नवीन लेखन...

हम नही सुधरेंगे

आटपाट नगर होतं. तेथे बाहेरून आलेल्या एका राजाचा अंमल होता. काही कारणाने राज्यात उलथापालथ झाली व राजास पायउतार होऊन पसार व्हावे लागले. लोकांनी राज्यकारभार चालविण्यास सुरूवात केली. अनुभवाचा अभाव असल्याने प्रजेवर नियंत्रण करणे जमत नव्हते. होणार्‍या दुर्लक्षाचा फायदा उठवीत नागरिकही स्वातंत्र्याची चव चाखू लागले. त्याची पुढे चटक लागली. कोणतेही बंधन नकोसे वाटू लागले. जो तो स्वातंत्र्याची व्याख्या स्वतःच्या सोयीने करू लागला. कसलाही ताळमेळ राहिला नाही. अंदाधुंदी माजली. जनजीवन दिशाहीन होऊ लागले. लोकांनी बनविलेले सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्कल लढवून कायदे करू लागले. नागरिकांना सुखसोयी पुरविण्यासाठी योजना, नियमावली आखू लागले. अंमलबजावणीस सुरूवात करून लोक कितपत स्वीकारताहेत याचा अंदाज घेऊ लागले. एव्हाना कोणतेही बंधन म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला या निष्कर्षावर येऊन पोचलेला समाज बदलास अनुकूल राहिला नाही. कोणत्याही बाबीवर सुधारणेचा उपाय अमलात आणण्याचा प्रयत्न हाणून पाडणारी कृती नागरिकांकडून होवू लागली. ‘हम नही सुधरेंगे’ हे पालूपद ठायीठायी आळविले जाऊ लागले. सुधारणा करण्याचे किती तरी प्रयत्न झाले.

  • वाहनांनी प्रवास करताना व पायी चालताना सर्वांना रस्त्यावरून जाणे सोपे व्हावे व सुरक्षा लाभावी यासाठी सिग्नल यंत्रणा उभारली. जनजागृती करण्यास प्रशासक व सेवाभावी कार्यकर्ते यांनी मोहीम उघडली. पण लोकांनी बेशिस्तीचे प्रदर्शन करीत ‘हम नही सुधरेंगे’ चा संदेश दिला.

 

  • अपघात झाल्यास जीव तरी वाचावा म्हणून काही सुरक्षा-साधनांचा वापर करण्याची सूचना केली गेली. पण आम्ही जिवाची फिकीर करीत नाही ह्या भुमिकेतून ‘हम नही सुधरेंगे’ वर नागरिक ठाम रहिले.

 

  • प्रशासक म्हणाले, ‘ठीक आहे. तुमच्या जिवाला धोक्यात टाकायचे असेल तर टाका. दुसर्‍याच्या जिवाची तरी काळजी घ्या’. पण तिकडेही दुर्लक्ष करून पुन्हा आपले पालूपद सुरू, ‘हम नही सुधरेंगे’.

 

  • विविध ऋतूंमधे नगरात त्या त्या ऋतुबरहुकूम आजारपण, साथीचे रोग यांचा फैलाव होऊ लागला. प्रशासकांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व पटविण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक आरोग्यासाठी काही नियम पाळण्याचे आवाहन केले. पण ‘हम नही सुधरेंगे’ चा हेका सोडला नाही नगरवासियांनी.

 

  • अमली पदार्थ व आरोग्याला हानीकारक सवयी यांचा प्रसार सर्व स्तरावरच्या नागरिकांमधे झपाट्याने झाला. कुटुंबजीवन व सामाजिक सुरक्षा उघड्यावर आली. व्यसनाधीनता घालविण्यासाठीचे कायदे ठोकरण्याइतके भान दाखवीत ‘हम नही सुधरेंगे’ च्या मूळपदावर लोक आले.

 

  • शिक्षण सर्वांना मिळावे व ते दर्जेदार असावे ही गोष्ट सर्वांना पटली. पण त्यासाठीचे निकष व नियम हे लादले जाऊ नयेत हा आग्रह धरला गेला. दर्जा कशा प्रकारे जोखायचा व शिक्षणात कशाचा समावेश असावा याचे स्वातंत्र्य प्रत्येक संस्थेने अबाधित राखले. ‘फी भरून संस्थेत प्रवेश घेण्यापासून डिग्री घेऊन संस्था सोडेपर्यंत आम्ही करू तीच पूर्व’ अशी परिस्थीती राज्यात उद्भवली. प्रशासकांनी अनुदान, रँकिंग वगैरे अनेक प्रकारे नियंत्रण राखता येते का ते पाहिले. पण संस्थांमधे ‘हम नही सुधरेंगे’ ला जोर चढला होता.

 

  • राज्यकारभार हाकण्यासाठी सेवेत कर्मचारी लागतात. राज्यात सुविधा पुरविण्यासाठी खाजगी तसेच सरकारी आस्थापना अवश्यकतेनुसार चालवाव्या लागतात. भरती-निवृत्ती चे चक्र सुरू असते. कामाच्या स्वरूपानुसार लायक उमेदवार निवडणे आवश्यक असते हे सर्वांना मान्य होते. अगदी सरकार, आस्थापना व नागरिकांना सुद्धा. पण ‘लायक’ कशाच्या आधारावर म्हणायचे याची व्याख्या आम्ही ठरवू, नियम कुठे शिथिल करायचा तेही आम्ही ठरवू आणि वरच्या पदावर कोणी जायचे याचा निवाडा आम्हीच करू; अशा स्वातंत्र्य जपणार्‍या बाण्यानुसार सेवा पुरविण्यात येऊ लागली. सेवेचा दर्जा घसरला. सावरण्यासाठी काही नियंत्रण राखण्याचा प्रयत्न झाला. पण कर्मचार्‍यांकडून ऐकू आला ‘हम नही सुधरेंगे’ चा नारा.

 

  • सांस्कृतिक ठेवा जपणारे राज्यातील नागरिक सण-उत्सवात रमू लागले. घरोघरी सण साजरे करून पौरजन सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेऊ लागले. हळू-हळू स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झालेले सार्वजनिक उत्सव देखाव्यांपेक्षा दिखाऊपणाच्या आहारी गेले. सर्व प्रकारच्या प्रदूषणाने वातावरण बिघडू लागले. जनआरोग्य धोक्यात येत असल्याचे पाहून प्रशासकांना नियमांचा आधार घ्यावा लागला. पण गळेकापू स्पर्धेपुढे प्रशासकांचे काहीच चालले नाही. फक्त स्पर्धकांचे ‘हम नही सुधरेंगे’ चे पालूपद चालले.

 

  • सर्व जगात होत असलेली तांत्रिक प्रगती आटपाट नगरातही पोचली. संदेशांची देवाण-घेवाण, षट्खंडातली खबरबात, व्यक्ती-व्यक्तींमधील व व्यक्तीगटांमधील संपर्क चुटकीसरशी होऊ लागले. या विश्वात फोटो काढण्यासारखे म्हणून जे जे आहे त्यांच्या संख्येपेक्षा कॅमेर्‍यांची संख्या जास्त झाली. पूर्वी फोटोग्राफर फक्त स्टुडिओत व समारंभात दिसत असत. आता या आटपाट नगरात कोठेही कॅमेरा वळवून फोटो काढलात तर एक तरी दुसरा फोटोग्राफर त्यात दिसेल. स्वतःचा फोटो स्वतः काढण्यापर्यंत मजल मारलेले तंत्रज्ञान प्रत्येकाच्या मुठीत आले. आटपाट नगर क्लिक्-क्लिकाटाने उजळले. नगरात होत असलेली प्रगती पाहून कारभारी नगराला ‘स्मार्ट’ म्हणण्याच्या तयारीला लागले. नगरातले नागरिक ‘काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम्’ च्या चालीवर, ‘गेम, व्हॉट्सॅप, फेसबुकेन कालो गच्छति सर्वदा’ ह्या नव्या सुभाषिताने चालू लागले. थोड्याच काळात या तंत्रज्ञानाने लोकांना व्यसनी बनविले. नगराचे प्रशासक अचंबित झाले. ‘नागरिकांना स्मार्ट बनविण्यास निघालो, तर हे काय मधेच उपटले?’ अशा विवंचनेत ते पडले. त्यांनी प्रामाणिकपणे धोक्याची जाणीव लोकांना करून दिली. पण पालथ्या घड्यातून ‘हम नही सुधरेंगे’ हेच ऐकू आले.

 

  • पावसाळा सुरू झाल्यावर नगरजन खुशीत दिसू लागले. जलस्त्रोतांचा, धबधब्यांचा शोध घेत शेकडो ‘कोलंबस’ रानोमाळ व डोंगर-दर्‍यातून फिरू लागले. नव्या तंत्रामुळे हे शोध ताबडतोब सर्वांपर्यंत पोचू लागले. पावसाळ्यात येणार्‍या सुट्या जल-पर्यटनस्थळी घालविण्याची प्रथा पडली. वर्षागणिक पर्यटक वाढू लागले. असंख्य लोकांना सोयी-सुविधा पुरविणारांना रोजगार मिळाला. काही प्रमाणात बेकारी कमी झाली. पर्यटक आनंद घेण्यात, फोटो काढण्यात इतके गुंतू लागले की स्वतःच्या जिवाचे काही बरे-वाईट घडू शकेल अशी शंकाही त्यांना येईनाशी झाली. जीव गमावणारे वाढू लागले. प्रशासकांनी सूचना लिहिल्या, जीवरक्षक नेमले. पण अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. काही पर्यटन स्थळे बंद करावी लागली. स्थनिकांचा रोजगार बुडाला. पर्यटक नाराज झाले. सूचना फलक पर्यटकांनी वाचावे व सावधगिरी बाळगीत नियमांचे पालन करावे ही अपेक्षा होती. पण नियम पाण्यात विसर्जित केलेल्या लोकांना पाठ होते आपले ब्रिदवाक्य, ‘हम नही सुधरेंगे’.

 

एका चतुर व्यक्तीने समुद्रकिनारी असलेल्या सुचना फलकासंबंधी सूचना केली ती अशी – ‘समुद्रकिनारी असलेला सूचना फलक पर्यटकांच्या येण्याच्या बाजूस तोंड करून लावला असता फायदा होत नाही हे सिद्ध झाले आहे. मग तो फलक, जेथे लाटा धडकतात तेथे समुद्राकडे तोंड करून लावायला काय हरकत आहे? पहिली शक्यता अशी की, कदाचित समुद्र समजून-उमजून वागेल. निदानपक्षी त्याला ब्रिदवाक्य तरी ठाऊक नसेल. दुसरी शक्यता ही की, फलक आपल्या दृष्टीआड लावला याचा अर्थ न वाचण्याजोगे काही तरी असेल, या विचाराने एखादा माणूस वाचेल. त्याचा जीव वाचला तर बोनस.’

अशा या आटपाट नगरीत कालांतराने नवे शासन नेमण्याची वेळ आली. वरील कल्पक सूचना करणारास प्रशासक म्हणून नेमावे असे खुल्या दिलाने सर्वांनी मान्य केले. त्याने पदभार स्वीकारताच घोषणा केली की मी लोकांच्या पालुपदाशी सहमत आहे. सर्वांना पूर्ण स्वातंत्र्य असेल. कोणीही नियमांची फिकीर करू नये.

आज तुम्ही आटपाट नगराला भेट दिलीत तर, तुम्हाला शिरस्त्राण घातलेले बाहुबली दिसतील; लाल दिवा व हिरवा दिवा यातला फरक ओळखणारे दिसतील; सार्वजनिक ठिकाणी घाण कारणाराला लोकच हटकतील; सर्व शाळा-कॉलेजमधे शिक्षण मिळत असलेले दिसेल; प्रमोशनसाठी कोणीही भांडताना आढळणार नाही; सार्वजनिक उत्सव होतात की नाही अशी शंका तुम्हाला येईल; फोनचा वापर मात्र भरपूर होत असलेला दिसेल. फोनला स्मार्ट म्हणायचे की लोकांना स्मार्ट म्हणायचे असा प्रश्न तुम्हाला पडेल. धक्यावर धक्के बसतील तुम्हाला.

समुद्र मात्र जसा खवळायचा तसाच खवळत असलेला दिसेल. कारण, त्याला बदलायचे कारणच नव्हते.

नारदाने ही कथा देवलोकात चातुर्मासानंतर, देव जागे झाल्यावर सर्वास सांगितली. देव धन्य झाले. अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण.

— रविंद्रनाथ गांगल 

 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

2 Comments on हम नही सुधरेंगे

  1. खरोखरच भारत आता बेशिस्त लोकांचा देश बनायला लागला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..