणि मला भिजवत होती…

मीही तो भूतकाळ जगत होते…

‘इकडे ये गं, तो बघ तो समोरचा माड पाहिलास का?  तो माड मी लावलाय … पण कधी फळ म्हणून दिलन् नाही त्याने  (कोकणात आलनी गेलनी केलनी दिलंन घेतलन असे ‘न’ युक्त सानुनासिक बोलणं असतं) तर , किती जण म्हणाले तोडून टाक तो इंदू … माड केवढा वाढलाय तरी एक नारळ नाही त्याला … पण मी काही तो तोडला नाही हो म्हणजे तोडूही दिला नाही कुणाला..  म्हटलं.. फळ नाही तर नाही पण झाडू(खराटा) करत्ये की त्याचा , झावळ्याही मिळतायत , आणि मुख्य म्हणजे – (हा तिचा खास शब्द) मुख्य म्हणजे – सावली मिळत्ये ना त्याची – आल्या गेल्याला… आणखी काय हवंय…’ हा सावलीचा मुद्दा जरा खोलवर स्पर्श करून गेला मला…

मी राहिले त्यातला एक दिवस जरा शांत शांत होती , जवळ बसले मी तिच्या ..  खूप वेळ झाला तरी काहीच बोलली नाही … मग काय झालं कोण जाणे … अचानक तिच्या भावनांना शब्दांचा पाझर फुटला… ओटीवर बसलो होतो तेव्हा म्हणाली, ‘…आज बघ झाडं कशी शांत, एकदम चिडीचूप बसलीयेत… काल पावसानं झोडपलंन् ना त्यांना.. म्हणून आज दमलीयेत बिचारी… बघ एकही पानं हलत नाहिये झाडाचं…’ एका झाडाची भाषा तेव्हाच कळते जेव्हा  त्यांचा श्वास – उछ्वासाचा संवाद समोरच्याला ऐकू येतो, आतून जाणवतो… 98 वर्षांचे कित्येक पावसाळे जगलेली माझी काकू आज्जी, तिला ते का ऐकू येणार नाही?… निसर्गाच्या कुशीतच लहानाची मोठी झाली ती… तसं पाहिलं तर फक्त तीन किंवा चार इयत्ता शिकलेली ती इंदू… पण किती शहाणपण शिकवलं तिला अनुभवाच्या शिक्षणाने… चूल मुलं अप्पा, पूजा, घरचे दारचे, मुंबईचे, आला गेला, गडी, शेण, अंगण, सारवण, पाणी, विहीर, नाती गोती एवढंच जग तिचं… फार फार बोलत, सांगत होती ती.. आणि मी सगळं ऐकलं तिचं, फार बोलूही शकले नाही कारण आजकाल कानांनी कमी ऐकू येतं तिला…

पडवीत बसलो होतो एका सकाळी… चुलीवर आठिळ्या भाजत होती भारती वहिनी … खुर्चीत बसलेली आज्जी , अचानक म्हणाली.. ‘बघितलस ना बाहेर…’

आंब्या फणसाची, काजूची अगदी भरपूर झाडं आहेत… त्यांची फळे खायला नकोत का कुणी? म्हणून मला एकटीला काय ती खाली ठेवून बाकी गेलेत सगळे वर , म्हणतायत वरूनच मला…  खा – हवं ते खा, भरपूर खा, आमच्याही वाटणीचंही खा…’ हे सगळं बोलली आणि आभाळभर हसली… वय बोलतं माणसाच्या वागण्यातून नकळत… ती तर 98 वर्षांची… मला तर काय करावं कळलंच नाही क्षणभर… पण एक विचार पक्का केला मनाशी… जेव्हा जमेल तेव्हा यायचं तिला भेटायला… निरपेक्ष माया प्रेम – पैशांनी विकत मिळत नाही कधीही… ती माया फक्त आपुलकीच्या माणसांपाशीच मिळते… आज्जीने याही वेळेला न मागता खूप खूप काही दिलं आणि शिकवलं… निघताना नेहमीप्रमाणे डोळ्यातली आसवं, टिपं – गाळली, ‘लवकर ये हो.’ म्हणाली, ‘गाडीला सावकाश चढ आणि पोहोचलीस की कळवं…’ एवढं म्हणून… पदराने डोळे पुसले, माझ्या, जुईच्या गालावर पापा घेऊन दोघींना अच्छा म्हटले…

नेमकं काय मिळालं – या आजी भेटीत?  सांगायला शब्दही अपुरे आहेत… काळीज सुखाने भरलंय तिथे तिचं आणि तिच्या अनावर ओढीनं मायेनं… इथे माझं…शुभम भवतु, सखी-दीप्ती

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व  दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला दीप्ती बर्वे-भागवत यांनी लिहिलेला लेख)

-दीप्ती बर्वे-भागवत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..