नवीन लेखन...

‘हुतूतू’- जगणे विकणे आहे !

गुलजारच्या चित्रपटांची नावे विचारात टाकतात. कथावास्तूशी असणारा त्यांचा संबंध जोडणे इतके सोपे नसते. “हुतूतू ” पाहायला मी पुण्याच्या सोनमर्ग चित्रपटगृहात दुपारी गेलो तेव्हा याच विचारात होतो. बघायला सुरुवात केल्यावर नेहेमीप्रमाणे गुंगून गेलो.

पात्रांची मराठी नावे (बर्वे ,गद्रे अशी ) आणि नाना पाटेकर ,सुहासिनी मुळे ,शिवाजी साटम ,मोहन आगाशे अशी एकसे एक मराठी मंडळी ! भरीस भर म्हणजे ” निकला नीम के तलेसे निकला” अशी फक्कड मराठी लावणी ! मग एका मराठी खेळाचे नाव देण्यामागील कोडे काहीसे उलगडले.

राजकारण आणि सामूहिक अस्वस्थ हुंकार,त्यात अतिरेकी घटना यावर पुन्हा एकदा गुलजारचा रोख दिसतो. तो या अराजकामुळे अस्वस्थ झालेला पदोपदी जाणवतो. फरक इतकाच की “हुतूतू ” मध्ये शाळा आणि शिक्षक यांची योजना करून भविष्यासाठी आशेचे थोडे किरण दाखवितो. ही सकारात्मकता खरं तर गुलजारची निशाणी ! काही चित्रपटांमध्ये ही हरवते तर काही ठिकाणी क्षीण ,अस्पष्ट ,अंधुक झालेली जाणवते. इथे मात्र त्या ऊर्जेची खूण जाणवते आणि हायसे वाटते.

आणखी एक काळजी त्याने इथे घेतली आहे – “आँधी” च्या धड्यापासून/ धसक्यापासून (?) तो सज्ञान झाला असल्याने इथे सुहासिनीच्या भूमिकेला कोठलाही रंग त्याने चोपडला नाहीए . राजकीय भूमिकेतील सुहासिनी इथे आब राखून हिंडते. त्याचवेळी shrewd (राजकीय व्यक्तीची आंतरिक ओळख) छटाही ती अचूक दाखविते. आयुष्याच्या संधीपर्वात इतकी जबरदस्त भूमिका वाटयाला येणे पूर्वसुकृताशिवाय शक्य नाही. नाना इथे काळावर भाष्य करणाऱ्याच्या भूमिकेत आहे. ” बंदोबस्त हैं ,जबरदस्त हैं “, ” घपला हैं ,घपला हैं ,घपला हैं भाई ” (चक्क या गीतात “अग बाई ” सारखे मराठी बोल आढळतात ) आणि ” जागो जागो जागते रहो ” अशा तब्बल तीन रचनांमधून गुलजार त्याचे इरादे स्पष्ट करतो आणि नाना पाटेकर जागल्याची /पहारेकऱ्यांची (भविष्यकाळातील “लोकपाल ” संकल्पना ) भूमिका चोख वठवतो. अशा व्यक्ती व्यवस्थेविरुद्ध फारकाळ ” बोलक्या ” असणे कोणालाच परवडणारे नसते. त्याला विजेचे झटके देण्यात येतात. वस्तीतील जोशी मास्तरांची तुरुंगात हत्या होते पण ती आत्महत्या भासविली जाते. विरोधाचे असे स्वर दाबले गेले की अनिर्बंध सत्ता उपभोगता येते.

हे सारे असह्य होऊन तब्बू आणि सुनील शेट्टी (एकेकाळचे प्रियकर -प्रेयसी ) आपल्या पालकांना धडा शिकवण्याचे ठरवितात. निवडणुकीच्या प्रचार सभेत घुसून ते मानवी बॉम्बच्या रूपाने विध्वंस करतात. स्वतः बरोबर आसपास जे न रुचणारे आहे ते अशा मार्गाने संपवितात आणि काव्यगत न्याय हेही एक भावनिक उत्तर आजच्या समस्यांवर असू शकते असे सुचवितात.

सुनील शेट्टीचा प्रियकर ते अपहरणकर्ता हा प्रवास सहजी पचनी पडत नाही त्यामागे गुलजारच्या प्रयत्नांना तितकीच विश्वासार्ह जोड देण्यात सुनीलचा अभिनय कमी पडला आहे. सगळ्याच बाबतीत मर्यादा असलेला हा कलावंत ! तब्बू नेहेमीप्रमाणे सहज ,साच्यात पक्की !

नाना बद्दल काय बोलणार ! “पाहिजे जातीचे “पासून या कलावंताला अगदी अलीकडच्या “आपला माणूस “पर्यंत मी बघितलं आहे. चोख बंदा रुपया ! त्याच्या वास्तव जीवनातील छटांचे प्रतिबिंब हुतूतू मधील “भाऊ ” या भूमिकेत पडले आहे. सलाम !

तब्बू आणि सुनील मधील नातं वाटा वळणांनी प्रगल्भ होत जाते. इथेही मीलन -विरह -मिलन via फ्लॅशबॅक आहेच.

” ये आँखे ,ये नम आँखे —-
जिन आँखोंमे तुम रहते थे
उनमे अब आसूं बहते हैं !
बहते ना जाना तुम आँखोंसे “

ही गुलजारची हळवी काव्यओळख पुन्हा एकदा लताने अधोरेखित केली आहे.

राजकारणी वेळप्रसंगी त्यांच्या मुलांचा बळी देऊ शकतात आणि त्यांची मुले “everything is fair in love and war ” असं प्रत्युत्तर देऊ शकतात, असा हा प्रवास बघून विचारात पडायला होतं . खेळात हार-जीत असणारच पण वेळप्रसंगी ती खेळच संपवू शकते ( व्यवस्थापनशास्त्रातील “लूज -लूज” परिस्थिती) हे भयाण वास्तव हा हुतूतू चा मला उमगलेला अर्थ आहे.

(सदर लेख माझ्या “गुलज़ार समजून घेताना ” या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.)

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..