गेल्या दहा हजार वर्षात… (उत्तरार्ध)

या उत्तरार्ध भागात आपण, आचार्य अत्रे यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती घेणार आहोत…….

आचार्य अत्रे जसे उत्तम लेखक होते, वक्ते होते तसेच ते उत्तम पत्रकारही होते. मराठी भाषेवरच नव्हे तद्दम महाराष्ट्रावर त्यांचे अतोनात प्रेम होते. त्यांनी सुरु केलेले नवयुग साप्ताहिक आणि मराठा दैनिक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. स्वातंत्र्यानंतर भारताची भाषावार प्रांतरचना करण्यात आली. तेंव्हा भाषेच्या निकषानुसार मुंबई, बेळगाव आणि धारवाड ही शहरे महाराष्ट्राला जोडली जाणे स्वाभाविक होते; परंतु तात्कालीन राजकरण्यानी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट घातला होता. त्याच प्रमाणे महाराष्ट्र आणि गुजरात यांचे एकत्रित महाद्विभाषिक राज्य आणायचा खेळ मांडला होता. मुंबई महाराष्ट्रात राहिलीच पाहिजे आणि महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचे राज्य म्हणून अस्तित्वात आलाच पाहिजे या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. या चळवळीची पार्श्वभूमी थोडक्यात देणे आवश्यक आहे त्याशिवाय त्या चळवळीचे महत्व समजणार नाही.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी ‘आर्थिकदृष्ट्या’ जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे आपल्या केंद्रीय नेतृत्वासमोर काही एक चालले नाही. दिल्लीश्वरांची हुजरेगिरी करत एका महान नेत्याने तर “ नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,नेहरु महत्त्वाचे वाटतात ” असे विधान केले.

निराधार होत चाललेल्या महाराष्ट्राला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी;  महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

आधीच अत्रे यांचे लेखन घणाघाती आणि आक्रमक होतेच त्यातून काँग्रेसने त्यांच्या अस्मितेवरच प्रहार केला होता, परिणाम निश्चित होता. आचार्य अत्रेंनी दै. मराठामधून काँग्रेसवर आसुडाचे केलेले शब्दप्रहार वाचून काँग्रेसी नेते लाह्या फुटाव्या तसे तडतडत होते. अत्रेंच्या मराठाने;  मराठी अस्मितेला नवी जाग आणली ” मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ” या ठिणगीने अवघा महाराष्ट्र पेटवला. सरकारने मराठी माणसाला गुंड, दरवडेखोर, बलात्कारी अशी शेलकी विशेषणे देत, दडपशाही करत गोळीबार, लाठी हल्ला केला. अत्रेंनी मुंबईतील दंग्यांची चिकित्सा हा जळजळीत लेख लिहून सरकारचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आणला, अत्रेंच्या शैलीत सांगायचे तर दै.मराठाने जुलमी सरकारचे थोबाड फोडले.”

या काळातील अत्रेंची भाषणे, लेख त्यांच्यातील बंडखोर क्रांतिकारकाची साक्ष देतो. दिल्लीपर्यंत जाऊन मराठी माणसाने लढा दिला तेंव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. प्रदीर्घ संघर्षातून मुंबईसह महाराष्ट्र झालाच पण  १०६ मराठी हुतात्म्यांच्या बलिदानाने रक्तरंजित होऊनच.

असो त्या १०६ हुतात्म्यांमुळेच आमची आजची पिढी ” मुंबई मराठी माणसाची, नाही कुणाच्या बापाची ” असे कीर्तनकारी थाटात म्हणू शकतो याचा विसर कधीही पडू देऊ नये हीच त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आचार्य अत्रे याबद्दल सांगावे तेवढे थोडेच आहे, लेखन मर्यादेचे भान ठेवत तूर्तास इथेच थांबतो परंतु याबद्दल अधिक विस्तृत  माहिती हवी असल्यास आचार्य अत्रे यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्राचा पाचवा खंड जरूर वाचावा.

आचार्य अत्रेंची लेखणी जितकी पुरोगामी होती तितकेच त्यांचे विचार आणि आचार देखील पुरोगामी होते. ते अगदीच नास्तिक नसले तरी, अनिष्ट रूढी, जातीभेद यांचा ते कडाडून विरोध करत. त्यांनी स्वतः दुसरा विवाह हा आंतरजातीय (अर्थातच प्रथम पत्नीच्या निधनानंतर ) केला होता.

विशेष म्हणजे हा काही प्रेमविवाह नव्हता. अंतरजातीय विवाह करावा की नको हा प्रश्न त्यांच्या पुढे नव्हता. त्यांना जेंव्हा स्थळ समजले आणि पसंत पडले, तेंव्हा मध्यस्थीने सांगितले की त्या तुमच्या जातीच्या नाहीत, तेंव्हा अत्रे झटकन म्हणाले “माझ्यासाठी तो प्रश्न गौण आहे, त्यांना जर मी पसंत असेन तर  माझा रुकार कळवा” वाचकांना ही बाब आज वाचताना कदाचित साधी वाटेल परंतु ही घटना १९३०-३२ सालातील आहे त्याकाळी असा निर्णय घेणे ही बाब साधी नव्हती. असा निर्णय घेण्याकरता झुंझार वृत्ती स्वभावातच असावी लागते.

पुण्याच्या पूर्वभागामध्ये बहुजनबहुल वस्तीत मुलींची शाळा काढणारे आचार्य अत्रे हेच होते.

पुणे नगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असताना, भांबुर्डा स्टेशनचे – शिवाजी नगर, रे मार्केटचे महात्मा फुले मंडई, असे नामांतरण करणारे, लाल महालाजवळील उध्वस्त बगिच्याचे पुनरुज्जीवन करून त्या बगीचाचे ” राजमाता जिजाऊ उद्यान ” असे नामकरण करणारे, जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाची पायाभरणी करणारे, सरकारी शाळेतील शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण देण्याकरता ट्रैनिंग स्कूल सुरु करणारे, पुण्याच्या अनेक रस्त्यांचे उत्तम दर्जाचे डांबरीकरण आणि सिमेंटीकरण करणारे आचार्य अत्रे, सत्तेचा उपयोग समाजसेवेसाठी कसा करावा याचा वस्तुपाठच देऊन जातात.

आज अनेक पुणेकरांची जीवनरेखा ठरलेली P M T (बस सेवा) ही देखील आचार्य अत्रेंच्याच कालखंडातील देणगी आहे.

तात्याराव सावरकरांचा ” स्वातंत्र्यवीर ” असा उल्लेख पहिल्यांदया करणारे आचार्य अत्रे, सावरकरांच्या पूर्वास्पृश्याच्या मंदिर प्रवेश चळवळीत आपले मित्र अनंत हरी गद्रे यांच्या सोबत नेहमीच पुढाकार घेत. आचार्य अत्रेंना सावरकरांचा जवळ जवळ १५ दिवस अखंड सहवास लाभला होता. त्यावेळी चित्रपट व्यवसायातील अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द सावरकरांनी सुचवले आणि आचार्य अत्रेंनी ते प्रचलित देखील केले.

समाजातील अनिष्ट रूढींचा कडाडून विरोध करणारे, उपेक्षित समाजाचे दुःख, समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी सतत कैवार घेणारे, संयुक्त महाराष्ट्राची कैफियत तावातावाने मांडणारे आचार्य अत्रे; राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या कीर्तनात रमत असत तर कधी गाडगेबाबांच्या कीर्तनातच संत तुकोबाराय-ज्ञानेश्वर यांच्या अभंगाचे निरूपणही करत हे सांगितल्यास कदाचित खरे वाटणार नाही पण या बद्दल त्यांनी स्वतःच आत्मचरित्रात लिहिले आहे. प्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर यांनी तर अत्र्यांना ” रसिकराज अत्रे ” असे संबोधले आहे.

धिप्पाड देह, पहाडी आवाज आणि कठोर शब्दांतील टीकाकार असणारे अत्रे आप्तजनांमध्ये मात्र नेहमीच शांत आणि सौम्य असत, त्यांच्या झंझावाती दौऱ्यामध्येही त्यांचे आपल्या कुटुंबाकडे लक्ष असे.

असे हे साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, वयाच्या ७१ वर्षी, १३ जून १९६९ रोजी, आपली प्रचंड साहित्य संपदा महाराष्ट्राला अर्पण करून अनंताच्या प्रवासाला निघून गेले.

आचार्य अत्रेंबद्दल लिहिताना शब्दांची मर्यादा नाही परंतु माझ्या बुद्धीची मात्र मर्यादा पडते आणि म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि थांबतो, जाता जाता एवढेच सांगेन की ;

“ आचार्य अत्रे ” एवढे शब्द जरी ऐकले तरी नकळत माझ्या मनात त्यांच्या पहाडी आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो आणि त्यातून एवढेच शब्द ऐकू येतात…

गेल्या दहा हजार वर्षात….

टीप : या लेखांकासाठी आवश्यक ती माहिती, कऱ्हेचे पाणी (आचार्य अत्रेंचे आत्मवृत्त), खंड १, खंड २, आणि खंड ५ यातून घेतलेली आहे.

समाप्त 

© श्रीपाद श्रीकांत रामदासी

Avatar
About श्रीपाद श्रीकांत रामदासी 6 Articles
मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नोकरी करतो. विविध प्रकारच्या लेखनाची आवड असून, चरित्रात्मक लेखनात विशेष रस आहे. काही कविता देखील केल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....