नवीन लेखन...

घर ‘बसल्या’ काम !

कार्यालय आणि घर हे दोन महत्वाचे पण वेगळे कप्पे आपले आयुष्य व्यापून टाकतात. दोन्ही ठिकाणे वेगळी, तेथे असण्याच्या वेळा वेगळ्या, जबाबदाऱ्यांचे स्वरूप वेगळे ! काय सामाईक असेल तर – दोन्ही ठिकाणी “आपण” असतो.

माहिती -तंत्रज्ञान क्षेत्राचा उगम होईपर्यंत या सीमारेषा बऱ्यापैकी ठळक होत्या. अर्थात घरी कामाची कागदपत्रे आणणारी मंडळीही होतीच. त्यामुळे कार्यालय घरी आणणे आणि (डोक्यात का होईना) घर कार्यालयात बरोबर नेणे हे चालत आलं आहे.

माझ्या वरिष्ठांना घरी कामाच्या फाईली ब्रीफकेसमधून नेण्याची सवय (खोड म्हणत नाही कारण ते वरिष्ठ होते) होती. घरी कागदपत्रांचा पसारा मांडून,सतत फोनवर (त्याकाळी मोबाईल नव्हते) बोलत ते काम करीत बसायचे. पत्नी म्हणायची – ” तुमचं ऑफिस घरी आणत जाऊ नका. ते तिथेच ठेवत जा. हे माझं घर आहे ,त्याचं घरपण टिकू द्या .”

अशाप्रकारे रोजची वेळ संपली तरीही कार्यालयात काम करणारे ,सुट्टीच्या दिवशीही कामावर जाणारे आपल्या आसपास सतत असतात. कामाचं स्वरूपच असं असतं की कार्यालयात जाण्यावाचून गत्यंतर नसतं.

पण गेल्या दोन दशकात माहिती -तंत्रज्ञानाने ह्या भिंती पाडल्या आहेत आणि “वर्क फ्रॉम होम “नामक नवी संज्ञा अस्तित्वात आली आहे. या क्षेत्रातील बरंचसं काम  ” सेवा ” पुरविण्याचे असल्याने संगणक आणि त्यावरील प्रोग्रॅम्स ,सॉफ्टवेअर्स पुरेसे असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधून -मधून घरी काम करण्याची मुभा दिली जाते. त्यामुळे त्यांच्या काही व्यक्तिगत समस्यांवर हा यशस्वी तोडगा ठरतो.  तसेच कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ( वाहतूक) बहुतांशी उत्पादक नसतो. पुण्याहून आणि नाशिक /मनमाड हून रोज हजारो प्रवासी रेल्वेने मुंबईला अपरिहार्यपणे ये-जा करतात.संस्थेलाही वाहतुकीसाठी बससेवा किंवा भत्त्यांच्या रूपाने खूप खर्च येतो. तेव्हा उभयपक्षी त्यांत “लाभ “दायक परिस्थिती असल्याने ही संधी खूप प्रसिद्धी झाली.

कोविड -१९ चा  विश्वसंचार जसजसा वाढत गेला आणि हे संकट लवकर मिटण्याचे चिन्ह दिसेना ,तेंव्हा अपरिहार्यपणे काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल आवश्यक भासू लागला. गूगल ,मायक्रोसॉफ्ट आणि अशा अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत गरजांवर ( घरून काम , जास्त दिवस रजा, आणि वेतनात कपात न करणे ) विचार करायला तातडीने सुरुवात केली. सध्याच्या महामारीने सगळीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे कामाची वेळ , कामाची गुणवत्ता , संसाधनांचा अभाव, तंत्रज्ञानातील अडचणी इ. बाबत अनेक समस्या निर्माण व्हायलाही सुरुवात झाली आहे.

कार्यस्थळावरील परस्पर संबंध आणि मानवी भावभावनांचे शास्त्र यांवर आता मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु झाले आहे. त्यामधील काही महत्वाची निरीक्षणे –

१) घरून काम करताना एकाकीपणाची भावना वाढीला लागते. आणि कोरोनाच्या भीतीदायक सहवासात तर अनिश्चितता आणखी त्रासदायक ठरू शकते.

२) भावनांवर नियंत्रण अवघड जाते.

३) आसपास सहकारी असले की ताण तितकेसे जाणवत नाहीत.

४) घरातील अनौपचारिक वातावरण आणि संस्थेतील औपचारिक वातावरण यातील फरक सुरुवातीला तरी अंगवळणी पडायला वेळ लागतो. घरी ओळखीचे चेहेरे (तसे ते कार्यालयातही असतात) आणि मनमोकळे आप्त,कुटुंबीय यामुळे कामाचा वेग जरा कमी होऊ शकतो आणि सुस्ती येऊ शकते. शिस्तीचाही बडगा कमी असतो. प्रत्यक्ष देखरेख नसते.

अशावेळी उत्पादक काम तर व्हावे आणि वरील अडचणी येऊ नयेत असं वाटत असेल तर घरबसल्या काम करणाऱ्यांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहेत.

१) आपण पाठवीत असलेले इ -मेल आणि त्यातील मजकूर – बरेचदा लिखाणाचा सूर समोरच्याच्या लक्षात येतोच असे नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता अधिक! तेव्हा “सेंड “करण्यापूर्वी संदेशाचे पुनर्वाचन महत्वाचे कारण इथे समोरासमोर संभाषण /संवाद नाही आणि त्यामुळे खुलासाही नाही. जर आपला सह -कर्मचारी सुद्धा घरून काम करीत असेल तर दूरध्वनीवर समक्ष बोलणे इष्ट! तंत्रज्ञानामुळे व्हिडीओ कॉल किंवा परदेशातील सहकाऱ्यांशी मिटिंग असेल तर पूर्वनियोजित वेळी कॉन्फरन्स कॉल असे पर्याय आता उपलब्ध आहेत.

२) प्रत्येक देशाच्या कालपटाचे (टाईम झोन) भान ठेवावे – विशेषतः सहभागी कर्मचारी विविध देशांमधून कॉन्फरन्स कॉलमध्ये असतील तर त्यांच्या कालपटाचे भान ठेवणे आवश्यक असते. कॉलची वेळ सर्वानुमते ठरविली तर अधिक उत्तम ! अन्यथा रोजची एक विशिष्ट वेळ ठरविली तर त्यानुसार सगळे आपापले काम सांभाळून सहभागी होऊ शकतात. विषयपत्रिका (अजेंडा) आधी कळविला तर अधिक चांगली पूर्वतयारी करता येईल आणि कॉल जास्त फलदायी होऊ शकेल. प्रत्येकाचे ऐकून घेतल्यावरच निर्णय घ्यावा. कॉलची वेळही मर्यादित असेल तर तो प्रभावी ठरू शकतो. त्यानंतर झालेल्या चर्चेची आणि घेतलेल्या निर्णयांची सर्वांना इ -मेल द्वारे माहिती द्यावी.

३) अचानक उद्भवणाऱ्या विषयांसाठी वेळ ठेवणे – कार्यस्थळावर जाता -येता सहज काही अनौपचारिक विषय छेडले जातात, बैठकीच्या आधी किंवा नंतर मुद्दाम थोडा वेळ राखून ठेवला तर विषयपत्रिकेवरील विषयांच्या व्यतिरिक्त इतरही चर्चा होऊ शकतात.

४) अधून मधून मुद्दाम छोटीशी सुट्टी घेणे – कार्यालयात चहा -नाष्टा ,जेवणाच्या सुट्ट्या ठराविक असतात. घरी काम करताना एकसुरीपणा येणे स्वाभाविक असते अशावेळी अधून मधून पाय मोकळे करावेत. बसण्याची पोझ बदलावी. क्रिकेटमध्ये “टाइम आउट” असा संदेश आला की जसे खेळाडू खेळण्यासाठी परततात तसे कामाच्या टेबलवर परतावे. विशेषतः संगणकासमोर बसून सतत काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो अशा वेळी सहज खिडकीतून अथवा दरवाज्यातून बाहेर पाहिले तरी डोळे निवतात. बहुतांशी माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांच्या बाहेर हिरवागार देखावा तयार केला असतो, पाण्याचे प्रवाह सोडले असतात त्यामागे मोकळीक मिळावी ,विरंगुळा मिळावा अशीच संकल्पना असते. तसाही हिरवा रंग डोळ्यांना थंड ठेवतो.

५) कामानंतरच्या कामाचे नियोजन – दिवसाचे काम आटोक्यात आले की थोडी विश्रांती , ध्यानसत्र , संगीत ऐकणे किंवा शारीरिक हालचाली ( मर्यादित व्यायाम) अशा गोष्टींचे नियोजन करावे म्हणजे त्या मानसिक चौकटीतून बाहेर पडता येते. अन्यथा मनात कायम काम आणि कामच घोळत राहते. हे असे शट डाऊन किंवा “ऑन -ऑफ “बटन कायम वापरता आले पाहिजे. घरात काम करत असल्याने कुटुंबीयांबरोबर एखादी चक्करही मन / शरीर ताजे करून जाते. विषय बदलतात, विचार वेगळे येतात त्यामुळे निरोगी मर्यादा आखता येतात.

६) व्यायामासाठी ठराविक वेळ – रोज कॅलेंडरवर शारीरिक हालचालींसाठी वेळ आखून  ठेवावा. त्यामुळे चपळता वाढते आणि आपण सक्रिय होण्याला हातभार लागतो. त्यासाठी व्यायामशाळेतच जाण्याची गरज नाही आणि सध्याच्या लॉक डाउनच्या काळात ते शक्यही नाही. पण आपल्या आवडीच्या एखाद्या गाण्यावर नृत्य करणे, यू -ट्यूब वरील व्हिडीओनुसार हालचाली करणे सहज घरी जमेल. एखाद्या मित्राबरोबर वर्चुअल व्यायाम हा पर्यायही आहे.

७) परस्पर चौकशी /संपर्क – शक्य असेल तर (वर्चुअल) चहापाणी , जेवण असे काही आयोजित केले तर कार्यालयातील लंच -टाइम चे दिवस परतून येतील आणि काहीवेळ तरी कंटाळा ,नीरसता जाईल. त्यानिमित्ताने अनौपचारिक चौकशी करता येईल आणि सहकाऱ्यांची खबरबात मिळेल.

अर्थात सगळीच कामे घरबसल्या शक्य नाहीत. जेथे तंत्रज्ञानाचा पर्याय आहे ( जसे वर्तमानपत्रे इ -पेपर काढताहेत), तेथे तो अवश्य वापरावा. मात्र डॉक्टर, वाहक -चालक , फार्मासिस्ट आणि अन्य अत्यावश्यक सेवा पुरवठादारांना घराबाहेर पडण्यावाचून गत्यंतर नाही. अशांनी चेहेरा मास्कने झाकणे , सामाजिक अंतर राखणे , हात स्वच्छ धुणे ही काळजी घेतलीच पाहिजे.

सध्याच्या अनपेक्षित संकटकाळात संस्थाही शक्य तितका प्रयत्न करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेत आहेत आणि त्याचबरोबर व्यवसाय सुरु ठेवण्याचीही कसरत करीत आहेत. मात्र आव्हाने परीक्षा घेणारी आहेत आणि स्वतःला अशा परिस्थितीशी जुळवून घेण्यावाचून पर्याय नाही.

घरबसल्या काम कदाचित अधिक मोठ्या प्रमाणावर भविष्यात (कोरोना संकटानंतरही) पर्याय ठरू शकेल तो गांभीर्याने हाताळला तर खूप समस्या सुटू शकतील. कदाचित कोरोनाची जगभरातल्या नोकरदारांसाठी ही आनंददायी भेट ठरेल.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 82 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर नऊ पुस्तके ( ६ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..