नवीन लेखन...

सेफ्टी मीटिंग

रात्री उशिरा पर्यंत ड्युटी केली असल्याने दुपारी एक नंतर पुन्हा ड्युटीवर जायचे होते. जहाज अमेरिकेच्या फिलाडेल्फियाच्या दिशेने फुल्ल स्पीड मध्ये पाणी कापत चालले होतं. समुद्र शांत होता प्रवाहाच्या दिशेने जात असल्याने जहाजाला चांगलाच वेग मिळाला होता. सकाळी नाश्ता केल्यावर मोकळी हवा खाण्यासाठी ब्रिज डेकवर उभा राहून संथ पाण्यामध्ये जहाजाच्या मागे प्रोपेलरमुळे निळं पाणी घुसळून निघाल्यावर तयार होणारे पांढरे शुभ्र बुडबुडे बघता बघता साडेदहा वाजायला आले होते.
नेहमीप्रमाणे माहिनाखेरीस घेतली जाणारी मंथली सेफ्टी मीटिंग सकाळी साडेदहा वाजता सुरु होणार होती. सेफ्टी मिटींगला ब्रिजवर सेकंड ऑफीसर सोडून इतर सगळ्या खालाशांना आणि अधिकाऱ्यांना हजर राहावे लागते.
आमचा कॅप्टन भारतीय नौसेनेतून निवृत्त झालेला अधिकारी होता. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कॅप्टन ने वयाच्या 18 व्या वर्षापासून काम करायला लागल्यापासून जवळपास 35 वर्षे जहाजावर काम केले होते. कॅप्टन म्हणून 15 वर्षाचा अनुभव असल्यामुळे आणि त्याच्या गंभीर स्वभावामुळे जहाजावर सगळेचजण त्याला वचकून असत. बरोबर साडेदहा वाजता मीटिंग सुरु झाली. कॅप्टन च्या बाजूला चीफ ऑफीसर, चीफ इंजिनीयर आणि सेकंड इंजिनीयर बसले होते बाकी सर्व अधिकारी आणि खलाशी असे सगळे मिळून बावीस जण या चौघांच्या समोर बसले होते. कॅप्टन ने कंपनीच्या फ्लीट मधील इतर जहाजांवर झालेल्या अपघातांबद्दल माहिती देऊन आपल्या जहाजावर तसे अपघात घडू नये म्हणून सूचना दिल्या. पुढील तीन दिवसात अमेरिकेत पोचणार आहोत मग तेथील कोस्ट गार्ड च्या इंस्पेक्शनसाठी तयारी करण्याची सूचना सगळ्या अधिकाऱ्यांना दिली. पेपर वर्क, मेन्टेनन्स, सेफ्टी रेकॉर्डस् , जहाजासह सर्वांचे व्यक्तिगत सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स तयार ठेवायला सांगितले.
कॅप्टन , चीफ ऑफीसर, चीफ आणि सेकंड इंजिनीयर या सिनियर अधिकाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट चार महिन्यांचे इतर ज्युनियर अधिकाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट सहा महिने आणि सर्व खालाशांचे नऊ महिने असे कॉन्ट्रॅक्ट असतात. कॅप्टनला या जहाजावर येऊन जवळपास चार महिने होत आले होते. सेफ्टी मीटिंग मध्ये सर्वात शेवटी कॅप्टन प्रत्येकाला काही बोलायचे असेल तर बोलायची संधी आणि वेळ देत असे. प्रत्येक जहाजावर तशी पद्धतच असते. थर्ड ऑफीसरचा कॉन्ट्रॅक्ट सहा महिन्यांचा पण त्याला सात महिने होऊन गेले होते त्याने घरी जायचा विषय काढला. दोन खालाशांचे दहा महिने पूर्ण झाले होते त्यांनी सुद्धा कॅप्टन कडे आमचं काय या अर्थाने बघितलं. कॅप्टन ने नेहमीप्रमाणे कंपनी कडून अजून काही बातमी नाही एवढंच उत्तर आलं. थर्ड ऑफीसर हरियाणा राज्यातला जाट होता पंचवीस वर्षे वयाच्या थर्ड ऑफीसरच कॅप्टन च्या या उत्तरामुळे डोकं फिरलं. रागाने लाल होत उभं राहून त्याने सर्वांसमोर सांगितलं की फिलाडेल्फियाला पोचल्यावर दुसऱ्या दिवशी मला घरी नाही पाठवलं तर मी त्या दिवसापासून काम करायचं बंद करेन.
कॅप्टनने चेहऱ्यावरचे कोणतेही भाव न बदलता त्याला ” जशी तुझी मर्जी ” एवढं सांगून त्याला खाली बसवलं. कॅप्टन नेहमी गंभीर असायचा पण आज त्याला काहीतरी बोलायचं होत. बराच वेळ गंभीरपणे बोलून झाल्यावर कॅप्टन आता दिलखुलासपणाने बोलू लागला. भारतीय नौसेनेत कसा भरती झाला इथपासून रिटायरमेंट नंतर पुन्हा मर्चंट नेव्हीत कसा जॉईन झाला हे सर्व त्याने थोडक्यात सांगितले. मागील 35 वर्षांपैकी जवळपास अर्ध्याहून अधिक म्हणजे 18 ते 19 वर्षे समुद्रात गेली. नौसेतून रिटायर झाल्यावर रिटायरमेंटचे भरपूर पैसे मिळाले होते पण वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मिळाले लाखो रुपये लांबच्या आणि जवळच्या नातेवाईकांनी लहान मोठ्या अडचणी सांगून जे नेले ते कायमचेच कारण परत तर कोणीच केले नाही पण आज देऊ उद्या देऊ सुद्धा नाही केलं कोणी.
नेव्ही जॉईन केली तेव्हा मुंबईत चाळीमध्ये राहायचो गावावरुन आलेले सगळे नातेवाईक मुंबईतल्या व रूम किचन असलेल्या चाळीत यायचे. नौसेनेत असल्याने मग नेव्ही नगर मध्ये मोठी रूम मिळाली तिथे राहायला कोणी येत नसे पण पैसे मागायला नातेवाईकांपैकी खूप जण येत कोणाची ना कोणाची काहीतरी अडचण असायचीच त्यांना नाही बोलताच येत नसे. जहाजावरून परतल्यावर आपल्याला भेटायला सर्व जण येत आहेत असं वाटायचं. पण भेटायला आलेला प्रत्येक जण त्याची अडचणच घेऊन येत असे.
मुंबईच्या चाळीतली खोली विकून आणि त्यात थोडेफार पैसे टाकून ठाण्यामध्ये कसाबसा फ्लॅट घेतला होता. घरी आई वडील आणि लहान बहीण होती नौसेनेत असताना बहीणीसाठी काय करू अन काय नको असं वाटायचं. तिचे कपडे फॅशन कॉलेज या सर्वांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. तिच्या लग्नामध्ये कमी पडायला नको म्हणून कर्जसुद्धा काढलं. आज करू उद्या करू असे करता करता कॅप्टन झाल्यावर वयाच्या पस्तिशी नंतर लग्न केले पण त्यापूर्वी नौसेतून रिटायर होऊन खाजगी शिपिंग कंपनी मध्ये नोकरी लागली होती. ठाण्याच्या फ्लॅटवर बहिणीचे आणि बायकोचे क्षुल्लक कारणावरून बिनसले तेव्हापासून बहीण तिच्या भावाला पण हाक मारेनाशी झाली. ज्या बहिणीसाठी एवढा जीव टाकला जीचे एकापेक्षा एक लाड पूर्ण केले ती एखाद्या क्षुल्लक कारणामुळे नाव घेत नाही यामुळे इतर नातेवाईकांनी त्यांच्या अडचणी सांगून नेलेले पैशांचं काहीच मोल राहील नाही. मोबाईल ,व्हाट्सएप आणि फेसबुक आहे, या सर्वांचा शोध लागायच्या पहिले जहाजावरून सॅटेलाईट फोनवरून सगळ्या नातेवाईकांना फोन करायचो त्यावेळी प्रत्येकजण ख्याली खुशाली विचारायचा पण आता मोबाईल, व्हाट्सएप आणि फेसबुक मुळे अस वाटत कि तेव्हा आपण सर्वांना फोन करायचो म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून सगळेजण आपली खुशाली विचारायचे अस वाटतं. महिन्याला हजारो रुपये सॅटेलाईट फोनवर खर्च व्हायचे. सख्खे ,चुलते, भाचे ,पुतणे जमेल त्यांना जमेल तेव्हा फोन करायचो. जहाजावरून जाताना सगळ्यांना काही ना काही तरी घेऊन जायचो. हळू हळू लक्षात यायला लागलं की आपण सर्वांना काही ना काही घेऊन जातो पण त्या वस्तू घेऊन कोणाला मनापासून आनंद झालेला दिसत नाही. अरे हे काय आणलं याच्यापेक्षा दुसरं काहीतरी चांगल का नाही आणलं असा प्रश्न बऱ्याच जणांच्या चेहऱ्याआड लपलेला दिसायचा. पस्तिशी नंतर लग्न झाल्याने पन्नाशी उलटून गेल्यावर सुद्धा मुली अजून जेमतेम कॉलेजला जाण्याऐवढयाच मोठया झाल्या. दोन मुलीचं झाल्या पण दुसरी मुलगी होऊनसुद्धा आनंदच झाला होता मुलगा नाही म्हणून कधीच वाईट वाटले नाही. पहिली मुलगी एक महिन्याची असताना जहाजावर गेलो आणि परत येईपर्यंत ती गुडघ्यांवर रांगायला लागली होती. एकीला पायावर उभं राहून चालतांना बघितलं तर दुसरीला गूडघ्यांवर त्यामुळे तीच पहिल्यांदा उभं राहणं आणि चालणं नाही बघता आलं. स्वतःसह मुलांच बालपण आणि त्यांच्या बालपणातील सुख प्रत्येक वर्षी अर्ध याप्रमाणे आयुष्यातून डिलीट होत गेलं. जहाजावर आलो की आयुष्य डिलीट झाल्यासारखं वाटतं ते उगाचच नाही. कामाचा ताण जहाजावरील जीवन आणि खराब हवामानामुळे येणारे गंभीर प्रसंग निभावून नेण्यात अर्ध आयुष्य कसं जात ते आपल्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा समजावून सांगता येत नाही. एकट्यानेच स्वतःच अर्ध आयुष्य जगायचं एकट्यानेच स्वतःची समजूत घालायची एकट्यानेच स्वतःला सावरायचं कारण एकट्याच हे एकटं आयुष्य एकट्यानेच निवडलं आहे. पन्नाशी उलटून गेली आई वडील बहीण बायको आणि जन्म दिलेल्या दोन मुलींपैकी किंवा इतर नातेवाईकांपैकी कोणीही कधी आपुलकीने बोलत नाही की बस झाली जहाजवरची नोकरी. सुरवातीला पैसे मिळावे म्हणून वर्षातले सहा महिने काढावे लागायचे आता पैसे वाचावे म्हणून सहा महिने काढावे लागतात. जेव्हा पगार कमी होता तेव्हा जास्त महिने काम करावं लागायचं आणि एन आर आय स्टेटअस आपसूकच मिळायचा, आता पगार जास्त आहे म्हणून एन आर आय स्टेटअस मिळावा म्हणून आपसूकच जास्त महिने काम करावं लागतं. सगळे लांबचे जवळचे नातेवाईक त्यांच त्यांचं आयुष्य जगत असताना खलाशी एकटाच स्वतःच एकटं आयुष्य जगत असतो.
समुद्राला लागून असणारे कित्येक देश पहिले अनेक मोठमोठ्या शहरात फिरायला मिळालं. बायको पोरांना बऱ्याच वेळा परदेशात फिरायला पण नेलं, शॉपिंग केलं.
जहाजावर असताना पुन्हा घरी जायला मिळेल या एकाच आशेवर दिवस आणि महिने काढावे लागतात. घरी आल्यावर पुन्हा जहाजावर जावं लागेल या कल्पनेने निराश व्हायला लागतं.
कधी जेवला? काय करतोस? कसं वाटतंय आज? थकायला झालं का ? कामाचा खूप ताण आहे का ? कोणी काही बोलल का? झोप पूर्ण झाली का? असं कोणी तरी विचारावास वाटतं व्हाट्सअप आणि फेसबुक आल्यापासून तर जास्तच वाटतं कारण हल्ली प्रत्येकाकडे तेच तर असतं. बोलायला वेळ नसतो मुड नसतो. पण कोणाला दोन ओळी टाईप करायला काही क्षण पण नसतात का ? बालपण आणि शिक्षण होईपर्यंतच आयुष्य सोडल्यानंतर जहाजावर नोकरी करायची असेल तर अर्ध आयुष्य असच एकट्याने घरी कधी जायला मिळणार आणि घरी आल्यावर पुन्हा जहाजावर जावं लागायची वाट बघण्यातच जाणार. जहाजावर हल्ली पर्यावरणविषयक कायदे आणि नियमांमुळे जहाजांचे बिझी शेड्युल त्यामुळे पाळावे लागणारे वेळेचे गणित यामुळे प्रत्येकाला एवढा स्ट्रेस आणि दडपण आहे त्यामुळे जहाजावर एकमेकांशी कोणी धड बोलत सुद्धा नाही. जेवण आणि ड्युटी याखेरीज एकमेकांसमोर कोणी येत नाही. सगळे जण आपापल्या केबिन मध्ये जाऊन स्वतःला कोंडून घेत असतात. स्वतःचा करून घेतलेला कोंडमारा इतरांना पटवून देता येत नाही आणि तसही स्वतःचा कोंडमारा इतर कोणाला समजण्याच्या पलीकडेच असतो. पैशांसाठी स्वतःच अर्ध आयुष्य एकट्याने जगावं लागतं आणि उरलेल्या अर्ध्या आयुष्यात कमावलेले सगळे पैसे सगळ्यांसाठी खर्चावे लागतात. या अर्ध्या आयुष्यमुळे ना कोणाला पैशांची कदर असते ना स्वतःची कदर असते. अर्ध आयुष्य फक्त पैसे कमवायचे आणि उरलेल्या अर्ध्या आयुष्यात खर्च करायचे ते संपले कि पुन्हा कमवायला अर्ध आयुष्याचे चक्र पुन्हा पुन्हा फिरवत राहायचं. जहाजावर येणारा एकपण खलाशी जहाजावर असताना त्याच्या कमाइतली दहा टक्के रक्कम सुद्धा खर्च करत नाही. पण जेव्हा घरून पुन्हा जहाजावर येतो तेव्हा त्याने कमावलेल्या रकमेपैकी दहा टक्के रक्कम सुद्धा शिल्लक नसते. प्रत्येक जण जातांना सांगतो की परत येणार नाही पण परत गेल्याशिवाय दुसरं काही करता येत नाही हे पण तितकच खरं असतं. घरी गेल्यावर काही दिवस चौकशी होते सगळ्यांकडून पण जस जसे दिवस वाढत जातात तस तसे आपणच नकोसे होत जातो अस लक्षात यायला लागतं.
जहाजावर जायला निघाल्यावर जेवढे डोळे दुःखाने भरून येतात त्याच्यापेक्षा जास्त डोळे घरी येताना भरून येतात पण ते एकट्याने काढलेल्या आयुष्याच्या दुःखाने असतात की घरी जाण्याच्या आनंदाने असतात नेमकं तेच समजत नाही. पूर्वी जहाजावर दारू मिळत असल्याने बरचसे जण दारू पिऊन नशेत वेळ घालवायचे पण आता झिरो अल्कोहोल पॉलिसी मुळे बऱ्याचजणांना फक्त सिगारेटचाच आसरा राहिला आहे.
कॅप्टन जवळपास तासभर बोलत राहिला एरव्ही तासाभरात आटपणारी मीटिंग दोन तास चालली. कॅप्टन जे बोलत होता ते ऐकून स्वतःची कीव येऊन कॅप्टन बोलत असताना तीन चार खालाशांचे डोळे पाणावले होते. एरव्ही तासभर चालणारी मीटिंग दोन तास चालली साडेबारा वाजल्याने जो तो जेवायला उठला. जेवून झाल्यावर ड्युटीवर जाणारे ड्युटीवर गेले आणि इतरांनी नेहमीप्रमाणे स्वतःला आपआपल्या केबिन मध्ये कोंडून घेतलं. जेवढा मोठा अधिकारी तेवढा त्याला कामाचा ताण आणि दडपण जास्त त्यामुळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट कमी महिन्यांचे. खालाशांना काम जास्त पण कामाचा ताण नाही म्हणून त्यांना नऊ किंवा दहा महिने कॉन्ट्रॅक्ट.
ज्युनियर अधिकाऱ्यांना सुरवातीला पाच सहा महिने आणि सिनियर अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात पण जरी कॉन्ट्रॅक्टचे महिने कमी कमी होत गेले तरी जहाजावर चढल्याबरोबर येणारा ताण आणि दडपणाने येणारा प्रत्येकजण एक प्रकारचा उदासपणा आणि एकटेपणा सोबतीला घेऊनच येतो.
मोबाईल, व्हाट्सएप, आणि फेसबुक आल्यापासून जहाजावरील वातावरण खूप बदललं. टेक्नॉलॉजिमुळे माणसं नुसती जवळ आल्यासारखी भासतात पण खर पाहिलं तर ती एकमेकांपासून दूर गेलेली असतात. लांब राहताना पत्रामध्ये लिहून आणि फोनवर बोलून जेवढं व्यक्त होऊन समाधान मिळायचं तेवढं समाधान मोबाइलवर व्हाट्सएप आणि फेसबुकवर मेसेज टाकून नाही मिळत. पत्रात आणि फोनवर बोलताना स्वतःच्या भावना व्यक्त व्हायच्या पण फेसबुक आणि व्हाट्सएप वर फक्त कॉपी पेस्ट व्हायला लागल्यात.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनीयर
कोन ,भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 106 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..