नवीन लेखन...

गोंधळ

आडगेवाडीतल्या अण्ण्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं. जास्त काही नाही, फक्त दोन डोकी फुटली. एका आगाउु आडगेवाडीकराने वर्‍हाडातल्या पोरीला शिटी मारली म्हणून थोडा दंगा झाला, पण बापूच्या चोख व्यवस्थापणामुळे लगेच आटोक्यात आला. लग्न होउुन चार दिवस उलटले. पूजा झाली, फक्त गोंधळ तेवढा बाकी होता. आईबापाला काही पडलेली नव्हती, ते गोंधळात इंटरेस्टच घेत नव्हते. म्हणून अण्ण्याने बापूला सांगून गोंधळयांची व्यवस्था करायला सांगितले. त्याने स्वत:च जाउुन सांगितलं असतं, पण गावात गोंधळी नव्हते आणि नवरदेवाने लग्न झाल्यावर हातातले हळकुंड सोडेपर्यंत तोंड वर करून गावाची शिव ओलांडायची नसते अशी प्रथा असल्याने आण्ण्याचा नाईलाज होता.
बापूचा लोकसंग्रह दांडगा म्हणून लग्नाची सगळी व्यवस्था बापूने अंगावर घेतलेली. त्यात बापूचा काहीही फायदा नाही पण पुढे पुढे होउुन पुढारीपणा करायचा त्याचा शौक तो अशा प्रसंगातून भागवून घ्यायचा. शिवाय वयाने सगळ्यांनाच वडिलधारा असल्याने सहसा त्याचा शब्द कोण मोडत नव्हते. पाच मैलांवर शिंदेवाडी होती. तिथल्या गोंधळयांची जोडी सगळया पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. बापूने सांगितल्यावर लगेच एक माणूस टांग टाकून सायकलीवरून शिंदेवाडीला गेला आणि त्याच रात्रीची गोंधळाची सुपारी देउुन आला.
“बाबा, त्यांना लवकर यायला सांगितलं आहेस का?”
“मग, दिवस बुडायच्या आत टच व्हायला सांगून आलोय.”
“ते एक चांगल केलंस बघ. आणि त्यांना रस्ता कुठला सांगितलास?”
“काय बापू तुम्ही पण विचारताय राव रस्ता कुठला सांगितलास म्हणून! त्या भूताच्या पांदीशिवाय दुसरा रस्ता आहे का वाडीला यायला?”
बापू त्याच्या उत्तरावर गप्प बसला. भूताची पांद ही वाडीजवळची ऐतिहासिक जागा होती. रात्री अपरात्री तिथून कोण आला की त्याला काहीतरी विचित्र अनुभव यायचे. लक्सूबापूला याच पांदीने वेड लावलं होतं. शेवटी त्याने तिथल्याच एका विहीरीत उडी टाकून जीव दिला होता. तेव्हापासून तर लोक दिवसाही तिथून जायला घाबरायचे. एकदम निर्मनुष्य रस्ता होता. रस्त्यावरून चारचाकी चालायचीच नाही. कशीबशी बैलगाडी जात असे एवढा ओबडधोबड. सायकल मात्र एका बाजूने चाकोरी धरून चालवता यायची. पण जी काही वर्दळ असेल ती दिवस बुडायच्या आतच असायची. बाकी इतरवेळी चिटपाखरूही नसायचं. म्हणून या बाबाने नीट सांगितलं नसेल तर गोंधळाची पंचाईत व्हायची ही बापूला काळजी लागलेली.
दिवस बुडाला. सात वाजून गेले, आठ वाजले तरी गोंधळयांचा पत्ता नाही. गोंधळाला लागणारं सगळं सामान घरात आणून ठेवलेलं. अण्ण्या घाईवर आलेला. लग्न होउुनही काही उपयोग नव्हता. गोंधळ झाल्याशिवाय बायकोजवळ जाता येणार नव्हते म्हणून तो वैतागला होता. लोक बायकोशी बोलूही देत नव्हते. गोंधळी आले नाहीत तर भटजीला बोलवून गोंधळ घाला म्हणून तो नाचायला लागला होता. एवढा टाईम होउुनही ते लेकाचे अजून का आले नाहीत म्हणून बापू चिंतेत होता. तसल्या काळ्याकुट्ट अंधारात कुणीही एकटा जायला तयार झाला नसता म्हणून बापूने दामा आणि गण्याला सायकली घेउुन शिंदेवाडीकडे पिटाळले.
दोघेही सायकलवरून रस्त्याचा अंदाज घेत बॅटरीच्या उजेडात चालले होते. अर्धा रस्ता गेल्यावर त्यांच्या कानावर संबळाचा आवाज येउु लागला. दोघांचेही कान खडे झाले. त्यांनी चमकून एकमेकांकडे पाहिले. काहीतरी आक्रित घडलं होतं यात वादच नव्हता. त्या रस्त्याने जसजसे ते जवळ जाउु लागले तसतसा त्यांच्या कानावर माणसाच्या गाण्याचा आवाजही यायला लागला. अजून पुढे गेल्यावर संबळ आणि गोंधळाची पदं ऐकू येउु लागली. पांदीतल्या भूताने दोघा गोंधळयांना धरलंय याची त्यांना खात्रीच झाली.

गोंधळयांनी शिंदेवाडीतला एक गोंधळ आटोपला. बराच उशिर झाला होता. आडगेवाडीच्या सुपारीला दिवस बुडायच्या आत या म्हणून सांगितले होते. पण तिथेच मुक्काम करायचा आहे, थोडा वेळ लागला तरी हरकत नाही असा विचार करून सायकलीवरून ते आडगेवाडीकडे निघाले. ते नेमके भूताच्या पांदीत आले आणि कुठून कुणास ठाउुक दोन भलेमोठे लांडगे समोर येउुन उभा राहिले.
सायकली तशाच बाजूला टाकून लांडग्यांना पळवून लावण्यासाठी दोघांनी खूप आरडाओरडा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लांडगे मागे हटायला तयार नव्हते. अंधारात त्यांचे चकाकाणारे डोळे बघितल्यावर दोघांच्या तोंडचं पाणी पळालं. लांडगे गुरगुरायला लागल्यावर विचार करायला वेळही नव्हता. दोघांनीही सरळ संबळ काढले, कमरेला करकचून बांधले, हात जोडले आणि “आई अंबाबाईच्या नावानं …” सुरू केलं. लांडग्यांनाही मजा वाटू लागली. उभे असणारे लांडगे संगीत गोंधळ ऐकत पायावर पाय टाकून आरामात खाली बसले. संबळ थांबला की गुरगुरायचे. गोंधळयांचे सगळे देव बोलवून झाले. संबळ बडवून हात दुखायला लागले पण लांडगे हटेनात.

दामा आणि गण्या सावधपणे पांदीजवळच्या चढावर आले. खालच्या तालीतून आवाज येत होता. समोर दिसायला काहीच मार्ग नव्हता. आधीच रात्र, त्यात मोठमोठ्या झाडांनी अजून काळोख वाढला होता. सायकली वरच्या बाजूला उभा करून कानोसा घेत ते हळूहळू खाली उतरू लागले. नजरेच्या टप्प्यात आल्यावर त्यांना समोरचा सीन दिसू लागला. दोन भलेथोरले लांडगे आरामात पायावर पाय टाकून दर्दी रसिकासारखे गोंधळ ऐकत बसले होते आणि या दोघांचा गोंधळ रंगात आला होता. थोडावेळ ह्या दोघांनीही त्या अनोख्या मैफलीची मजा घेतली. शेवटी गोंधळ्यांना तर घेउुन जायला पाहिजे म्हणून त्यांनी आरडाओरड करत बॅटरीचा उजेड लांडग्यांच्या डोळयांवर मारला आणि त्यांना पळवून लावले तरीही अंगात आल्यासारखे गोंधळी सुंबूळुंग गुंबूळुंग वाजवतच होते. पुढचे दोन लांडगे पळून गेल्याचा त्यांना पत्ताच नव्हता.
“कोल्हापुरची लक्षुमी गोंधळाला यावं न् जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला यावं.” हे त्याचं चालूच होतं. शेवटी दामा आणि गण्याने जाउुन त्यांचे हात धरले तेव्हा ते भानावर आले.
“ये खंडेरायाच्या लाडक्यांनो, बास करा आता. च्यायला, दिवस बुडायच्या आत या म्हटल्यावर हा टाईम आहे होय रे तुमचा? गुंडाळा आता हे सगळं आन् चला आमच्यामागं गपगुमानं.”
कपाळावरचा घाम पुसून धरथरत्या अंगाने दोघा गोंधळ्यांनी आपला बाडबिस्तरा आवरला आणि निमुटपणे ते दामा आणि गण्याच्या मागे चालू लागले. शेवटी भेदरलेल्या गोंधळयांची वरात घेउुन ते आडगेवाडीत पोहोचले आणि दिवसातला तिसरा गोंधळ चालू झाला.

©विजय माने, ठाणे

http://vijaymane.blog

चित्र : खलील आफताब

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..